• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आला थंडीचा महिना

- खणखणपाळ (अराळ-फराळ)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 13, 2023
in भाष्य
0

आला थंडीचा महिना…
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला…
मधाचं बोट कोनी चाखवा…
च्यामारी! ह्या कडाक्याच्या थंडीत कोण बरं ही लावणी म्हणतंय आपल्या गब्दुल्ल्या आवाजात? आं? नाही नाही-हा अमृतट्वीट महाआवाज नाहीय. पुरुषाचा आवाज आहे हा. ओळखलं- ओळखलं- गायरान आवाजात तो आडदांड्या थंडीची लावणी म्हणतोय- टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकार्‍यांना दिलेलं खंडणी जमा करण्याचं टार्गेट आणि गायरान जमिनीचं प्रकरण यावरून हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी थंडीच्या लाटा सोडल्या आणि मग काय हुडहुडी भरली की राव. रक्तदाब वाढला. नाडी जलद चालू लागली (लेंग्याची नव्हे- हाताची). धाप लागू लागली. घशात घरघर असल्यासारखं होऊ लागलं. थंडी जाण्यासाठी उपाय सुरू झाले.
डॉक्टर म्हणाले, `कोमट पाण्याने स्पंज करा-‘ केलं. पण गेंड्याच्या कातडीवर कोमट पाण्याचा काही परिणाम होईना. ताप वाढू लागला. मीडिया प्रश्न विचारू लागला. कोणी सांगितलं, `झोप पूर्ण करा- विश्रांती घ्या-‘ घेतली झोप. (म्हणजे झोपेचे सोंग घेतलं-) पण तिकडे ते घड्याळवाले दादा पाच-पाच मिनिटांनी गजर करून उठवू लागले. राजीनामा मागू लागले. कमळाबाई म्हणाली, `भावजी काहून एवढं घाबरायचं- ऊबदार कपडे घाला की- थंडी पळून जाईल बगा- हवं तर माज्या लुगड्याच्या पदराखाली लपून र्‍हावा-‘ आता एवढा लाडिक आग्रह होतोय म्हटल्यावर तेही करून पाहयलं. च्यामायला, तोवर त्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी कापडंच फाडायला सुरुवात केली. २८९ का कुठला तरी नियम काढला आन् त्याअन्वये बोंबाबोंब चालू ठेवली की रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी परिस्थितीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकारात नसताना विकली आहे किंवा वाटप केली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते.’ च्यामारी- ही मधेच पांढर्‍या टोपीखालची टक्कलशीर का बरं धडधडू लागली? जो उठतो तो राजीनामा मागतोय– अन् ते माजी गृहमंत्री आपल्या मागणीला आणखी एक वळसा देऊन राह्यले! ते म्हणतायत- `फौजदारी गुन्हा दाखल करा! ओय ओय… काय थंडी, काय झाडी, काय आरोपांचे डोंगार! एकदम नॉट ओक्के. काय करावं बरं? हा थंडीपासून नॉट रिचेबल’ व्हायला पाहयजे. सुरतला जावं की गोहत्तीला? का गोव्यात जाऊन राहू? काजूची फेणी घेतल्यावर म्हणे थंडी कुठल्या कुठे पळून जाते- पण नको- फेणी घेताना कुणी बघितलं तर आपल्यावर नव्या आरोपांच्या शेणी थापल्या जाणार. त्यापेक्षा मध बरा. खोकला तरी कमी होईल. अरे…मला लागलाय खोकला, मधाचं बोट कोनी चाटवा.
अरे वा… आले आले… माझ्या मदतीला शेवटी मधाचा बुधला घेऊन गंगाधरसुत आले. त्यांनी ठणकावून सांगितलं की `टीईटी घोटाळा विरोधकांच्याच चाळीतला आहे आणि सत्तारांच्या मुलीला टीईटीमधून नोकरी लागलेली नाही. बरं झालं. पण हा खोकला थांबत का नाहीय? मधाचं एकच बोट चाटवलं त्यांनी. पण क्लीनचिट द्यायची तर संपूर्णच द्यायची ना? गायरान जमीन घोटाळा आणि सिल्लोड महोत्सव खंडणी प्रकरण पण आधीच्याच सरकारच्या काळात झालेलं आहे, असं त्यांनी सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? रेटून घ्यायचं… दोन-चार दिवस विरोधकांनी शेकोटीत लाकडं टाकणं सुरूच ठेवलं असतं आणि मग सगळं थंडच झालं असतं की…
