दुसर्या दिवशी सकाळी उठलो, तेव्हा सगळ्यांचा पुरेसा आराम झाला होता. त्यामुळं फ्रेश होऊन निघालो, तेव्हा सूर्यदर्शन झालेलं होतं. आपण स्वतःहून प्रवास करतो तेव्हा एक फायदा असतो. तुम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागात राहता येतं. शहरातली पाहायची बरीचशी स्थळं आमच्या हॉटेलपासून किलोमीटर, दीड किलोमीटर परिघात होती. परदेशात आणि हल्ली भारतातही हॉटेलच्या रिसेप्शनवर नकाशे आणि स्थळांची माहिती उपलब्ध असते. ती गोळा केली. आणि पायीच फिरायला निघालो. हॉटेलच्या जवळच एक शंभर चौरस फुटांचा छान बेटवजा बगीचा होता. मार्चमध्ये जगाच्या त्या भागात झाडांना थोडी थोडी पालवी फुटायला लागते. मग तो परिसर हिरवाकंच दिसायला लागतो. झाडांना अद्याप फुलं आलेली नव्हती. त्यामुळं रोज सकाळी कोण ती फुलं खुडून देवाला वाहतात किंवा कसं ते कळलं नाही.
हेलसिंकी शहर तसं खूप मोठं म्हणता येणार नाही. आपल्या शहरांसारखं चहूबाजूंनी अस्ताव्यस्त तर नक्कीच पसरलेलं नाही. त्यात आम्ही मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे मुंबईतल्या फोर्ट किंवा पुण्यातल्या लक्ष्मी रोड म्हणता येईल अशा भागात, राहायला होतो. आमच्या हॉटेलपासून जवळच सिनेट स्क्वेअर नावाचा चौक होता. एका बाजूला मोठं ल्यूथरां कॅथेड्रल किंवा शहरातलं महत्वाचं चर्च. जराशी दूर हेलसिंकी युनिव्हर्सिटीची इमारत आणि त्याच्याच शेजारी देशाच्या पंतप्रधानांचं कार्यालय. समोर भलामोठा चौक. हाच सिनेट स्क्वेअर. चौकामध्ये रशियाचा पूर्वीचा राजा झार याचा पुतळा. रशियाच्या राजाचा पुतळा या देशात मध्यवर्ती ठिकाणी कसा या प्रश्नाचं उत्तर पुढे हॉटेलमध्ये मिळालं. मुळात हे शहरच त्या राजाने वसवलं आहे, त्यामुळं शहरावर सेंट पिटर्सबर्ग या रशियन शहराची छाप आहे.
हॉटेलच्या बाहेर पडल्यावर आम्ही इतके कुडकुडलो की कुठल्याही मोकळ्या जागेत फार काळ उभं राहणं शक्य नव्हतं. पण फोटो तर काढायला हवे होते. इथेही एक प्रश्न आला. आम्ही सगळे थंडीपासून बचाव करायला अंगभर उबेच्या गोष्टी ल्यालेलो. मग आतले कपडे कसे दिसावे. त्यामुळं संपूर्ण ट्रिपभर काढलेले फोटो एकसारखे आले. जणू संपूर्ण ट्रिपभर एकाच कपड्यात वावरतोय!
आम्ही ‘सौमेलिना’चा समुद्री किल्ला बघायचं ठरवलं होतं. ही हेरिटेज साइट एका बेटावर आहे. सौमेंलिना बेटाच्या आसपास मुख्य भूप्रदेशावरदेखील काही प्रेक्षणीय स्थळं आहेत. लाल रंगाचं ‘उपेन्स्किना कॅथेड्रल’ आणि त्याच्या समोरच असलेला ‘झारीना’ म्हणजे रशियन राणीचा पुतळा. तो तिथं कसा हे आता वेगळं सांगायला नको.
प्रथम आम्ही आमचा मोर्चा सौमेंलिना बेटाकडे वळवला. ते बेट असल्यानं तिथं फेरीने जावं लागणार होतं. पण मधला संपूर्ण समुद्र तर गोठलेला दिसत होता. ह्या बर्फातून बोट जाणार कशी असं मनात आलं. बोटीवर चढायला मशीनवर कार्ड वापरुन तिकिटे काढायची होती. पण आमचं कार्ड काही केल्या स्वाईप होईना. समोरून येणार्या एका भारदस्त व्यक्तीला मदतीची विनंती केली. ‘हे माझं काम नाही’ असा नाराजीचा सूर लावत त्यांनी प्रयत्न केला. पण त्यालाही ते जमलं नाही. आमची ही तारांबळ होत असताना तिथं बोट सुटण्याची वेळ झाली होती. परदेशात वेळ अगदी काटेकोरपणे पाळतात. ती भारदस्त व्यक्तीच बोटीची कप्तान होती. मग त्या कप्तानानेच ‘चला आत शिरा’ म्हणत आम्हाला बोटीवर घेतलं.
