त्यादिवशी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या सकाळी माझ्या घरी आला तो ‘चुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणं म्हणतच. मी मनात म्हटलं, मूडमध्ये दिसतोय. गाऊंदे. कारण आनंदाचे क्षण आमच्या दोघांच्या आयुष्यात फार कमी येतात आणि आनंद झाला असला तरी आनंद व्यक्त करण्याची इतकी मराठी, हिंदी गाणी असताना तो ‘चुम्मा चुम्मा दे दे’च का गातोय? सकाळी सकाळी त्याच्या ‘लिव्ह इन’ पत्नीने नाश्ता देता देता त्याला निसटता किंवा कडकडीत चुम्मा देऊन खूष तर केलं नसेल ना! त्याशिवाय तो असलं फाजील की फजूल गाणं असं मोठमोठ्याने गात माझ्या घरात प्रवेश करणारच नाही.
असो. मी त्यामागचं कारण त्याला अजिबात विचारलं नाही आणि विचारणारही नाही. आपल्याला कुठे असल्या चुम्मा प्रकाराचा अनुभव आहे! त्या मानाने पोक्या भाग्यवान. प्रत्यक्ष विवाहबंधनात न अडकता त्याने कायदेशीर ‘लिव्ह इन’मध्ये राहून पतीचे सगळे हक्क मिळवले म्हणून मला त्याचं कौतुकही वाटतं आणि दयाही येते. आपण कसे बघा, एकटा जीव सदाशिव. डोक्यावर किंवा मनावर कसलंही ओझं नाही. दादा कोंडकेंच्या या चित्रपटामुळे आठवलं आणि दादांच्या चित्रपटांतील गाण्यांमध्ये असे चुम्म्याचे प्रसंग आहेत का हे तपासण्यासाठी मी ते आठवू लागलो. तेव्हा सर्वात आधी ‘मुका घ्या मुका’ चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यांच्या इतर चित्रपटांतील गाण्यांमध्ये तर सगळं चुम्म्याच्या पुढचं होतं. पण ते कधी हिडीस, बीभत्स किंवा व्हल्गर नव्हतं. ‘ढगाला लागली कळं’ या ‘सोंगाड्या’तील गाण्यासह द्वर्थी शब्दांची उतरंड त्यात असायची, पण ऐकताना त्यात कधी अश्लीलतेची झाक कोणाच्याही मनाला स्पर्श करत नसे. उलट त्यांच्या या प्रतिभासामर्थ्याला आणि गीतरचनेला दाद मिळत असे. सेन्सॉरने आक्षेप घेताच त्यांनी आपली बाजू स्पष्ट करताना सेन्सॉरचीही दांडी गुल केली.
पोक्याच्या ‘चुम्मा चुम्मा दे दे’ हे अमिताभ इतक्याच अतिपुरुषी आवाजात त्याने गायलेल्या गाण्यामुळे ‘चुम्मा’ या शब्दाची व्याप्ती चित्रपटगीतांमध्ये पूर्वीपासून किती पसरली आहे, याची याद आली आणि ना. सी. फडके यांच्यापासून काकोडकरांपर्यंतच्या कादंबर्यांमध्ये विविध प्रकारच्या किती चुम्म्यांची रेलचेल असेल, या विचाराने मस्तकच भरकटलं. हिंदी चित्रपटांत तर ‘छू लेने दो नाजूक होठों को’पासून मराठीत कवयित्री शांता शेळके यांच्या ‘प्रीती जडली तुझ्यावरी’ या गाण्यात ‘ओठांवर जे थरथरते ओळखशील का सांग कधी?’पर्यंत या प्रेमातील भावनांचे पडसाद आहेत. उर्दूमध्ये या ‘चुम्म्या’ला ‘बोसा’ म्हणतात. आज विद्याधर गोखले असते तर त्यांनी या ‘चुम्म्या’चा चुंबन विस्तार खुलवून खुलवून सांगितला असता.