आयला, शेकोटी पेटवा म्हटलं तर त्यांनी पेटवलीच की. पण राव त्या शेकोटीनं ऊब मिळायची सोडून चटके बसायला लागले माननीय कृषी मंत्री महोदयांना. काय करावं बरं? ह्या सगळ्यामागे कोण आहे? शोध घेतला पायजे. विरोधकांना शेकोटीत टाकायला लाकडं कोण पुरवतंय? संदीपान भुमरे तर नव्हे? भरत गोगावले? कोणीतरी आमच्या मिंधे गटातलाच असणार. नाव न घेता आता जरा ठोकून काढतो त्या गद्दाराला… धरा रे कोणीतरी माझ्याबरोबर माईक… हां हां… एक्स्लुजिव तुम्हाला देतो मुलाखत… थांबा थांबा– जरा हसत–हसत सांगू द्या मला…
“हे बघा… माझ्या सद्सदविवेकबुद्धीला जे पटलं ते नीट केलं. मी लोकांसाठी काम करतोय. जी बातमी आहे त्याच्यावरून मला शंका येतेय की मुख्यमंत्री महोदयांच्या घरात जी चर्चा होते, ती बाहेर फोडणारा कोणीतरी आमच्याच पक्षातला असला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलीय, आपल्या गोपनीय मीटिंगमधल्या बातम्या बाहेर कशा जातात? कोण आहे, कोण करतोय, मी नाव नाही घेणार. पण मंत्रीपद न मिळालेल्या आमच्याच गटातल्या कोणाचं तरी हे षडयंत्र आहे…”
च्यामारी… असं आहे होय हे थंडी प्रकरण? तरी म्हटलं विरोधकांपैकी सगळेच कसे बोलायला लागले एकामागून एक. कृषीमंत्री महोदयांनी सद्सद्विवेकबुद्धीचं कुमारी आसव घेऊन थंडी-खोकला हटवण्यासाठी प्रयत्न चालवलाय आणि आता तिकडे मुमं दाढीला थंडी वाजू लागलीय. गोपनीय गाठी-भेटी घेऊन आपण एवढी मेहनत करून ४० जणांना पळवलं. त्यातले कितीजण एकमेकांवर डूख ठेवून आहेत? त्यातले कितीजण पुन्हा आपल्याकडूनही पळून जाणार आहेत? कुठे जाणार आहेत? मंत्रीपद मिळालं नाही म्हणून किती जण नाराज आहेत? काही जणांना महामंडळाचं अध्यक्षपद देतो, म्हणून मधाचं बोट पाठवलं होतं- पण आता आपल्याच लोकांनी केलेली ही आपली नाकाबंदी चुकवून निसटायचं म्हणजे `ना घर का- ना घाट का’ असं तर होणार नाही ना आपलं? हेलिकॉप्टर विकून परत रिक्षावर तर बसायला लागणार नाही ना?
थंडी उलटलीय. अंगात कणकण आहे. दाढी खवखवतेय. मनातला गोंधळ वाढलाय. हिंसक उलट्या होतील की काय, असं वाटू लागलंय. ही लक्षणं ठीक नाहीत. काय करावं बरं? कुठल्या ज्योतिषाकडे जावं आता? की पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला गुपचूप जाऊन तिलाच साकडं घालावं? नको नको… तिकडे नको. आपणच आपला खर्च करायची आपल्याला सवय नाहीय. त्यापेक्षा अयोध्येला गेलेलं बरं. सरकारी खर्चानं, सरकारी सुरक्षेत जायचं नि जय श्रीराम म्हणत सांगणं करायचं, `हे रामलल्ला निदान वर्षभर तरी बुडाखालची मुख्य खुर्ची काढून घेऊ नकोस. एक बाणी-एक वचनी अशी तुझी ख्याती आहे. आमची नाही. पण ही थंडी सहन होत नाहीय. तेवढी तरी काहीतरी चमत्कार करून नाहीशी कर…

Previous Post

गरिबांनो, शिकू नका, गुलाम बना!

Next Post

पुण्यात फुलतंय केशराचे शेत!

Next Post
पुण्यात फुलतंय केशराचे शेत!

पुण्यात फुलतंय केशराचे शेत!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.