आजकाल हवामानाचा अंदाज लावणे अवघडच झाले आहे. सकाळी थंडीच्या कडाक्याला सामोरे जाताना स्वेटर घालून बाहेर पडावे, तर सकाळी दहा वाजता उकाड्याने फॅन लावायची वेळ येते. पाऊस तर आजकाल कधी येईल हे बहुदा ब्रम्हदेवाला देखील समजणे मुष्किल. सकाळच्या थंडीने आधी गारठलेले असताना, अचानक संध्याकाळी पावसाने हजेरी लावली आणि ‘मुंबई स्पिरिट’च्या नावाने कपाळाला आठ्या घालत मुंबईकरांनी त्याला सामोरे जाण्यास सुरुवात केली. ट्रेन लेट, तुंबलेले पाणी, टॅक्सीवाल्यांचा माज आणि बेस्टची गर्दी सगळे एकाच वेळी अवतरले होते. संध्याकाळी ऑफिसची पार्टी म्हणून पार्टी गाऊन घालून आलेली संजना तर या सगळ्या परिस्थितीने पूर्ण भांबावून गेली होती. एकतर आधी गाडी वाटेत बंद पडली, त्यात तो गाऊन सांभाळत तिने कसा बसा समोरच्या हॉटेलचा आसरा घेतला, तोवर पायातल्या सँडलने असहकार पुकारला आणि त्याचा बंद तुटला. बहुदा पाच मिनिटांत आता आपण रडायला लागणार असे संजनाला वाटू लागले. त्याचवेळी एक भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला, ‘एक्स्क्यूज मी… काही मदत हवी आहे का?’ संजनाने झटकन मागे वळून पाहिले. तिशीबत्तीशीचा एक पीळदार शरीराचा, हसतमुख युवक मागे उभा होता.
‘नो थँक्स, आय विल मॅनेज…’ ती संकोचाने उत्तरली.
त्याने एकवार तिच्या गाऊनच्या अवस्थेकडे, तिच्या तुटलेल्या सँडलकडे पाहिले आणि पुन्हा विचारले, ‘आर यू शुअर?’
यावेळी मात्र संजनाने उत्तर देणे टाळले. तिची तिला जरा लाज वाटली. शेवटी त्यानेच पुढे होऊन तिच्या हातातली बॅग घेतली आणि तो मागे वळला. गच्च भरलेल्या त्या हॉटेलमध्ये बहुदा तो पूर्वीपासून आलेला असावा. एका रिकाम्या टेबलाकडे त्याने मोर्चा वळवला. तो आधीपासून तिथे बसलेला असावा. त्याने अदबीने खुर्ची ओढली आणि संजनाला बसवले. बराच वेळ उभे राहून श्रमलेली संजना जरा सुखावली.
‘धन्यवाद… तुम्हाला उगाच त्रास…’ ती हळुवार आवाजात पुटपुटली.
‘अहो त्रास कसला? एवढे असे काय कष्ट घेतले मी?’ तो मिश्किलपणे म्हणाला. त्याचा फोन वाजला आणि तिची परवानगी घेत तो फोनवर गुंतला. कळत नकळत संजना त्याचे निरीक्षण करण्यात गुंतली. तरूण चांगल्या घरातला वाटत होता, अंगावरचे कपडे, घड्याळ, शूज श्रीमंतीची साक्ष देत होते. दिसायला देखील तो नक्कीच देखणा होता. अर्थात गर्भश्रीमंतीत वाढलेल्या संजनासाठी यात भुलण्यासारखे काही नव्हते म्हणा, पण त्या तरुणात एक कसलेसे अनामिक आकर्षण होते, हे मात्र नक्की.
‘काय घेणार तुम्ही?’
’नो थँक्स. खरेतर मी एका पार्टीला चालले होते. पण अचानक गाडी बंद पडली, नेहमीचा गॅरेजवाला फोन उचलेना. त्यात गाडीत बसून राहिले तर पाऊस आणि विजांच्या आवाजाने अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे मग इथे आसरा घेतला,’ तिने एका दमात रामकथा सांगितली. तो शांतपणे तिचे निरीक्षण करत ते ऐकत राहिला.
