लोक पंचतारांकित हॉटेल काढतात. आपण पंचतारांकित वृद्धाश्रम काढूया, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका बैठकीत व्यक्त झाले अन् अल्पावधीतच असा फाइव्ह स्टार वृद्धाश्रम उभा राहिला. मुंबईच्या छायेत- खोपोलीला! वृद्धांसाठी विरंगुळागृह- रमाधाम डौलाने, रुबाबाने उभे आहे. गगनगिरी महाराजांच्या आश्रमाजवळ… हाकेच्या अंतरावर… जवळच पालीचा गणपती आहे. महड तीर्थक्षेत्र आहे. आई एकवीरा हाकेच्या अंतरावर आहे. निसर्गाच्या कुशीत… काय झाडी… काय डोंगार… काय पंचतारांकित वृद्धाश्रम… मुख्य रस्त्यापासून एका मिनिटाच्या अंतरावर…
अलीकडेच माँसाहेबांचा ९२वा स्मृतिदिन `ममता दिन’ इथे साजरा केला होता. स्थानिक लोकाधिकार महासंघाने आम्हा वृत्तपत्र लेखकांसाठी रमाधाम सहलीचे आयोजन केले होते. मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई)चे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी या भेटीगाठीचे नियोजन केले होते. रमाधामचे विश्वस्त आदरणीय खासदार अनिल देसाई यांनी आयोजित समायोजित प्रबोधनाची शिदोरी उपस्थितांची झोळीत टाकली. दुसरे विश्वस्त व राखणदार चंदूमामा वैद्य यांनी आदरातिथ्याचे अनोखे दर्शन घडविले. रमाधाममधील दररोजच्या हालचालीवर त्यांचे सूक्ष्म लक्ष असते. लेखक मंडळी घरी परतताना म्हणत होती, तुझे नाव रमाधाम.
वृद्ध जीवनाचे पैलू डोळ्यासमोर ठेवून शानदार तीन मजली वास्तू आपल्या स्वागतासाठी उभी आहे. ५०० चौरस फुटाच्या एकेका सदनिकेत अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. एका सदनिकेत चार पलंग व दोन स्वच्छतागृहे म्हणजेच चार जणांसाठी- टेबल, खुर्ची, कपाट, ए-वन विद्युत जोडणी, अत्याधुनिक उद्वाहन व्यवस्था- आलिशान भोजनगृह २४ बाय सात सुरक्षाव्यवस्था… डॉक्टरांना फोन करा… डॉक्टर हजर.. मॉर्निंग वॉकसाठी व फेरफटका मारण्यासाठी धावपट्टी व लॉन… प्रबोधन शिबिरासाठी तळमजल्यावर सभागृह… समोरच्या हिरवळीवर सुंदर झोपाळा… चारही बाजूस अतिभव्य वनश्री… असे बहुआयामी अन् कल्पतेने नटलेले रमाधाम स्वागतास सज्ज आहे. पुणे-मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावर-पुणे-मुंबई प्रवास करताना रमाधाममध्ये डोकावा. बाळासाहेब ठाकरे व मीनाताईंच्या स्पर्शाने आकारलेली ही वास्तू आहे. स्वप्न सत्यात कसे उतरले- त्याचे हे मूर्तीमंत प्रतीक होय.
आता अथश्रीचे ओझरते दर्शन
परांजपे समूहाचे अथश्री नायक यांनी १०पेक्षा जादा `वृद्धसंजीवनी’ केंद्रे उभी आहेत- वृद्धांच्या सेकंड इनिंग्जसाठी! सुपरलेटिव्ह सीनियर लिविंग म्हणजेच होम फॉर दी सिनिअर सिटीजन अशी सहकारी गृहनिर्माण संकुल पुण्यामध्ये उभारले आहे अथश्रीने… वृद्धजणांसाठी समर्पित व अग्रदूत म्हणून मागील वीस वर्षांपासून अथश्रीची वाटचाल चालू आहे. दोन तपांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन दहापेक्षा अधिक अथश्री संकुलांचे यशस्वी व्यवस्थापन अथश्री करीत आहे. अत्यंत सुरक्षित व तणावमुक्त जीवन वृद्धांना मिळावे म्हणून सदर संस्था कार्यरत आहे. महामारीच्या काळात याची प्रचिती आली.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब यांनी रमाधामची निर्मिती व संवर्धन केले आहे. प्रेरणा होती गाडगे महाराजांच्या आश्रमशाळेची व खुद्द गाडगे महाराजांची. १९९०मध्ये रमाधामची उभारणी केल्यापासून आजतगायत अनेकांनी शांतीपूर्ण व आनंदी जीवनाचा येथे अनुभव घेतला आहे. २७ वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रमाधामचा कायापालट केला आहे. रमाधामला अत्याधुनिक रूप दिले आहे. अधिक जाणीवेने, सृजनशीलतेने!
रमाधामचे नियोजन, व्यवस्थापन व कार्यप्रणाली अथश्रीने आपल्या हाती घेतले आहे. सहकार्याचा हात पुढे केला आहे. अंमलबजावणी सुरू केली आहे. अथश्रीच्या प्रेरणास्त्रोत आहे, बाळासाहेबांची मानवतावादी दृष्टी! सीनियर सिटीझनांचे सामाजिक, अध्यात्मिक व शारीरिक जीवन समृद्ध करण्याचा इथे प्रयत्न होत आहे. तेव्हा हा प्रयत्न यशस्वी होत आहे. बाळासाहेबांच्या स्पर्शाने, श्रमाने, आत्मीयतेने साकार झालेल्या रमाधामला भेट देऊ या. अत्यल्प प्रवास व अत्यल्प शुल्क देऊन खोपोलीच्या निसर्गाशी मैत्री करूया. उचला मोबाईल आणि ९१९७६७८२५८८१ या क्रमांकावर पूनमताई कांबळेंशी संपर्क साधा.