गेल्या काही दिवसापासून सीमा भागात कानडी हैदोस सुरू आहे. बेळगावच्या टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर भ्याड हल्ला झाला. कर्नाटकात सहा महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे तेथील भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे रोज बेताल वक्तव्य करून मराठी माणसाला डिवचत आहेत. जतच्या पाणी प्रश्नी तेथील नागरिकांना महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी उचकवत आहेत. सीमावासीयांची भाषेच्या नावाखाली गळचेपी सुरुच आहे. सर्व दृष्टीने कर्नाटकाचे भाजप सरकार आक्रमक भूमिका घेत आहेत. या उलट महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. ‘अरे ला का रे’ने उत्तर देण्याची भाषा करतात. परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी घाबरून बेळगाव दौरा रद्द केला. नेभळट आणि घाबरट महाराष्ट्र सरकारकडून जास्त अपेक्षा नाही. परंतु सीमावासीयांच्या सतत पाठीशी रहाणार्या शिवसेनेने लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमावासीयांच्या मागे खंबीरपणे शिवसेना उभी असल्यामुळे कर्नाटक सरकार घाबरून सीमावासीयांविरोधात टोकाची भूमिका घेत नाही. सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने पहिला तीव्र लढा दिला, त्याला जवळजवळ ५५ वर्षे झाली आहेत. त्यानंतर वेळोवेळी सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने आंदोलने, लढे दिले आणि सीमाप्रश्न ज्वलंत ठेवला. सीमा प्रश्नाचा वाद न्यायालयात आहे. शिवसेनेमुळेच सीमा प्रश्न जिवंत राहिला आहे.
सीमा प्रश्न म्हणजे मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. महाराष्ट्र-कर्नाटक यांतील वादग्रस्त भाग महाराष्ट्रात यावा, महाजन कमिशनने केलेला अन्याय दूर व्हावा यासाठी शिवसेना मनापासून या विषयावर सतत बोलत असते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र समितीची संपूर्ण महाराष्ट्र समिती झाली, परंतु समितीने या प्रश्नावर तीव्र आंदोलन केले नाही. किंबहुना महाराष्ट्रात मुंबई आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती हळूहळू निस्तेज होऊ लागली. म्हणून महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या मराठी माणसाला चेतविण्याचे काम आवश्यक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे अचूक ओळखले आणि १९६७च्या ऑक्टोबर महिन्यात एक पत्रक काढून बेळगाव-कारवारच्या सीमा भागातील जनतेच्या मागणीस पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्रभर ‘काळा दिन’ पाळण्याचे आवाहन मराठी जनतेला केले. त्या दिवशी घराघरावर काळे झेंडे लावावेत आणि दंडावर व छातीवर काळ्या फिती लावाव्यात असा आदेश शिवसैनिकांना देण्यात आला. ‘असहाय्य, एकाकी, हताश सीमा भागातील जनतेच्या पाठीशी आता महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,’ असे मत शिवसेनाप्रमुखांनी मांडले. शिवसेनेने सीमा प्रश्न आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
मा. बाळासाहेबांच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार बेळगाव परिसरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगावातील दुकाने, बाजारपेठा व कारखाने पूर्णपणे बंद झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमंत्रणावरून शिवसेनाप्रमुख त्या दिवशी, म्हणजे नोव्हेंबर १९६८मध्ये बेळगावात गेले. तिथे त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. सुमारे चार हजार सायकलस्वारांच्या फेरीत ते मोटारीतून निघाले. त्यावेळी त्यांच्याबरोबर एकीकरण समितीचे नेते सर्वश्री बा. रं. सुंठणकर, बाबूराव ठाकूर, बळवंतराव सायनाक वगैरे मंडळी होती. बारा वर्षे सीमा प्रांतासाठी जिद्दीने लढा देणारे आमदार सायनाक, सुंठणकर आणि ठाकूर या त्रिमूर्तीची भाषणे झाल्यानंतर बेळगावच्या जनतेला आशेचा दिलासा देणारे आणि लढा चेतवणारे बाळासाहेबांचे भाषण झाले.
त्या सभेनंतर मुंबईत ठिकठिकाणी सभा सुरू झाल्या. त्या सभांमध्ये बाळासाहेब आणि शिवसेना नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या. अभ्युदय नगर, काळाचौकी येथे सभा झाली आणि शिवाजी पार्कवरही प्रचंड सभा घेण्यात आली. स्वतः शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवेदन सादर केले आणि हा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवावा असा आग्रह धरला.
