ऊर्दू शेरोशायरीचे आस्वादक, अभ्यासक मधुकर धर्मापुरीकर यांचे ‘लज्जत’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. उर्दू शेरोशायरीच्या आवडीतून त्यांनी ही लिपी पण शिकून घेतली आणि ते त्या भाषेच्या खोल प्रवाहात उतरले. तिथून त्यांनी वेचून आणलेली मौक्तिके या पुस्तकात वाचायला मिळतात. या पुस्तकाला प्रसिद्ध लेखिका नंदिनी आत्मसिद्ध यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा निवडक भाग.
– – –
आपल्या जीवनात अनेक गोष्टी रंगत आणि लज्जत आणत असतात. भाषा ही त्यातलीच एक छानशी गोष्ट. कळू लागतं तेव्हापासून भाषा आपल्याला सोबत करायला लागते. नकळत तिला ओळखत आणि जोखत आपण मोठे होत जातो. जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न भाषेच्या मदतीनेच आपण करत असतो. या सगळ्या वाटचालीत मग केवळ मातृभाषाच सोबतीला राहत नाही. आसपास बोलल्या जाणार्या भाषा आणि बोली कानावर पडत असतात आणि त्यांचा हा ओझरता सहवास आपल्या ओंजळीत बरंच काही टाकत असतो. आपल्या देशात शाळेत जाणार्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात. बहुभाषिक संस्कृतीची ओळख होत असते. सगळ्या भारतीय भाषांमध्ये उर्दू ही अशी भाषा आहे जी स्वतःची असी एक निराळीच ओळख आणि छाप घेऊन आलेली आहे. उर्दूचा उगम आणि विकास हा भारतातलाच. या भाषेच्या इतिहासात डोकावण्याचा विषय इथे नाही. पण उर्दू ही संपूर्णपणे भारतीय भाषा आहे, तिचा जन्मच या देशात झाला आहे, हे अधूनमधून ठासून सांगावं लागतं. तसंच ती एका विशिष्ट धर्माची भाषा नाही व नव्हती, हेही. या भाषेचं राजकारण इथे वर्षोनुवर्षं केलं गेलं. पण या राजकारणात आणि वादंगात न शिरता उर्दूवर निस्सीम प्रेम करणारे कितीतरी लोक इथे आहेत. जगभरात आहेत. अशा उर्दूप्रेमींपैकी एक आहेत, आमचे नांदेडचे मित्र मधुकर धर्मापुरीकर.
धर्मापुरीकरांची ओळख नेमकी कधी झाली, ते मला सांगता येणार नाही. पण त्यांचं उर्दू भाषेवरचं प्रेम हा आमच्या स्नेहातला एक महत्त्वाचा दुवा नक्कीच राहिला आहे. उर्दू भाषा नांदेडकरांना अजिबात परकी नाही. एकेकाळच्या निज़ामाच्या राजवटीमुळे उर्दू माध्यमातून शिकलेले कैक मराठी लोक इथे आहेत. धर्मापुरीकरांचे वडील प्राथमिक शाळेत उर्दू माध्यमातून शिकले. शिवाय त्यांना हिंदी गाणी आणि उर्दू शायरी यांची आवडही होती. त्यामुळे वडिलांना उर्दू शब्दांचा अर्थ विचारत त्यांची बालपणीच उर्दू शायरीची मुशाफिरी चालू झाली. हिंदी गाण्यांनी उर्दू शायरीचा प्रसार दूत बनून केला, हे खरंच आहे. धर्मापुरीकरांचं हे उर्दूप्रेम इतक्या वर्षांमध्ये खूप बहरलं आहे. वेळोवेळी या आवडत्या विषयाच्य़ा अनुषंगाने त्यांनी लिखाण केलं. बर्याच उर्दू कथांचा अनुवादही केला. उर्दूच्या सहवासात त्यांना एक आनंद मिळत गेला आणि जगण्यातच एक जान आली. त्यांचं हे नवं पुस्तक. या सगळ्या अनुभवाविषयीची ‘लज्जत’ घेऊन आलं आहे ‘लज्जत’ हे समर्पक नाव सार्थपणे मिरवणारं हे लेखन धर्मापुरीकरांच्या उर्दूप्रेमाचा दाखलाच देतं.
उर्दूवर जिवापाड प्रेम करणारे, तिचा अभ्यास करणारे आणि उर्दू साहित्याचा आस्वाद घेणारे खूप असतात. यातल्या प्रत्येकाची आपली अशी वाट असते. उर्दू भाषा महाराष्ट्रात फारशी परकी नाही. शिवाय तिची लिपी न आली, तरी उर्दू साहित्याचा आस्वाद घेता येतो. यामुळे उर्दूचे चाहते इथे खूप आहेत. पण प्रत्येक भाषेची लिपी ही तिची खासियत असते. त्यामुळे उर्दू भाषा तिच्या लिपीतून शिकण्यात एक वेगळीच मजा आहे. धर्मापुरीकरांनीही ही लिपी शिकून घेतली. तिची वळणं आणि गुंतागुंत समजून घेतली. उर्दू लिपीचं नजाकतदार वर्णन करत ते लिहितात, ‘ही उर्दू लिपी-हातावरच्या मेहंदीच्या नक्षीसारखी!’ मात्र लिपीत अडकून न पडता, या भाषेकडे आणि तिच्यातील साहित्याकडे त्यांचा अधिक ओढा राहिला.
