□ महाविकास आघाडीचा मोर्चा महामोर्चा नव्हता, नॅनो मोर्चा होता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ आणि एवढे विक्राळ सत्तेचे, पैशांचे बळ पाठिशी असताना तुमचे माफी मांगो आंदोलन तुम्हीच माफी मागावी इतक्या मायक्रो पातळीवरचे झाले, त्याचे काय देवेनभाऊ!
□ मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना कोर्लईच्या ग्रामस्थांनी हुसकावून लावले.
■ कडवट शिवसैनिकांच्या गुहेत प्रवेश करताना महाशक्तीच्या ताटाखालच्या पाळीव मांजरांनी दहा वेळा विचार करायला हवा.
□ भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला तेव्हा आम्ही चांगले होतो, शिवसेनेला पाठिंबा दिल्यावर वाईट कसे झालो?- मराठी मुस्लीम सेवा संघाचा सवाल.
■ इकडे असताना भ्रष्ट असलेले लोक तिकडे जाताच पुण्यपावन सज्जन कसे बनून जातात, त्यातलाच हा प्रकार! कायम यांच्याकडे पाहा आणि फुलं वाहा.
□ जी २० परिषदेसाठी झोपडपट्ट्या झाकल्या, रस्त्यांची रंगरंगोटी.
■ अशी पत्रे मारून गरिबी झाकता येत नाही, ती आकडेवार्यांमध्ये उघडी पडतेच. शिवाय विमानांमधून जे दिसतंच, ते रस्त्यांवर झाकून कोण कोणाची फसवणूक करतंय?
□ त्या गृहस्थांविषयी केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल: शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे नाव न घेता निर्देश.
■ पवारसाहेब, केंद्राने महाराष्ट्राचा अवसान घात करण्यासाठीच त्यांची नेमणूक केली आहे, तो निर्णय घेऊनच पाठवले आहे.
□ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सैन्यदलाचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसने त्यांची हकालपट्टी करावी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मागणी.
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवानच्या प्रकरणात कोणीही घुसखोरी केली नाही, असे खोटे विधान करून भारतीय जनतेची फसवणूक केली आणि चीनच्या दाव्याला पाठबळ दिले; त्याबद्दल त्यांची हकालपट्टी कधी करताय नड्डाजी तुमच्या पक्षातून?
□ नासाच्या नव्या चांद्र मोहिमेत महिलेचा समावेश; चंद्रावर महिलेचे पाऊल पडणार.
■ आता तरी कवी लोक प्रेयसीच्या मुखाला चंद्राची उपमा देणे थांबवतील काय?
□ विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देणार नाही : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे प्रतिपादन.
■ तुमच्या भंपक दारूबंदीला न जुमानता राज्यात दारू, तीही विषारी दारू विकली जाते, याची जबाबदारी तुमचीच आहे नीतीशबाबू! तुमच्या बंदीत दम असता तर मुळात या लोकांना दारू उपलब्धच झाली नसती. त्याची जबाबदारी घ्या.
□ चीन युद्धाची तयारी करतोय, केंद्र सरकार निद्रिस्त आहे : राहुल गांधी यांची टीका.
■ त्यांचे डोळे पाकिस्तानसारख्या फुटकळ शेजार्याकडे पाहतानाच लाल होतात, चीनचा विषय आला की डोळे पांढरे होतात, छाती ५.६ इंचाची होते.
□ चलनवाढ आम्ही रोखू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
■ अहो अक्का, तुम्हाला तुमची कामं झेपत नाहीत, रिझर्व्ह बँकेचं काम करायला कुठे निघालात? त्यांना त्यांचं काम करू द्या, तिथे हस्तक्षेप करू नका, तेवढंच पुष्कळ आहे सध्या.
□ पोर्ट ट्रस्टच्या जागेत मुंबईचा विस्तार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ बिल्डरांचे सरकार, मुंबईची पुरती वाट लावल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार!
□ मराठी माणसाला मुंबईत परत आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ कशाला लोकांना भलती गाजरं दाखवता? नगरविकास मंत्री असताना डुलक्या काढल्यात का?
□ प्रसाद लाड यांच्याविरोधातील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून बंद.
■ भाजपमध्ये या, प्रसाद मिळवा, लाड करून घ्या, या एक खिडकी योजनेचे सोमय्या, दरेकरांपाठोपाठ आणखी एक लाभार्थी.
□ प्राध्यापकांना आता पुण्य, पुराण, पंचांगांचा अभ्यास करावा लागणार, यूजीसीच्या उजळणी अभ्यासक्रमात ‘भारतीय ज्ञाना’चा समावेश.
■ पोथ्यांमधल्या भाकडकथांची पोपटपंची ‘ज्ञान’ म्हणून बहुजनांच्या माथी मारण्याचे कारस्थान ब्रिटिश अंमलाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले आहे हो, सावधान!
□ देशाला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षांनंतरही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातात : महानायक अमिताभ बच्चन यांची स्पष्टोक्ती.
■ अखेर आठ वर्षांनी का होईना, तुम्हाला वाचा फुटली, याचाच आनंद आहे बच्चनजी! आता मला तसे म्हणायचे नव्हते म्हणून माघार घेऊ नका म्हणजे झालं!
□ व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण हे न्यायसंस्थेचे कर्तव्य : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड.
■ असे सरन्यायाधीश एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे बिल्कीस बानोच्या बलात्कार्यांची सुटका करण्याच्या निर्णयाच्या पुनर्विलोकनालाच सर्वोच्च न्यायालय नकार देते, तेव्हा काय म्हणायचे?