‘टारझन’ नावानं हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखले जाणारे हेमंत बिर्जे ‘सूर्या’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. हा चित्रपट ६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेमंत बिर्जे म्हणाले, या सिनेमातील अॅक्शन साऊथ इंडियन सिनेमाच्या तोडीची आहे. निर्मात्यांनी उत्तम बिग बजेट सिनेमा बनवला आहे. मला या सिनेमात काम करताना जशी मजा आली अगदी तशीच मजा प्रेक्षकांना तो थिएटरमध्ये पाहताना अनुभवता येईल. हिंदी सिनेमात विविधांगी भूमिकेतून अभिनयाचा ठसा उमटवणारे अखिलेंद्र मिश्रा म्हणाले, याआधी मी मराठीत ‘आजचा दिवस माझा’ या सिनेमात काम केलं होतं. सूर्या या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीला प्रसाद मंगेशच्या रूपाने एक अॅक्शन हिरो मिळणार आहे. मी आता हिंदी सिनेमात खलनायकी रोल स्वीकारत नाही. पण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. यामुळेच मी मराठी सिनेमासाठी खलनायकाची भूमिका स्वीकारली.
समाजात विघातक प्रवृत्ती वरचढ ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नायक पुढे यावा लागतो. असाच डॅशिंग नायक असलेल्या सूर्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘सूर्या’ कशी दाखवतो, याची चित्तथरारक कहाणी दाखविणारा राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल यांनी प्रस्तुत केला असून या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे.
पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाला, यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट नाही’ असा आनंद प्रसाद मंगेश यांनी व्यक्त केला. रुचिता जाधव, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, प्रदीप पटवर्धन आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. अॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि रोमान्स या सगळ्याचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास सर्वच कलाकारांनी यावेळी व्यक्त केला. ‘उगवला पराक्रमी सूर्या सूर्या’, ‘मन गुंतता गुंतता’, ‘रापचिक रापचिक कोळीणबाई’, ‘मी आहे कोल्हापूरची लवंगी मिरची’, ‘बेरंग जवानी’ अशी वेगवेळ्या जॉनरची पाच गाणी /या चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान, मंगेश ठाणगे, प्रशांत हेडव यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, राजा हसन, ममता शर्मा, कविता राम, खुशबू जैन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहे.