सचिन तेंडुलकर पायचीत गो. मॅकग्रा… ‘‘यष्टीची उंची सहा इंचाने अधिक असती, तर सचिन तेंडुलकरला निश्चित बाद ठरवता आले असते!’’… ही भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांची खोचक टिप्पणी या घटनेचे गांभीर्य मांडणारीच आहे…
…१९९९च्या अॅडलेड कसोटीमधील ती घटना आजही क्रिकेट चाहत्यांना आठवत असेल. वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या
उसळणार्या चेंडूवर सचिनला भोपळाही फोडता आला नाही आणि पायचीत होऊन तो माघारी परतला. एका गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले, इतकी ही घटना साधीसरळ नक्कीच नव्हती. या घटनेचे नायक सचिन आणि मॅकग्रा आहेत, हेसुद्धा अभिप्रेत नाही. त्याचे वेगळेपण असे की, मॅकग्राने टाकलेला चेंडू खरे तर चुकवण्यासाठी खाली झुकलेल्या सचिनच्या खांद्यावर आदळला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी पायचीतच्या निर्णयासाठी दाद मागितली आणि पंच डॅरेल हार्पर यांचे बोट क्षणार्धात आकाशाकडे गेले.
सचिनला काय घडते आहे, याचा अंदाज येण्याआधीच हा धक्का बसला. निराशेने सचिनने पॅव्हेलियनचा रस्ता धरला. समस्त क्रिकेटजगतात या घटनेबाबत आश्चर्य, नाराजी आणि टीकेचे तरंग उमटले. क्रिकेटमधल्या खेळभावनेविषयी जाणकारांमध्ये चर्वितचर्वण झाले. काही क्रिकेटतज्ज्ञांनी तर क्रिकेटच्या नियमांचा अर्थ-अन्वयार्थ काढला आणि सचिन बाद नसल्याचे पुराव्यासह सिद्ध केले. या वादाच्या वाईटात एक चांगली घटना क्रिकेटमध्ये घडली ती म्हणजे २००२पासून कसोटी मालिकेकरिता त्रयस्थ पंचांची संकल्पना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अंमलात आणली.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेचे महत्त्व वाढले, ते याच घटनेपासून. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अॅशेस किंवा भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानी द्वंद्वाची उत्सुकता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेच्या बाबतीतही निर्माण झाली. गेल्या काही वर्षांतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील अनेक घटना आणि प्रसंगांनी क्रिकेटमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. उभय संघांमधील चार कसोटी सामन्यांच्या ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या मालिकेची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.
हरभजन सिंग-अॅर्न्ड्यू सायमंड्स यांच्या वादावर आधारित ‘मंकी गेट’ प्रकरण तर आख्यायिका झाले आहे. २ ते ६ जानेवारी २००८ या कालावधीत सिडनीच्या त्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे कवित्व अद्याप ओसरलेले नाही. हरभजनने आपल्यावर वर्णभेदात्मक शेरेबाजी करीत ‘‘माकड’’ संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली. मग बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल हरभजनच्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीत सचिन तेंडुलकरची जबानी महत्त्वाची ठरली होती.
ही कसोटी मैदानी पंच स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन तसेच तिसर्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयांमुळेही गाजली. बकनर यांच्या चुकीच्या निर्णयांमुळेच सामन्याला कलाटणी मिळाली. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने विजयाकरिता साम-दाम-दंड-भेद या रणनीतीचा सामन्यात वापर केला. अखेरच्या दिवशी तासाभराचा अवधी असतानाच मायकेल क्लार्कने पाच चेंडूंत ३ बळी घेत ही कसोटी कांगारूंना १२२ धावांनी जिंकून दिली. परंतु ‘जिंकण्यासाठी काहीही…’ या ऑस्ट्रेलियाच्या नीतीवर कडाडून टीका झाली.
सामन्यानंतरच्या मुलाखतीत भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने ‘‘फक्त एकच संघ खेळभावनेने खेळला एवढेच मी सांगेन,’’ असे भाष्य केले. त्यामुळेच क्रिकेटक्षेत्राला १९३२च्या ऐतिहासिक ‘बॉडीलाइन’ मालिकेची आठवण झाली. त्या रक्तरंजित मालिकेमुळे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील राजनैतिक संबंध दुरावले होते. तशाच प्रकारची ठिणगी ‘मंकी गेट’मुळे पडली होती. ‘बीसीसीआय’ने खेळाडूंना मायदेशात आणण्यासाठी खासगी विमानाचीसुद्धा व्यवस्था केली होती. परंतु सुदैवाने हे प्रकरण निकालात निघाले.
२०१७च्या बंगळूरु कसोटीत स्टीव्ह स्मिथने पंचांनी बाद दिल्यानंतर तिसर्या पंचांकडून दाद मागण्यासाठी म्हणजेच ‘डीआरएस’ घेण्यासंदर्भात ड्रेसिंग रूममध्ये विचारणा केली होती. कोहलीने ही बाब त्वरित पंचांच्या निदर्शनास आणली. यावेळी ऑस्ट्रेलियाची इभ्रत वेशीवर टांगली गेली. चूक उमगल्यानंतर मात्र स्मिथने दिलगिरी प्रकट केली आणि भ्रमिष्टाप्रमाणे वागल्याची सारवासारव केली होती.
