‘एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा’ असा मेसेज आला आणि मी चक्कर येऊन खाली पडायचीच बाकी होते. एकादशी, चतुर्थी, रविवार, विकेंड, अमुक महाराज प्रकट दिन अशा कोणत्याही दिवसाचे कारण काढून रोजच कसल्या तरी शुभेच्छा इनबॉक्समध्ये आदळतच असतात. पण एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा सर्वप्रथम देऊन धन्य होणारा हा फूल कोण याची मला भयंकर उत्सुकता वाटली. आपण सोडून जगात बाकीचे सगळे मूर्ख आहेत या गोष्टीवर सगळ्यांचा एवढा विश्वास आहे की हा मेसेज आपल्यासाठी नाहीच असे समजून प्रत्येक जण समोरच्याला मूर्ख बनवत या शुभेच्छा पुढे पाठवतो आहे.
या एप्रिल फूल्स डे बद्दल वाटलेल्या उत्सुकतेपायी मी गुगल विद्यापीठात या दिवसाचा भरपूर अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की आपल्याकडेच फक्त तारीख, तिथी यांचा गोंधळ नसून तो तर सगळ्याच देशांमध्ये आहे. एक एप्रिल हा दिवस मूर्खांचा दिवस म्हणून का साजरा केला जातो याची माझ्या पद्धतीने मी काही कल्पना केलेली होती. म्हणजे असं की या दिवशी एखाद्या देशामध्ये मूर्ख लोकांनी आमचं स्वतंत्र राज्य हवं किंवा देश हवा म्हणून कोणा राजावर मोर्चा नेलेला असणार किंवा आम्हाला सरकारी कामकाजात आमचे स्वतःचे आरक्षण हवे म्हणून आमरण उपोषण केले असणार. असे काहीतरी विलक्षण या दिवशीचे महत्व असणार. अर्थात हे आपल्या देशात घडलेले असणे शक्यच नाही. एकतर आपल्या देशात ‘मी मूर्ख’ असे कोणी मान्यच करणार नाही आणि मान्य केले तरी सरकारी नोकरीत वेगळी जागा मागण्याचे काही प्रयोजन नाही.
पण साधारण पावणेदोन तासांच्या अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले की मूर्खांनी केलेल्या कुठल्याही विलक्षण गोष्टीमुळे हा दिवस जन्माला आलेला नाही, तर कित्येक देशांत या संदर्भात कित्येक वेगवेगळ्या कहाण्या प्रचलित आहेत. हे म्हणजे फसकीची, शिवामुठीची, खुलभर दुधाची अशा एकाच सोमवारच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्यासारखे आहे.
पहिली कहाणी समोर आली ती इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा आणि बोहेमियाची राजकन्या यांनी लग्न करण्याचे ठरवले आणि ३२ मार्च १३८१ ही लग्नासाठीची तारीख सगळ्यांना कळवली. हा दिवस सांगून त्यांनी सगळ्यांना मूर्ख बनविले म्हणून ३१ मार्चच्या पुढचा दिवस १ एप्रिल हा फूल्स डे म्हणून साजरा करण्याची पद्धत पडली म्हणे! एकूणच कहाणीच्या सत्यतेविषयी मला शंका आहे. मुळात या इंग्लंडच्या राजेरजवाड्याना नाही उद्योग. यांच्याकडे नावांचा तोटा असल्यासारखे काय करतात? दुसरा तिसरा असे करून मुलांना बोलावतात. किमान सात पिढ्या तरी नाव रिपीट करू नये अशी सूचना मी त्यांना पाठवली आहे. लवकरच ती अमलात आणू अशी खात्रीदेखील त्यांनी मला दिली आहे. तर अशा या रिचर्ड दुसर्याने कुठल्याशा राजकन्येशी लग्न करण्याचा मूर्खपणा केला. लग्न करणे हाच मूर्खपणा आहे हे त्यांना काही वर्षांनी लक्षात आले असणार पण उपयोग काय? तर असा मूर्खपणा केला ते केला, वर लोकांना चुकीची तारीख कळवली. आमच्या देशात असे घडले असते तर लोकांनी तारीख न बघता, ‘आम्ही लग्नाला येऊन गेलो. मागच्या रांगेत बसलो होतो. पुढच्या वेळी जेवणाची गुणवत्ता सुधारायला वाव आहे, जेवणात गुलाबजामऐवजी जिलबी ठेवा,’ असेही कळवले असते. पण इंग्लडमध्ये लोक मूर्ख बनले आणि शिक्षा अख्ख्या जगाला भोगावी लागली.
