‘अब हिंदू मार नहीं खाएगा’ हे स्थापनेनंतर दोन वर्षातच शिवसेनेने आपल्या कृतीतून दाखवून दिले. तेव्हा सरकारने शिवसेनेला जातीय दंगलीचे गुन्हेगार ठरवले होते. पण जनतेला शिवसेना हिंदूंची तारणहार वाटत होती.
त्याचे झाले असे. मुंबई-ठाण्यात शिवसेनेची घोडदौड सुरू होती. मराठी माणसाच्या आणि सामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम शिवसेना करीत होती. सामाजिक न्याय मिळवून देण्यात यश मिळत होते. या बातम्या भिवंडी, कल्याण, कर्जतसारख्या ग्रामीण भागात पोहचत होत्या. भिवंडी हा मुस्लीम बहुलभाग असल्याकारणाने आणि तत्कालीन सरकारच्या अल्पसंख्याकधार्जिण्या धोरणाने हिंदू समाजाला कुणी वाली नव्हता. भिवंडी-कल्याणमध्ये सामाजिक प्रश्नांबरोबर धार्मिक प्रश्नही महत्वाचा होता. तेथील अल्पसंख्याकांच्या दादागिरीच्या बातम्या शिवसेना नेतृत्वाच्या कानावर पडत होत्या. त्यामुळे शिवसेनेने तिकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरावरील पूजेच्या प्रश्नाचा वाद पुन्हा उफाळला. कल्याणजवळ एक दुर्गाडी नावाचा किल्ला होता. त्यावर एक दुर्गादेवीचे मंदिर होते. त्यामुळेच किल्ल्याला दुर्गाडी नाव दिले गेले. हिंदूंचे हे श्रद्धास्थान होते. याच मंदिराच्या जवळ एका भागाला मुस्लिमांनी दर्ग्याचे स्वरूप दिले आणि तिकडे नमाज पढण्यास सुरुवात केली. साहजिकच वातावरण तंग होऊ लागले. हिंदूंना असुरक्षित वाटू लागले. तेव्हा शिवसेनेला दखल घ्यावी लागली. २८ सप्टेंबर १९६८ रोजी बाळासाहेब, मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी या शिवसेनेच्या आघाडीच्या नेत्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर आम्ही जाणार आणि तिथे देवीची मनोभावे पूजा करणार, नारळ फोडणार, गुलाल उधळणार, पूजेचे सर्व विधी यथासांग पार पाडणार, असे जाहीर केले. अर्थातच पोलीस बंदोबस्तात वाढ केली गेली. त्यावेळी शिवसैनिकांनी फार मोठ्या संख्येने गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारने जमावबंदी जाहीर केली होती. पण तो हुकूम तोडून आम्ही येणारच, असे बाळासाहेबांनी जाहीर केले होते. हिंदूंची पूजा पार पडली. पोलीस त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास धजावले नाहीत. देवीचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, जर कोणी तो करण्यास धजावलेच तर त्यांना योग्य तो धडा शिकवू असे दत्ताजी साळवींनी ठणकावले. मनोहर जोशींनी तर आमच्याच देशात, आमच्याच राज्यात, आमच्याच देवीचे दर्शन घेण्यावर कसले निर्बंध लादता? दुष्ट शक्तींना आम्ही पूर्णपणे नेस्तनाबूत करू. दाक्षिणात्य व मुस्लीम समाजाने आमच्यात मिळून मिसळून राहायला हवे. त्यातच त्यांचे हित आहे. पाकधार्जिण्या मुस्लिमांना आमच्या देशात थारा नाही. त्यांना लाथ मारून आम्ही देशाबाहेर हाकलून देणार आहोत, असे भाषण केले.
