आपण लोकांना नावं ठेवतो. विशेषणे लावतो. लोक ही आपल्याला नावं ठेवतात. विशेषणे लावतात. इतरांना नाव ठेवायला आपल्याला काही वाटत नाही. पण आपल्याला कुणी काही नकारात्मक नाव ठेवलं तर मात्र आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो.
एरव्ही आपण अगदी सहज म्हणतो, तो अमुक तर मूर्ख आहे. तमुक बावळट आहे. तो तर दुष्ट आहे. ती खूप कजाग आहे. हा भांडखोर आहे. तो चिडखोर आहे… घमेंडखोर, मतलबी, स्वार्थी, कंजूष, येडछाप, आळशी, धांदरट, वेंधळा, बावळट, चोर, हरामखोर अशी अनेक विशेषणे आपण लोकांना लावत असतो. त्यांच्या वागण्यावरून आपण त्यांना ही विशेषणे, ही लेबले, ही स्टिकर्स लावतो.
नाही म्हटलं तरी आपल्या सार्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात आजूबाजूच्या माणसांबद्दल मत व्यक्त करण्याची सवय असते.खोड असते. खरं तर लेबले किंवा स्टिकर वस्तूंवर चिकटवलेली असतात. पण माणूस वस्तू नाही. त्याला असे लेबल लावणे योग्य आहे का? त्याच्या आजच्या वागण्यावरून त्याला कायमस्वरुपी असे काही ठरवून टाकता येईल काय? माणूस बदलू शकत नाही काय? त्याचे वागणे बदलू शकत नाही काय?
आपण सगळ्यांनी असे अनुभवले आहे की ज्याला आपण बावळट म्हणत होतो तो पुढे स्मार्ट झाला. जिला अक्कलशून्य ठरवलं तिने आपण बुद्धिमान आहोत हे सिद्ध केलं. एखादी रागीट व्यक्ती पुढे शांत होत गेली. एखादा स्वार्थी व्यक्ती पुढे परोपकारी झाला. एखादी कंजूष व्यक्ती पुढे दिलदारपणे वागू लागली. चोर्यामार्या करणारा, बदमाशी करणारा व्यक्ती पुढे सज्जन झाला. आपणच मग लोकांना सांगतो, अरे आता तो खूप बदलला आहे. आता ती पूर्वीची राहिली नाही…
माणूस बदलू शकतो. सुधारू शकतो किंवा बिघडूही शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्याने एकदा चोरी केली म्हणून तो आयुष्यभर चोरीच करणार आहे असे नाही. आपण त्याला चोर चोर म्हणत राहिलो तर तो सुधारेल की बिघडेल? आपण एखाद्याला तू मूर्ख आहेस. तुला अक्कल नाही असं म्हणत राहिलो तर त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला ते पोषक ठरेल की मारक ठरेल?
आपण लोकांच्या वागण्यावरून त्यांना लेबल लावतो, तसेच आपण त्यांच्या बाह्यरूपावरून अर्थात दिसण्यावरून ही नावं ठेवत असतो. लेबल लावत असतो. काळ्या, जाड्या, फावड्या, टकल्या किंवा इतरही अनेक काहीबाही म्हणत असतो.
आपण इतरांना वागण्या-दिसण्यावरून लेबल लावतो, पण आपल्याला कुणी काही नाव ठेवले, लेबल लावले तर आपल्याला कसं वाटेल याचा मात्र आपण विचार करत नाही. असे चिडवण्याचे उद्योग आपण शाळा कॉलेजच्या दिवसात केले असण्याची शक्यता आहे. कदाचित आपणच अशा चिडवणार्या मित्रांचे अनेकदा शिकार झालो असंही असू शकेल.
कधी कधी हे चिडवणं, लेबल लावणं एखाद्याला खूप क्लेशदायक ठरू शकतं. आपल्याकडून कधी असं झालंय का की ज्या मित्रांना आपण चिडवायचो, लेबल लावायचो त्यांना खूप मानसिक त्रास व्हायचा? त्यांना दुःख व्हायचं अन् आपल्याला मात्र मजा यायची? दुसर्याला दुःख होतं आहे आणि आपण ते एन्जॉय करतोय हा प्रकार कितपत योग्य आहे याचा आपण विचार करायला हवा. दोस्ती में थोडा बहुत मजाक चलता है, हे बरोबर आहे. पण थोडा चल सकता है, बहुत नही. आपण करतोय तो मजाक थोडा आहे की बहुत आहे, हे आपण तपासून पाहिले पाहिजे. आपल्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाचा मानसिक छळ होणे आणि आपण त्यात आनंदी होत राहणे, हे निरोगी मनाचे लक्षण नक्कीच नाही.
