बाहेर तुफान पाऊस कोसळत होता अन् आता ह्या बेमौसमी पावसात करावे का, हा विचार इतरांना असेल, पण सारंग दर्यावर्दीला मात्र नव्हता. दुपारीच ढग भरायला लागले अन् सारंगने इरादा पक्का केला होता. ढगांचे भरून येणे बघता संध्याकाळी सहाच्या सुमाराला पाऊस पडेल हे नक्की होते. सारंगने मस्त बेत ठरवला होता. पाऊस चालू झाला की पहिला पेग भरायचा अन् तोही पटियाला. सावकाश नऊपर्यंत ब्लॅक लेबल रिचवत राहायची अन् शेवटच्या पेगला कबाबची ऑर्डर द्यायची. मस्त हादडायचे अन् दहाच्या सुमाराला जुहूचा भन्नाट वारा घेत लाँग ड्राइव्हला जायचे. पण देवाजीच्या मनात त्याच्यासाठी काही वेगळाच बेत असावा.
खरंच साडेसहाला पाऊस चालू झाला अन् सारंगने पहिल्या पेगला हात घातलाच होता की कर्कश्शपणे बेल किंचाळली. आनंदात विरजण घालायला आलेल्या माणसाच्या नावाने मनातल्या मनात शिमगा करत सारंगने दार उघडले. दारात अर्धवट भिजलेली एक तरुणी उभी.
‘दर्यावर्दी सर आहेत?’
‘हो आहेत ना.’
‘बोलवता का?’
‘आता मी स्वतःलाच कसा हाक मारू? ते पण दारात?’ सारंगच्या मिष्किलीने ती काहीशी गोंधळात पडली होती.
‘म्हणजे?’
‘तुमच्यासमोर दर्यावर्दीच उभा आहे. या आत या..’
ती काहीशी अवघडत आत शिरली अन् धप्पकन सोफ्यावर विसावली.
‘पाणी?’
‘नको. तुम्ही खरंच सारंग दर्यावर्दी असाल, तर माझे तुमच्याकडे खूप महत्त्वाचे काम आहे.’
‘हो, मी खरंच सारंग दर्यावर्दी आहे. आधार कार्ड दाखवू?’ सारंगने पुन्हा गमतीने विचारले. तोवर तिने हॉलचे निरीक्षण करत आपली नजर सारंगच्या पेगवर स्थिरावली होती. तिची नजर बघून सारंग एकदम लाजला अन् त्याने ग्लास उचलून किचनमध्ये पळवला. येता येता तो तिच्यासाठी पाणी घेऊन प्रगटला. पाणी पिताना तिच्या गळ्याची होणारी नाजूक हालचाल तो रसिकतेने न्याहाळत होता.
‘बोला मॅडम, तुमचे काय काम होते?’
‘सारंगजी, मी नेहा कामठे. दोन वर्षापूर्वी माझे राजन थिटेशी लग्न झाले होते.’
‘होते?’
‘मी येते आहे त्या विषयावर.. मला आधी सगळे बोलू द्या प्लीज.’
‘बोला ना..’
‘राजन मेकॅनिक होता. चंद्रशेखर सावंतच्या गॅरेजमध्ये तो कामाला होता. त्याच्या हातात खरंच कला होती गाड्या दुरुस्त करायची. मालकाला पण त्याच्यावर खूप विश्वास होता अन् त्यामुळे त्याला पगार देखील इतरांपेक्षा जास्ती होता. राजन तसा एकटाच. लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलेले. शिक्षण फारसे नव्हते त्याचे, पण मी तरी कुठे दहावीच्या पुढे गेले होते? पहिले सहा महिने आमचे संसार जणू स्वर्ग होता. पण त्यानंतर अचानक त्याच्या आयुष्यात वहिदा आली. चंद्रादादांनी दुसरे लग्न केले होते अन् ही त्यांचीच बायको. त्यांचे काय अन कसे सूत जुळले माहिती नाही, पण दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आधी दबक्या आवाजात चर्चा होती, पण एक दिवशी चंद्रादादांनी सरळ राजनला कामावरून कमी केले आणि सगळा प्रकार उघड झाला. त्या दिवशी रात्री चंद्रादादाने आमच्या घरी येऊन खूप तमाशा केला.’
‘तुम्हाला हे त्याच दिवशी कळले?’
‘खरे तर नाही. राजनचे घरी असताना सतत फोनवर बिझी असणे, माझ्यावर अचानक चिडचिड करणे ह्यावरून मला थोडा अंदाज आला होता; पण कामावर काही टेन्शन असेल, असे मला वाटले होते.’