परळ शाखेच्या वाढदिवसाच्या दिवशी कामगार मैदानावरील सभेत बाळासाहेबांनी पुन्हा एकदा सीमा प्रश्नासाठी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली. येता प्रजासत्ताक दिन हा सीमा प्रदेशातील प्रजेच्या हक्कासाठी लढण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस म्हणून शिवसेना पाळणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘‘हा प्रश्न केव्हा सोडवणार हे जोपर्यंत केंद्रामधील सरकार सांगत नाही, तोपर्यंत काँग्रेस नेत्यांना व केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही. त्यांचे मुंबईचे रस्ते रोखून धरायचे असा शिवसेनेने संकल्प सोडला आहे. या मार्गाशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही.’’ शिवसेनेने प्रक्षोभक भाषणे करून मराठी माणसातील प्रक्षोभक आग्या वेताळ जागृत केला होता.
याच सुमारास शिवसेनेचे नेते दत्ताजी साळवी व मनोहर जोशी यांची बेळगावात सभा झाली. भाषणात ते म्हणाले, ‘‘मुंबईच्या विमानतळावर कोणताही केंद्रीय मंत्री २६ जानेवारीनंतर उतरल्यास त्याला शिवसैनिक विमानतळापासून राजभवनापर्यंत जाऊच देणार नाहीत. सीमाप्रश्नासाठी निधड्या छातीने त्यांच्या मोटारीसमोर आडवे पडतील. पोलिसांनी खुशाल गोळीबार, लाठीमार करावा, आम्ही पर्वा करीत नाही.’’ त्याचवेळी मा. बाळासाहेबांनी पुण्यात जाहीर सभेत सांगितले की, ‘‘सीमाप्रश्न सोडवण्याची निश्चित मुदत ठरवेपर्यंत पंतप्रधान, उप पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा व म्हैसूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांच्याविरोधी ‘मुंबई बंद’चा कार्यक्रम तारीख २६ जानेवारीनंतर घेण्यात येईल. हे श्रेष्ठी मुंबईत येतील त्यावेळी शिवसैनिक त्यांच्या मोटारीसमोर आडवे पडतील.’’
प्रजासत्ताकदिनाला ही मुदत संपली. त्यामुळे २७ तारखेला शिवसैनिकांमध्ये लढण्यासाठी स्फुरण चढले. परिणामाची पर्वा न करता शिवसेना रस्त्यावर उतरली. माहीम, शिवाजी पार्क, पोर्तुगीज चर्च, प्रभादेवी आणि वरळीच्या नाक्यावर सत्याग्रहींच्या तुकड्या उभ्या राहिल्या. ठाण्याचे नगराध्यक्ष वसंतराव मराठे यांच्याकडे माहीमच्या सत्याग्रहाचे नेतृत्व होते, तर शिवाजी पार्कचे नेतृत्व सर्वश्री दत्ताजी साळवी व सुधीर जोशी यांच्याकडे होते. पोर्तुगीज चर्चला होते मनोहर जोशी. प्रभादेवीला डॉ. खरुडे व राजा साळवी, साटम गुरुजी तर वरळी नाक्यावर गावडे, तावडे, नलावडे ही नगरसेवक त्रयी होती. माहीमच्या बस डेपोजवळ वसंतराव मराठे जबरदस्त मुसंडी मारून यशवंतराव चव्हाण यांच्या गाडीसमोर आडवे पडले. सगळ्याच सत्याग्रहींनी तो कित्ता गिरवला. मग एकच गडबड उडाली. जो सत्याग्रही दिसेल त्याला दे लांब ढकलून, असा प्रकार सुरू झाला. शेवटी कशीबशी सत्याग्रहींना चुकवून गाडी पुढे गेली नि दिशा बदलून प्रभादेवीपर्यंत पोहोचली. वरळीपर्यंत पाच ठिकाणी यशवंतरावांची गाडी अडविण्यात आली. शेवटी सर्व सत्याग्रही शिवसेना कचेरीवर जमले. त्या ठिकाणी बाळासाहेब त्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘नामदार यशवंतरावांना मार्ग बदलायला लावला, यातच आपला विजय झाला आहे.’’