‘तुमची हरकत नसेल, तर मी माझ्या मेकॅनिकला बोलावतो. तो इथून जवळच आहे. माझा ड्रायव्हर तुमची गाडी ठीक करून घेईल आणि ती तुमच्या पार्टीच्या जागी आणून सोडेल. तोवर मी तुम्हाला माझ्या गाडीतून पार्टीच्या ठिकाणी सोडतो,’ तो आर्जवी स्वरात म्हणाला.
‘अहो, इतके सगळे कशाला? इतक्यात टॅक्सी बुक होईल.’
’चला हो, मला ही तेवढीच कंपनी होईल हयातपर्यंत,’ तो डोळे मिचकावत म्हणाला आणि तो आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली.
’घाबरू नका, मी तुमच्या मागावर नाही. मी शादाब खान. खान ग्रुप्सच्या मालकांचा मुलगा आणि तुमच्या कंपनीचा कस्टमर. मला देखील आज तुमच्या ऑफिसच्या पार्टीचे आमंत्रण आहे,’ त्याने हसत हसत माहिती दिली आणि तिने मोकळा श्वास घेतला.
‘पण तुम्ही मला…’
‘रायचंदानी साहेबांच्या मुलीला ओळखत नाही असा मुंबईत कोण असेल?’ तो पुन्हा हसत उत्तरला.
– – –
‘संजना, काल तुझ्यासोबत होता तो शादाबच ना?’
‘येस पप्पा..’
‘नाईस गाय.. ब्राइट फ्यूचर..’
‘पप्पा, तो मला कालच भेटला आहे. तुम्ही फार पुढचा विचार करू नका. आणि तुम्हाला कल्पना आहे की मी कोणत्या मन:स्थितीत आहे. सो प्लीज. मी थोडा मोकळा श्वास घेते आहे, चार लोकांच्यात मिसळते आहे म्हणजे माझ्यासाठी सगळे
नॉर्मल झाले आहे असे नाही. प्लीज…’ संजना तडतडा बोलली आणि शेवटी हुंदके देत खुर्चीत विसावली. आपण बोलायला थोडी घाई केली आणि वेळही चुकीची निवडली हे ओळखायला रायचंदानींना उशीर लागला नाही. रायचंदानी सावकाश संजनाजवळ गेले आणि त्यांनी हळुवारपणे संजनाच्या केसात हात फिरवायला सुरुवात केली. सहा महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर पिंगा घालायला लागला होता…
– – –
२३ वर्षांची संजना, त्यांच्या दृष्टीने तशी अल्लडच म्हणावी लागेल, एकदम गप्प गप्प राहायला लागली, घराबाहेर पडेनाशी झाली आणि ते जरा धास्तावले. आईविना वाढलेली पोर या प्रसंगात कशी हाताळावी त्यांना देखील उमजेना. शेवटी त्यांनी नीलाताईंना साद घातली. नीलाताई त्यांच्या नात्यातल्या लांबच्या भगिनी. त्या आणि त्यांनी चालवलेला वृद्धाश्रम हेच त्यांचे जग. पण लहानपणापासून संजनावर त्यांचा भारी जीव. त्या तातडीने धावल्या आणि संजनाच्या भीतीमागचे कारण उलगडले.
यौवन, सौंदर्य आणि पैसा आणि त्याला मिळालेली बेफाम आयुष्याची साथ संजनाला न्ाको त्या मार्गाने घेऊन गेली होती. गौतम सिंघानी असे मुलाचे नाव होते. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या संजनाचे नको त्या अवस्थेतले व्हिडिओ आणि फोटो त्याने हत्यारासारखे वापरायला सुरुवात केली होती. आधी फक्त पैशापर्यंत मर्यादित असलेली मागणी आता ‘मित्रांच्या रात्री पण रंगव’ असं सांगण्यापर्यंत पोहोचली आणि संजना हादरली.