‘मग पुढे?’
‘चंद्रादादा आमच्याकडे येऊन गेला अन् त्याच रात्री राजनचा खून झाला.’
‘खून?’
‘पोलीस त्याला आत्महत्या किंवा अपघात समजत आहेत, पण ते तसे नाहीये.’
‘म्हणजे?’
‘पहाटे बोरघाटात पोलिसांना एक जळालेल्या अवस्थेतली चारचाकी आढळली. त्यात एक पूर्ण जळालेला मृतदेह होता. त्याच्या अंगावरचे दागिने अन् अर्धवट जळालेले घड्याळ बघून तो मृतदेह राजनचाच असल्याची ओळख पटली. मला ओळखायला बोलावले होते. खरंच सांगते सर, ओळखण्यासारखे काही उरलेलेच नव्हते.’
‘मग तो राजनच होता हे..’
‘उजव्या पायाची करंगळी सर…’
‘तिचे काय?’
‘हे कांड होण्याच्या दोन दिवस आधी राजनच्या उजव्या पायावर वीट पडली होती अन हाडाला दुखापत झाली होती. मयताच्या पायावर त्याच खुणा सापडल्या.’
‘बरं मग?’
‘पोलिसांनी त्यांची कारवाई पूर्ण पाडली. पंचनामा केला, त्यात गाडीने अचानक पेट घेतल्याने राजनचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांनी जाहीर केले.’
‘डीएनए टेस्ट?’
‘ते काय असते?’
‘तुमची कथा मी ऐकली. पण तुमचे माझ्याकडे नक्की काम काय आहे? तुम्हाला राजनचा खून झाला असे वाटत आहे का?’
‘नाही हो साहेब..’
‘मग?’
‘मेला तो राजन नव्हता, हेच मला सांगायचे आहे?’
‘काय?’
‘साहेब, राजनसारखा मेकॅनिक दुनियेत नाही असे सगळे म्हणायचे. तो गाडीत अडकून मरेल?’
‘तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?’
‘साहेब, एक तर मेला तो राजन नव्हता किंवा मग त्याला आधी मारून गाडीत टाकून जाळलेले आहे.’
‘कशावरून?’
‘साहेब, राजन कोणतेही अडकलेले गाडीचे दार सहज उघडू शकायचा, लॉक झालेल्या काचा सहजपणे बाहेरून उघडायचा. तो आतून गाडी उघडू शकणार नाही?’
‘तुमचा कोणावर संशय आहे?’
‘चंद्रादादावर. पण तो रात्रभर स्वतःच पोलीस चौकीत होता.’
‘कसा काय?’
‘त्या रात्री त्याने प्रचंड दारू ढोसली अन् ’आशिकी’ बारमध्ये दंगा घातला. मालकाने पोलिसांना बोलावले अन त्यांनी चंद्रादादाला उचलले. तो रात्रभर आतच होता.’
‘तुम्हाला नक्की माझ्याकडून काय हवे आहे?’
‘साहेब, मेला तो राजन होता का? असेल तर त्याला कोणी मारले? हे स्ागळे मला माहिती करून घ्यायचे आहे. पोलिसांनी तर फाइल अपघात म्हणून बंद केली आहे. आता मला तुमचाच आसरा आहे.’
‘तुम्ही अजून गोंधळलेल्या आहात. शांत व्हा आणि मी नेमके काय करावे असे तुम्हाला वाटते ते सांगा मला नीटपणे.’
‘साहेब, मी दोन वर्षे राजनला ओळखते आहे. तो असा सहजपणे कोणाच्या तावडीत सापडणारा नाही. आणि अशा प्रकारे मरणारा तर नक्की नाही. साहेब ह्यात काहीतरी घोटाळा आहे हे नक्की. पण माझे कोणी ऐकायलाच तयार नाही. शेवटी मी जिथे धुण्याभांड्याला जाते, त्या सरोजिनी काकूंनी तुमचे नाव सांगितले अन् मी इथे धावले.’
सरोजिनी मुंदडा म्हणजे बरेच मोठे प्रस्थ होते अन् त्या सारंगच्या जुन्या क्लायंट देखील होत्या.
‘ठीक आहे मी प्रयत्न करतो, पण हाताला फारसे काही लागेल, अशी अपेक्षा ठेवू नका,’ सारंगने वैतागून शेवटी केसमध्ये हात घातलाच.
– – –
‘कदम साहेब केस काय आहे नक्की?’
‘सारंग, अरे जुनी कार होती. अचानक वायरिंग पेटली अन् कारला आग लागली. दरवाजे आतून लॉक झाले अन् राजनचा केस खल्लास. आम्ही इंजिनिअर्सला बोलावून पूर्ण तपासणी केली आहे सोन्या.’