शिवसेनेने पहिली लढाई जिंकली. दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सीमा प्रश्नाबाबत शिवसेनेचा विराट मेळावा भरला होता. याच सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बाबूराव ठाकूर यांनी गर्जना केली की, ‘‘सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी शिवसेनेने सुरू केलेला लढा हा सीमावासीयांना मिळालेला एक दिलासा आहे. सीमा भागांतील जनतेला ‘धीर देणारा पुरुष’ या दृष्टीने मी बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी आज शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता जागी करीत आहे याबद्दल शिवसेनेला माझे शतशः धन्यवाद!’’ सीमावासीयांना सेनेचा आधार वाटू लागला आणि सेनाच प्रश्न सोडवेल ही खात्री वाटू लागली.
याच सभेत शे. का. पक्षाचे बापूसाहेब लाड, संयुक्त समाजवादी पक्षाचे बापूसाहेब काळदाते व प्रजासमाजवादी पक्षाचे नेते यांनी सीमा प्रश्नावर शिवसेनेच्या लढ्याला सहकार्याचा हात पुढे केला आणि शिवसेनाप्रमुख या नात्याने त्यांचे सहकार्य मी स्वीकारीत असल्याचे जाहीर करतो असे बाळासाहेब ठाकरे यांनी टाळ्यांच्या गजरात जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असा संभव आहे. पण तसं झालं तर शिवसैनिक चवताळून बाहेर येतील आणि मग नुसते पोलिसांनी भागणार नाही, सैन्य बोलवावं लागेल.’’ लाठ्या, अश्रुधूर, गोळीबार यांना तोंड देऊन प्रखरपणे लढा चालविण्याची शपथ त्यांनी शिवरायांच्या साक्षीने सभेला उपस्थित हजारो शिवसैनिकांकडून घेतली.
दरम्यान, फेब्रुवारी १९६९मध्ये भारताचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार असल्याचे जाहीर झाले आणि शिवसेनेने त्यांची गाडी अडवून त्यांना निवेदन देण्याचे जाहीर केले. ७ फेब्रुवारी १९६९ रोजी मोरारजी देसाई यांची मोटार अफाट पोलीस बंदोबस्तात कोठेही न थांबता अक्षरशः भरधाव वेगाने माहीम येथे शांततेने निदर्शने करणार्या शिवसैनिकांना उडवून, जबर जखमी करून निघून गेली. शिवसेनेचे छायाचित्रकार अशोक करंबळेकर जबर जखमी झाले. बेशुद्धावस्थेत त्यांना टॅक्सीने ‘मार्मिक’ कचेरीवर नेण्यात आले. आणखी एक शिवसैनिक सत्यकांत पेणकर याच्या तर अंगावरून गाडी गेली आणि शिवाजी पार्क दादर भागात तुफान चकमकी होऊन रणकंदन माजले. पोलिसांनी पाशवी लाठीमार केला व अश्रुधूर सोडला. महापौरांच्या घराजवळील एका पोलीस चौकीला आग लावण्यात आली. सिटीलाईट सिनेमाजवळच्या तीन पोलीस चौक्या भस्मसात करण्यात आल्या. शिवसेनाप्रमुखांनी रात्री ‘नवाकाळ’ला सांगितले की, ‘‘आमचा पोलिसांनी संपूर्ण विश्वासघात केला आहे. मोरारजी देसाई ज्या गुर्मीत भरधाव मोटारी सोडून गेले ती गुर्मी अनपेक्षित आणि चीड आणणारी आहे. संयमाचा कडेलोट झाला. आता मुंबईसाठी जसा ऊग्र लढा दिला तसाच दिला जाईल आणि परिणामांची जबाबदारी आमची नाही. लढ्याची ठिणगी पडली आणि लवकरच आगडोंब उसळलेला पाहावयास मिळाला.
मोरारजींच्या उर्मट अरेरावी वृत्तीमुळे आणि पोलिसांच्या विश्वासघातामुळे शिवसैनिक भडकले. लालबाग, दादर येथे आंदोलन पेटले. अनेक बसेस जाळण्यात आल्या. जमाव बेभान झाला होता. पोलिसांनी गोळीबाराच्या अकरा फैरी झाडल्या. संपूर्ण वाहतूक बंद पडली. लाठीमार व अश्रुधुराचे सत्र चालूच राहिले. रात्री दहानंतरचे भयंकर दृश्य दिसत होते. चित्रा टॉकीजसमोर बसेस जळत होत्या. एकामागोमाग तीन बसेस जळाल्या.
