ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन नावाचं गारुड जनसामान्यांवर होतं. चार चार गुंडांना लोळवणारा अँग्री यंग मॅन, भारी डायलॉग मारणार्या या हिरोचा आवाज, त्याची स्टाईल याचं अनुकरण करणारे तरुण गावागावात असायचे. शहरातील केशकर्तनालयात लावलेले अमिताभ, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर यांचे फोटो पाहून मला या हिरोसारखे केस कापून हवे आहेत असं सांगण्याचा तो काळ होता. सलूनला सलोन म्हटलं जायच्या आधीचा हा काळ.
अशा टिपिकल सिनेमावेड्या बाप-मुलाची गोष्ट सांगणारा ‘सातारचा सलमान’ हा सिनेमा आहे.
१९८२ साली, कुली सिनेमात अमिताभ बच्चनला अपघात झाला झाला. तेव्हा देशाला आता तुझी गरज आहे. अमिताभची जागा आता फक्त तूच घेऊ शकतोस, अशी हवा भरून अरूण काळभोर याला दोन मित्र सातार्यातील चिंचोली गावातून मुंबईला पाठवतात. डिट्टो अमिताभ बच्चन दिसणारा, वागणारा अरुण हा चित्रपटवेडा तरुण. सिनेमात संधी न मिळता हाती निराशा घेऊन अरुण मुंबईहून गावाला परततो, तेव्हा गावकरी खिल्ली उडवतात. त्याच क्षणी, ‘मी हिरो बनायला अपयशी ठरलो पण मी माझ्या मुलाला सुपरस्टार बनवूनच दाखवेनच’ अशी प्रतिज्ञा अरुण करतो आणि सिनेमाच्या मुख्य कथानकाला सुरुवात होते.
सातारा जिल्ह्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत असतं. एका चित्रपटात अरुणच्या मुलाला, अमितला छोट्या भूमिकांसाठी निवडलं जातं. या छोट्या भूमिकेचा सिलसिला पुढे सत्तावीस सिनेमांत सुरू राहतो. कधी तरी मला हिरोची भूमिका मिळेल हे लहान भूमिका करणार्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. तसच ते अमितचेही आहे. शिवाय वडिलांची ‘माझा मुलगा सुपरस्टार होईल’ ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यासाठी तो काय मेहनत घेतो आणि सुपरस्टार बनायचं त्याचं स्वप्न पूर्ण होतं का यांची उत्तरे सिनेमा पाहिल्यावर मिळतील.
ग्रामीण भागातील मुलांना सिनेसृष्टीतचे आकर्षण वाटून त्यांचे त्या स्वप्नांच्या मागे पळणे अशा आशयाच्या कथा ‘मैं माधुरी दीक्षित बनाना चाहती हूं’ यांसारख्या चित्रपटातून यापूर्वीही अनेकदा दाखविल्या गेल्या आहेत. कथाबीजात नावीन्य नसलं तरी मांडणी हलकी फुलकी आणि मनोरंजनात्मक होईल, याची काळजी या सिनेमाच्या दिग्दर्शकाने घेतल्याचं दिसतं. ‘झिम्मा’फेम हेमंत ढोमे यांच्या सिनेमात एन्टरटेन्मेंटचा तडका आणि नावाजलेले कलाकार यांचा संगम असतो. याही चित्रपटाची गाडी मनोरंजनाच्या दिशेने वाटचाल करते, काही प्रसंगात ती रेंगाळते, पण कंटाळा येऊ देत नाही. प्रसाद भेंडे यांचं छायाचित्रण सिनेमा देखणा करण्याचं काम करतं. आय वॉण्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी… हे लग्नाच्या हळदीचे गाणं पाय थिरकायला लावणारे आहे. सिनेमातील हिरोचे स्वप्न खरं होतं की नाही हे कळायला सिनेमा पाहायला हवा, पण, या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाल्याने यापूर्वी लहानमोठ्या भूमिका साकारणार्या सुयोग गोर्हे याचं स्वप्न मात्र पूर्ण झालं आहे. दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत आपल्या कामात नवखेपणा दिसू न देता सुयोगने गावरान मुलगा, हिरो बनण्याची इच्छा, त्यासाठी केलेले प्रयत्न, प्रेम, प्रेमभंग, निराशा असे या भूमिकेतील कंगोरे उत्तम रीतीने दाखवले आहेत. डिस्को लायटिंग अंगाला गुंडाळून डान्स करणं, खर्जात बोलणं, स्टाईल यातून मकरंद देशपांडे यांनी अमिताभ बच्चनचे बेअरिंग सुरेख पकडलं आहे. हिरो बनता आलं नाही म्हणून स्वतःचे स्वप्न मुलावर लादणार्या बापाची तगमग त्यांनी उत्तम रीतीने दाखवली आहे. हिरोला मदत करणार्या मित्राच्या भूमिकेतील अक्षय टांकसाळेचे विनोदाचे टायमिंग लाजवाब आहे. शहरातून गावात नवीन आलेल्या मुलीची माहिती काढून सांगताना, तिला नृत्यकलेची आवड आहे, तिच्या वडिलांनी सरकारी नोकरीत किती पैसे कमावले आहेत इथपासून ते तिच्या आजोबांना मुतखडा झाला आहे इथपर्यंतचे डिटेल्स सांगताना अक्षय धमाल उडवून देतो. या कथेत हिरोसोबत गावातील मैत्रीण आणि शहरातून आलेली मैत्रीण यांच्या प्रेमाचा त्रिकोण आहे. सायली संजीव हिने मनातून प्रेम करणारी बालपणीची मैत्रीण माधुरी संयमितपणे निभावली आहे, तर शिवानी सुर्वेने शहरी मुलीचे काम उत्तम रीतीने वठवलं आहे. भूमिका कितीही लहान असो, पडद्यावर दिसल्यावर थिएटरमध्ये हास्य फुटेल, अशा ताकदीचे विनोदी अभिनेते फार कमी असतात, आनंद इंगळे त्यापैकीच एक आहेत, यावर हा सिनेमा शिक्कामोर्तब करतो. महेश मांजरेकर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत असे दिग्गज कलाकार लहान भूमिकेतून कथेचा भाग बनत कथा पुढे नेतात.
पडद्यावर नायक बनू शकलात तर उत्तमच, नाही तर खर्या आयुष्यात आपल्या वागणुकीने, कामाने आपण हिरो बनू शकतो हा संदेश हा चित्रपट देऊन जातो. फार अपेक्षा न ठेवता हा सिनेमा पाहाल तर डोक्याला ताप न देणारी चार घटकांची करमणूक निश्चित मिळेल.