तुमच्या नाटकांच्या कल्पना एकदम भलत्याच वेगळ्या असतात… त्या तुम्हाला सुचतात तरी कशा?
– राजीव शिंदे, सातारा
गरज माणसाला नको नको ते सुचवते.
बायको रोज माहेरी जाण्याची धमकी देते. पण, कधी जात मात्र नाही. हे सरळ सरळ चीटिंग नाहीये का?
– युवराज कांदळे, तासगाव
मला विचारलंत ठीक आहे.. या चीटिंगवर वोटिंग घेऊ नका. घरची धतिंग आणखीन वाढेल.
तोकड्या कपड्यांवरून सुरू असलेल्या वादात तुम्ही ऊर्फीच्या बाजूने की चित्राताईंच्या बाजूने?
– राणी तांदळे, करमाळा
मी फुल पँटच्या आत पण हाफ पॅन्ट घालत नाही.. कशी कोणाची बाजू घेणार.. इथे वाघ म्हटलं तरी खाणार.. आणि ‘दोन बायका फजिती ऐका’ असं नाटक बघायचंय का तुम्हाला? पण ते नाटक माझं नाहीय.
आपल्या देशाला खरोखरच दोन राष्ट्रपिता आहेत काय?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
असं बोलणार्यांच्या संकल्पनेत राष्ट्रमाता किती, याचा शोध घ्यावा लागेल.
तामीळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तिथल्या राज्यपालांनी महापुरुषांचा अवमान करताच त्यांना ठणकावलं आणि लोकांनीही राज्यभर गो बॅक रवी, असे बोर्ड लावले. आपल्याकडे असं काही कधी पाहायला मिळेल?
– सुनंदा पांचाळ, हरचेरी
जेव्हा आपल्याकडच्यांना जनाची नाय पण मनाची तरी वाटेल तेव्हा!
मांजर उंदरांना मारून खाते, असं लहानपणापासून ऐकतो आहे, प्रत्यक्ष पाहण्यात कधी आलं नाही. ती अफवाच आहे का?
– चिन्मय रेपाळे, बदलापूर
मोठे व्हा लवकर, निदान प्रश्न तरी मोठ्या माणसासारखा विचाराल.
तिळगूळ घ्या आणि गोड बोला असं संक्रांतीला फक्त महाराष्ट्रातच का सांगतात?
– सुनयना पालकर, तुरुकवाडी
तुमचा ‘च’ चुकलाय. तिळगूळ घ्या गोड बोला अस संक्रातीला’च’ महाराष्ट्रात सांगतात.. कारण गोडबोले फक्त महाराष्ट्रातच आहेत!
बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात… त्या भिजायच्या आधी तो खाऊन टाकतात का?
– रमेश वांगळे, खामगाव
आधी सांगा… कोणाच्या तोंडाला लागायचं आहे?
नवरा आपलं ऐकत नाही, अशी सगळ्या बायकांची तक्रार असते. तुमच्या बायकोने कधी केली आहे का हो अशी तक्रार?
– संकर्ष गोरडे, जिंतूर
आम्ही बाबा मुक्या-मुक्याने संसार करतो!
फेसबुकवर स्वत:चं प्रोफाइल लॉक ठेवून गाव हुंगत फिरणारे आणि कुठेही कमेंटींचे पो टाकत फिरणारे लोक नेमके काय खाऊन जगत असतील? इतका निलाजरेपणा येतो कुठून?
– आबासाहेब पाटील, भायखळा
माणूस जे खातो तेच टाकतो… पण त्यांना निलाजरे नका बोलू आबा… अहो, लाज वाटते म्हणून प्रोफाइल लॉक असतो ना त्यांचा!
हल्ली जो नेता उठतो तो बसगाड्या बुक करून आम्हा ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवून आणतो. अरे, आम्हाला इतर काही कामं, इतर काही त्रास आहेत की नाही? तीर्थयात्रा घडवल्या की आमचे प्रश्न सुटले?
– मनोहर फातर्फेकर, कळवण (ज्येष्ठ नागरिक)
देवदर्शन म्हणून माझं दर्शन घ्या, असं जोवर ‘ते’ सांगत नाहीत, तोवर देवदर्शन करून घ्या!
छान रोमँटिक थंडी पडल्यावर बायकोकडे पाहून कोणतं गाणं गाता तुम्ही?
– रश्मी मांडवकर, चिपळूण
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…
तुझ्या माझ्यासाठी वेगवेगळं पांघरूण नवं…
वाळवी या नावाचा मराठी सिनेमा तयार झाला आहे. हा मुंग्या, खोडकिडे, घोडमाशा, पिसवा यांच्यावर अन्याय नाही का?
– देवेंद्र मुजुमदार, पिंपळगाव
देवेंद्रजी, आपण या अन्याय झालेल्या मुंग्या, खोडकिडे, घोडमाशा, पिसवा यांचा वेगळा गट तयार करा आणि त्यांना न्याय मिळवून द्या!