हे प्रकरण लाला किंवा जग्गासारख्यांकडून हाताळण्याचे नाही ही जाणीव रायचंदानींना होती. प्रकरण जेवढे चारचौघात राहील आणि ते चारचौघे सुजाण असतील तितके योग्य हे ते जाणून होते. त्यांनी ताबडतोब कमिशनर शर्मांचा फोन लावला आणि सगळी कर्मकथा त्यांना सांगितली. कमिशनर साहेबांनी त्यांना नुसता धीर दिला नाही, तर योग्य माणूस देखील जोडून दिला. विक्रम शेखावत. नुकताच बढतीवर रुजू झालेला हा तरणाबांड इन्स्पेक्टर रायचंदांनींसमोर हजर झाला आणि त्याला बघूनच त्यांचा अर्धा भार हलका झाला. सहा फुटापेक्षा जास्त उंच, धिप्पाड शरीर, तांबूस गोरापान रंग… जणू ग्रीक देवतेचा पुतळाच समोर उभा राहिला होता.
‘कमिशनर साहेबांनी..’
‘मला सगळी कल्पना दिली आहे सर. त्या गोष्टीचा जितका कमी उल्लेख होईल तितके बरे,’ विश्वासाने शेखावत म्हणाला आणि रायचंदानी भारावले.
‘मला संजनाजींशी बोलता येईल का?’
‘त्याची खरंच गरज आहे?’
‘तशी गरज नसती तर मी इथे आलो देखील नसतो सर.’
नाईलाजाने रायचंदानींनी संजनाला बोलावणे धाडले. आधीच धास्तावलेली संजना आता पोलिस वेषातल्या विक्रमला बघून अजून घाबरली. मात्र त्याने अगदी शांत शब्दांत तिला धीर दिला आणि हळूहळू बोलते केले.
‘संजनाजी, जे घडले ते आपण बदलू शकणार नाही. मात्र त्याचा कणभर देखील परिणाम तुमच्या भविष्यावर होणार नाही आणि झाला प्रकार कधी उघड देखील होणार नाही याची खात्री मी तुम्हाला नक्की देतो.’
‘पण…’
‘तुम्ही जरा देखील घाबरू नका.मला फक्त इतकीच माहिती द्या की हे फोटो-व्हिडिओ फक्त गौतमकडेच आहेत, का ते त्याने इतर कोणाशी शेअर केले आहेत? या सगळ्यात नक्की किती जण आणि कोण कोण सामील आहेत?’
‘फोटो आणि व्हिडिओ फक्त गौतमकडेच आहेत हे नक्की. कारण ते इतर कोणाकडे असते तर त्या मित्राने मला नक्की काहीतरी घाणेरडी मागणी करायला फोन केला असता. त्याचे सगळे मित्र त्याच्याएवढेच नीच आहेत.’
‘त्यांची नावे, नंबर आणि जमल्यास पत्ते मला या कागदावर लिहून द्या.’
‘नाव आणि नंबर सगळ्यांचे आहेत पण पत्ते फक्त एक दोघांचेच लक्षात आहेत.’
‘हरकत नाही, ते मी बघतो. आता सर्वात महत्त्वाचे..’
‘काय?’ धास्तावलेल्या आवाजात संजना विचारती झाली.
‘हे नराधम उद्या कोणत्याही अवस्थेला पोहोचले, तरी तुम्ही स्वतःला दोष देणार नाही ना?’
‘नाही! जनावरांच्या लायकीचे आहेत सगळे. त्यांचे हात पाय तुटले तरी मला काही वाटणार नाही. फक्त पुन्हा त्यांची सावली देखील माझ्या आयुष्यात नको आहे,’ संजना ठामपणे म्हणाली आणि विक्रम विश्वासाने हसला.