‘डीएनए?’
‘कोणाचे? राजनला ना माय ना बाप. त्याच्या एकाही नातेवाईकाबद्दल कोणाला पत्ता नाही. तपासणार काय?’
‘पण तो राजनच होता, हे नक्की कसे ठरवले?’
‘बोन स्ट्रक्चर, हाड वाकडे झालेली उजव्या पायाची करंगळी अन् मुख्य म्हणजे हातातले घड्याळ.’
‘कदम तुम्ही शुअर आहात?’
‘१०० टक्के सारंग. ही नेहा वाटते तितकी साधी नाही. त्या चंद्राशी हिची गुलुगुलू चाले असते, अशी आतली बातमी आहे.’
‘खुनाचा काही अँगल?’
‘वाटत तर नाही. मयताच्या शरीरावर मारहाणीच्या, झटापटीच्या काही खुणा नाहीत. अपघात झाला त्या दिवशी राजनला साधी गाडी उघडता येत नव्हती का चालू करता येत नव्हती. तो रात्री प्रचंड प्यायलेला होता. आम्ही बारचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहे. इव्हन गाडी बारच्या बाहेर काढताना त्याने दरवाज्याजवळची कुंडी देखील फोडली होती.’
‘मला केस फाइल बघता येईल?’
‘शुअर.. पण हे फक्त तुझ्या माझ्यात. माझी नोकरी धोक्यात आणू नको.’
कदमांनी दिलेली फाइल सारंग बर्याच वेळ तपासत होता. शेवटी एका फोटोवर टिचकी मारत त्याने शीळ घातली अन् कदमाच्या हृदयाचा ठोका चुकला. काय सापडले ह्या सैतानाला आता? दोन दिवसात क्लोज झालेली केस आता परत नवा रंग घेते का काय?
‘हीरो काय झाले?’
‘कदम, हा फोटो कुठला?’
‘मॅक्सी बारचा. ह्या प्रसंगाचे व्हिडिओ फुटेज पण पोलिसांनी जप्त केले आहे. इथेच राजन गाडी धडकवून कुंडी फोडून बाहेर पडला.’
‘कदम, मॅक्सी बार?’
‘त्याचे काय?’
‘कदम, मॅक्सी बारला पेग सिस्टिम आहे. थ्री स्टार बार आहे तो. राजनसारखी लोकं जिथे पितात, त्या बारला क्वॉर्टर ज्या रेटला असते, त्या रेटला इथे एक छोटा पेग मिळतो.’
‘मग?’
‘मग काय मग? राजनसारखा माणूस असल्या हायफाय बारला सहा किलोमीटर लांब कशाला जाईल? ते ही घरापाशी चार बार असताना?’
‘त्याने काय फरक पडतो सारंग?’
‘बराच फरक पडतो कदम. मी बघतो आता काय करायचे ते. तू धावपळीला तयार राहा..’ सारंग मिश्किलपणे म्हणाला आणि कदमांच्या पोटात मोठा खड्डा पडला.
– – –
‘प्यासा’… कसे शोभून दिसणारे नाव लेऊन तो बार उभा होता. बार फक्त म्हणायचे, पण त्याची अवस्था देशी गुत्त्यापेक्षा वेगळी नव्हती. दोन चार काचा लावलेल्या म्हणून बार म्हणायचे इतकेच. अशा ‘देखण्या’ बारमध्ये चक्क अब्जाधीश सारंग दर्यावर्दी ’टँगो’ची बाटली घेऊन बसलेला होता. कपडे त्याने बारला साजेसे घातलेले असले, तरी त्याचे उमदे रूप कसे लपणार होते? जाणारा येणारा प्रत्येकजण त्याच्याकडे कावळ्यांच्या कळपात आलेला राजहंस अशा नजरेने बघत होता. शेवटी ज्या सगळ्यासाठी हा अट्टाहास केला होता सारंगने तो प्रयत्न यशस्वी ठरण्याची वेळ आली. खांद्यावरचे पोते बाजूला टाकत अन घाम, कचरा आणि कशाकशाचा उग्र वास मारत एक भंगार गोळा करणारा सारंगकडे ’बरा भेटला बकरा’ अशा नजरेने बघत त्याच्यासमोर येऊन टेकला. त्याचा पावशेरचा कोटा संपला अन् त्याने आशाळभूत नजरेने सारंगकडे पाहिले.
‘नवे जणू?’
‘आँ?’
‘नै.. अड्ड्यावर नवे दिसता..’
