एकीकडे मूत्रपिंडाविना तडफडणारी बायको आणि दुसरीकडे स्वतःचे एक मूत्रपिंड दान करण्याचे आर्जवे करणारी सहकारी. डॉ. दीपक दंद्वात सापडले होते. त्यांच्यातला मूत्रपिंडरोपण तज्ज्ञ शल्यविशारद भावनिक बुचकळ्यात सापडला होता. अखेर सिस्टर मुग्धाचा विजय झाला आणि त्या दिवशी त्या दोन शस्त्रक्रिया डॉक्टरांनी पार पाडल्या होत्या… थरथरत्या हातांनी, मात्र यशस्वीपणे. ‘निवडक जोसेफ तुस्कानो’ या पुस्तकातील एक कथा.
– – –
डॉ. दीपक त्राण गळाल्यागत खुर्चीत बसून राहिले होते. त्यांचे हातपाय जणू शक्तिहीन झाले होते. मूत्रपिंडरोपणाची ती शस्त्रक्रिया दिवसभर चालली होती. त्यांचे मन अधीरतेने व्यापले होते. काहीशा व्याकूळतेने त्यांचे अंतःकरण तडफडत देखील होते… चेहर्यावरून कृतज्ञता ओसंडून वाहत होती.
मागच्या आठवड्यातील ती शस्त्रक्रिया त्यांना आठवली. त्या तरुण पेशंटला एक मूत्रपिंड मिळण्यासाठी किती वाट बघावी लागली होती! डायलेसिसला तर तो पार वैतागून गेला होता. त्याचा बाप धनाढ्य होता त्यामुळे प्रश्न पैशाचा नव्हताच. पण तो वेदनादायक कृत्रिम उपचार त्याला नकोसा झाला होता. तो म्हणालासुद्धा, ‘डॉक्टर, कंटाळा आलाय या कृत्रिम जगण्याचा. हे अपंगत्व सहन होत नाहीये.
मात्र, डॉक्टर त्याला सारखे धीर देत होते. जीवन किती मोलाचे आहे हे पटवून देत होते. त्याने नकारात्मक भूमिका सोडून द्यावी, म्हणून वैद्यकीय जगातले अनुभव ऐकवून त्याच्यात आशावाद रुजवीत होते. अन् त्याच्या अगदी दुसर्याच दिवशी छत कोसळून चिरडला गेलेला एक मजूर इस्पितळात आणला गेला. त्याच्या कवटीचा पार चेंदामेंदा झाला होता. ‘मेंदू निकामी होऊन आलेला मृत्यू’ म्हणून ती केस फाईलबंद झाली. त्या मजुराचा आगापिछा नव्हता. सुदैवाने, त्याचा रक्तगट त्या तरुणाशी मिळताजुळता होता. डॉ. दीपकनी सहकार्यांशी चर्चा केली. संबंधितांची अनुमती मिळविली. कायदेशीर कागदपत्रे भराभर तयार केली. तो पेशंट आणि त्याचे आईबाप आनंदाने या अवयवरोपणासाठी तयार झाले. त्या मजुराची दोन्ही मूत्रपिंडे शाबूत होती. ती दोन्हीही या तरुणाला हवी होती. त्याच्या गर्भश्रीमंत बापाने आपणहून देऊ केलेली त्याची किंमत डॉक्टरांनी नाकारली नाही. त्यांनी ती इस्पितळाच्या फंडात जमा केली. गरीब रुग्णांच्या फंडात जमा केली. यदाकदाचित त्या मजुराचा कुणी वारस चौकशी करीत आला, तर त्याला भरपाई देण्यासाठी तो पैसा उपयोगी पडणार होता. डॉ. दीपकनी सराईतपणे ती शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडून त्या तरुण रुग्णाला नवजीवन दिले होते.