– – –
गौतम सिंघानी, राजन कक्कर आणि विशाल चंदानी हे त्रिकूट या सगळ्या प्रकारामागे होते. विक्रम शेखावतने नक्की काय केले, कुठले सोर्स वापरले हे रायचंदानींना देखील कधी कळले नाही. पण दोनच दिवसात गाडीवरून कॉलेजला जात असताना झालेल्या अपघातात राजन आणि विशाल जागच्या जागी ठार झाले. राजन आणि विशालला मारायची सुपारी गौतमने दिली असल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचली आणि गौतम गायब झाला. तिसर्या दिवशी विक्रमचा खास माणूस गाडी घेऊन आला आणि रायचंदानी व संजनाला घेऊन लोणावळ्याचा एका जुनाट फार्महाऊसवर पोहोचला. स्वागताला खुद्द विक्रम शेखावत हजर.
‘शेखावत साहेब…’ गदगदलेल्या आवाजात रायचंदानींनी त्याचे हात हातात घेतले. ‘आधी एक महत्त्वाचे काम तर उरकू द्या, मग माना हवे तेवढे आभार..’ हसत हसत विक्रम म्हणाला आणि त्यांना आतल्या खोलीत घेऊन आला. खोलीतले सगळे सामान एका कडेला हालवलेले होते आणि मध्ये एका गंजलेल्या लोखंडी खुर्चीवर हात बांधलेल्या अवस्थेत गौतम बसलेला होता.
‘सर, आपण बाहेर बागेत बसूयात का? संजनाजी तुम्ही आणि गौतम इथे छान गप्पा मारा..’ हाताने एका टेबलाकडे इशारा करत विक्रम म्हणाला आणि त्या दिशेने बघताच रायचंदानी देखील हादरले. टेबलावर नेलकटर, चाकूपासून ते आसूड, हातोडी आणि तलवारीपर्यंत बरेच काही ओळीने सजवलेले होते.
चार दिवसात गौतमचे जंगली श्वापदांनी खाल्लेले अर्धेमुर्धे प्रेत जंगलात सापडले आणि हे प्रकरण कायमचे निकालात निघाले. मात्र हे प्रकरण संपत असतानाच संजना आणि विक्रमच्या जवळिकीचे नवे प्रकरण देखील सुरू झाले आणि अर्थात रायचंदानींनी देखील तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. विक्रम शेखावत त्यांना प्रचंड आवडलेला होता. त्याचे धाडस, हुशारी सगळेच कौतुकाचे होते. मुख्य म्हणजे कमिशनर साहेबांनी स्वत: त्याच्या भविष्याबद्दल खाजगीत बरेच काही रायचंदानींच्या कानावर घातले होते. असा कर्तृत्ववान जावई घरबसल्या चालून येत असेल, तर संधी सोडतील तर ते रायचंदानी कसले? तसेही गौतमच्या प्रकरणापासून ते जरा धास्तावलेले होते. अशा वेळी विक्रमसारखा जोडीदार तिच्यासोबत असणे त्यांना देखील सुखावणारे होते.
सगळे काही सुरळीत चालू होते. विक्रम आणि संजना चाेरट्या भेटींची, प्रेमाची रंगत अनुभवत होते. रायचंदानी देखील ‘आम्हाला काय माहिती नाही बा..’ अशा आविर्भावात या सगळ्याची मजा लुटत होते. शेवटी एकदाची ही खोटी खोटी कोंडी फुटली आणि संजनाने हळुवार गुपित निलूआत्याजवळ उघड केले. रायचंदानींनी मग खोटी खोटी ‘कठोर बापा’ची भूमिका पार पाडली आणि शेवटी मुलीच्या हट्टापुढे झुकलो असे दाखवत एका आठवड्याच्या आत संजना आणि विक्रमचा साखरपुडा संपन्न केला.
