– काय कसा काय वाटला आमचा च्या तुमाला?
– कडू हाय, पन तुमच्याकडं काई गोड शिल्लकच न्हाई तर तुमी तरी कुठनं देनार गोड च्या?
– आवं पावनं, तुमास्नी येवडा गुजरात पेशल अमृततुल्य च्या पाजला, तर असं बोलता होय? बरं आता पान-सुपारी घ्या राव ही प्रेमाची.
– हां हां, अजिबात नगं सुपारी. नुस्तं पान चालंल.
– का वं? सुपारी काहून नंग म्हनतायसा?
– आवं सुपारी आता द्याल नि दुपारी आमास्नीच चुना लावाल.
– तो कसा काय?
तर मंडळी तो सुपारी घ्या, सुपारी घ्या म्हणून आग्रह करणारा इसम ठाण्याचा. लई पोचलेला गडी. त्याच्या मालकानं कमळाबायकडनं घेतली सुपारी नि निघाला घेऊन चाळीस टपोरी. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचाय म्हणे! बाळासाहेबांचे विचार कुठं, आपण कुठं? अरे बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय रिक्षाचं भाडं वाटलं काय? पडला मीटर नी केलं टुर्रऽऽ
बाबरी पडली. कमळी म्हणाली, ‘मी न्हाई त्यातली.’ बाळासाहेब म्हणाले, ‘जर ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे.’ बाळासाहेबांचं हिंदुत्व लपून छपून कटकारस्थानं करणारं नव्हतं. थेट बोलायचे. सरळ सरळ भिडायचे. ‘मी असं बोललोच नाही,’ असं कधी ते म्हणाल्याचं आठवतं? नाही आठवणार. त्यांनी आवाज दिला की अडवाणी आणि महाजन पळत पळत ‘मातोश्री’वर यायचे. झुकून नमस्कार करायचे बाळासाहेबांना, तुम्हाला साधी ईडी लावायची धमकी मिळाली तर तुमचं हिंदुत्वाचं ढेकूळ कमळीच्या एका लाथेनं फुटलं. गेलात दिल्लीला धावत कुल्याला पाय लावून पळत. घेतलीत सुपारी. आपलंच मराठी घर फोडायची. खाल्ल्या ताटात शिटायची. दावा केलात अख्ख्या घरावर. घेतलात धनुष्यबाण. केलीत घाण. पक्षाचं नाव पण घेतलं. खोके द्यायचे-खोके घ्यायचे. कोण चाटतोय पाय मोरारजीच्या फाफडा पिलावळीचे? हा बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा? कदापि नाही. आता आरसा शोधा सुपारीवाल्यानु. बघा आपलं फेकनाथी थोबाड त्या आरशात.
तर मंडळी, माननीय सुपारीवाले आता आरशासमोर उभे म्हणोन आहेत. वेशभूषा पांढरी आहे. पण आरशात काळ्या झग्यातला, क्रूरपणे हल्ला करून भक्ष्याचे (की पक्षाचे?) लचके तोडून खाणारा लांडगा दिसतो आहे. त्याच्या अंगावर लहान-मोठे भ्रष्टाचाराचे काळे ठिपके दिसताहेत. त्याचा जबडा लांब असून एकाच वेळी अनेक मांसखंड कोंबून तो सुरतमार्गे गोहत्तीला चाललाय. तिथे तो कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आपल्या संधीसाधुपणाला आशीर्वाद मागताना आता दिसतोय. आरशासमोरचा सुपारीवाला आश्चर्यचकित होऊन, एका जागी स्थिर उभा राहून, आरशातली हलती चित्रफीत बघण्यात रंगून गेलाय. आपणच आपली पाठ तो थोपटून घेत असताना पुढचं चित्र आरशात सरकतं आहे. त्या मुख्य लांडग्याभोवती आता चाळीसेक लांडगे गोळा झालेत. त्यांच्यात काही लांडगिणीही आहेत. सुपारीवाल्याला आरशात आता एक लबाड कोल्हा त्या मुख्य लांडग्याशी खलबतं करताना दिसतोय. कोल्हा त्याला सांगतोय, ‘आता मागे हटायचं नाही लांडगेजी. तुम्ही सांगायचं की मूळ पक्षातच आहात तुम्ही. काही काळजी करू नका तुम्ही. आपण मिळून शिकार करू.’