दुसरी कहाणी म्हणजे १५६४मध्ये फ्रान्सचा राजा चार्ल्स नववा याने नवीन वर्ष १ जानेवारीपासून चालू होईल असे जाहीर केले. त्याप्रमाणे नवीन कॅलेंडर बनवून घेतले. तरीही बरेच लोक जुन्या पद्धतीप्रमाणे ईस्टरपासून नवीन वर्ष सुरू करीत. ईस्टर एप्रिल महिन्यात येत असल्याने एप्रिलचा पहिला दिवस या पद्धतीने वर्ष सुरू करणार्या मूर्खांचा दिवस म्हणून हेटाळणी केली जाई. आता आपलं कॅलेंडर पाळत नाही म्हणून समोरच्याला एकदम मूर्ख ठरवायचे म्हणजे कठीणच आहे. फ्रान्समध्ये जे घडले तेदेखील आपल्या देशात घडणे अशक्यच. म्हणजे असे कॅलेंडर बदलले असतेच तर आमच्या विचारस्वातंत्र्यावर गदा यापासून ते तुम्ही म्हणताय का मग तर मुळीच बदलणार नाही
कॅलेंडर, असे म्हणण्यापर्यंत सगळं काही आपल्या लोकांनी केलं असतं; पण नवीन कॅलेंडर काही स्वीकारलं नसतं. आपली राजकीय विचारसरणी न आवडणार्या व्यक्तीला मूर्ख मानण्याची प्रथा तशी सगळीकडेच आहे. पण कॅलेंडरसाठी जगाला मूर्ख ठरवणार्या चार्ल्सला त्यामुळेच कालनिर्णय, महालक्ष्मी, दाते पंचांग, असे कुठल्याही दिनदर्शिकेत स्थान मिळाले नसते.
कुठल्याही दिवसाबद्दल आणि माणसाबद्दल गोंधळ उडाला असेल तर त्याबद्दलची उत्सुकता काहीच्या काही वाढते. तद्वतच या फूल्स डेबाबत घडले असावे. तर असेच ४-५ शतकांत वेगवेगळ्या पद्धतीने या फूल्स डेचा उगम सांगितला आहे. त्यामुळे अर्थातच लोकांचा गोंधळ उडालेला आहे.
तुमचा कुत्रा हरवला, तुझ्या मैत्रिणीचा फोन आलाय घे, माझ्या पोटात दुखतंय असे काहीही कारण सांगत लोक एकमेकांना मूर्ख बनवत असतात. असली फालतू कारणे सांगून मूर्ख बनवणे म्हणजे आपल्या आवडत्या नेत्याला निवडून दिले तर तो खरंच चांगलं काम करेल अशी अपेक्षा ठेवण्यासारखे वेडेपणाचे आहे.
माझे तर मत असे आहे की मूर्ख बनण्यावर देखील माणसाचा विश्वास बसायला हवा असे कारण सांगावे. म्हणजे जसे की बॉसने फोन करून ‘तुझी संपूर्ण पीएल मंजूर झाली आहे,’ असे जरी सांगितले तरी तो एप्रिल फूल होईल. ‘या वर्षी आपल्या विभागाची जी प्रगती झाली ती केवळ तुझ्यामुळेच हे व्यवस्थापन मंडळाला सांगून मी तुझे प्रोमोशन मंजूर करून घेतले आहे,’ एवढे जरी आपल्या ऑफिसने सांगितले तरी आपण सहजच मूर्ख बनून जाऊ.
हवामान खात्याने केवळ खरा हवामानाचा अंदाज सांगितला तरी आपले मूर्ख बनणे कठीण नाही.
