‘धोंडी चंप्या : एक प्रेमकथा’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. म्युझिक लाँच सोहळ्याच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. भरत जाधव चार वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटातून पुनरागमन करत आहेत. या सिनेमाबद्दल ते म्हणाले, कलाकाराच्या आयुष्यात पॉजचे खूप महत्व असते. मला एकाच प्रकारच्या भूमिका सांगून येत होत्या. तोच तोच अभिनय करण्यापेक्षा मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाचा विषय वेगळा आहे. मी आणि वैभव एक रेडा आणि म्हैस यांच्यासाठी भांडतोय. मुद्दामहून घडवून आणलेल्या विनोदापेक्षा प्रसंगातून घडत जाणारा विनोद लोकांना जास्त भावतो. तोच निखळ विनोद आम्ही या सिनेमातून प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत.
अभिनेते वैभव मांगले म्हणाले, दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांच्यासोबत मी ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या मालिकेत काम केलं आहे. त्यांना ह्युमरची आणि पटकथेची चांगली जाण आहे. काही ठरावीक स्किट ते मला ‘हे तुझ्या जॉनरमध्ये हे चांगले होतील’ असं सांगून करायला द्यायचे. आणि नेमके तेच स्कीट हिट व्हायचे. त्याचं कास्टिंग परफेक्ट असतं. या सिनेमात माझा रेडा आणि भरतची म्हैस प्रेमात पडते. मग माझी मुलगी भारतच्या मुलाच्या प्रेमात पडते, यातून काय धमाल उडते ती या सिनेमातून पाहायला मिळेल.
संगीतकार अवधूत गुप्ते म्हणाले, मला म्युझिक डायरेक्टर म्हणून ज्ञानेश भालेकरने मला ‘गोलमाल’ सिनेमातून ब्रेक दिला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सौरभ-दुर्गेश हेही यशस्वी होतील याची मला खात्री आहे. या सिनेमातील गाण्यांत मी खूप हाय स्केलला गायलो आहे. सिनेमातील गाणी प्रेक्षणीय आणि श्रवणीय झाली आहेत.
वैशाली सामंत म्हणाल्या, माझ्या आयुष्यातील पाहिलं ‘ही गुलाबी हवा’ हे रोमँटिक गाणं मला ज्ञानेश यांनी दिलं. तोपर्यंत ‘ऐका दाजीबा’, ‘कोंबडी’ सुपरहिट झाल्याने त्याच धाटणीची गाणी माझ्याकडे येत होती. या सिनेमातील गीतलेखन खूप अर्थपूर्ण झालेलं आहे. मला ती गाताना खूप मजा आली.
दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ‘प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. काही भावना व्यक्त करत आहे. आमची म्युझिक टीम एकदम झक्कास असल्याने प्रत्येक गाण्याची खासियत आहे. उडत्या चालीचे, शांत, रोमँटिक असा सगळ्याच पद्धतीचा यात समावेश आहे. प्रेक्षकांनी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या गाण्यांनाही देतील.” हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या लघुकथेवर बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.