एअर इंडियावर मोर्चा- चीफ पर्सनल
मॅनेजर एस. के. नंदा यांना मारहाण.
शिवसेनेच्या जन्मानंतर नोकरभरतीच्या वेळी जेथे जेथे मराठी माणसावर अन्याय होत असे; त्या त्या ठिकाणी शिवसेना त्या अन्यायाचा प्रतिकार करत असे. त्या काळात शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता असून देखील मराठी तरुणांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जायची. त्याला एअर इंडियाही अपवाद नव्हती. त्यावेळी ‘एअर इंडिया’सारख्या मोठ्या कंपन्या नेहमीच बिगरमराठी लोकांची भरती करत असत. म्हणूनच एअर इंडियातील नोकरभरतीच्या निषेधार्थ आझाद मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सर्वश्री वामनराव महाडिक, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ता प्रधान, दत्ताजी साळवी प्रभृति नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
त्यावेळी ‘एअर इंडिया’चे चीफ पर्सोनेल मॅनेजर एस. के. नंदा होते. शिवसैनिकांनी नंदा यांना जाब विचारला. नंदा यांनी त्यावर उत्तर दिले की, नोकरभरतीचा निर्णय देशस्तरावर होतो, माझ्या हातात काही नाही. अशी उडवा-उडवी करताच उपस्थित बेरोजगार मराठी तरुणांनी नंदा यांच्या थोबाडीत मारल्या. त्यांना लाथा मारून खाली पाडले. मारहाण झाल्यामुळे नंदा थरथर कापत होते, असे ‘एअर इंडिया’च्या कर्मचार्यांनी सांगितले. बाळासाहेबांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘नंदा यांच्या थोबाडीत मारण्यात आली हे खरे आहे. त्यांची तीच लायकी आहे. तेही मराठीद्वेष्टे आहेत. ज्यांचे अर्ज विचारात घेतले नाहीत, त्यांनीच नंदा यांच्या थोबाडीत मारल्या असाव्यात.’’ ‘मराठी माणसांना प्राधान्य द्या,’ ‘महाराष्ट्रद्वेष्ट्या नंदा, बंद कर तुझा धंदा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घटनेनंतर एअर इंडियाचे व्यवस्थापन जागे झाले. मग एअर इंडियामधील पायलट, हवाई सुंदरी, कर्मचारी आणि कामगारांच्या भरतीमध्ये मराठी माणसांना प्राधान्य मिळू लागले. ‘शिवसेना स्टाईल’ने हिसका दाखवल्यामुळे व्यवस्थापनाने शिवसेनेचा धसका घेतला. तेव्हापासून ‘शिवसेना स्टाईल’ची ताकद महाराष्ट्राला कळली.
या घटनेवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘शिवसेना व एअर इंडिया’ असा अग्रलेख लिहिला. त्यात ते लिहितात, ‘‘एअर इंडियामध्ये मराठी भाषिकांना योग्य त्या प्रमाणात नोकर्या मिळत नाहीत, या निषेधार्थ एक मोर्चा शिवसेनेतर्फे निघाला होता.यासंदर्भात शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी यापूर्वी काही तक्रारी केल्या होत्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही. याकरिता शिवसेनेने मोर्चा आणला, तर तेही समजू शकते व त्याबद्दल टीका करण्यास जागा नाही. पण मोर्चा नेल्यानंतर पर्सोनेल ऑफिसर नंदा यांना जी मारहाण शिवसैनिकांनी बाळ ठाकरे यांच्यासमोर केली; ती अक्षम्य आणि निषेधार्ह आहे. वास्तविक नंदा हे पर्सोनेल ऑफिसर आहेत. नोकरभरतीशी त्यांचा संबंध असला तरी एवढ्या मोठ्या संघटनेत एक अधिकारी नोकरभरती वा अन्य बाबतीतील धोरण ठरवत नाही. या संबंधात काही अधिकार्यांची समिती असते. त्या समितीचे निर्णय अंमलात आणणे हे पर्सोनेल ऑफीसरचे काम आहे. म्हणून एअर इंडियाचे नोकरभरतीचे धोरण चुकीचे आहे, असे गृहित धरले, तरीही कोणी एका अधिकार्याला जबाबदार धरता येत नाही. नंदा हेच जबाबदार आहेत, असे वादाकरता ग्राह्य मानले, तरी बाळ ठाकरे आणि शिवसैनिकांना लोकांना धडा शिकवण्याची सनद कोणीही दिलेली नाही. त्यांनी कायदा हातात घेऊन मारामारी करणे हे अश्लाघ्य आहे.’’
या मारहाणीवरून विधानसभेतही रणकंदन माजले. शिवसेनेला गुन्हेगार ठरवण्यासाठी काँग्रेस, शे.का.प., जनसंघ, समाजवादी आमदारांमध्ये अहमअहमिका लागली होती. शिवसेनेच्या या स्टाईलने मात्र मराठी तरुण उत्साही आणि आनंदित झाले होते. ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीत नाना वांद्रेकर (नारायण आठवले) यांनी मराठी माणसांच्या मोर्चाचे, एका अर्थाने कृतीचे समर्थन करणारा लेख लिहिला.