आपल्याला कोणी काही चिडवत असेल तर ते चिडवणं थांबवण्याचा एक प्रभावी मार्ग हा आहे की आपण चिडायचं नाही. कारण ज्याला चिडवलं जातं, तो चिडला तरच चिडवणार्याला मजा येते. तो चिडवतोय आणि आपण चिडलोच नाही तर तो कसा अन् किती चिडवणार? त्याला फार चिडवताच येणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला कुणीही कसंही वागवत राहावं. चिडवत राहावं, काही बोलावं आणि ते आपण सहन करत राहावं.
अर्थात चिडवण्या चिडवण्यामध्येही फरक आहे. एखाद्या मुलीचं लग्न जमल्यावर धाकटा भाऊ तिला चिडवतो अन् ती लटके रागावते. एखाद्या तरुणाला त्याचे मित्र एखाद्या मुलीवरून चिडवतात, तेव्हा तो सुखावतो. हे झालं गोड चिडवणं. अशा चिडवण्याला कुणाची हरकत नसते. असो.
आपण इतरांना फक्त वाईट, नकारात्मकच विशेषणे लावतो, नकारात्मक लेबल लावतो असं नाही. काही लोकांना आपण चांगली लेबलेही लावतो. अनेक मित्र, स्नेही यांचं वर्णन हुशार, प्रेमळ, विद्वान, प्रामाणिक, समंजस, नम्र, दानशूर, सेवाभावी, संवेदनशील, दयाळू, विचारी, विवेकी असे करत असतो. आपल्याला त्यांचा तसा अनुभव आलेला असतो. आपण त्यांच्याबद्दल तसं ऐकलेलंही असू शकतं. पण कधीकधी पुढे असं लक्षात येतं की आपण समजतो तसा तो नाही. आपण त्याला/ तिला चांगला समजत होतो, पण त्याचं खरं रूप वेगळं आहे किंवा ती व्यक्ती आता बदलली आहे.म्हणजे चागलं वागणारी व्यक्ती पुढे वाईट वागू शकते. शहाणी सुरती वाटणारी व्यक्ती मूर्खपणा करू शकते.
लोक जेव्हा वागण्या-बोलण्यावरून आपल्याला बरीवाईट लेबले लावतात, तेव्हा आपण ती लेबले चिकटवून घ्यावीत का? लोकांच्या आपल्याबद्दलच्या मताला किती महत्व द्यावं? कुणी आपल्याला मूर्ख म्हणालं, म्हणून आपण मूर्ख ठरतो का? कुणी आपल्याला विद्वान म्हणालं, म्हणून आपण विद्वान ठरतो का? लोकांचं मत आपण स्वतःवर चिकटवून का घ्यावं? ते प्रमाणपत्रासारखं का स्वीकारावं? ती व्यक्ती म्हणते आहे त्याप्रमाणे आपण वागतो आहोत का? त्या व्यक्तीच्या म्हणण्यात काही तथ्य, काही सत्य आहे का? याचा मात्र आपण विचार करायला हवा. इतरांच्या मताला किंमत द्यायची नाही असं नाही. ते फीडबॅक म्हणून घ्यायला हवं. स्वतःचं मूल्यमापन जरूर करावं आणि जे दोष सापडतील ते सुधारावे.
थोर मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस म्हणतात, लोक आपल्याला नाव ठेवतात, तेव्हा ते जे काही म्हणतात ते सर्व आपण स्पंजप्रमाणे शोषून घेतो. ते आपल्याला जे समजतात, ते आपण स्वत:ला समजू लागतो. स्पंज ही निर्जीव वस्तू आहे. स्पंज विचार करू शकत नाही. पण आपल्याकडे बुद्धी आहे, विचार करण्याची क्षमता आहे. विचार न करता त्यांच्या म्हणण्याशी सहमत झालो, तर आपण आपलं मोठं नुकसान करून घेतो. स्पंज बनू नका हा एलिस यांचा अत्यंत महत्वाचा सल्ला आपण लक्षात ठेवला पाहिजे.
आपल्याला व्यक्ती आणि वर्तन या दोन गोष्टी वेगळ्या करता यायला पाहिजेत. एखादा माणूस दुष्ट नसतो, त्याने दुष्टपणा केलेला असतो. ते त्याने त्यावेळी केलेलं वर्तन आहे. त्याचं वागणं दुष्टपणाचं आहे. तो दुष्ट नाही.
जे इतरांच्या बाबतीत करायचे ते आपल्याही बाबतीत करायचं. आपल्याकडून काही बरंवाईट वागणं झालं, तर ते आपल्या हातून तेव्हा घडलेलं वर्तन आहे. ते वर्तन म्हणजे आपण नाही, हे लक्षात घ्यावं. खलिल जिब्रान यांनी म्हटले आहे, आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीवरून स्वतःबद्दल मत ठरवणं म्हणजे समुद्राची शक्ती त्याच्या लाटेवर उसळणार्या फेसावरून ठरवण्यासारखं आहे.