उर्दूतली काव्यरचना, विशेषतः गजल आणि शेर यांचं आकर्षण इतरांप्रमाणे धर्मापुरीकरांनाही आहे. अगदी दोन ओळींच्या मुठीत मावणारं विराट अर्थविश्व हे उर्दूचं वैशिष्ट्य. ‘गागर में सागर’ किंवा खरं तर, ‘बूँद में सागर’ ही या रचनेची ताकद… या ताकदीने धर्मापुरीकरांना विशेष खेचून घेतलं. एखादा शेर, एखादा शब्द त्यांना झपाटून टाकू लागला. आजही ते एखाद्या शब्दाचा मागोवा घेत असतात आणि मनाचं समाधान होईपर्यंत आपला शोध चालूच ठेवतात. त्याचं हे झपाटलेपण त्यांच्याशी फोनवर होणार्या संवादातून नेहमी अनुभवाला आलं आहे. या शोधाबद्दलचंच त्यांचं लिखाण पुस्तकात आहे. उर्दूची स्वाभाविकपणे झालेली ओळख, वडिलांकडून, आसपासच्या मित्रांकडून आणि जाणकारांकडून या भाषेविषयी गोळा केलेली माहिती, मनातल्या शंकांचं निरसन अशा अनेक अंगांनी त्यांनी लिहिलं आहे. अलीकडे एकूणच सुटत चाललेलं भाषेचं भान त्यांना जरा खटकतं. तर शब्दांच्या अंतरंगात लपलेले अर्थ आणि चकवा देणारे शब्द याबद्दल त्यांना कुतूहल आहे. मनातले भाषेविषयीचे विचार टिपणारं लेखन त्यांनी वेळोवेळी केलं आहे. भाषा आणि शब्द यांच्याकडे किती विविध दृष्टींनी पाहता येतं, याचा प्रत्ययच त्यांचं हे लिखाण देतं.
दाग हा उर्दू कवी ‘आती है उर्दू जबाँ आते आते’ असं म्हणून गेला. त्याने जणू एक अबाधित सत्य समोर ठेवलं आहे, हे उर्दू शिकणारा प्रत्येकजण मान्य करेल. पण एकदा का ही भाषा अंगवळणी पडली, की सगळी वाट स्वच्छ दिसू लागते. उर्दूला जगात विशेष लोकप्रिय करणारी गोष्ट म्हणजे या भाषेतला शेर नावाचा अनमोल खजिना. दोन ओळींमधून अर्थपूर्ण असं बरंच काही सांगून जाण्याची किमया हे शेर करतात. म्हणूनच तर दाग या भाषेविषयी असंही लिहून गेला-
उर्दू है जिसका नाम, हमीं जानते हैं ‘दाग’
सारे जहाँ में धूम हमारी जबाँ की है
आपल्या लेखांमधून धर्मापुरीकरांनी, आपण शब्दांचा मागोवा कसा घेतला, त्यासाठी शब्दकोश कसे धुंडाळले, जाणाकारांना प्रश्न विचारून एकेका शब्दाचा आणि शेरचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगितलं आहे. अनेकदा शेर तर समजला, पण त्याचा शायर कोण, हे कळलं नाही, अशी चुटपुट त्यांना लागून राहिली. अन् खंरच आहे की, कैक उर्दू शेर विखुरले जातात आणि ते ट्रकच्या मागे लिहिलेले किंवा सुटेच कुठेतरी उद्धृत केलेले भेटतात. त्यांचा कर्ता कोण, हे अज्ञातच राहून जातं. उर्दूचा व्यासंग असेल, तर कदाचित ते कळून येतं. पण तरीही बरेच शेर कवीची अनोळख घेऊनच रसिकांमध्ये मशहूर होतात. कधी एखाद्या अक्षराच्या अभावी शेरचा अर्थच संपूर्ण बदलून जातो. कॉलेजात ऐकलेला एक शेर आपल्याला कसा आवडला होता आणि नंतर त्याचा कर्ता कवी समजल्यावर तो वेगळ्या स्वरूपात पुढे कसा आला, याची कथा धर्मापुरीकरांनी दिली आहे.