पण आजची केस वेगळी होती. शल्यविशारद डॉ. दीपकचे हात ऑपरेशन करताना थरथरले होते. स्वतःच्या बायकोवर त्यांनी अवयवारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. तिची निकामी झालेली मूत्रपिंडे काढून तिच्या शरीरात एक नवीन सशक्त मूत्रपिंडरोपण केले होते. सिस्टर मुग्धाने दान केलेले मूत्रपिंड! अन् हो, आजच्या शस्त्रक्रियेसाठी मुग्धा कुठे होती, साहाय्य करायला? त्यामुळेच त्यांना सारखे चुकचुकल्यासारखे वाटत होते. त्यांच्या साहाय्यक डॉक्टर सिस्टरांच्या नजरेतून त्यांची ती अस्वस्थता सुटली नव्हती…
खुर्चीत बसल्या बसल्या डॉ. दीपकच्या बंद नजरेसमोरून सगळा इतिहास सरकू लागला. वसईच्या एका गावात जन्मलेल्या गरीब शेतकर्याचा मुलगा आणि लहानपणीच पोरका झालेला दीपक मामाच्या आश्रयाने वाढला. मामाने त्याच्या कुशाग्र बुद्धीची आणि मेहनतीची कदर करून त्याला शिकविले. पदवी मिळविली, एखाद्या सरकारी खात्यात चिकटला की, मामा हात झटकून कर्तव्यातून मोकळे होणार होते. पण, झाले उलटेच! दीपक बोर्डात गुणवत्ता यादीत पास झाला, दहावीला आणि बारावीलादेखील शिष्यवृत्या मिळवीत डॉक्टर झाला. शहरातल्या एका नामवंत इस्पितळात शल्यविशारद म्हणून रुजू झाला. अल्पावधीतच ख्यातकीर्त झाला… त्याच्या लग्नाच्या वेळी मामाचा भाव वधारला. श्रीमंताघरची मंडळी मामाला मस्का लावू लागली. शेवटी मामाच्या उपकाराची जाणीव ठेवून मामाने निवड केलेल्या मुलीशी दीपकने लग्न केले.
अनिता त्याच्या जीवनात आली ती तिच्या घरचे श्रीमंती संस्कार घेऊनच. तशी ती मुळात हुशार मुलगी, पण लाडाकोडात वाढल्यामुळे तिने शिक्षणाचा कंटाळा केला होता. तिच्या जगण्याविषयीच्या कल्पनादेखील माफक होत्या. बापाने डॉक्टर नवरा मिळवून दिल्यामुळे ती तशी खूष होती. काहीशी मिजाशीत होती. डॉक्टर नवर्याने खोर्याने पैसा मिळविला की आपल्याला कसली ददात उरणार नाही हे स्वप्न ती पाहू लागली होती.
पण, डॉ. दीपकनी आपले करिअर एक ‘मिशन’ म्हणून मानले होते. ‘जीवनदान’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. ते रात्रंदिवस इस्पितळात काम करीत होते, गोरगरिबांच्या मदतीला धावून जात होते… मग, नवरा-बायकोचे खटके उडत गेले. प्रारंभी डॉक्टर तिला खूप तर्हेने समजावीत होते.
‘अगं अनिता, आपण केवळ मेंदूने विचार करून चालेल का? हृदयाने सुद्धा विचार केला पाहिजे नाही का?’
‘तुमचे ते तत्त्वज्ञान मला ऐकवू नका. जेव्हा बघते तेव्हा तुम्ही कामात. बँकेत शिल्लक काय आहे हे तरी माहीत आहे का? अन् त्या सिस्टर मुग्धाचा फोन आला की निघालात धावत,’ अनिता चरफडत म्हणाली.
अनिताच्या बोलण्याचा रोख डॉ. दीपकच्या लक्षात आला होता. आपण धनकमाईकडे दुर्लक्ष करतो हे त्यांना पटवून देण्याचा ती सारखा आटापिटा करायची. आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन त्याने स्वतःचे स्वतंत्र इस्पितळ काढावे असे सारखे टुमणे लावून होती. पण, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. सरकारी इस्पितळातच राहून त्यांना आम समाजाची सेवा करायची होती. सासर्यांच्या उपकारांचे ओझे त्यांनी झटकन नाकारले होते. त्यामुळे अनिता त्यांच्यावर सारखी चिडायची. त्यांना काहीबाही बोलायची. तुसडी वागणूक द्यायची. ते सारे डॉक्टर निमूटपणे सहन करायचे. अन् आज अनिताने सिस्टर मुग्धाचा उल्लेख केल्यावरही ते काही बोलले नव्हते.
सार्या इस्पितळाला डॉ. दीपक आणि सिस्टर मुग्धा यांच्यातील जवळीकीची माहिती होती. पण, डॉक्टरांबद्दलच्या आदरयुक्त दरार्यामुळे कुणी त्याविषयी ब्र काढीत नसे. डॉक्टर-सिस्टरांमध्ये निर्व्याज प्रेमाचे एक नाते निर्माण झाले होते. मुग्धा डॉक्टरांना त्यांच्या मूत्रपिंड-रोपणाच्या शस्त्रक्रियेत मदतनीस म्हणून काम करायची. ती कार्यतत्पर होती, त्याहीपेक्षा खूप प्रेमळ होती. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची मानसिक तयारी व्हावी म्हणून ती किती धडपडे! तिचा प्रेमळ स्वर रुग्णांना आश्वासक वाटे. शस्त्रक्रिया केलेला रुग्ण डोळे उघडायचा तेव्हा सिस्टर मुग्धाच्या गालावर खळी पडणार्या हास्याने त्याचे स्वागत होई.
अन डॉक्टरांचीदेखील ती खूप काळजी घेई. अगदी वैयक्तिकरीत्या त्यांच्या सेवेस तत्पर राही. डॉक्टराची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि शस्त्रक्रिया कौशल्य याने ती भारावून जायची. त्यांच्याप्रती असलेला तिच्या मनातला आदर दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहायचा. दिवसभराच्या घाईगर्दीच्या कामात कधी फावला वेळ की ते दोघे मनसोक्त बोलत बसत. मात्र, ती सगळी चर्चा रुग्णाच्या मानसिकतेबद्दल, वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडींबद्दल, त्यांना आलेल्या इस्पितळातील अनुभवाबद्दल असे. एखाद्या जागतिक स्वरूपाचा वैद्यकीय परिषदेला डॉक्टर जाऊन येत, तेव्हा ते तिला सोप्या भाषेत तिथल्या घडामोडीची माहिती देत. कारण सिस्टर मुग्धाच्या ठायी असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्यांनाही साक्षात्कार झालेला होता. रुग्णांच्या स्वभावाचे किंवा लक्षणांचे निरीक्षण करून ती खूपदा अचूक तर्क करायची आणि मग डॉक्टर आणि ती योग्य निष्कर्ष काढून त्या रुग्णावर उपचार करायचे. तो उपचार नेमका रामबाण ठरायचा. डॉ. दीपकच्या अगाध ज्ञानाचे सिस्टर मुग्धाला खूप कुतूहल वाटायचे.
गत वर्षी ते युरोपातील एका परिषदेला हजेरी लावून परतले होते. त्या परिषदेत वाचल्या गेलेल्या वैद्यकीय शोधनिबंधातील माहिती खरोखर विस्मयकारक होती.
‘मुग्धा,’ त्यांनी गप्पांच्या ओघात सिस्टरला सांगायला सुरुवात केली होती. सगळ्या इस्पितळात डॉक्टर एकटेच तिला एकेरी नावाने हाक मारीत. खरे म्हणजे, इस्पितळातल्या तिच्या कामाचा आटापिटा पाहून डॉक्टर मुद्दामहून तिला उसंत मिळावी म्हणून काहीतरी सांगायचे निमित्त काढीत व दोघेही उसंत घेत.
‘जपानच्या डॉ. आटोमिकांनी सूक्ष्म निरीक्षणे व सर्वेक्षण करून अवयवरोपण झालेल्या रुग्णांसंबंधी महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलाय, अगदी पुराव्यासहित,” ते म्हणाले.
`काय म्हणताहेत, डॉ. आटोमिका?’ नेहमीच्या कुतूहलभरल्या निष्पाप चेहर्याने सिस्टर मुग्धाने विचारले, तेव्हा डॉक्टरांचा हुरुप वाढला.
`त्यांचे म्हणणे आहे की, एका शरीराचा कुठलाही अवयव दुसर्या शरीरात रोपण केला तर ज्या रुग्णाच्या शरीरात हे रोपण होते, त्याचा स्वभाव हळूहळू बदलत जातो. त्याच्या स्वभावाची जडणघडण त्या अवयवदान करणार्या व्यक्तीसारखीच होते.’
‘खरंच की काय?’