सर्व काही आनंदात सुरू असताना, अचानक एक दिवशी पार्टीला गेलेली, डोळा काळानिळा झालेली आणि गाल सुजलेली संजना संध्याकाळची घरी आली आणि रायचंदानी हादरले. पार्टीत कोणा जुन्या मित्राबरोबर तिला डान्स करताना पाहून विक्रम चिडला होता आणि त्यात झालेल्या वादातून त्याने चक्क तिच्यावर हात उचलला होता. विक्रमच्या आत दडलेले जनावर पाहून संजना पूर्ण हादरून गेली होती. कालपर्यंत तिला एखाद्या फुलासारखा जपणारा विक्रम आता तिच्याबाबत आकलनापलिकडे पझेसिव झाला होता. त्याचे हे रूप बाप-बेटी दोघांना धक्का देणारे होते. पण ही तर सुरुवात होती. विक्रमचा जाच आता प्रचंड वाढू लागला होता. संजनाच्या कपड्यांपर्यंत ही बंधने पोहोचायला लागली आणि संजनाच्या सहनशक्तीचा शेवट झाला. तिने सरळ विक्रमबरोबरचा साखरपुडा मोडून टाकला. विक्रम पिसाळला, संतापला, त्याने संजनाला अनेक धमक्या देखील दिल्या; मात्र रायचंदानींची ताकद तो ओळखून होता. त्यानंतर त्याने अनेकदा संजनाची माफी मागितली, आपण आता सुधारल्याचे सांगितले, पण तिने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
या सगळ्या धक्क्यातून सावरत असताना तिच्या आयुष्यात शादाब आला. नकळत अधेमध्ये होणार्या भेटी आता ठरवून व्हायला लागल्या. मात्र दोन वेळा अत्यंत भयावह अनुभवातून गेलेली संजना आता मात्र सावध होती. तिने शादाबशी फक्त मैत्रीचे संबंध ठेवले होते. शादाब मात्र तिच्यात गुंतत चालला होता. शेवटी एके दिवशी तिला भीती होती तेच घडले, शादाबने आपल्या मनातील भावना संजनासमोर उघड केल्या. हा प्रसंग येणार याचा अंदाज संजनाला होताच. त्यासाठीच ती शादाबला फारसे जवळ करत नव्हती. मात्र आता या प्रसंगाला सामोरे जावे लागणार होतेच.
तिने स्पष्टपणे त्याला नकार कळवला. मित्र म्हणून त्याचे स्थान तिला जास्त महत्त्वाचे वाटत होते. शादाबला मात्र ते मान्य नव्हते. त्याने आपल्या वडिलांकडून, रायचंदानींकडून तिच्यावर दबाव टाकण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र संजनाचा नकार ठाम राहिला. काही दिवसांत शादाबने तिच्याशी पूर्ण संपर्क तोडला. संजना घडलेल्या घटनांना विसरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक शादाबने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी आली आणि संजनाच्या आयुष्यात पुन्हा वादळ आले. अरे माझ्या आयुष्यात काय सगळे ‘सायको’च येतात का काय? या प्रश्नाने तिला ग्रासले होते.
शादाबला हॉस्पिटलमधून घरी आणून चार दिवस झाले होते; मात्र एकदा फोनवर बोलण्यापलीकडे तिने फारसा उत्साह दाखवला नव्हता. त्या रात्री अचानक तिची झोपमोड झाली आणि आपल्या खोलीत कोणीतरी असल्याचे तिला जाणवले. ती प्रचंड घाबरली. त्याचवेळी अंधारातून पुढे आलेल्या त्या मुखवटा घातलेल्या व्यक्तीने हातातला चाकू तिच्यावर उगारला आणि संजना किंचाळली. प्रसंगावधान राखून तिने जवळचे टेबल त्याच्या अंगावर ढकलले आणि रूमबाहेर पळाली.
रायचंदानींनी पोलिसांना तातडीने कळवले आणि संजनाची सुरक्षा देखील वाढवली. चार दिवस उलटले होते. पोलिस तपास सुरू होताच, मात्र हाताला ठोस काही लागत नव्हते. अशातच एके दिवशी चक्क संजनावर पुन्हा एकदा ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये हल्ला झाला आणि परिस्थिती अजून गंभीर बनली. त्यात भरीस भर म्हणून संध्याकाळच्या वेळेला विक्रम शेखावत बंगल्यावर हजर झाला.