डॉ. आंबेडकर मार्गावर व दादर भागात ट्युबलाईटस् सर्रासपणे फोडण्यात येत होत्या व पोलीस लाठीमार करीत पाठलाग करीत होते. रात्री ८.४५ वाजता शिवसेना नेते दत्ताजी साळवी व इतर शिवसैनिकांनी भोईवाडा मैदानाजवळ १४४ कलम मोडले व त्यांना अटक झाली. मनोहर कोकाटे, ज्ञानेश तांडेल, शाहीर पांडुरंग पवार हे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणा ते देत होते. शिवसेनेचे हे आंदोलन जवळजवळ चार दिवस चालू होते. सर्व मुंबईत तुफान दंगल झाली. गोळीबारात ७ ठार व ३५ जखमी झाले. वरळी ते माहीम तीन रात्री कर्फ्यू जारी करण्यात आला. माहीम रेल्वे स्टेशन जाळण्यात आले. सेंच्युरी बाजारच्या काचा फोडण्यात आल्या आणि दंगल हळूहळू गिरगाव व उपनगरातही पोहोचली. ठाण्यातही सत्याग्रह करण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी सैन्य सज्ज ठेवण्याचे आदेश सरकारने काढले आणि गोळीबारात ३० ठार, १५१ जखमी झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.
पुराणात कबंध राक्षसाची गोष्ट आहे. त्याला डोके नसते. फक्त धड आणि हात-पाय असतात. हात कितीही लांब होतात. समाजपुरुष हा तसा असतो. त्याला डोके नसते. परिस्थिती चिघळली की हातात येईल ते नष्ट करण्याकडे कल असतो. तशीच अवस्था त्याप्रसंगी झाली आणि परिस्थिती आवाक्याबाहेर गेली.
त्यावेळी बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये एक उत्कृष्ट व्यंगचित्र काढले. त्यात पक्षपाती महाजन कमिशनचा कर्नाटकधार्जिणा अहवाल सादर केल्यानंतर यशवंतराव चव्हाणांना पेशावाईतल्या राघोबादादाच्या रुपात पेश केले होते. हाताची घडी छातीवर ठेवून ते उभे आहेत तर सीमाभाग नारायणराव पेशव्यांच्या रुपात त्यांच्या पायाशी पडून जिवाची भीक घालण्यासाठी करुणा भाकत आहे. हातात महाजन कमिशनचा तलवारीसमान धारदार अहवाल घेऊन गारदी खून करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. जहांबाज आनंदीबाई म्हणजे दिल्लीतील मराठी लॉबी. ती म्हणते आहे, ‘पंतप्रधानपद मिळत असेल, तर मरु द्यात त्याला.’ या व्यंगचित्राचे शीर्षक होते, राघोबा नारायणराव जगणार की मरणार?’’
या सर्व घटनांवर मार्मिकमध्ये ‘थू तुमच्या जिंदगानीवर’ असा अग्रलेख लिहिला होता. ‘मार्मिक’च्या हातात घालून ‘नवाकाळ’ शिवसेनेच्या बाजूने म्हणजे सीमावासी मराठी बांधवाच्या बाजूने लिखाण करीत होता. एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व मराठी वृत्तपत्रे सीमा प्रश्नांच्या बाजूने उभी राहिली. पण त्यांनी हिंसक आंदोलनाला विरोध केला. या आंदोलनाच्या प्रतिक्रिया देशभर उमटल्या. लोकसभा व राज्यसभेत चर्चा झाली. कॉ. भूपेश गुप्ता यांनी शिवसेनेला फॅसिस्ट संघटना म्हटले आणि शिवसेनेला अमेरिकन पैसा मिळतो असा आरोप केला. तर लोहियावादी राज नारायण म्हणाले की शिवसेना हा लोकशाहीवरचा डाग आहे आणि देशाला कलंक आहे. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निवेदनात म्हटले की, शिवसेनेचा बंदोबस्त दडपशाही करून होणार नाही. जयप्रकाश नारायण यांनी शिवसेनेपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रघातकी आहे, असे उद्गार काढले. ‘टाईम मॅगझीन’ने बाळासाहेबांचा गौरव करत म्हटले की, ‘लोकक्षोभाच्या ज्वाळा विझवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न विफळ ठरले. परंतु बाळ ठाकरे यांनी कारागृहाच्या भिंतीआडून शांतता प्रस्थापनेचे आदेश दिल्यानंतरच मुंबई दंगलमुक्त आणि शांत झाली.’