‘हो, रोपण केलेल्या अवयवाच्या पेशी यशस्वीपणे कार्यरत झाल्या की, त्या नव्या शरीरात प्रभावी होऊ पाहतात. या रोपण केलेल्या अवयवातल्या पेशीतील विशिष्ट जनुके मज्जासंस्थेत प्रवेश करून आपला प्रताप दाखवितात. त्याचा परिणाम स्वभाव बदलण्यात होतो, असा त्यांचा निष्कर्ष आहे.’
‘एक सांगू, डॉक्टर?’
‘बोल.’
‘दोन वर्षांपूर्वी आपल्या इस्पितळात एक भाजलेला पेशंट आला होता. अब्दुल वसीम त्याचं नाव. त्याच्या शरीरावर आपल्या इस्पितळात त्वचारोपण करण्यात आले होते. तो बरा झाल्यावर त्याची बायको वर्षभरानंतर भेटायला आली होती. म्हणते कशी, ‘सिस्टर, आपने क्या जादू किया?’ मी विचारले, ‘काय झाले?’ तर म्हणाली की आधी अब्दुल खूप आक्रस्ताळी होता, तापट होता. ऑपरेशननंतर अगदी शांत झालाय, देवाधर्माला लागलाय. मी त्यावेळी तिची समजूत काढली की वेदना माणसाला शहाणे करतात. मात्र, आता मला वाटायला लागलंय की त्याच्यावर रोपण केलेली त्वचा एखाद्या पापभिरू माणसाची असावी.’
‘तसंही असेल. डॉ. आटोमिकांनी अशी बरीच उदाहरणे आपल्या शोधनिबंधात उद्धृत केली आहेत. तूदेखील आपल्या इस्पितळातील पेशंटवर लक्ष ठेव. त्यातून काही इंटरेस्टिंग माहिती आपल्यालाही मिळेल,’ डॉक्टर कौतुकाने म्हणाले.
डॉक्टरांनी केलेले कौतुक सिस्टर मुग्धाला शाबासकीसारखे वाटे. तिच्या शरीरावर मूठभर मांस चढले. पण, त्याचवेळी तिच्या डोक्यात एक विचार चमकला आणि ती विमनस्क झाली. सतत प्रसन्नचित्त असलेले आणि कामात गढलेले डॉ. दीपक कधीतरी खूप उदास दिसायचे. गप्पांच्या ओघात तिला त्याचे कारणदेखील गवसले होते. डॉक्टरांचे आणि त्यांच्या बायकोचे स्वभाव जुळत नव्हते. तिच्या हट्टी आणि चंगळवादी वृत्तीमुळे ते नाराज होते. पन्नाशीतल्या या यशस्वी गृहस्थांची वैयक्तिक शोकांतिका तिला खूप रुखरुख लावीत होती. डॉक्टरांचा जास्तीत जास्त सहवास लाभावा आणि त्यांना आपल्या प्रेमळ शब्दांचा आधार द्यावा, असे तिला मनोमनी वाटे.
एकदा काय झाले, डॉक्टरांनी तिला Reader Digest या इंग्रजी मासिकाचा नोव्हेंबर २००६चा अंक दाखविला. त्यात Gift of Life हा लेख होता व तो अवयवरोपणाचे महत्त्व विशद करणारा होता. अवयवदान हे किती श्रेष्ठ दान आहे, हे त्या लेखात सोदाहरण पटवून दिले होते. इतकेच नव्हे, तर समंजस लोकांनी मृत्यूनंतर अवयवदान करावे हे जाहीर आवाहनदेखील केले होते. त्यासाठी अवयवदानाची घोषणा करणारी कार्डेदेखील त्या अंकात उपलब्ध करून दिली होती. त्या कार्डात माहिती भरून ती आपल्या पाकिटात ठेवायची म्हणजे अपघाती मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याची इच्छा इतरांना कळू शकत होती. अवयव निकामी झालेले रुग्ण नवा अवयव मिळावा म्हणून किती तिष्ठत, तडफडत असतात हे त्या दोघांनी स्वतः अनुभवले होते.
‘डॉक्टर, वास्तविक आपल्याकडे श्रद्धेचा भाग म्हणून लोकं मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे टाळतात. मात्र ख्रिस्ती, हिंदू, बुद्ध, ज्यू, शीख आणि मुस्लीम या सर्व धर्मांत अवयवदानासाठी अनुमती दिलेली आहे.’
