आर्थर मिलरचं ‘डेथ ऑफ या सेल्समन’ हे नाटक माझं अत्यंत आवडतं. सुखाची स्वप्नं पाहणार्या विली लोमन या एका सेल्समनचं… आणि त्याच्या स्वप्नवत दुनियेमागे फरफट झालेल्या त्याच्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट. नकारात्मकता, असंबद्धता आणि विरोधाभास या प्रमुख थीम्सवर हे संपूर्ण नाटक विली लोमन आणि त्याच्या कुटुंबाभोवती… विली धावणार्या स्वप्नवत दुनियेमागं फरफटत राहतो. आपण फार असामान्य आहोत, उच्चवर्गीय आहोत, श्रीमंत नि सुखी आहोत या खोट्या धारणेमागे वर्तमान आणि भूतकाळ यांच्या सीमेवर वावरणार्या विलीला पाहताना प्रेक्षक कळवळून उठतो. हे जग आता आहे तसं आपण स्वीकारलं नाही, तर कोणत्या भ्रमनिराशेत आपण हेलकावत राहतो… ते असं जगणार्या माणसाला कळतच नसतं. तो, त्याची बायको लिंडा, मोठा मुलगा बिफ आणि धाकटा हॅपी या चौकोनी कुटुंबाची ही भारावून टाकणारी नाट्यकृती.
दुबेंकडे, अपर्णा थिएटरकडून पृथ्वीवर अनेक वर्ष काम करता करता फिरोज खानची ओळख झाली होती. तोही अतिशय वेगळी नाटकं करणारा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होता. एक दिवस अचानक त्यानं भेटायला बोलावलं. फोनवरच तो ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ करतोय हे त्यानं सांगितलं.. त्यातला विली आपल्यालाच करायला मिळणार, या आनंदात मी तिथे पोहोचलो आणि मला फिरोजने त्या नाटकातला दोन नंबरचा सर्वोत्कृष्ट रोल म्हणजे बिफ ऑफर केला. नाटक आधी वाचलं होतच. त्याची फिल्म पाहूनही वेडा झालो होतोच. डस्टिन हॉफमन या अद्भुत नटानं विली साकारला होता आणि बीफ साकारला होता माझ्या अत्यंत आवडत्या नटानं… ज्याचं नाव होतं जॉन माल्कोविच. इथे फिरोजच्या नाटकात पहिल्या नंबरच्या, विलीच्या रोलसाठी होते सतीश कौशिक. त्यांना अनेक सिनेमांतून विनोदी ढंगाच्या भूमिका साकारताना पाहिलं होतं. हे विली, म्हणजे रामलाल (हिंदी नाटकाचं नाव ‘सेल्समन रामलाल’ होतं) कसे करणार, असं वाटलं होतं. पण दिग्दर्शक फिरोजने आणि स्वतः सतीशजींनी सतीशजींच्या स्थूल शरीराचा असा काही वापर करायचं ठरवलं होतं की तो रोल इतक्या उंचीवर जाईल, याची मी कल्पनाही केलेली नव्हती. आईच्या भूमिकेत काही वर्ष विदुला मुणगेकर आणि नंतर सीमा बिस्वास होती…
रिहर्सल सुरु झाली आणि वेगळाच प्रवास सुरु झाला. रिहर्सलचा प्रत्येक दिवस म्हणजे अनोळखी प्रदेशातल्या अगणित अनोळखी वाटा शोधणं होतं. बाप आणि मुलाच्या संबंधातल्या कॉम्प्लिकेशन्स हा जागतिक विषय आहे. या नाटकातला मोठा मुलगा मी… बापाच्या सततच्या अपेक्षाच्या ओझ्याखाली दबून गेलेला, शाळेतला क्रिकेट स्टार म्हणून उदयाला आलेला आणि त्यामुळेच बापाच्या अपूर्ण स्वप्नांच्या अपेक्षांच्या आग्रहात गडबडून गेलेला, त्याच्या नकळत आवश्यकता नसताना कुठे कुठे छोट्या छोट्या चोर्या करण्याची सवय जडलेला (क्लेप्टोमेनियाक) यौवनावस्थेतच बापाला परस्त्रीसोबत पाहिलेला, आपल्या आईला फसवणार्या बापाचा द्वेष करणारा, आयुष्यातली अनेक उत्तरं शोधतांना फसलेला, आयुष्यात ‘मोठ्ठं’ होताच येत नाही या टर्मवर आलेला आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर, आयुष्यभर आपण ज्याचा द्वेष केला तो बाप खरतर आपल्याला खूप आवडतो हे सत्य कळलेला.