बर्फाचं आच्छादन दूर सारत जाणारी बोट हा वेगळा अनुभव होता. पण वर्षाच्या त्या दिवसांत सौमेलिना बेट आणि किल्ला म्हणजे चक्क बर्फाचा ढिगारा होता. किल्ल्यात कोणीही नव्हतं. माहिती देणारे फलक मात्र होते. गंमत म्हणजे त्या बेटावरही एक छोटेखानी मॉल होता. त्या मॉलमधलं उबदार वातावरण चांगलंच सुखावह वाटत होतं. शिवाय तिथं गरम गरम कॉफी मिळत होती. ती पिऊन आणि सौमेलिना बघून म्हणजे तिथला बर्फ तुडवून परत बोटीवर आलो. आता ती भारदस्त व्यक्ती कुठं दिसत नव्हती, तिच्या जागी दुसरीच कोणी व्यक्ती होती. आम्ही त्यांना सांगितलं की येताना आम्ही तिकीट काढलं नाही, आता पैसे कुठे द्यायचे? तर ती व्यक्ती म्हणाली, ‘मशीन चाललं नाही, हा तुमचा दोष नाही, तुम्ही जाऊ शकता’. हेलसिंकीकरांनी आम्हाला दिलेला हा सुखद धक्का आणि भेट होती. आमचे चक्क ६५ युरो वाचले होते. पण त्याहीपेक्षा महत्वाची होती त्यांची विचार करण्याची पद्धती. त्यांनी मागितले नसते तरी आम्ही आपणहून त्यांना सहज पैसे दिले असते. त्यांना ते सहज खिशात घालता आले असते. आम्हाला जराही संशय आला नसता. त्यांच्या वागण्यानं हा प्रसंग मनावर कोरला गेला हे मात्र नक्की.
सौमेलिना बेट पाहून परत येताना पाऊस लागला. पावसात तिथली थंडी कमालीची वाढते. प्रत्यक्षात हा सगळा भाग म्हणजे बाजाराची जागा. पण आपल्या बाजाराची सर त्याला कधीच येणार नाही. कारण आपल्याकडची गर्दी, लगबग तिथं कुठंही शोधून सापडायची नाही. रस्त्यावर तुरळक माणसं असताना त्याला ‘बाजार’ कसं म्हणायचं हा प्रश्न आम्हाला पडला यात नवल नव्हतं.
पाऊस पडत असतानाच्या थंडीत कुडकुडण्याचा विलक्षण अनुभव घेतल्यावर आम्ही दगडात बांधलेलं चर्च- चर्च इन द स्टोन- पाहायचं ठरवलं. आम्ही असलेल्या जागेपासून हे दूर असल्यानं ट्रामने जावं लागणार होतं. ट्राम नंबर, ट्राम स्टॉप नीट बघून तिथे उभे राहिलो. तिथे सगळे प्रवासी आत शिरल्याशिवाय ट्राम सुरु होणार नाही हे माहित असूनही तेरा जण असल्यामुळे ट्रामच्या दोन दारातून विभागून आत शिरायचं ठरलं, दारं बंद झाल्यावर सगळे ट्राममधे आहेत ना याचीही खात्री करुन घेतली. आम्ही सगळे वयानं ५०-६०च्या पुढचे तरी नवीन देशात फिरताना गोंधळलेलेच होतो. ट्राममधे सगळे स्थानापन्न झाल्यावर आमच्यापैकी एकजण तिकिटं घ्यायला ड्रायव्हर कम कंडक्टरकडे गेला. त्याने सांगितलं, ‘ट्राममध्ये तिकिट मिळत नाही, ट्राममध्ये चढण्याआधी तिकीट काऊंटरवर तिकीट घ्यावं लागतं.’ हे संभाषण होतंय तोपर्यंत पुढचा स्टॉप आला. त्याने आम्हाला तिथे उतरुन तिकीटं घ्यायला सांगितलं. आम्ही गुपचूप उतरलो. तिकीट काऊंटर शोधला तर तो ट्राम स्टॉपच्या जवळपास कुठंच दिसत नव्हता. चौकशीत कळलं की इथं तिकीट बस स्टॉपवर किंवा बसमध्ये मिळत नाही, तर विशिष्ट किऑस्कवर मिळतं. तुम्ही किती वेळ प्रवास करणार याप्रमाणे तिकिटाचे दर असतात. आमच्यापासून सर्वात जवळचा किऑस्क थोडा- म्हणजे अर्धा पाऊण मैल- लांब होता. नुसती तिकिटं घेण्यात पाऊण तास वाया गेला होता. तिकिटं घ्यायला जाणारी मंडळी चांगलीच दमली ही गोष्ट वेगळी!
