पुण्यात जिथे एकही नळ दिसत नाही, तिथे नळस्टॉप हे नाव कसं काय पडलं असेल?
– मंदार पटवर्धन, भोकरदन
मिनरल वॉटर विकत घ्या, दिसत नाही ते शोधत बसू नका. पुणे तेथे फक्त नळ उणे असं समजा.
पवार साहेब, डिसेंबर महिना सुरू आहे. थंडी रोज वाढते आहे. या थंडीवर मात करून बंडी घालावी, अंडी खावी की ब्रँडी घ्यावी?
– सिद्धार्थ दांडेकर, फलटण
बरीच कोंडी झालीय तुमची. बायकोची माफी मागा, माहेरावरून बोलवा, कोंडी फुटेल.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एका उमेदवाराने मला बाटली दिली आहे आणि दुसर्याने बिर्याणी; आता मी कोणाला मत देऊ?
– मनवेल डिमेलो, पालघर
जो चाकणा देईल त्याला द्या… तीच खरी किंमत आहे आपल्या मताची. बिर्याणी आणि बिअर तर खूप महाग आहेत त्या पुढे.
संतोषराव, पवार या शब्दामध्येच वापर हा शब्द पण दडला आहे, याचे इंगित काय असावे?
– सुंदर काळे, बारामती
सुंदर आणि काळे??? ये क्या इंगित है सुंदर काळे साहेब?
टीव्हीवरचे कार्यक्रम पाहण्यापेक्षा फिश टँककडे पाहात बसलं तर अधिक मनोरंजन होतं, असा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव काय?
– सत्यरंजन वाटवे, वारजे, पुणे
सत्यरंजनजी, सत्य सांगा ना! घरातल्या रिमोटपुढे तुम्ही टीव्हीच्या रिमोटला हात लावू शकत नाही ना.
सिनेमात पोलीस गुन्हा घडून गेल्यानंतरच कसे काय पोहोचतात? त्यांना गुन्हा घडत असताना पोहोचायची परमिशन नाही काय?
– गोल्डी सावंत, रहिमतपूर
मग हिरो काय खलनायकाच्या डोक्यावरचे केस उपटणार?… आणि आपल्यासारखे प्रेक्षक टाळ्या कधी पिटणार?
माझी बायको स्वत: तासन्तास मोबाइलमध्ये डोकं घालून बसते आणि डोकं वर काढल्यावर मीच कसा दिवसभर मोबाइलमध्ये मग्न असतो म्हणून माझ्यावर डाफरते. आता यावर काय करायचं?
– राणा अत्तार, धनकवडी, पुणे
मुझको राणाजी माफ करना, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला द्या… (मोबाईलमधून काय, मी बायकोसमोर अशीही मान वर करू शकत नाही.)
शेवटी सत्याचाच विजय होतो, असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. असं खरंच होतं का हो सर?
– मनस्वी पांडे, अमरावती
मला काय नि तुम्हाला काय, या प्रश्नाचं उत्तर शेवटीच कळेल ना? (माझा आता कुठे मध्य आलाय… आणि तुम्ही काय वय सांगणार नाही.)
सगळे धर्म प्रेमाची शिकवण देतात, असं सगळ्याच धर्माचे पाईक सांगतात, तर मग सगळ्यात जास्त हिंसा धर्मावरूनच का होते जगात?
– पोपटराव साळवे, सोलापूर
कारण शिकवण कोणी आचरणात आणत नाही… शिकवणारे पोपटासारखे बोलतात आणि ऐकणार्यांचे पोपटराव होतात.
माझा डोळा फार दुखतोय म्हणून मी डेन्टिस्टकडे तो तपासून घ्यायला गेलो, तर त्याने मला हाडांच्या डॉक्टरकडे पाठवलं हो. हा काय चावटपणा आहे?
– श्रीरंग भावे, विले पार्ले
तुमच्या डोळ्यातील भावे (अनेक भाव) बघून तुमच्यातला हाडाचा चावटपणा डॉक्टरला कळला असणार!
रोज महाराष्ट्रातल्या एका तरी महापुरुषाचा अवमान केला जातो आणि तरी महाराष्ट्र पेटून उठत नाही. असं का होतं?
– वल्लभ मलकापुरे, मिरज
पेटून उठलाय की सोशल मीडियावर… त्यातून खरी पेटवापेटवी करायला कोणाला वेळ मिळत नाही (मलकापुरे… पुरे की पेटवापेटवी)!
आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी बजेटसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. निर्मलाक्कांना तुम्ही काय सूचना कराल?
– शालिनी पाटील, रंकाळा, कोल्हापूर
मी खूप सूचना करेन हो. पण अक्का मला कांदा-लसणाचीही किंमत देणार नाहीत.