शिवसेना स्टाईलने ‘सोंगाड्या’ला न्याय
मुंबईमध्ये मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपटगृह उपलब्ध होत नाही, अशी आरडाओरड अधून-मधून होत असते. दक्षिणेतील प्रेक्षकवर्ग आणि बिगर दक्षिणी प्रेक्षकाला चित्रपटगृहात खेचून आणण्याची ताकद दक्षिणेच्या चित्रपटांची असते. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यासाठी खास प्रयत्न करताना दिसत नाहीत. पण मराठी चित्रपट चांगला असेल, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम लाभत असेल आणि तरीही त्या चित्रपटाला चित्रपटगृह मालकाची आडकाठी होत असेल, तेव्हा त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवावाच लागतो. १९७१ साली मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शाहीर दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या’ चित्रपट दादर येथील कोहिनूर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. दोन आठवडे हाउसफुल्ल चालत असलेल्या सोंगाड्या चित्रपटाचे प्रदर्शन नवकेतन फिल्मच्या ‘तेरे मेरे सपने’ या देवानंदच्या हिंदी चित्रपटासाठी चित्रपटगृहाच्या मालकाने थांबवले. दादा कोंडके यांनी व्यवस्थापकांना विनंती करूनही त्यांनी पुढील प्रदर्शन थांबविले. त्याच संध्याकाळी दादांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन ही गोष्ट सांगितली. बाळासाहेब संतापले आणि काही तासांच्या आत कोहिनूरसमोर जवळ-जवळ पाच हजार शिवसैनिकांनी निदर्शने केली. तेरे मेरे सपनेचे पोस्टर्स फाडले. मनोहर जोशी मालकाला भेटले. शिवसैनिकांचे उग्र रूप पाहून मालकाने चित्रपट जितके दिवस चालेल तितके दिवस चित्रपटगृह देण्याचे मान्य केले. मराठी चित्रपटाला न्याय मिळवून देऊन शिवसेना ही कला व संस्कृति रक्षकदेखील आहे हे दाखवून दिले.
शिवसेनेचा पाचवा वर्धापन दिन समारंभ १९ जून रोजी शिवाजी मंदिर येथे साजरा झाला. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘‘दादा कोंडके यांच्यासाठी केलेले काम हे आपले कर्तव्यच होते. या प्रकरणी शिवसेनेने दंडेली केली असा आरोप केला गेला. पण दंडेली केल्यावाचून न्याय मिळत नाही. दादा कोंडके यांच्यासाठी आम्हाला न्यायच मिळवायचा होता आणि तो आम्ही मिळवून दिला. या प्रकरणानंतर डाव्या विचारांचे शाहीर दादा कोंडके हे शिवसेनेत पूर्णपणे मिसळून गेले. दसरा मेळावा असो, शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा असो, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणूक असो, दादा कोंडके हे शिवसेनेचे ‘स्टार प्रचारक’ बनले. दादा कोंडके यांनी आयुष्यभर शिवसेनेचा प्रचार व प्रसार एखाद्या कट्टर शिवसैनिकाप्रमाणे केला.
शिवसेनेचे पहिले महापौर- डॉ. हेमचंद्र गुप्ते!
१९७१च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसह विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ४४ जागांपैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकल्या. रत्नागिरी येथून फक्त मधू दंडवते निवडून आले होते. शिवसेनेला फक्त १.५ टक्केच मते मिळाली होती. मनोहर जोशी, दत्ता प्रधान यांना पराजयाला सामोरे जावे लागले. शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘‘हा विजय गाईचा नाही, बाईचा नाही, तर शाईचा आहे. (तेव्हा काँग्रेसची निशाणी गाय-वासरू होती) बाळासाहेबांच्या या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा झाली. काँग्रेसला ही टीका झोंबली. यावर काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी तर शिवसेनेचे विष निपटून काढायला हवे, अशी प्रतिक्रिया दिली.
१९७१ या वर्षाची सुरूवात पराजयाने झाली. पण शिवसेनाप्रमुख खचले नाहीत. दरम्यान मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. शिवसेनेकडे बहुमत नव्हते. परंतु शिवसेना आणि संघटना काँग्रेस यांनी महापौरपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. १४० नगरसेवकांपैकी (दोनजणांनी राजीनामा दिला होता) संघटना काँग्रेसचे ४२, तर शिवसेनेचे ४१ नगरसेवक असताना अचानक संघटना काँग्रेसच्या ७ नगरसेवकांनी पक्ष सोडला. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ३४ झाले. संघटना काँग्रेसने, शिवसेनेच्या डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना पाठिंबा दिला. (महापौरपदाच्या निवडणुकीच्या दुसर्या फेरीत) शिवसेनेचा विजय झाला.
शिवसेनेचे डॉ. हेमचंद्र गुप्ते महापौरपदी निवडून आले. शिवसेनेचे पहिले महापौर बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला. शिवसेनेचा पहिला आमदार बनण्याचा मान प्रि. वामनराव महाडिक यांना मिळाला. कष्टकरी-कामगार वर्गाबरोबरच सुशिक्षित मराठी वर्गाला शिवसेना जवळची वाटू लागली. एअर इंडियाच्या एस. के. नंदा यांना थोबाडीत लगावल्याच्या कारणामुळे ‘शिवसेना स्टाईल’चा धसका महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी घेतला.