त्यानंतर आम्ही पुन्हा ट्राममध्ये बसून चर्च पाहायला गेलो. चर्च नक्कीच वेगळं होतं. एक भलामोठा दगड कोरून बनवलेलं होतं. तांब्याचं छप्पर देखील दिसत होतं. या चर्चमध्ये ध्वनिव्यवस्था खूप चांगली आहे, त्यामुळं संगीताचे रीतसर कार्यक्रम होतात. पण आत शिरायला पैसे लागतात. एकतर तिथं खूप वेळ काढला असता तर आमच्या ट्राम तिकिटाची वेळ संपली असती. पुन्हा नवीन तिकीट काढावं लागलं असतं. शिवाय काचेच्या दरवाजातून आतलं सगळं मस्त दिसत होतंच. जे असंच दिसतंय ते पैसे देऊन पाहायचं आणि आपला वेळ वाया घालवायचा, यासाठी सगळ्यांनी कां कूं केलं. शेवटी आम्ही चर्चच्या आत न जाता बाहेरून परत फिरलो. थंडी इतकी होती की आता कोणालाही आणखी कुडकुडायची इच्छा नव्हती. ट्रामचे मार्ग बहुदा गोलाकार असतात. ज्या ठिकाणाहून निघतात तिथेच परत येतात. दुसरी ट्राम उलट्या दिशेची असते. ती बरोब्बर त्याच मार्गावर पण विरुद्ध दिशेनं धावत असते. बाहेरच्या थंडीत कुडकुडण्यापेक्षा ट्रामची ऊब बरी हा सुज्ञ विचार सगळ्यांना पटला. म्हणून गुमान उलट्या दिशेच्या ट्राममध्ये बसलो आणि रशियाचा छाप असलेल्या संपूर्ण हेलसिंकी शहराची धावती भेट घेतली.
वेळेअभावी काही ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊ शकलो नाही. पण या शहराची काही वैशिष्ट्यं वाचली होती. इथं स्पा करण्याची परंपरा आहे. शहरात अनेक ठिकाणी तशी सोय आहे. काही स्पा दीडशे दोनशे वर्षं जुनी आहेत. गरम पाण्याच्या स्पामध्ये शरीर शेकून घेतल्यावर काही मंडळी एकदम बर्फासारख्या थंड पाण्यात स्वतःला डुम्बवून घेतात. पाणी खूपच थंड असल्यानं तुमच्या आमच्यासारख्यांना गारठून जाण्याचा धोका असतो. साधारणतः १० युरोमध्ये उत्तम स्पा करून घेता येतो.
याशिवाय काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. त्यात कांपी चॅपल हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणता येईल. रस्त्यात उभे राहून सुसूची तुरतुरी सोडणार्या लहान बाळाचे जगप्रसिद्ध शिल्प असलेल्या बॅड बॅड बॉयसारख्या काही वेगळ्या गोष्टी चुकल्या, त्याचं तितकंसं वाईट वाटलं नाही. पण एक जागा न पाहिल्याची चुटपुट लागून राहिली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जवळच सेरुआसारी नावाचं एक बेट आहे. ते एकप्रकारचं खुल्या हवेतलं वस्तुसंग्रहालय किंवा म्युझियम म्हणता येईल. पण थंडीत तिथं जाणार्या बोटी बंद असतात. साहजिकच ते आमच्या प्रवासाचा भाग होऊ शकलं नव्हतं. तिथं जुन्या फिनलँडची आठवण करून देणार्या वास्तू उत्तमरीत्या जपून ठेवल्या आहेत. अशीच एक उन्हाळ्यात करायची गोष्ट म्हणजे १०० वर्षं जुन्या ट्राममधला प्रवास. तोही राहून गेला.
आणखी एक वेगळी गोष्ट वाचनात आलीय. इथल्या सरकारनं दुकानं उघडी ठेवण्याची वेळ नेमून दिलेली नाही. जे ते दुकानदार आपल्या मर्जीप्रमाणं हवं तितका वेळ दुकान उघडं ठेऊ शकतात. त्यामुळं दुकानांची वेळ पाहूनच जावं लागतं. उन्हाळ्यात दुकानं जास्त काळ उघडी असतात. तरीही बहुतांश दुकानं सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत उघडी मिळतात. मध्यवर्ती रेल्वे स्टेशनच्या आसपास १० वाजेपर्यंत व्यवसाय चालतो. त्यानंतर साधी कॉफी मिळणंही कठीण होतं. हे शहर लिट्टाला नावाच्या काचसामानासाठी प्रसिद्ध आहे. ते आपल्या खरेदीच्या यादीत समाविष्ट हवं.