माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या प्रत्येक वेळी काही ना काही सनसनाटी बातमी घेऊनच येतो. गेल्या आठवड्यात तो खेड येथील गोळीबार मैदानात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर आव्हानसभेला जाऊन आला. भाजप आणि शिंदे गटाचे दास झालेले शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांचा नवा अवतार पाहण्याची पोक्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण त्याला एक प्रश्न पडला होता, तो म्हणजे शिंदे यांच्या सभेत त्यांनी भाषण सुरू केलं की बहुसंख्य लोक उठून घरी का जातात? ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ घोषणा करत असतानाही सभेतील लोक त्यांच्या भाषणाकडे पाठ का फिरवतात? एवढी आश्वासनं ते अख्ख्या महाराष्ट्राला देत असताना लोक त्यांचं भाषण सुरू झालं की खुर्च्या का सोडतात? असा कोणता व्हायरस त्यांच्याकडून बाहेर पडतो की त्यामुळे लोक त्यांचं भाषण ऐकायचं सोडून पळपुटेपणा करतात?
वरळी कोळीवाड्यात तेच झालं आणि खेडच्या सभेतही तेच! मी त्यांच्या भाषणाच्या शैलीचा आणि विचारांचा अभ्यास केला आहे आणि काही निष्कर्ष काढले. मुळात जाहीर सभेतील भाषणं हा सीएमचा प्रांत नाही. डोक्यावर सतत मुख्यमंत्रीपद जाण्याची टांगती तलवार, त्यात फडणवीसांच्या अतृप्त इच्छेमुळे त्यांना वारंवार आपल्यापेक्षा कमी लेखण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, त्याशिवाय स्वत:च्या गद्दारीविषयी मन खात असल्याची बोच, मोदी-शहा आणि भाजपच्या फालतू नेत्यांपुढे कधी नव्हे ती लोटांगणं घालण्याची आलेली पाळी, भाजपचा आपल्याला वापरून घेऊन फेकून देण्याचा कट हे सारं डोक्यात भरल्यामुळे, डोक्यात उरलेला गोंधळ यामुळे या माणसाचा आत्मविश्वासच धुळीला मिळालेला आहे. आपल्या या अशा वागण्याला बाळासाहेब कधीच क्षमा करणार नाहीत याचाहीr खात्री त्यांच्या अंतर्मनाला असल्यामुळे भाषणात काय बोलावं याचा त्यांच्या मनात गोंधळ उडतो आणि प्रत्येकवेळी कुठल्याही भाषणात तेच तेच मुद्दे घोळवून उसनं अवसान आणल्यासारखं ना शेंडी ना बुडखा अशा पद्धतीचं त्यांचं भाषण होतं. अतिशय नीरस, कंटाळवाणं आणि ठरावीक साच्याचं अतिशय विस्कळीत पद्धतीचं हे भाषण असतं. एका खालच्या पट्टीत ते बोलतात. मग मध्ये कुठेतरी मूळ सेनेवर बोलताना टाळ्या मिळाव्यात म्हणून वरची पट्टी लावतात. पण त्याचा श्रोत्यांवर काडीचाही परिणाम होत नाही आणि टाळ्याही मिळत नाहीत. एखाद्या यांत्रिक रोबोसारखं हे भाषण असतं. ते ऐकत बसून वेळ घालवण्यापेक्षा लवकर घरी जावं म्हणून लोक पांगतात आणि हळूहळू खुर्च्या रिकाम्या होतात. मुळात ओढून ताणून केलेले आवाजातील चढउतारही श्रोत्यांना कृत्रिम वाटतात. मूळ विचारच खोटे असल्यामुळे त्यात प्राण नसतो, तेज नसते, तर नुसती फुकाची दम नसलेली बडबड असते.