काही दिवसांनी शिवसेनाप्रमुख पुन्हा दुर्गाडी किल्ल्यावर गेले. त्यावेळी दहा ते बारा हजारांची प्रचंड गर्दी त्यांच्या भाषणाची वाट पाहत होती. ‘मुस्लिमांनी या देशाशीच एकनिष्ठ राहायला हवे. त्यातच सर्वांचे हित आहे. तसे कराल तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण इथे राहून भलताच गर्व करत बसाल आणि पाकिस्तानधार्जिणे बनाल, तर मात्र तुमचे हात-पाय धड राहणार नाहीत. राम-रहीम एक है वगैरे बोलायला ठीक. पण हाच रहीम रामाशी हातमिळवणी करायला तयार नसेल, त्याच्या पाठीत खंजीर खुपसणार असेल तर त्याचा कोथळा शिवसेनेची वाघनखे काढतील, हे त्याने पुरेपूर समजून राहावे,’ असा इशाराच बाळासाहेबांनी दिला.
महिकावतीच्या मंदिरावर भगवा
महाड येथील महिकावती देवीचे मंदिर हे हिंदूंचे देवस्थान नसून मुसलमानाचा दर्गा आहे, असा मुसलमानांचा दावा होता. हिंदूंकडून त्याला चोख उत्तर देणे आवश्यक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे हिंदूरक्षणकर्ते आहेत, अशी हिंदूंची भावना दुर्गाडी किल्ला प्रकरणापासून झाली होती. महाडमधील हिंदू बाळासाहेबांच्या येण्याची वाट पाहत होते. त्याप्रमाणे बाळासाहेबांनी महाडमध्ये सभा घेऊन या हिंदुस्थानात जन्माला येऊन पाकिस्तानशी निष्ठा ठेवणार असाल, तर हिंदुस्थानात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असा इशाराच देशद्रोही मुस्लिमांना दिला. शिवसेना नेते दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, अरुण मेहता यांचीही भाषणे झाली. बाळासाहेबांनी महिकावती मंदिरात नारळ फोडून मंदिरावर भगवा झेंडा फडकवल्यामुळे जमलेला हिंदू जनसमुदाय खूष होता, आनंदित होता. कारण यापूर्वी कुठल्या राजकीय नेत्यांनी अशी हिम्मत दाखवली नव्हती. शिवसेना फक्त मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठीच नव्हे, तर हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी, संरक्षणासाठी लढणारी देखील संघटना आहे हे सिद्ध झाले.
शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली हिंदू एकटवत होता हे पाहून मुस्लिमांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. शिवसेनेला प्रतिकार करण्यासाठी दोन समाजांत तेढ निर्माण केला गेला. मग कौसा, महाड, भिवंडी आणि जळगाव येथे जातीय दंगली झाल्या. शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचे इतर नेते महाड दौर्यावरून परत येत असताना कौसा गावाजवळ बाळासाहेबांच्या गाडीपुढे मुद्दामहून बैलगाडी आणल्याने झटापट झाली. ही बातमी गावात पसरल्यावर गावातील शे-दोनशे मुस्लीम मंडळी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला करण्यासाठी आली. सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या गेल्या. पण बाळासाहेबांसोबत असलेल्या शिवसैनिकांचा बंदोबस्त व संरक्षण कवच पाहून त्यांची भंबेरी उडाली. ते माघारी फिरले. तरीही दुसर्या दिवशी कौसात दंगल उसळली. हिंदूंनी प्रतिकार केला.
भिवंडीत शेवटचा शिवजयंती उत्सव १९६७ साली झाला होता. भिवंडीत शिवजयंती उत्सवाला बंदी होती. शिवसेनेमुळे हिंदूंमध्ये जागृती झाली होती. त्यामुळे भिवंडीतील शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिवजयंतीची मिरवणूक भुसारी आळीतून येत असताना अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. मिरवणुकीतील सुमारे दहा हजार लोकांची एकच धांदल उडाली. मग दंगल उसळली ती दुसर्या दिवशीही आटोक्यात आली नव्हती. दंगलीत मृतांचा अनधिकृत आकडा ३०च्या वर होता. साधारणतः दोन कोटींची वित्तीय हानी झाली.