या नाटकातले कितीतरी प्रवेश मी केलेल्या अनेक नाटकांतील उत्कृष्ट प्रवेशांमधले. पैकी दोन्ही मुलं बापाला पार्टी देण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन जातात.. तिघेही ड्रंक होतात आणि बापाच्या असंबद्ध वागण्यामुळे त्याला चक्क तिथंच सोडून निघून जातात, तो प्रवेश, पिऊन बेभान अवस्थेत घरी पोहोचल्यावर त्याची वाट पाहात बसलेली आई आणि तिच्याशी टोलवाटोलवी करताना तिचं बापावरलं प्रेम पाहून हबकून गेलेली मुलं.. हा प्रवेश आणि माझा सगळ्यात फेव्हरेट म्हणजे बापाकडे मदत मागण्यासाठी दुसर्या शहरातल्या हॉटेलवर अचानक पोहोचल्यावर बापाला एका परस्त्रीसोबत वेगळ्याच अवस्थेत पाहिल्यावर बापाची झालेली त्याची स्थिती.. आणि मुलाला बसलेला धक्का… हे सगळे प्रवेश सतीशजींसोबत करणं म्हणजे प्रत्येक प्रयोग ही एक शाळा होती..
माझ्या वास्तविक जीवनात माझाही वडिलांसोबत अजिबात संवाद नव्हता.. नाटकातल्याच बापागत माझ्या आयुष्यात अवचित घडलेल्या एका घटनेनं मलाही बापाबद्दलच्या द्वेषाने पछाडलं होतं. वास्तव स्वीकारायला काही वर्षं जावी लागली होती आणि जेव्हा त्यांच्याशी डेस्परेटली बोलावं वाटलं होतं तेव्हा ते गेले होते.
– – –
पालेकरांच्या ‘ध्यासपर्व’ शूटच्या काहीच दिवस आधी ते गेले… त्यांच्या दहाव्याला मी नव्हतो.. पुण्याहून शूटच्या मधून भावाबरोबर फोनवर मी सगळं मॅनेज केलं होतं…
शूटचा कितवा दिवस होता आठवत नाही.
शूट एका वाड्यात होतं..
र. धों. कर्व्यांचं घर. त्या दिवशीचे सगळेच प्रसंग महत्वाचे….
सकाळपासून उगाच खूप एकटं एकटं वाटत होतं…
तरी मी सीनमधल्या प्रत्येक शॉटमध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करत होतो.
मी धोतर आणि पांढरा शुभ्र सदरा घालून टेबलाशी बसलेलो… टेबलवर टाईपरायटर, कागदाच्या शीट्स, लिखाणाचं बरंच सामान, पाण्याचं भांडं आणि एक दौत होती. आधी काही शॉट्स झाले होते… पुढल्या शॉटचं देबुदा लायटिंग करत होते… आजूबाजूला गडबड होती… मी टेबलाशी बसलेलो होतो.. कुणास ठाऊक का, मी अचानक वळलो आणि टेबलवरल्या वस्तू ठीक करू लागलो.. दौत उघडी होती की सेटिंगवाले कुणी करून गेले की काय कुणास ठाऊक.. पण ती पडली.. प्रतिक्षिप्त क्रियेत मी उठलो आणि काही वस्तू आवाज करत धडाधड कोसळल्या.. आणि दौत टेबलवर सांडून टेबल क्लॉथ निळा झाला… माझ्या सदर्यावर काही शिंतोडे उडाले की काय आठवत नाही.. आठवतंय ते पालेकरांचं त्या दिवशी आक्ख्या युनिटसमोर मला ओरडणं… पालेकरांचं चिडणं म्हणजे काय हे त्यांच्यासोबत काम करणार्या मोजक्याच लोकांना ठाऊक असेल…
शॉट ऑलमोस्ट रेडी होता… सकाळपासून अनेक अडचणींमुळे स्पीड थोडा मंदावला होता… त्यामुळे माझ्याकडून झालेल्या या चुकीला आज माफी नव्हती… पालेकर बोलले… खूप बोल्ले… अख्ख्या युनिटसमोर बोल्ले.. सगळं युनिट स्तब्ध होऊन माझा पाणउतारा पाहात होतं… आणि मी आत आत खचत चाल्लो होतो…
अचानक मला नुकत्याच गेलेल्या वडिलांची खूप आठवण येऊ लागली.. लहान मुलाला कुणी बाहेरचं ओरडल्यावर ते धावत जाऊन आपल्या वडलांना सांगतं, तसं काहीसं मला वाटू लागलं… छाती भरून येत होती.. गळ्यात दाटून येणारा आवंढा मी गिळत उभा होतो… धाय मोकलून रडावं वाटत होतं… पण लगेच सीन होता.. नेमका पालेकरांनी लंच ब्रेक केला.. मी त्यांच्या समोरून अक्षरशः लहान मुलासारखा पळत पहिल्या मजल्याला जिना धाड धाड उतरून खाली आलो. डावीकडे काही अंतरावरच जुन्या काळची दोन टॉयलेट्स होती.. पळतच आत शिरलो.. धाड्कन दाराच्या दोन फळ्या आतून लावून वरली लोखंडी कडी अडकवली आणि गुदमरला हंबरडा आवाज होऊ नये अशा आवाजात हमसाहमशी रडू लागलो.. वडिलांच्या कुशीत शिरून पालेकरांची तक्रार करावी आणि त्यांना खडसावायला लावावं असं वाटू लागलं.. भिंतीच्या आधारानं रेलून खूप रडून घेतलं..
