• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नेतृत्वक्षम स्मिथ!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 23, 2023
in फ्री हिट
0

कठीण परिस्थितीत आलेल्या नेतृत्वाच्या प्रभारी जबाबदारीचेही स्टीव्ह स्मिथने सोने केले. चेंडू फेरफार प्रकरणामुळे कारकीर्दीला लागलेले ग्रहण आता सुटले आहे. अ‍ॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क यांचा ऑस्ट्रेलियाचे यशस्वी कर्णधार हा वारसा चालवण्याची क्षमता स्मिथकडे आहे. आगामी आव्हानांचा विचार करता स्मिथकडे पुन्हा कर्णधारपदाची धुरा सोपवल्यास महत्त्वाचे ठरेल.
– – –


‘‘मला माहीत आहे की मला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल. मी पूर्णपणे हतबल झालो आहे. मला आशा आहे की भविष्यात मी आदर आणि माफी मिळवू शकेन,’’ हे मायदेशी परतल्यावर प्रसारमाध्यमांसमोर मांडताना स्टीव्ह स्मिथचे डोळे पाणावले होते… तो इतक्यावरच थांबला नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहते आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांची त्याने माफी मागितली.
स्मिथच्या झळाळत्या कारकीर्दीच्या उंचावणार्‍या आलेखाला अधोगती मिळाली ती २४ मार्च २०१८ या दिवशी. ती मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्धची होती. चेंडू रिव्हर्स स्विंग व्हावा, म्हणून त्यात फेरफार करण्याची ही चाल टीव्ही कॅमेर्‍यांनी प्रकाशझोतात आणली. या कटात स्मिथ, वॉर्नर आणि सलामीवीर कॅमेरून बँक्रॉफ्ट या त्रिकुटाचा समावेश होता. सामन्यानंतर तिघांना २४ तासांत त्वरित मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर चौकशी समितीच्या अहवालानुसार तिघांवरही कारवाई करण्यात आली. यापैकी स्मिथवर एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली. तसेच कर्णधारपदासाठी दोन वर्षांच्या बंदीचाही या निकालात अंतर्भाव होता. ही घटना घडेपर्यंत स्मिथ हा कर्णधार होता, तर वॉर्नर हा उपकर्णधार. स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या परंपरेला साजेसेच नेतृत्व आणि खेळी साकारत होता. हीच गुणवत्ता वॉर्नरमध्ये होती. या घटनेमुळे कुशल कर्णधारांची ऑस्ट्रेलियाची परंपरा खंडित झाली, असे दिसून येत होते. पण बंदी संपल्यानंतर स्मिथ पुन्हा मैदाने गाजवू लागला. कर्णधारपदाची बंदी संपल्यानंतर २०२१ आणि २०२२च्या उत्तरार्धात स्मिथकडे प्रभारी नेतृत्व सोपवण्यात आले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे इंग्लंडवर २७५ धावांनी आणि वेस्ट इंडिजवर ४१९ धावांनी विजय मिळवले. सध्या भारत दौर्‍यावर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेत ०-२ असा पिछाडीवर होता. भारताने फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर ४-० अशी मर्दुमकी दाखवण्याचा चंगच बांधला होता. या कठीण स्थितीत आणखी भर पडली. डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतावे लागले. त्यामुळे स्मिथकडे पुन्हा प्रभारी नेतृत्व चालून आले. पण इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ‘शिकारी खुद यहाँ, शिकार हो गया’ हीच प्रचीती आली. फिरकीच्या बळावर चक्क ऑस्ट्रेलियाने नऊ गडी राखून भारतावर मात केली. मग अहमदाबादची अखेरची कसोटी भारताने अनिर्णीत राखली. म्हणजेच स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ अपराजित राहिला. स्मिथवर पुन्हा कर्णधारपदासाठी विश्वास व्यक्त करता येऊ शकतो, हाच विश्वास या घटनांमुळे मिळत आहे.

खोडकर स्मिथ

‘स्लेजिंग’ अर्थात डिवचणे हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा स्थायीभाव. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची ही मानसिकता स्थानिक क्रिकेटमध्येही ओघानंच दिसून येते. साधारण १८ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात षोडषवर्षीय गोंडस स्मिथ आत्मविश्वासाने फलंदाजी करीत होता. परंतु नजीकच्या क्षेत्ररक्षकांपैकी एक अनुभवी क्रिकेटपटू त्याला वारंवार डिवचत होता. परंतु, तो मुलगा मनाने खंबीर होता. त्याने आपले चित्त ढळू दिले नाही. शांतपणे तो गोलंदाजाला सामोरा जात आपल्या धावांचा आकडा वाढवत होता. मग अचानक धैर्याने तो त्या क्षेत्ररक्षकाकडे वळला आणि चेहर्‍यावर स्मित राखतच त्याने त्याला विचारले, ‘‘तुम्ही किती वर्षांचे आहात?’’ त्यावर तो क्षेत्ररक्षक उत्तरला, ‘‘मी ३० वर्षांचा!’’ मग त्या मुलांने हसतच त्याच्यावर भाष्य केले, ‘‘अरे, तुम्ही अजून याच दर्जाचे क्रिकेट खेळताय?’’ हे ऐकताच सर्वांनाच हसू फुटले. त्या मुलाची खोडी काढणारा तो स्थानिक क्रिकेटपटू खजील झाला होता. मग सामन्यानंतर स्टीव्हनच्या खेळीचे त्या क्रिकेटपटूने स्वत: ड्रेसिंग रूममध्ये जाऊन कौतुक केले होते. तोच हा स्मिथ!