बहुत शोर सुनते थे पहलू में दिल का
जो चीरा तो इक कतरा-ए-खून निकला
हा शेर त्या तरुण वयात खूप भावला, वास्तवात ‘आतश’ या शायराच्या शेरमधली शेवटची ओळ ‘जो चीरा तो इक कतरा-ए-ख़ूं न निकला’ अशी होती. ‘खूं न निकला’ आणि ‘खून निकला’ यात बारीकसा फरक दिसतो, पण अर्थ एकदम उलटा होतो. तसाच घोळ ‘इयादत’ (आजार्याची विचारपूस) आणि ‘इबादत’ (प्रार्थना) या शब्दांमुळे झाला होता. उर्दूत हे शब्द लिहिले की फक्त एका नुक्äत्याचा फरक आहे. दोन्ही प्रकारे शेर अर्थपूर्ण होतो. पण दोन्ही अर्थ खूप निराळे आहेत. अनेक वर्षं हा शेर इबादत या शब्दानिशीच छापला गेलाय. ‘रेखता’ या वेबसाइटवरही तो तसच उद्धृत केलेला आहे. या शेरवरून धर्मापुरीकरांचे मित्र व उर्दूचे चाहते व अभ्यासक डॉ. नंदू मुलमुले यांच्याशीही त्यांचा वाद झाला होता. आपण हा इयादत शब्द कुठे वाचला, असा प्रश्न धर्मापुरीकरांना पडला होता. अखेरीस हा शेर त्यांना हव्या त्या रूपात, स्वतःच्याच संग्रहात असलेल्या ‘चमन दर चमन’ या उर्दू लिपीत विविध प्रसिद्ध शेर दिलेल्या पुस्तकात त्यांना मिळाला. अकबर इलाहाबादी या नामवंत शायरने लिहिलेला हा शेर आहे-
रहता है इयादत में हमें मौत का खटका
हम याद-ए-खुदा करते हैं, कर ले न खुदा याद
मनाला असं छळणारे, कोड्यात टाकणारे शेर धर्मापुरीकरांना चुटपुट लावतात आणि त्यांचा थांगपत्ता काढण्यासाठी उद्युक्त करतात.
एका आवडलेल्या शेरच्या कर्त्याचा शोध घेता घेता धर्मापुरीकरांना ‘शाज’ या उर्दूतल्या शायराचा शोध लागला. हा शेर खरोखरच फार अर्थपूर्ण आहे-
आगे आगे कोई मशअल लिए चल रहा था
हाए क्या नाम था उस शख्स का नाम पूछा भी नहीं
धर्मापुरीकरांना शेरचा कवी कोण, हा ध्यास नेहमीच लागून राहिलेला असतो, त्यामुळे हा शेर त्यांना आवडला, यात नवल नाहीच… आधी हे नावही त्यांना चुकीने ‘शाद’ असं समजलं होतं. पण डॉ. झिया या जाणकार उर्दू मित्रामुळे त्यांना खरं नाव समजलं. या शाज यांच्याविषयीची इतरही माहिती समजली आणि गंभीर प्रवृत्तीच्या शाज यांच्य़ावर लेख लिहिणार्या मुजतबा हुसैन या व्यंग्यात्मक लेखन करणार्या शाज यांच्या लेखकमित्राची माहितीही झाली. व्यंगचित्रांचा अभ्यास असणार्या धर्मापुरीकरांना यामुळे खासच आनंद झाला असणार.
कुठल्याही भाषेत लिहिताना चुका झाल्या, तर दोन अर्थ होतात. यामुळे कधी गंमत येते, कधी भलतेच अर्थ होतात, तर कधी वाचणार्याला पेच पडतो. कधी गजल वा गीतातील शब्दाचे चुकीचे उच्चार गायकाने केल्यामुळेही मूळ रचनेला वेगळंच वळण मिळतं. अशा अनुभवांतून जात, धर्मापुरीकरांनी उर्दू शब्द व शेरांचा मागोवा घेत राहण्याचं व्रत चालू ठेवलं आहे. त्यांना असलेली हिंदी सिनेसंगीताची आवडही उर्दू शब्दांविषयीचं त्यांच्या मनातलं कुतूहल वाढवणारी ठरली. मग बहुरे, चश्मेबद्दूर खरामाँ अशा शब्दांचा अर्थ ते शोधत गेले. खय्यामच्या एका अल्बममध्ये ‘दाग’च्या एका शेरमध्ये मूळ रचनेतला ‘बावफा’ हा शब्द त्याची पत्नी, गायिका जगजित कौर हिने ‘बेवफा’ असा उच्चारला आहे. हे दोन शब्द परस्परविरोधी अर्थ व्यक्त करणारे. इतर ठिकाणीही तसाच उच्चार झालेला आढळला. त्यामुळे या शेरचा अर्थ पारच बदलून जातो. याचा शोधही धर्मापुरीकरांनी घेतला. अखेरीस उर्दू अभ्यासक मित्रांच्या मदतीने त्यांना दागच्या १९१२ साली प्रकाशित झालेल्या ‘आफताब-ए-दाग’ या संग्रहात ही गजल सापडली. तर त्यात ‘बावफा’ असा शब्दच होता.
शायरीच्या मुशाफिरीत रंगलेले धर्मापुरीकर या पुस्तकात पानोपानी भेटतात. नेमका आणि योग्य तो अर्थ समजला, याचा त्यांना आनंद होतोच. पण या शोधात केलेली वाटचाल, भ्रमन्ती आणि पालथी घातलेली पुस्तकं याची एक अवर्णनीय अशी गंमत ते अनुभवताना दिसतात. या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याची त्यांना मोठी असोशी आहे. या लेखनाची ‘लज्जत’ म्हणूनच इतरांनाही एक आनंद मिळवून देते.