‘तू आता इथे कशासाठी आला आहेस?’ रायचंदानींनी संतापाने विचारले.
‘संजनावरचे संकट दूर करायला.’
‘ते तू होतास आणि ते दूर झाले आहे!’
‘पप्पा, माझ्या चुकांची शिक्षा मला मिळाली आहे. नसेल तर नंतर पुन्हा द्या. पण मी काय सांगतोय ते नीट ऐका. संजनावर हल्ला करणारा शादाब आहे अशी मला शंका आहे. तीन महिन्यापूर्वी त्याची सेक्रेटरी अचानक गायब झाली. तिचा अजून तपास लागलेला नाही. त्यामागे शादाबचा हात असावा असा पोलिसांना संशय आहे. ती केस मी हाताळत आहे. शादाब किती मनोरुग्ण आहे ते मी चांगला जाणून आहे,’ विक्रांतच्या बोलण्याने रायचंदानी चांगलेच चिंतेत पडले होते. त्यांनी काही वेळ विचार केला आणि संजनाला बोलावले. हॉलमध्ये विक्रमला पाहून तिला धक्काच बसला. मात्र विक्रमने तिच्यासमोर पुन्हा एकदा सगळी कहाणी सांगितली आणि संजना देखील चिंतेत पडली.
विक्रमचे बदललेले रूप पाहून संजना चांगलीच प्रभावित झाली होती. संजनावरच्या हल्ल्याच्या केसच्या निमित्ताने विक्रम पुन्हा एकदा संपर्कात आला होता; मात्र हा विक्रम पूर्ण वेगळा होता. जसा विक्रम तिला हवा होता, हा अगदी तसा होता. तो कोणत्याही जुन्या प्रसंगाची आठवण काढत नव्हता, अत्यंत नम्रतेने वागत होता आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात पूर्वी काही नाते होते हे देखील तो जाणवू देत नव्हता. या सगळ्या गदारोळात रायचंदानींची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आणि त्याच रात्री तो प्रसंग घडला…
रायचंदानींच्या पायाजवळच्या खुर्चीत संजना विसावली होती. त्याचवेळी मागचा दरवाजा अचानक उघडला आणि तीच मुखवटाधारी व्यक्ती आत शिरली. संजनाला सावरायला वेळ मिळण्याआधीच तिने हातातला सुरा उगारला… मात्र त्याच वेळी एक जोरदार आवाज झाला आणि ती व्यक्ती खाली कोसळली. मागे हातात बंदूक धरलेला विक्रम उभा होता. संजनाने धावत जात विक्रमला मिठी मारली. तोवर गर्दी जमली होती. विक्रमने पुढे होत त्या व्यक्तीचा बुरखा बाजूला केला. त्याचा अंदाज खरा ठरला होता; तो शादाबच होता.
रायचंदानी आज प्रचंड खूश होते. संजना आणि विक्रम पुन्हा एकत्र आले होते. आज त्याचाच जंगी सोहळा सुरू होता. संजना एका पुरुष मित्रासोबत नाचत होती आणि चक्क विक्रम स्वत: त्यांना प्रोत्साहन देत होता.
‘विक्रम, बेटा तुझे हे रूप पाहून खूप आनंद होतोय. मला वाटले होते, हा शादाब का आपल्या आयुष्यात आला? पण आता वाटते, झाले ते बरेच झाले. निदान तुम्ही पुन्हा एकरूप झालात.’ रायचंदानींचे डोळे पाण्याने डबडबले.
‘आला नव्हता हो… मी पाठवला होता. त्याच्या सेक्रेटरीच्या प्रकरणातून बाहेर काढायचा शब्द देऊन. पण मी त्याला दुनियेतूनच बाहेर काढणार आहे हे बिचार्याला माहिती नव्हते. संजना फक्त माझी आहे आणि माझीच राहणार..’ मनातल्या मनात विक्रम बोलला आणि त्याच्या चेहर्याावर एक गूढ हास्य तरळले.