शोधत होते ‘प्रति वॉर्न’, पण…

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा स्मिथ हा त्यावेळी दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता. वयाच्या १७व्या वर्षी स्टीव्हनला क्रिकेटसाठी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. १६ आणि २१-वर्षांखालील वयोगटासाठीचे ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार त्याने पटकावले होते. त्यामुळे स्मिथमधील गुणवत्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मग २०१०मध्ये इंग्लंड दौर्‍यावर पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची निवड समिती एका लेग-स्पिनर गोलंदाजाच्या शोधात होती. खरे तर शेन वॉर्नचा वारसदारच ही मंडळी शोधत होती. त्यावेळी २१वर्षीय स्मिथला पदार्पणाची संधी मिळाली. परंतु पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्या वाट्याला गोलंदाजीच आली नाही, तर फलंदाजीला आठव्या क्रमांकावर स्थान मिळाले. मग दुसर्‍या डावात मात्र त्याने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात हातभार लावला. दुसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ८८ धावांवर कोसळला. मात्र त्यांना दुसर्‍या डावात आव्हानात्मक लक्ष्य उभारून देण्यात स्मिथच्या ७७ धावांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे नंतर अ‍ॅशेस मालिकेत त्याला सहाव्या क्रमांकावर बढती मिळाली. या मालिकेत त्याने दोन अर्धशतके झळकावली. मग दोन वर्षे त्याला एकाही कसोटी सामन्यात खेळायला मिळाले नाही. त्यानंतर २०१३मध्ये भारत दौर्‍यासाठी त्याची निवड झाली. मोहालीच्या पहिल्याच कसोटीत स्मिथ चमकला. मग मात्र तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात फलंदाज म्हणून कायम स्थिरावला. २०१४मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आला असताना स्मिथकडे उपकर्णधारपद देण्यात आले. परंतु कर्णधार मायकेल क्लार्क दुखापतींशी सामना करीत असल्यामुळे स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आणि ती त्याने यशस्वीपणे पेललीसुद्धा. त्याने चार कसोटी सामन्यांत चार शतके झळकावून मालिकावीर पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटधुरिण ‘प्रति वॉर्न’ शोधत होते. परंतु त्यांना जे गवसले होते, ते त्यापलीकडचे होते. त्यांना एक जबाबदार फलंदाज आणि भावी संघनायक स्मिथच्या रूपात सापडला होता.

नेतृत्वाचा पहिला डाव

क्लार्कची कारकीर्द दुखापतींच्या ससेमिर्‍यामुळे अस्ताकडे वाटचाल करीत असताना २०१५च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात स्मिथच्या अर्धशतकाचा सिंहाचा वाटा होता. याच वर्षी क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २-३ अशा फरकाने अ‍ॅकशेस मालिका गमावली आणि त्यानंतर आपसूकच नेतृत्वाची धुरा स्मिथच्या समर्थ खांद्यावर सोपवली गेली. २०१५ ते २०१८ म्हणजेच चेंडू फेरफार घटना घडेपर्यंत स्मिथ कर्णधारपदाच्या पहिल्या डावात चिवट फलंदाजीच्या बळावर यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नावारूपास येत होता. ही घटना घडली नसती, तर २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात स्मिथच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला असता आणि कदाचित निकालही वेगळा लागला असता.

हीच काळाची गरज

२०१८मध्ये चेंडू फेरफार कटात तो सामील नसता, तर एव्हाना अ‍ॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क यांचा वारसा चालवणारा यशस्वी कर्णधार म्हणून स्मिथने स्वत:ला सिद्धही केले असते. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाने टिम पेन आणि पॅट कमिन्स यांच्याकडे कसोटी कर्णधारपदाची धुरा सोपवली. पण त्यांच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाची विजीगीषु वृत्ती मैदानावर क्वचितच दिसली, जी सध्या स्मिथच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्धच्या मालिकेत दिसते आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियापुढे जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना, अ‍ॅशेस आणि भारतात होणारी एकदिवसीय प्रकाराची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही आव्हाने समोर आहेत. ही यशस्वीपणे पेलण्यासाठी स्मिथकडे नेतृत्व सोपवणे, ही काळाची गरज आहे.

[email protected]

Previous Post

माकडांचं शेपूट कापून माणूस…

Next Post

चंदेरी दुनियेतील सौंदर्याच्या खाणी

Next Post

चंदेरी दुनियेतील सौंदर्याच्या खाणी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.