”हो ना, मुग्धा. जोपर्यंत आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्य माणसात रुजत नाही तोपर्यंत याविषयी उदासीनता दिसून येईल.’ ‘मात्र, आता आपण सगळ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून अवयवदानाकडे बघायला पाहिजे,’ सिस्टरने आपले मत मांडले. ‘अनुकंपा हा तर आपल्या हिंदू धर्माचे आधारभूत तत्त्व आहे आणि अवयवदान हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण होऊ शकेल.
‘आणखी काही छोटी मोठी कारणे या महत्त्वपूर्ण विषयाच्या आड येतात. Brain death विषयी आपल्याकडे गोंधळ आहे. मेंदू मृत झालेला माणूस त्यांच्या आप्तस्वकीयांना जिवंत वाटतो, मात्र त्याच्या शरीरात व्हेन्टिलेटरद्वारा ऑक्सिजन पंप केला, तरच त्याचे हृदय व फुफ्फुसे धडधडतात हे कुणी लक्षात घेत नाही. ते नैसर्गिक जगणे नसतेच मुळी.’
‘अन् डॉक्टर, नातेवाईकांचा आक्रोश आपण नेहमी अनुभवतोच ना?’
‘खरं म्हणजे अवयव तुटवडा ही जागतिक समस्या आहे. विज्ञान तंत्रज्ञान खूप प्रगती करीत आहे, तरीसुद्धा माणसाची प्रवृत्ती बदलत नाही, ही खेदाची बाब आहे. आता हे बघ ना, आपल्याकडे प्रचंड प्रमाणात अपघात होतात. इस्पितळात लोकं आजारी होऊन मरतात. त्यापेक्षा अपघातात अचानक जीव गमवण्याच्या दुदैवी माणसांचे अवयव इतरांना खूप उपयुक्त ठरू शकतात. तरीही, १० कोटी मागे पाच जण स्वेच्छेने अवयवदान करतात, हे किती व्यस्त प्रमाण आहे!”
‘पण डॉक्टर, त्याला आपली सरकारी यंत्रणादेखील कारणीभूत आहे. आपल्या मृतदेहाची हेळसांड होईल, ही भीती देखील काहींच्या मनात असते.’
‘हो ना! तेव्हा आपण स्वतःपासून या पवित्र कार्याला सुरुवात करायला हवी,’ डॉक्टर म्हणाले. मग त्या दोघांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे ठरविले. रिडर्स डायजेस्टमधल्या त्या प्रतिज्ञा-कार्डसमध्ये योग्य ती माहिती भरून आपापल्या पर्स-पाकिटात ठेवली.
त्यानंतर, अगदी दोन दिवसांनी डॉ. दीपकनी सिस्टर मुग्धाला आपले इच्छा-पत्र दाखविले. ते वाचून ती चकितच झाली. त्यांनी लिहिले होते, ‘शरीरात आत्मा असेल का? की सजीवता हेच आत्म्याचे रूप आहे? जीव जातो तेव्हा आत्मा शरीर सोडून जातो पण, नेमका कुठे जातो?… या विचारांनी जिवंतपणीच मेंदूचा बर्यापैकी भुगा केलेला आहे. अन् आत्मा असेलच आणि तो परतीच्या अगम्य प्रवासाला निघाला की या निष्प्राण देहाचा उपयोग काय? तेव्हा देहदान व्हावे हीच मनःपूर्वक इच्छा आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू या सद्भावनेमागे नाही. माझ्या अखेरच्या क्षणी शरीराचे सर्व उपयुक्त अवयव वैद्यकीय सल्ल्यानुसार काढून, ते गरजूंना दान करावेत. शरीराचा उरलासुरला भाग विद्युतदाहिनीत जाळून माझे पुरते अस्तित्व नष्ट करावे. आयुष्यात हातून तसं काही भव्यदिव्य घडलेले नसल्यामुळे कुणाच्या आठवणीत उरावे अशी मुळीच अपेक्षा नाही. निरपेक्ष प्रेम कुणावर करता आले नाही आणि निर्व्याज प्रेम कुणी दिलेही नाही. तेव्हा कुठलाही हिशेब न करता ते खाते आपसूक बंद होणारे आहे. समाजाला भरभरून द्यायची इच्छा मात्र अपुरी राहणार आहे. ती खंत उरी बाळगून जगावे लागते आहे. अंत्ययात्रा, श्रद्धांजली, सांत्वन, स्मरण आणि स्मारक या गोष्टी होऊच नयेत. फुंकर घातलेल्या मेणबत्तीच्या गत माझे अस्तित्व झटकन् नाहीसे व्हावे. कुणाच्या अमूल्य वेळ आणि कष्टाने कमविलेल्या पैशाचा अपव्यय त्यातून होऊ नये हीच विनम्र माफक अपेक्षा.’