त्या दिवशी लोक मुळात मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेच नव्हते. एकतर गर्दी बाहेरून जमवलेली होती. जे लोक आले होते ते दुसरे गद्दार भाजपदास कंडम हे मूळ शिवसेनेवर आणि नेतेमंडळींवर किती भयानक आवाजात आणि किती लिटर विष ओकतात हे पाहण्यासाठी. मुळात यांच्या अभद्र अविचारांना ऐकण्याचीही त्यांची इच्छा नसते. पण हे किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचं निरीक्षण त्यांना करायचं असतं. अतिशय अशुद्ध आणि शिवराळ भाषेत बोलणार्या या कंडमची डाळ येत्या निवडणुकीत शिजणार नाही याची जाणीव त्यांना स्वत:लाही आहे. मग आपली ताकद दाखवण्यासाठी मुंबई व इतर ठिकाणाहून सभेसाठी भाड्याने माणसं आणून आपली बेअक्कल पाजळणं हा एकमेव उपाय त्यांच्यापाशी होता. पण खाल्लेल्या मिठाला न जागण्याचा आणि स्वत: काजवा असून स्वत:ला सूर्य समजण्याचा मूर्खपणा असलेच बेअक्कल लोक करू शकतात. धड बोलता आणि लिहिताही न येणार्या आणि भानगडबाज, कुप्रसिद्ध दादाची ड्रायव्हरगिरी करणार्या या कंडम दगडाला बाळासाहेबांनी शेंदूर फासला आणि त्याने स्वप्नातही बघितली नसेल अशी आमदारकीची दुनिया दाखवली. पण शेवटी दगड तो दगडच. बाळासाहेबांनी अशा कितीतरी दगडांना देवपण दिलं. पण ते सांभाळण्याची अक्कल लागते. ती बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी करून अलिबाबा व चाळीस चोरांनी मातीमोल केली. ज्यांचं मीठ खाल्लं त्यांच्याशीच बेईमानी केली. अशी डोक्यात हवा गेलेली माणसं भाजपने त्यांच्या डोक्यात आणि खोक्यात आणखी हवा भरल्यामुळे त्यांच्या मेंदूवर या हवेचे थर बसले आहेत. त्यांची सारासार विचार करण्याची शक्तीही नाहीशी झाली आहे. आपण कुठे होतो आणि आता कुठल्या चिखलात पडलो आहोत, याची जाणीव त्यांना निवडणुकीत पडल्यावर होईल. शिवसेनेच्या प्रमुखाने त्याबरोबर असलेली सुडाची भावना ज्यावेळी बदला घेण्याच्या रूपात परिवर्तित झाली त्याचवेळी या दगडांचा कोळसा झाला. निवडणुकीत हे गद्दार कुठल्याकुठे फेकले जातील आणि त्यांचे तांबा-पितळ उघडे पडून ते भंगारात जातील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. शिवसेनेच्या नावाचा सुरुवातीला फायदा करून घेणारे आणि नंतर शिवसेनेच्या नावावर जनतेची कामे, विकासकामे करणारे गद्दार या कामांच्या भिंतीत कोरलेल्या संगमरवरी पाटीवर शिवसेनेचे आमदार किंवा नगरसेवक हे बिरूद आपल्या नावापाठी न लावता केवळ कार्यसम्राट अशी त्यांनी स्वत:च स्वत:ला बहाल केलेली पदवी लावतात, तेव्हाच यांच्या डोक्यातून शिवसेना केव्हाच त्यांनी काढून टाकली आहे, हे लक्षात येतं. शिवसेनेपेक्षा स्वत:ला मोठे समजणारे गद्दार शेवटी आमदार किंवा माजी आमदार राहात नाहीत, तर गद्दार म्हणूनच लोकांच्या लक्षात राहतात.
पोक्याने त्याचा निष्कर्ष मला सांगितला, तेव्हा मी त्याची पाठ थोपटली. जो बाळासाहेबांच्या शिवसेनेला नडला, त्याचा कार्यभाग बुडाला, असं म्हणून मी त्याचं कौतुक केलं.