स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोममध्ये आमच्या टूरचा शेवटचा पडाव होता. डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरांप्रमाणेच इथंही वेळ कमीच होता. एका दिवसात जमेल तितकी भटकंती करायची आणि पुढे बोटीने पुन्हा हेलसिंकीला जाऊन परतीचं विमान पकडायचं हा आमचा ठरलेला प्लॅन होता. हे शहरही तसं मोठंच आहे. एका दिवसात होणं शक्य नाही. त्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जुनं शहर जे आजही तितक्याच हिरिरीनं जपलं गेलं आहे. या भागाला गमला स्टॅन म्हणतात. इथंही इतर शहरांसारखाच राजवाडा आहे. राजवाड्यासमोर जलाशयाच्या काठाने राजमुकुटाची एक मोठी प्रतिकृती आहे.
इथं आम्ही बस, ट्रॅम आणि मेट्रो या तिन्ही मार्गांनी प्रवास केला. हॉटेलमध्येच आम्हाला कळलं होतं की इथली मेट्रो स्टेशन्स भन्नाट आहेत. मेट्रो स्टेशन असून असून किती वेगळी असणार अशा साशंक मनाने आम्ही हॉटेलजवळच्या एका स्टेशनला भेट द्यायचं ठरवलं. पण प्रत्यक्षात स्टेशनच्या आत शिरलो, तेव्हा नुसते थक्क झालो, तोंडात बोटं घालणं काय तेवढं बाकी राहिलं होतं. खरंच ही स्टेशन्स म्हणजे उत्तम कलाकृतीचा जबरदस्त नमुना म्हणता येतील. दोन किंवा तीन सरकते जिने पार करून तुम्ही फलाटावर येता तेव्हा आपण मेट्रो स्टेशनवर आहोत, हेच विसरून जाता. विशेष म्हणजे एखाद्या स्टेशनच्या बाबतीत हे केलेलं नाही. अनेक स्टेशन्स अशीच आहेत. ती पाहिल्यावर अचंबा होतोच, पण त्याचबरोबर भूगर्भात इतक्या खोलवर हे केलं गेल्यानं याचं कौतुक देखील वाटू लागतं.
बाकी जुनं शहर युरोपच्या इतर अनेक शहरांच्या जवळ जाणारं आहे. छान रंगवलेल्या, रांगेत शिस्तीत उभ्या असलेल्या इमारती फारशा वेगळ्या वाटल्या नाहीत.
हां, एक रुखरुख मात्र राहून गेली. इथून जवळच एका बेटावर वासा म्युझियम आहे. ते पाहायचं राहून गेलं. सतराव्या शतकातली युद्धनौका तिथं जपलेली आहे. या नौकेचा इतिहास बराचसा टायटॅनिक बोटीच्या जवळ जाणारा. आपल्या पहिल्याच प्रवासात तोफा-बंदुकांसह ती समुद्रतळाला गेली. खास म्हणजे त्यानंतर अनेक वर्षांनी ती समुद्रतळातून बाहेर काढण्यात आली. त्यादरम्यान सुदैवानं ती बरीचशी शाबूत राहिली होती. आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून हे म्युझियम पाहायचं राहून गेलं. तसंच आणखी एका बाबतीत उत्सुकता शमवयाचं राहून गेलं. इथं ओरिजिनल भुताची टूर असते असं वाचलं होतं. ती काय असते तेही पाहायचं होतं. पण नाही जमलं. पुन्हा कधीतरी इथल्या खाद्यसंस्कृतीची, ‘नॉर्डिक’ जेवणाची ओळख करून घ्यायला आणि वासा म्युझियम व ओरिजिनल भूताची टूर पाहायला पुन्हा यायला हवं असं वाटून गेलं.
आमची पुढची रात्र कुठल्याही शहरात नव्हती. ती होती क्रूझ बोटीवर. बोट कसली, एखादं पिटुकलं शहर तरंगत असावं असा हा अनुभव होता. बोटीवर प्रवेश करायला भली मोठी रांग होती आणि आत प्रवेश करण्यापूर्वी कडक सुरक्षा चाचणी केली जात होती. त्यामुळं प्रत्यक्ष आत जायला बराच वेळ गेला. पण एकदा आत गेल्यावर मस्त मजा आली. बोटीवरच्या एकंदर वातावरणाची तुलना पंचतारांकित हॉटेलला लाजवील अशीच होती. खोल्या लहान असल्या तरी जवळपास सर्व सुखसोयींनी युक्त होत्या.
बोट सुटल्या सुटल्या आम्ही सर्व डेकवर जमलो. डेकवरून दिसणारं दृश्य खरंच खूप नयनरम्य होतं. आसपासची हिरवीगार बेटं. मावळतीला आलेला सूर्य पाहून आम्ही सगळे चांगलेच रोमँटिक झालो. काहींनी तर चक्क जोडीने दोन्ही हात पसरून, टायटॅनिकची ‘पोझ’ घेऊन फोटो काढून घेतले. होणारा सूर्यास्त पाहत आम्ही सगळे थोडा वेळ डेकवरच रेंगाळलो. पण पुढे आणखी मजा आमची वाट पाहत होती.
बोटीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर वेगवेगळ्या सुखसोयी होत्या. चारी बाजूला खोल्या आणि मध्ये थोडी मोकळी जागा अशी व्यवस्था होती. ही मोकळी जागा बरीच प्रशस्त आणि किमान दहा बारा मजले उंच होती. बोटीवर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे खेळ, वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्यांची जंत्री आणि प्रत्येक कार्यक्रमाचं वेळापत्रक लावलं गेलं होतं. त्यात छोटेखानी सर्कस देखील होती. सर्कस म्हणजे तारेवरच्या आणि झुल्यांवरच्या चित्तथरारक कसरती. आम्ही सगळ्यांनी लहान मूल होऊन त्याचा आनंद लुटला. इतरही अनेक कार्यक्रम होते. तिथं एक छोटेखानी थिएटर होतं. संगीत मस्त होतं आणि एके ठिकाणी तर चक्क कॅब्रे होता. एक काचबंद गोलाकार व्यासपीठाच्या आसपास तुम्ही आरामात कोचावर बसायचं. आवडीची दारू विकत घ्यायची आणि तिचा घुटका घेत ‘धुंद’ व्हायचं.
तिथं जुगार देखील सुरू होता. छे! कॅसिनोला जुगार म्हणायचं म्हणजे एकदम गावंढळ झालं. पण जे काही चाललं होतं ते जुगारापेक्षा निराळं देखील नव्हतं. आमच्यापैकी काहींनी गंमत म्हणून तिथेही आपली उपस्थिती लावली. ज्याला ‘स्लॉट मशिन्स’ म्हणतात, ती सोय तर सगळीकडे होती. आमच्यापैकी एकीला त्या मशीन्समध्ये भरपूर पैसे मिळाले. साहजिकच इतरांना चेव आला. त्यांनीही नशीब आजमावून घेतलं. जी जिंकली होती तिलाही आणखी जिंकायची ऊर्मी चढली. अर्थात शेवटी कुठल्याही कॅसिनोमध्ये जे होतं तेच झालं. तिच्यासकट आम्ही सगळेच काही युरो घालवून बसलो. धमाल करायचा आनंद मात्र भरपूर लुटला.
क्रूझवर खाण्याचीही रेलचेल होती. जगभरातले अनेक प्रकारचे उपलब्ध होते. बारही बक्कळ होते. पैसे द्यायचे आणि हव्या त्या गोष्टीचा आनंद लुटायचा. त्यासाठीच तर या क्रूझ असतात. तुम्ही पैसे खर्च करा आणि हवे ते अनुभव घ्या.
बोटीवर दुकाने देखील होती. दुकानं बघितल्यावर शॉपिंगचा मोह कोणाला आवरतो. आम्हीही आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या दुकानात शिरलो. एके ठिकाणी एक ड्रेस आम्हाला आवडला. तो विकत घ्यायचं निश्चित केलं. पण त्यानंतर एक गंमत घडली. सोबतचा मित्र ‘काय घेतोयस?’ म्हणून विचारात तिथे आला. आम्ही तो ड्रेस त्याला दाखवला. त्याने तो नीट न्याहाळला आणि त्या ड्रेसची कॉलर पाहून हसत सुटला. कॉलरवर लेबल होतं, ‘मेड इन इंडिया’. मी कपाळाला हात लावला. ज्या व्यक्तीसाठी तो ड्रेस घेणार होतो त्या व्यक्तीला मी मारे ऐटीत सांगणार होतो की परदेशातून आणलाय. ते खोटंही नव्हतं, पण त्या व्यक्तीला वाटलं असतं की मी खोटं बोलतोय. इथंच कुठेतरी भारतात विकत घेऊन मी परदेशातून आणल्याचं खोटंच सांगतोय असा त्याचा गैरसमज झाला असता आणि तसा तो ड्रेस भारतात नक्कीच अर्ध्या किमतीत मिळाला असता. सोबत माझं परकीय चलन गेलं असतं आणि भरमसाठ किमतीला विकत घेतल्यामुळं झालेला मनस्ताप दोन्ही झाले असते.
सगळी मजा करत आम्ही बरेच उशिरापर्यंत जागे होतो. शेवटी अगदीच झोप अनावर झाल्यावर आपापल्या खोलीत गेलो आणि ढाराढूर झोपलो. दुसर्या दिवशी जाग आली तोपर्यंत बोट फिनलँडला, हेलसिंकीला, पोचत होती. दूरवर किनारा दिसू लागला होता. क्रूझवर आमच्या टूरची सांगता फारच छान झाली होती. आता सगळ्यांना घराचे वेध लागले होते. भरपूर वेगवेगळे अनुभव आणि तितक्याच उत्तम आठवणी घेऊन आम्ही पुन्हा घरी निघालो होतो…
(स्वीडनची सफर सुफळ संपूर्ण, पुढच्या भेटीत नवा देश… कोणता? थोडी कळ काढा… एकदम हटके डेस्टिनेशन आहे, हे नक्कीच.)