लॉर्ड ऑफ दी फ्लाईज हे पुस्तक वाचले आहे का? एका बेटावर काही मुले अडकतात आणि मग त्यांच्यात अस्तित्व संघर्ष सुरू होतो. जसा प्रौढ माणसात असतो तसाच. Survival of the Fittest हा डार्विनचा सिद्धांत पुरेपूर पटवून देणारी ही धक्कादायक कादंबरी आहे. प्राचीन काळी मुलांचे लाड करणे हे समाजमान्य नव्हते. अगदी परदेशात पण… खुद्द ब्रिटनच्या राजघराण्यात नव्हते, तर तिच्या गुलामांचा देशात काय असणार?
मुले ही फक्त सुधारण्यासाठी असतात, असे मत प्रत्येक, त्यातही भारतीय, पालकाचे असते, नाही नाही होते… कोणे एकेकाळी असायचे. बालमानसशास्त्र नावाच्या शाखेचा उदय झाला नव्हता. मुळात मानसशास्त्र हेच भारतात परिकथेसमान. चार दिवस उपाशी ठेवा, चार फटके द्या, इथपासून काम नको म्हणून नाटके चाललीत, इथपर्यंत उपाय असायचे. मोठ्या माणसांच्या बाबतीत हे, तर मुलांच्या बाबतीत काय असणार? घरी चल मग बघते तुला, या धमकीला घाबरला नाही असा माणूस नसेल. सॉरी ज्येष्ठ माणूस नसेल. पण नकळत कधीतरी हे धमकीसत्र लुप्त झाले आणि संवेदनशील दृष्टीने मुलाकडे पाहू जाऊ लागले. छडी लागे छमछम संस्कृतीवर हा उत्तम उतारा होता.
तथापि आजकाल मात्र कार्ट्याला एक फटका द्या, असे वाटावे इतपत घटना घडत आहेत. मुळात माझ्यासारख्या व्यक्तीला तर प्रकर्षाने वाटू लागले आहेत. It takes a village to make a child… म्हणजे मुलाच्या भावनिक आणि इतर घडणीत समाजाचा मोठा सहभाग असतो. मग आज बघितले तर जिथे समाजाचे खरे नाही, तिथं मुलाचे काय?
आक्रस्ताळी, वाट्टेल तसे वागणारी बेबंद कार्टी आजकाल सर्वत्र दिसतात. स्थळे सांगू? फूड मॉल, थिएटर, दुकाने, मॉल, विमान, बस, बाजार, अगदी वाण्याचे दुकान सुद्धा.
लहान मुले अशी माझ्या डोक्याला शॉट होतील, असे मला स्वप्नात पण वाटले नव्हते. मुलांना समजावून घेणे, या नावाखाली मुलाचे आचरट चाळे दिसतात. खचाखच भरलेल्या फूड मॉलमधे हातात गरम जेवणाची प्लेट घेवून खो खो करत खुर्ची शोधताना मला बेबंद धावणार्या कार्ट्यांना चुकवण्याची कसरत इतके वेळी करावी लागलीय की आजकाल मी रविवार-शनिवार सुट्टी दिवशी जाणे टाळते.
कोणत्याही हॉटेलात उतरताना प्रथम तिथे लहान मुले असणार का? हा माझा प्रश्न असतो. कारण अनेक वेळा पॅसेजमधे धावणार्या, बॉल दाणदाण आपटत नेणार्या मुलांमुळे माझ्या झोपेचे खोबरे झाले आहे. बरं पालकांना सांगितलं, तर बच्चे है जी, वो नहीं खेलेंगे तो क्या हम खेलेंगे इस उमर में… ह्या ह्या ह्या, हे उत्तर.
मॉलमध्ये खरेदी करताना तर या पोट्ट्यांनी माझ्या पायावरून अगणित वेळी ती ट्रॉली नेली असेल. माझ्यासमोर एकदा वाण्याच्या दुकानात एका कन्येने बासमती आणि उकडा यांची एकत्रित भेळ केली होती.
असल्या उच्छादी कार्ट्यांच्या दोन थोतरीत न लगावता, नो बेबी… असे नाही वागायचे? मी घरी तुला देईन हं, असे गोग्गोड बोलणारे पालक बघून मला का असे पालक मिळाले नाहीत, असा दुःखी विचार माझ्या मनात अगणित वेळी येऊन गेलाय. अर्थात यावर मला पण असेच वाटते, असे आमच्या पुत्ररत्नाने सांगितल्यावर मी गप बसले हे अलाहिदा. पण अशा पोरांची संख्या अपरिमित वाढू लागलीय, हे सत्य आहे.
लग्नाच्या बुफेत तर पापडसदृश वस्तू, हात धुण्याचे नळ, मांडलेले सलाड या वस्तू आपल्या खेळासाठी आहेत, असा समज करून पोरं धुमाकूळ घालत असतात. आपल्या पैठणीवर जेव्हा अशा पोरांचा धक्का लागून डाळ फ्राय किंवा पनीर रस्सा उलटा होतो, तेव्हा मुले म्हणजे फुले असे बिलकुल वाटत नाही.