२००४मध्ये नागपूरमधील तिसरी कसोटी वाचवणे भारताला आवश्यक होते. परंतु पहिल्या दिवशी सकाळीच कर्णधार सौरव गांगुलीने दुखापतीमुळे माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला. पण यामागची खरी बातमी निराळीच होती. भारतीय गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळावी, यासाठी गांगुलीने क्युरेटरला सूचना केली होती. ती त्याने धुडकावल्यामुळे गांगुलीने सामन्यातून माघार घेतल्याचे चर्चेत होते. परंतु गांगुलीच्या आततायी निर्णयामुळे भारताने ही कसोटी मोठ्या फरकाने गमावलीच, शिवाय मालिकेवरही ऑस्ट्रेलियाने कब्जा केला. तब्बल ३५ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली होती.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने आत्मचरित्रात ‘हिरवी रणनीती’ असे संबोधत गांगुलीवर तोंडसुख घेतले आहे. याच गांगुलीने २००१मध्ये कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याला नाणेफेकीसाठी प्रतीक्षा करायला लावली होती. नाणेफेकीसाठी घालून जायचा राष्ट्रीय ब्लेझर सापडत नव्हता, म्हणून विलंब झाल्याचे कारण गांगुलीने सांगितले. परंतु स्टीव्ह वॉ यानेही ‘आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन’ या आत्मचरित्रात त्या घटनेचा उल्लेख केला आहे. ‘नाणेफेकीसाठी मला ताटकळत ठेवून गांगुलीने उद्दामपणा दाखवला’, असे वॉ याने आवर्जून नमूद केले आहे.
२००४मधील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेली चौथी कसोटी ही जेमतेम अडीच दिवसही चालली नव्हती. पहिल्या दिवसाच्या खेळात भारताने २ बाद २२ धावा केल्या आणि पावसाचे आगमन झाले. दुसर्या दिवशी तब्बल १८ फलंदाज बाद झाले आणि दोन्ही संघांचे पहिले डाव आटोपले. ऑस्ट्रेलियाने ९९ धावांची आघाडी घेतली. परंतु तिसर्या दिवशी खेळपट्टीने आणखी जबरदस्त रंग दाखवले आणि एकूण २० बळी घेतले. विजयासाठी १०७ धावांचे तुटपुंजे आव्हान स्वीकारलेल्या कांगारूंची ९३ धावांत दैना उडाली आणि भारताने १४ धावांनी अखेच्या कसोटीत दिलासादायी विजय मिळवला. त्यामुळे या खेळपट्टीला अनेक खेळाडू आणि टीकाकारांनी लक्ष्य बनवले.
१९९८मध्ये सचिन आणि शेन वॉर्न यांचे मैदानावरील तुंबळ युद्ध चांगलेच गाजले होते. सचिनने तीन कसोटी सामन्यांत ४४६ धावा काढताना मालिकावीर पुरस्कार जिंकला, तर वॉर्नने एकूण १० बळी घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका म्हटली की राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा उल्लेख अपरिहार्यच आहे. क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालेल्या कोलकाता आणि अॅडलेडमधील अविस्मरणीय कसोटी सामन्यांतील समान धागा म्हणजे द्रविड आणि लक्ष्मण ही भारतीय क्रिकेटमधील ‘राम-लक्ष्मण’ जोडी. या द्वयीने या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताला पराभवाच्या खाईतून विजयाच्या शिखरावर पोहोचवले. २००१मध्ये कोलकात्यात लक्ष्मणने द्विशतक तर द्रविडने शतक साकारले होते. या दोघांनी संपूर्ण दिवस झुंज देत ३५५ धावांची भागीदारी साकारली होती. तथापि, अॅडलेडमध्ये २००३साली द्रविड-लक्ष्मणने ३०३ धावांची भागीदारी रचली. यावेळी द्रविडने द्विशतक तर, लक्ष्मणने शतक झळकावले होते. या दोन्ही ऐतिहासिक कसोटी सामन्यांमधील आणखी एक समान धागा म्हणजे दोन्ही सामन्यांत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली होती.
गेल्या काही वर्षांत भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अलविदा केल्याचेही प्रत्ययास आले आहे. २००३-०४मध्ये सिडनी कसोटी ही स्टीव्ह वॉच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी ठरली. या सामन्यात त्याला ८० धावा करता आल्या. परंतु शतक झळकावण्यात अपयश आले. याचप्रमाणे २००७-०८मध्ये अॅडलेड कसोटीनंतर अॅडम गिलख्रिस्टने निवृत्ती पत्करली. २००८-०९मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौर्यावर आला होता, तेव्हा निवृत्तीकडे झुकलेल्या ‘फॅब फाइव्ह’वर सर्वच स्तरातून टीका होत होती. दुखापती आणि फॉर्मशी झुंजणार्या कर्णधार अनिल कुंबळेने दिल्लीच्या फिरोझशाह कोटलावर क्रिकेट जगताला अलविदा केला. मग नागपूर कसोटी सामना संपताच सौरव गांगुलीनेही निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पहिल्या डावात ८५ धावा काढणार्या गांगुलीची दुसर्या डावाने घोर निराशा केली. १३ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील या ‘दादा’ व्यक्तिमत्वाने शतक झळकावून कसोटी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. पण कारकीर्दीचा शेवट मात्र एका शून्याने झाला.