‘हां. जरा कोणाच्या शोधात आलेलो..’ सारंगने आजूबाजूला सावध नजर फिरवत हळू आवाजात उत्तर दिले. प्रतिक्रिया म्हणून समोरच्या भंगारवाल्याने मोकळ्या ग्लासकडे नजर फिरवली अन् त्याची इच्छा ओळखून सारंगने हसून मान हालवली. त्याने गपकन् सारंगच्या समोरची बाटली आपल्याकडे ओढली आणि एक भला मोठा पेग हावर्यासारखा भरला. त्याचा पेग संपेपर्यंत सारंग शांत होता. त्याचा पेग संपला आणि सारंगने मुद्द्याला हात घातला.
‘भाऊ इथे एक मेकॅनिक राहतो. आपले पैसे अडकलेत त्याच्याकडे…’
‘कोण? भिव्या? का चंद्र्या?’
‘नाही नाही. राजेश नावाचा…’
‘राजन असेल.’
‘बरोबर. राजन. राजनच नाव त्याचे.’ चेहर्यावर खुशी दाखवत सारंग दबक्या आवाजात बोलला.
‘त्याच्याशी काय व्यवहार?’
‘एक इम्पोर्टेड गाडी होती. आपण अशा गाड्यांमध्ये व्यवहार करतो. चोरीच्या असतील तरी खपवतो. इसार म्हणून पंचवीस हजार दिलेले त्याला. तो गायबच झाला एकदम. फोन पण बंद लागतोय. काय लफडा असेल काय?’
‘गचकला तो..’
‘गचकला?’
‘डेड झाला साहेब. पोचला वर.’
‘मेला? असा एकदम?’
‘आता मनुक्षाची काय ग्यारंटी? कोण म्हणतं आक्शिडेंट, कोण म्हणतं चंद्र्यानी मारला. देवाला ठौक काय ते.’
‘आता हा चंद्रा कोण?’ बाटली त्याच्यासमोर सारत सारंगने विचारले अन् समोरच्याची कळी खुलली.
‘चंद्र्याच्या बायकोचे अन ह्या राजनचे लफडे होते साहेब. गुप्ताकडे पण गेली होती म्हणत्यात..’
‘गुप्ता?’
‘तो पोटं पाडणारा डॉक्टर हो. ह्या राजकमल ब्यांडच्या बाजूला त्याचा हास्पिटल आहे.’
सारंगने मान डोलवली अन् वेटरला खूण केली.
– – –
‘कदम, ही वहिदा प्रेग्नंट आहे.’
‘त्याचा काय संबंध आला?’
‘कदम, हे पोर चंद्र्याचे असते तर ती गुप्ताकडे कशाला गेली असती?’
‘नीट सांग बाबा..’
‘हे पोर नक्की राजनचे असणार. कारण राजनचा मृत्यू झाला तेव्हापासून गुप्ता पण गायब आहे.’
‘तू कुठला विषय कुठे घेऊन चालला आहेस सारंग?’
‘मी योग्य दिशेलाच चाललो आहे कदम. आता काही करून ह्या वहिदाचे अन चंद्र्याचे डीएनए सँपल मिळायला हवे आहे.’
‘ते मी बघतो. पण हे सगळे कशासाठी?’
‘अहो कदम… तिच्या पोटातल्या बाळाचा अन चंद्र्याचा डीएनए मॅच झाला नाही तर? त्या बाळाचा डीएनए अन मयताच्या डीएनएची चाचणी पण जुळली नाही तर?’
‘सारंग ही एक अपघाताची केस आहे. तू किती फाटे फोडतो आहेस?’
‘हा खून आहे कदम अन मेलेली व्यक्ती राजन नाही असा मला देखील संशय आहे.’
‘त्या नेहाने बुद्धी भ्रष्ट केली आहे तुझी.’
‘इतकी सहजपणे भ्रष्ट होणारी बुद्धी नाही माझी. थोडे सहकार्य कर, मी ह्या नाटकावरचा पडदा उठवतो बघ.’
– – –
‘साहेब, असे मला अचानक चौकीत बोलावले?’
‘वहिदा, डॉ. गुप्ता कुठे आहे?’ लेडी कॉन्स्टेबलने दमदार आवाजात विचारले अन वहिदा दचकली.
‘कोण गुप्ता?’
‘तोच ज्याच्याकडे तू तपासायला गेली होतीस.’
‘मी कशाला कुठे जाऊ?’
‘गुप्ताच्या दवाखान्यात कॅमेरे बसवलेत वहिदा.’
‘एकपण कॅमेरा नाही,’ वहिदा ठामपणे बोलली अन आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर तिच्या चेहर्याचा पूर्ण रंग उडाला.