सरकारने कुठले का होईना केवळ काम केले तरी आपण तद्दन मूर्ख असल्याची जाणीव आपल्याला क्षणार्धात होईल. किराणा माल विकणार्याने मूर्ख बनवण्यासाठी एखादा दिवस मालात भेसळच करू नये. मोठ्या उद्योगपतीने मूर्ख बनवण्याचे काम म्हणून प्रामाणिकपणे उद्योग करावा, बँकेबरोबर प्रामाणिक व्यवहार ठेवावेत. आपोआप देश मूर्ख असल्यागत त्याला वागवू लागेल.
एकमेकांना मूर्ख बनवण्यासाठी आपण माणूस म्हणून वागलो तरी पुरेसे आहे.
कारण जिथे ‘मुँह में राम, बगल में छुरी’ याची इतकी सवय झाली आहे की तीच जगण्याची पद्धत आपल्याला वाटू लागली आहे. आपण जन्मतःच मूर्ख बनतो आहोत आणि मरेपर्यंत आपण मूर्ख बनलो हे मान्य करणेही आपल्याला कठीण जात असते.
‘या फोटोवर क्लिक करा आणि बघा जादू’
‘या हिरोईनने दिला बकरीच्या पिलाला जन्म’
‘बारा मुले असूनही ती आई नाहीच’
‘तुमच्या या सवयीमुळे वाढू शकते तुमचे वजन’
अशा थुक्रट बातम्यांनी रोजच जिथे आपली ऑनलाईन वृत्तपत्रे आपलं लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला मूर्ख बनवतात, तिथे वेगळ्या मूर्खांच्या दिवसाचे प्रयोजनच काय?
कुठला तरी बुवा काळी जादू करून रोज शेकडोंना गंडा घालत असतो. जमतारासारखं संपूर्ण गाव जगाला मूर्ख बनवून मोकळं झालंय. शेयर बाजारात रोजच कुठे तरी कोणी तरी कोणाला तरी करोडोचे चंदन लावत असते. बिल्डर, राजकारण, सरकार, राज्यकर्ते असे सगळेच मिळेल त्या मार्गाने मूर्खांचे उत्पादन करण्यात गुंतले आहेत, तिथे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा?
कोणाला मूर्ख कसे बनवावे असा प्रश्न मी गुगलला विचारल्यावर मला पहिली टिप मिळाली की कोणालाही झोपेतून उठल्यावर पहिल्या अर्ध्या तासातच एप्रिल फूल बनवावे. जोवर माणूस तारीख पाहात नाही तोवर त्याला मूर्ख बनवण्यात मजा आहे. आपण भानावर येण्याच्या आधी कुठला तरी धर्म, कुठली तरी जात आपल्याला चिकटवली जाते. भानावर येण्याच्या आधी आपली ओळख तयार करणे, भानावर येण्याआधी आपला मतदार तयार करणे, भानावर येण्याआधी अनुयायी तयार करणे हे मूर्ख बनवणे नाही तर काय?
खूप वेळा मी विचार करते की मूर्ख बनवण्यामागे कुठली आदिम प्रेरणा असावी? अगदी पुरातन काळापासून माणसाला एखाद्याला मूर्ख बनवायला आवडते. माझा तर असा अंदाज आहे की आदिमानव देखील असा एकमेकाला मूर्ख बनवीत असणार. म्हणजे बायकोने शरीराला लपेटण्यासाठी नारळाच्या मोठ्या झावळ्या मागितल्यावर हा मेथीची बारीक रोपटी खुडून आणत असणार आणि कसे मूर्ख बनवले म्हणून हसत असणार.
मी शहाणा आणि तू मूर्ख ही भावनाच माणसाला एक प्रकारचा अहं देत असावी. श्रेष्ठत्वाची भावना देत असावी. त्यातूनच एखाद्याला मूर्ख बनवण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असणार. रोज रोज, रात्रंदिवस आपण फूल्स बनवतही असतो आणि बनतही असतो. म्हणूनच म्हटलं, एप्रिल फूल बनवण्याचं प्रयोजनच काय? इथे तर फूल्स खिले हैं गुलशन गुलशन.