सचिन, गांगुली, लक्ष्मण, द्रविड आणि कुंबळे हेच ते ‘फॅब फाइव्ह’. त्यांच्या कालखंडात कसोटीचे वैभव टिकले. त्यांच्यातील झुंजारपणाचे पोवाडे रचले गेले. पण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वेगवान गोलंदाजांसमोरची फलंदाजांची तारांबळ आणि आपल्या गोलंदाजीचा बोथट मारा यामुळे भारताला मालिका विजय मिळवता आलं नव्हता. पण भारत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विजय मिळवू शकतो, हे स्वप्न कर्णधार विराट कोहलीने सत्यात उतरवले. न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आप्रिâका आणि ऑस्ट्रेलिया या वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन मानल्या जाणार्या खेळपट्ट्यांवर भारताच्या वेगवान मार्याने टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळेच २०१८मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका २-१ अशी जिंकण्याचे ऐतिहासिक यश संपादन केले. परंतु चेंडू फेरफार प्रकरणामुळे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ बंदिवासात होते, म्हणूनच भारताला जिंकता आले, अशी वल्गना ऑस्ट्रेलियाकडून केली गेली.
२०२१मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात पुन्हा २-१ अशा फरकाने मालिका विजयाची पुनरावृत्ती करीत तो विजय नशिबाने मिळाला नव्हता, याची साक्ष दिली. अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने शरणागती पत्करली. यातील दुसर्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांत पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारत ०-४ अशा पद्धतीने गमावणार असे अंदाज वर्तवले गेलेले. अजिंक्य रहाणेला प्रभारी संघनायक म्हणून ‘बळीचा बकरा’ केला जाणार हेसुद्धा निष्कर्ष काढले गेले. दुखापतीमुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुभवाचा आलेख एकीकडे मंदावत असताना नवोदितांचे पारडे जड होत चालले. पण अजिंक्य आणि शिलेदारांनी त्याची तमा बाळगली नाही. भारताचा गोलंदाजीचा मारा बदलत गेला, परंतु मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा जगातील सर्वोत्तम मारा चारही कसोटी सामन्यांत समान होता. पण भारताच्या झुंजार वृत्तीपुढे त्यांची मात्रा चालली नाही. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर कसा नांगर टाकायचा, हे चेतेश्वर पुजाराने दाखवून दिले, तर तणावमुक्त आक्रमकता कशी अंगीकारायची, हे ऋषभ पंतने सिद्ध केले. कौटुंबिक निर्णय घेताना कर्तव्याला महत्त्व देणे, हे सर्वांनाच जमत नाही. मोहम्मद सिराजने क्रिकेटपटू बनावे, हे त्याच्या रिक्षाचालक वडिलांचे स्वप्न. तो ऑस्ट्रेलियात असतानाच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पण सिराजने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांना आगळी श्रद्धांजली वाहिली. टी. नटराजननेही पितृत्वाची रजा टाळून मायदेशात परतल्यावर आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला पाहिले. कुटुंबाला प्राधान्य देत पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला विराट मात्र टीकेचा धनी झाला.
तूर्तास, ‘आधुनिक अॅशेस’ मालिकेसाठी तमाम क्रिकेटरसिकही सज्ज झाले आहेत. भारतात फिरकीला पोषक खेळपट्ट्या कसोटी सामन्यांसाठी असतील, ही खात्री बाळगून ऑस्ट्रेलिया माहीश पिथिया नामक ‘प्रति-अश्विन’च्या गोलंदाजीवर कसून सराव करीत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आतापर्यंतच्या १०२ कसोटी सामन्यांपैकी ३० भारताने आणि ४३ ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर २८ सामने अनिर्णीत आणि एक सामना टाय झाला आहे. ही एकंदर आकडेवारीच फक्त ऑस्ट्रेलियासाठी प्रेरणा देऊ शकेल. याव्यतिरिक्त भारतीय भूमीवरील ५० कसोटी सामन्यांत २१ सामन्यांत भारताने, तर १३ सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय (१५ अनिर्णीत, एक टाय) मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतात अखेरचा कसोटी मालिकेतील विजय २००४-०५ला मिळवला होता, तर त्यांना स्वत:च्या भूमीवरही आता भारताला हरवणे गेल्या आठ वर्षांत जमलेले नाही. त्यामुळेच भारताचे या मालिकेत पारडे जड मानले जाते. मैदानी कसोटीद्वंद्व आणि वाद याचा कोणता अध्याय या मालिकेत लिहिला जातो, हे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.