विमानतळ अथवा तत्सम जागी टॉयलेटमधील हात सुके करणार्या मशीनसमोर उभे राहून ते चालू-बंद करणे, बेसिनचा नळ सुरू करणे, टिश्यू पेपर उपसणे, असले अनेक कार्यक्रम पालकांच्या समोर सुखनैव चालू असतात आणि पालक आपल्या दिवट्यांच्या या समाजद्रोही वर्तनाची बिलकुल दखल् घेत नाहीत. आपण एरवी भारतीय संस्कृती, उच्च आचार विचार, ज्येष्ठ लोकांच्या पाया पडणे बिडणे यावर व्हॉट्सअपवर बदाबदा ज्ञान ओतत असतो, पण अशावेळी मात्र चूप!!!!
फार वर्षांपूर्वी परदेशात फिरायला गेले होते. तिथल्या बर्याच पोट्टे कंपनीचा रंग फक्त उजळ, बाकी वागणे अगदी आपल्या इथल्या मुलांसारखेच आणि ते सहन करणारे बुद्ध लाजेल अशा मनोवृत्तीचे पालक बघून माझी सहनशक्ती पूर्ण शून्य झाली होती. ट्रेनमधून उतरून झपझप चालताना एक पोर परत त्या ट्युबच्या दिशेनं पळाले. आपोआप बंद होणार्या त्या दरवाजाचे त्याला आकर्षण वाटले होते, मी काही करायच्या आत त्याच्या मातेने त्याच्या ढुंगणावर एक फटका दिला आणि बखोटी पकडून त्याला नेले. पुढे ती आई भेटल्यावर तिला मी फक्त ‘यू डिड गुड’ इतकेच सांगितले. आपल्यासारखीच आई या ज्या नात्याने अनोळखी बायकाही बांधल्या जातात, त्यातून तिला कळले मला काय म्हणायचे आहे ते… आणि हो ती आई आफ्रिकन वंशाची होती. पुढे पूर्ण प्रवासात ते पोर चूप होते.
आपल्या मुलांच्या वागण्याचा जेव्हा इतर समाजाला त्रास होतो, तेव्हा आपण काहीतरी उपाय करायला हवेत, हे पालकांना जेव्हा कळेल तेव्हा समाज प्रगल्भ होईल. शिस्त आणि स्वातंत्र्य यात जबाबदारी हा मुद्दा लक्षात घेतला जात नाही. वास्तविक तो आधी यायला हवा. तथापि हल्ली मुलांना स्वतंत्रपणे वागू देतो या नावाखाली एक बेजबाबदार पिढी तयार होते आहे हे पालकांना कळत नाही. आपल्या काही कृतीचे विपरीत परिणाम होणार आणि ते आपण कबूल करायचे हे आजकाल विसरले जाते आहे. बालमानसशास्त्र बिलकुल चुकत नाही. ते अयोग्य पद्धतीने वापरणारी माणसे चुकतात. इथे आजकालची मुले असे म्हणून दोष देता येणार नाही. पालकांनी सजग होऊन बघायला हवे.
अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर आपण त्या बटबटीत भडक मालिका बघायच्या, आणि मुलांना सांगायचे की वाचन करा, त्याने माणसं प्रगल्भ होतात, तर त्यांना कसं पटेल ते? आपण ही भाजी नको, अमुक आवडतं नाही करायचे आणि मुले खातच नाहीत ही तक्रार मांडायची, याला काय अर्थ आहे? मुले आपल्याला बघत मोठी होतात. वडील जेवणाचे उष्टे ताट तसेच ठेवून हात धुतात, पालक दिवसभर मोबाईलमधे असतात, पाचकळ बोलतात, शिव्या देतात, असे बघून अशा वागण्यात चूक नाही हे मुलांना वाटते. मुख्य करून धोका काय असतो की हे वागणे मुलांच्या मनात पक्के बसते.
भारतात आजही अनेक ठिकाणी पितृसत्ताक समाजव्यवस्था आहे, ज्यात बाई दुय्यम असते. अनेक घरात आपल्या आई, बहिणीला कसे वागवले जाते हे मुले बघतात. आणि नकळत तसेच वागतात… इथे मी आर्थिक स्तर घेत नाही. अगदी उच्चशिक्षित, सुखवस्तू लोक पण सहज तसे वागतात.
तुम्हाला पटत नसेल तर मुले जिथे खेळतात तिथं जाऊन निरीक्षण करा. सतत धाक, अति शिस्त जशी योग्य नाही, तसेच हे वागणे पण चुकीचेच आहे. आपण भारतीय घरात व्यक्ती म्हणून जसे वागतो, तसे बाहेर समाजात नाही. आणि मेख इथेच आहे.
मुलांना शिस्त असावी म्हणजे काय याची व्याख्या आज बदलली आहे. कारण काही वर्षे आधी सायंकाळी शुंभकरोती आणि मोठ्या व्यक्तीच्या पाया पडणे, उलट न बोलणे इथपर्यंत होते. आजकाल मात्र मुलांना हवे ते करू देणे म्हणजे योग्य पालकत्व अशी व्याख्या झालीय. ‘नाही’ हा शब्द अनेक मुलांना सहन होत नाही आणि आम्हाला मिळाले नाही, निदान आमच्या मुलांना तरी सुख मिळो, पालकांचीही इच्छा चूक नाही. तथापि आपण त्यांना नक्की काय देतो हे डोळसपणे बघायला हवे. तोपर्यंत असे वागणारी मुले पालक होऊन त्यांच्यावर त्यांची मुले जेव्हा त्यांच्या डोक्याला शॉट देतील तेव्हा काव्यगत न्याय मिळेल!! तेवढेच समाधान…