इंग्लंड-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या पाश्चात्य देशांत या ‘चुम्मा’ प्रकारांना सार्वजनिक ठिकाणी बंदी नाही. रस्त्यावर, बागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चालता, बोलता, उठता, बसता दोन जीव अगदी सहजपणे हा प्रकार करू शकतात. आपल्या देशात मात्र त्याला कायदेशीर बंदी आहे. तरी चोरी छुपे, बागेत, चौपाटीवर, बसस्टॉपवर असे प्रकार होताना दिसतात. प्रेमात आकंठ बुडालेल्यांच्या बाबतीतच हे प्रकार किंवा गैरप्रकार शक्य असतात. काही राजकीय व्यासपीठांवर एखाद्या स्त्री नेत्याच्या बाबतीत त्यांचे वरिष्ठ नेते असे प्रकार करत असल्याचे दाक्षिणेतील राज्यांमधील काही व्हिडीओ यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. पडद्याआड, खासगी जीवनात काहीही करा, पण आजूबाजूला जनतेचा, गर्दीचा रेटा असताना भर व्यासपीठावर किंवा मिरवणुकीत असले चुम्मा-चुम्मीचे प्रकार करून सार्वजनिकरीत्या आपल्या मैत्रीच्या नात्याचं प्रदर्शन करू नका, असंच जनता जनार्दन हात जोडून सांगेल.
अशा प्रकारांना ‘नकळत सारे घडले’ असंही म्हणता येत नाही. सगळे पुरुष वासनेच्या दलदलीत बुडालेले नसतात. तशाच स्त्रियाही नसतात. पण आजकाल मैत्रीच्या नात्यांचे बंध इतके सैल झाले आहेत की नकळत आपण काय करत आहोत याचं भान राहात नाही आणि पोक्यासारखा सभ्य माणूसही ‘चुम्मा चुम्मा दे दे’ आपल्या भसाड्या आवाजात गात माझ्या घरात प्रवेश करतो हे सगळंच न समजण्यासारखं आहे. काही गोष्टी चित्रपट, नाटकं, राजकीय क्षेत्र, कला क्षेत्र यांसारखी ठिकाणं काही लोकांनी इतकी स्वस्त आणि सवंग करून टाकली आहेत की लाज-लज्जा यासारखं काही शिल्लक राहिलंय यावर विश्वासच बसत नाही. आजकाल वडील-मुलगी, भाऊ-बहीण यांसारख्या नात्यांमधील पावित्र्याला चूड लावणार्या ज्या बातम्या वृत्तपत्रांत येत आहेत, त्यावरून या समाजाला ही कसली कीड लागल्याची लक्षणं आहेत यासंबंधी प्रश्न पडतो. पोलीस बिचारे त्यांचे नोकर. ते त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतात. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. ‘सस्पेंस ऑफ पिस्तुल’ हा हिचकॉकचा फॉरेनचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माझ्या म्हणण्याचा प्रत्यय दिसेल.
आमचा पोक्या तसा बिनधास्त आहे. जे मनाला पटेल ते बोलतो आणि करतोसुद्धा. तो कुणालाच घाबरत नाही. त्याचं गाणं झाल्यावर माझी इच्छा नसूनसुद्धा त्याला त्याबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यावर त्याने बरेच आढेवेढे घेतले, पण नीट काही बोलेना. मी म्हटलं, पोक्या, तुझ्या हृदयात शिवसेना असली तरी आपण भाजपचे चोरीछुपे कार्यकर्ते आहोत. ते आपल्यावर विश्वासाने काही कामे सोपवतात आणि आपण ती पार पाडत्ाो. त्यामुळे त्यांच्या आतल्या गोटातील बातम्या आपल्याला समजतात.
त्यावर पोक्या म्हणाला, तू मला तुझे लेक्चर देऊ नकोस. मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला तो प्रसंग विसरू शकत नाही. राजकारण इतकं कोडगं असेल असं वाटलं नव्हतं. आपला खोटेपणा लपवण्यासाठी इतरांना खोटं पाडण्याचा तो प्रसंग पाहून आमच्यासारख्यांची मान खाली जाते रे टोक्या.
पोक्याला काय म्हणायचं आहे, हे मी समजलो. तो कशाबद्दल बोलत आहे, हेही समजलो. त्याला मी म्हटलं, तू फार मनावर घेऊ नकोस. राजकारणातले या प्रकाराहून असभ्य प्रकार मी तुला सांगेन. तू तुला स्फूर्ती आल्याप्रमाणे गात राहा ‘चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा’.