‘बाई अगं तू तिकडे गेलीच नाहीस कधी, तुला गुप्ता माहिती पण नाही, तर मग ही सगळी माहिती कशी काय? आता खरे काय ते बोलतेस का काढू काठी?’
‘मॅडम, मी काही नाही केले. माझी पाळी चुकली अन् मी घाबरले. मी सरळ गुप्ताला जाऊन भेटले आणि त्याने मला सांगितले की मी पोटुशी आहे. त्यानंतर तो कुठे गेला, त्याचे काय झाले मला माहिती नाही.’
‘हे पोर राजनचेच ना?’
‘मला नाही माहिती..’
‘राजन कुठे आहे वहिदा?’ खाडकन मागून प्रश्न आला आणि वहिदा पुन्हा दचकली. मागे सारंग उभा होता.
‘मेला तो..’
‘मेला तो राजन नव्हता वहिदा. दुसरा कोणी होता.’
‘म.. मला काही माहिती नाही. मला घरी जाऊ द्या.’
‘असे कसे माहिती नाही वहिदा? घरातले दागिने विकून आलेले पैसे दिलेस कोणाला मग?’
‘मी असे काही केलेले नाही.’
‘गुंजाळ सोनाराला भेटून आलोय मी वहिदा. त्याला बोलवायचे का तुझ्यासमोर? का तुला न्यायचे तिकडे बेड्या घालून?’ सारंगने आवाज चढवला अन् वहिदा ओक्साबोक्शी रडायला लागली.
– – –
‘सारंग, हे नक्की प्रकरण तरी काय आहे?’
‘पोलिसांनी फार वर वर शोध घेतला कदम. हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही. तपासात तुम्हाला खुणा, पुरावे तर सापडले पण ते पेरलेले होते.’
‘म्हणजे?’
‘वहिदा अन् राजनचे प्रकरण चंद्र्याला कळले अन् त्याने राजनच्या घरी जाऊन तमाशा केला. नेमके त्याच दिवशी दुपारी वहिदाने राजनला आपण प्रेग्नंट असल्याचे कळवले होते. त्यांनी चंद्र्याचा काटा काढायचे देखील ठरवले होते. राजन आधीच टेन्शनमध्ये होता. चंद्र्याने घराबाहेर तमाशा केला अन् राजनने त्याचाच फायदा घ्यायचे ठरवले. सगळ्यात आधी त्याने वहिदाला गाठले अन् प्लॅनप्रमाणे तिने दागिने विकून जे पैसे आणले होते ते त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तो जिथे सगळीकडे सीसीटीव्ही असतील अशा बारमध्ये तमाशा करून घेतला. तो बाहेर पडला आणि लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने हायवेवरून एकाला गाडीत बसवले. त्याला प्रचंड दारू पाजली आणि बेशुद्ध केले. घाटात गाडी नेऊन त्याने दोघांचे कपडे, घड्याळे, गळ्यातल्या माळा, कडे वगैरे अदलाबदली केले आणि आतून गाडीला आग लावली. त्यासाठी त्याने नक्की काय मेकॅनिक फंडा लावला ते अधिक तपासात कळेलच. मात्र, गाडीला आग लागताच त्याने तिथून सुंबाल्या केला.’
‘हे सगळे असे घडले?’
‘माझ्या अंदाजाने हे असेच घडले आहे. माझ्या माणसांनी राजनचा माग काढला आहे आणि तो शिक्रापूरच्या धाबा कम लॉजमध्ये लपला आहे. तुझा फोन लागत नव्हता म्हणून मी कमिशनर साहेबांना कळवून तिथे एक पोलीस पथक आधीच रवाना केले आहे. लवकरच तो ताब्यात आला की सगळे काही समोर येईलच!’
‘पण तुला ह्या सगळ्याची शंका आली कशी?’
‘एकतर राजनने निवडलेला हायफाय बार, इतका प्यायलेला अन गाडी चालवू न शकणारा माणूस २४ किलोमीटर पुढे घाटापर्यंत सुखरूप पोहोचतो, हे सगळेच संशयास्पद होते. त्यात नेहाला असलेला ठाम विश्वास, वहिदाचे प्रेग्नंट असणे असे बरेच कच्चे दुवे माझ्या हाताला लागले अन मी त्यांना एकत्र करत घट्ट बांधले.’ सारंग बोलत असतानाच त्याचा फोन वाजला.
‘राजन सापडला कदम..’ डोळा मारत सारंग म्हणाला अन कदमांनी दोन्ही हात जोडत त्याला नमस्कार घातला.