मधल्या काळात बाहेर दाराशी कुणीतरी येऊन थांबल्याची चाहूल लागली.. तरी मी काही वेळ काळोखातच रडत उभा राहिलो… (प्रतिमा जोशी… जी तेव्हा त्यांना असिस्ट करत होती, ती काही वेळानं पालेकरांच्या सांगण्यावरून माझ्या मागोमाग येऊन माझं आतलं रडणं ऐकून गेली हे तिनेच सांगितलं आहे.)
मग रडून शांत झाल्यावर कुणाला कळू नये म्हणून धोतरानं तोंड वगैरे व्यवस्थित पुसून बाहेर आलो.
– – –
‘सेल्समन’ नाटकात सगळ्यात शेवटी बापाला हॉटेलमध्येच सोडून आल्याच्या रात्री झालेल्या बाप मुलाच्या भांडणात.. मी.. मोठा मुलगा हतबल होत सांगू लागतो… ‘सकाळी एका इंटरव्ह्यूला गेलेला असताना तिथल्याच टेबलवरलं एक किंमती पेन सवयीप्रमाणे चोरून मी धावत जाऊन मी गच्चीवर लपलो.. वर गच्चीवर ते पेन मी माझ्यासमोर धरले.. का करतोय मी हे असं.. काय करायचंय मला.. कुठे पोहोचणारय मी.. हा विचार करू लागलो. त्या पेनकडे पाहत असताना मला कळलं, मी खूप सामान्य कुवतीचा माणूस आहे बाबा… मी इंटरव्ह्यू दिल्याचं तुम्हाला खोटंच सांगितलं.. तुम्ही समजता तितका मोठा मी नाही बाबा.. तुम्हाला कळत कसं नाही बाबा, मी अतिशय सामान्य आहे.. माझ्यात मोठा माणूस होण्याची कुवतच नाहीये बाबा… आपण सगळेच खूप सामान्य आहोत… प्लीज तुम्ही हे कटू वास्तव स्वीकारा बाबा… हे सगळं जे काही तुम्ही पाहाता आहात ते एक स्वप्न आहे बाबा.. प्लीज बाबा वास्तवात या.. आम्हा सगळ्यांकडे नीट पाहा.. आम्ही खूप सामान्य लोक आहोत बाबा… मी तुमच्या पाया पडतो बाबा वास्तवात या… आणि हो बाबा… तुम्ही मला खूप आवडता. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर…’
अशी एक मोठ्ठी सोलोलोक्वी म्हणत मी आयुष्यात पहिल्यांदा बापाला घट्ट मिठी मारतो… त्याच्या गळ्यात पडून त्याच्या पाठीवरून लहान मुलासारखा हात फिरवू लागतो… त्यांच्या गळ्यात पडून रडत रहातो… आणि शेवटी आईला म्हणतो..
‘आई… थोपटून थोपटून झोपव गं माझ्या या बापाला… खूप थकलाय माझा बाप.’
असं म्हणून मी एक्झिट घेतो…
– – –
हा प्रवेश करतांना मला नेहमी ‘ध्यासपर्व’ शूटवेळी घडलेला वरला प्रसंग आठवायचा.. मी कोकरासारखा सतीशजींना बिलगायचो आणि ते एखाद्या भेदरलेल्या सश्यासारखे माझ्या मिठीत यायचे..
तेव्हा तो सतीश कौशिक नसायचा…
तो भानुदास नावाचा माझा बाप असायचा…
नाटक संपतं.. नट वेगळं जगू लागतात.. पुन्हा कधीतरी भेटतात.. नाटकाच्या आठवणी जागवतात.. पण तेव्हा त्यांना तशी प्रयोगातल्यासारखी मिठी मारता येत नाही..
सतीशजी भेटले होते मध्यंतरी..
त्यांना मारायला पाहिजे होती मिठी..
सतीशजी गेले…
मला माझाच बाप गेल्यासारखं वाटतंय…
बॉन व्हॉयेज सतीशजी!
हॅपी जर्नी!!!