डॉक्टरांचे ते इच्छापत्र वाचून होताच मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू तरळले. डॉक्टरांच्या नजरेस आपली भावनिक कमतरता पडू नये म्हणून ती पटकन् वार्डात शिरली. अन् अगदी काही महिन्यांनंतर ती धक्कादायक घटना घडली. एका छोट्याशा अपघाताचे निमित्त झाले होते आणि अनिताच्या डॉक्टरांच्या बायकोला पोटाखाली खूप मार लागला होता. त्या अपघातात तिच्या दोन्ही मूत्रपिंडांना मार लागून त्यांना इजा पोचली होती. तिचा रक्तगट बी-निगेटिव्ह असल्यामुळे डॉक्टर दीपक खूप चिंतेत पडले होते. सिस्टर मुग्धा त्यांची धावपळ बघत होती. तिचा रक्तगट ओ-निगेटिव्ह होता व तो त्या दुर्मिळ बी-निगेटिव्ह या रक्तगटाशी जुळवून घेऊ शकत होता. तिने मनाशी एक निश्चय केला.
`ते कसं शक्य आहे, मुग्धा’, डॉ. दीपक मोबाईलवरून जवळजवळ ओरडलेच. ते रुग्ण बायकोजवळ बसले होते. अनिताचा तो अपघात झाल्यापासून त्यांचे कामावरचे लक्षच उडाले होते. तिची सेवा-शुश्रूषा करण्यात ते पार गुंतले होते… अन् मुग्धा फोनवरून सांगत होती की, ती तिची एक किडनी अनिताला द्यायला तयार झाली होती. आपल्या मैत्रिणीचा एवढा मोठा त्याग त्यांना सहजपणे झेपणारा नव्हता.
`डॉक्टर, तुम्हाला माहित आहे ना! मला ना आगा ना पिछा. ज्या दोन भावंडांसाठी मी लग्नाच्या भानगडीत पडले नाही ते आता चांगले सेटल झाले आहेत. केवळ म्हातारे आई-बाबा आहेत, त्यांची सेवा करायचीय, बस्स!’ मुग्धा आजर्व करीत सांगत होती.
`तरीही, अजून उभे आयुष्य आहे तुझ्यापुढे?’ डॉक्टरना तिचा तो प्रस्ताव अजिबात मान्य नव्हता.
`डॉक्टर, मी चांगली पंचेचाळिशी गाठलीय. अन् हे सारे मी माझ्या आनंदासाठी करते आहे. आपण याचा कुठे बोभाटा होऊ द्यायचा नाही म्हणजे झाले.”
एकीकडे मूत्रपिंडाविना तडफडणारी बायको आणि दुसरीकडे स्वतःचे एक मूत्रपिंड दान करण्याचे आर्जवे करणारी सहकारी. डॉ. दीपक दंद्वात सापडले होते. त्यांच्यातला मूत्रपिंडरोपण तज्ज्ञ शल्यविशारद भावनिक बुचकळ्यात सापडला होता. अखेर सिस्टर मुग्धाचा विजय झाला आणि त्या दिवशी त्या दोन शस्त्रक्रिया डॉक्टरांनी पार पाडल्या होत्या… थरथरत्या हातांनी, मात्र यशस्वीपणे.
खुर्चीवर बसल्या बसल्या तो सारा चित्रपट त्यांच्या नजरेसमोरून सरकत गेला. त्यांचे मन मिश्रभावनांनी भरून आले होते. त्याचवेळी त्यांना डॉक्टरांना डॉ. आटोमिकाच्या संशोधनाची आठवण झाली. एक वेगळीच हुरहुर त्यांच्या शरीरभर सैरभर पसरली. आता त्यांचे मन एका वेड्या आशेने कुतूहलाच्या गर्दीत गरगरू लागले होते…
अनभिज्ञ (२०१२)
नवचैतन्य प्रकाशन मुंबई