चित्रफीत थांबलेली आहे. आणि आता सुपारीवाला आपला मुखवटा स्वच्छपणे आरशात बघतो आहे. आता आरशात आणि आरशासमोर फक्त सुपारीवालाच.
आरशातला सुपारीवाला (आसु) – काय रे, एवढं थोबाड पडायला काय झालं?
आरशासमोरचा – आयला, मला आता मूळ शिवसैनिक आणि मराठी माणसं शिव्या देत र्हाणार.
आसु – देवंदेत. घाबरायचं नाय. काय? आपण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत, अशी पिपाणी वाजवत र्हायची.
समोरचा – हां. पण काल धर्मवीर स्वप्नात आले होते. जळती सिगारेट माझ्या अंगावर फेकून म्हणाले, गद्दारांना क्षमा नाही.
आसु – वरती गेलेली माणसं आता काही नाही करू शकत तुझं वाकडं. आपण बाळासाहेबांबरोबरच धर्मवीरांचेही विचार पुढे नेत आहोत असं बोंबलत राहायचं.
समोरचा – आयला, बेस्ट आयडिया हाय. मग कमळीनं दिलेली सुपारी वाजवूनच टाकतो.
आसु – बिलकुल. आणि ध्यानात ठेव, त्यांच्या सुपार्या वाजवण्यासाठी तुलासुद्धा संबंधितांना सुपार्या द्याव्या लागतील.
याप्रमाणे आदरणीय महोदय सुपारी घेते झाले आणि कमळीच्या ढुंगणामागून फिरू लागले. कमळीचे मालक आहेत गुजराती. त्यांनी महाराष्ट्रातील ‘वेदांत’ आणि इतर उद्योग पळवले. सुपारीवाले शांत बसले. एक आटा ढिला भाज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, मुंबईचा, मराठी लोकांचा वारंवार अपमान केला. दोनचार मिनिटं यांचं रक्त सळसळलं. पण लगेच कमळीनं दिल्लीतल्या अडकित्त्याकडे यांचं लक्ष वेधलं. रक्त थंड झालं. तिकडे कर्नाटकात कमळीचं पाचवं की सहावं कुंकू फडफडलं. बेळगाव तर देणारे नाहीच, उलट जत तालुका, सांगली-बिंगली आम्हाला हवीय, म्हणू लागलं तर पहिल्यांदा यांनी आपले चंबुराज कर्नाटकात मराठी लोकांना धीर देण्यासाठी पाठवायचं ठरवलं. पण त्यांच्या पोलिसांनी तिथं सीमेवरच नाकाबंदी केली नि यांची शेपूट आतल्या आत वळवळत राहिली. कमळीचा डोळा आहे मुंबई महापालिकेवर. ती एकदा ताब्यात आली आणि एकदा कंबोज, सोमय्या, लोढा बिडा महापौर म्हणून बसवला की कमळी मराठी लोकांना लुटायला मोकळी.
सुपारीवाल्या, निवडणूक आयोगाला किती खोके पोचवलेस नि धनुष्यबाण विकत घेतलास माहीत नाही, पण त्याचा तुला काय उपयोग? बाळासाहेबांची धनुर्विद्या तुझ्याकडे आलेली नाही. ती ज्यांच्याकडे आहे त्यांचे बाण रोज कमळीच्या आणि तुमच्यासारख्या चाळीस चोरांच्या दिशेने सणसणत सुटत आहेत. ते बाण सोडणारा धनुर्धर बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला आणि आपल्या राजकीय वाडवडिलांशी एकनिष्ठ असलेला माणूस आहे. त्याची बदनामी करून तो थांबत नाही. त्याला तुरुंगात टाकून तो भीत नाही. बाहेर आल्यावर पुन्हा धनुष्य ताणतो.
अगदी कोंडी झालीय ना तुमची?
पण म्हणून काय त्याला या जगातूनच नाहीसा करण्याची सुपारी द्यायची?
थूतऽऽ तुमच्या.