भिवंडीच्या दंगलीचे पडसाद महाड, जळगाव येथेही उमटले. महाराष्ट्रातील इतर शहरांतही थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती होती. जळगावात ३६ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० कुटुंब बेघर झाली.
केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुस्लीमबहुल भिवंडीला प्रथम भेट देवून तेथील जनतेचे सांत्वन केले आणि मदत जाहीर केली. नेहमीप्रमाणे या जातीय दंगलीचे खापर विरोधकांनी शिवसेनेवर फोडले. शिवसेनेचा गुन्हा काय, तर मुस्लिमांना मुँहतोड जवाब देऊन हिंदूंचे रक्षण त्यांनी केले. सरकार दरबारी शिवसेना गुन्हेगार ठरत होती. परंतु सामान्य हिंदूंना ती तारणहार वाटत होती. भिवंडीत १८८६ साली महाभयंकर दंगल झाली होती. त्यानंतर ही दुसरी मोठी दंगल झाली. शिवसेनाप्रमुख कडाडले, भिवंडी हे दुसरे पाकिस्तान आहे, तो अस्तनीतील निखारा आहे. नंतर शिवसेनेच्या सततच्या मागणीमुळे भिवंडीत शिवजयंती उत्सवाला घातलेली बंदी १९८४मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी उठवली.
जातीय दंगल कुठल्याही समाजाला नको असते. दंगलीमुळे दोन्ही समाजाचे खूप नुकसान होते. दंगलीचा पुरस्कार बाळासाहेबांनी कधी केला नाही. भिवंडी-जळगाव दंगलीनंतर बाळासाहेबांनी ३० ऑगस्ट १९७०च्या ‘मार्मिक’च्या अंकात ‘या वृत्तीनेच जातीयवाद पोसला जात आहे’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहून हिंदू-मुस्लीम समाज, राज्यकर्ते आणि राजकीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले. ‘जातीय दंगली झाल्या की बंदीचे हत्यार सरकार उपसते. कुठेही भांडणे नको म्हणून बंदीची कलमे जारी करून मोकळे होतात. परंतु या वृत्तीने ही आग क्षणिक थंडावल्यासारखी वाटली तरी ती आतल्या आत धुमसत असते. जातीय दंगल ही शेणाच्या गोवरीसारखी असते तिला फुंकर मारली की ती लगेच पेट घेते. परंतु धुमसत राहणे हा तिचा मूळ स्वभाव आहे! हिंदू असो की मुस्लीम असो, शांतता आणि सुव्यवस्था यासाठी केलेली उपाययोजना दोघांनाही सारखीच बंधनकारक असायला हवी. सण हिंदूंचा असो वा मुस्लिमांचा, त्यानिमित्त निघणार्या मिरवणुकीसाठी काही राजमार्ग ठरवले असते आणि दोन्ही समाजांतील मान्यवर व्यक्तींना बोलावून शासनाने कडक समज दिली असती तर काही वावगे ठरले नसते. उलट उभय समाजांतील घबराहटीचे निराकरण होणे सोपे झाले असते.’
बाळासाहेबांचे जातीय दंगलीविषयी एवढे सुस्पष्ट विचार असताना शिवसेना विरोधक मात्र शिवसेनेमुळे दंगली उसळल्या असा बेछूट आरोप करून ती शमवण्यास मदत करण्याऐवजी मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यात पुढे होते. कल्याणचा दुर्गाडी किल्ला प्रकरण, महाडचे महिकावतीचे मंदिर प्रकरण, भिवंडी, महाड, कौसा, जळगाव दंगलीतील शिवसेनेच्या हिंदुत्ववादी राष्ट्रीय भूमिकेमुळे आणि ठोशास ठोसा लगावणार्या निडर वृत्तीमुळे हिंदू शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटत होता. खर्या अर्थाने तेव्हापासून शिवसेना हिंदूंची तारणहार बनली. शिवसैनिक ‘धर्मवीर’ आणि शिवसेना ‘हिंदू रक्षक’ बनली.