एकदा मोदीजी हेलिकॉप्टरने दौर्याला जात होते, खालून आवाज कशाचा येतोय म्हणून बघितलं तर आडव्या रस्त्याने एक अॅम्ब्युलन्स येताना दिसली. मोदीजींनी तात्काळ हेलिकॉप्टर बाजूला घ्यायला सांगून अॅम्ब्युलन्सला रस्ता दिला होता. जनतेला बर्याच गोष्टी माहित नसतात. – कपिल पाटील (फेसबुक)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान कमी आणि गुजरातचे सुपर मुख्यमंत्री अधिक आहेत. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे प्रकल्प पळव, त्यासाठी इथले सरकार पाड, असे अनेक उपक्रम त्यांच्या आशीर्वादाने सुरू असतात. सगळीकडून गुजरातमध्ये गुंतवणूक आली पाहिजे, सगळे प्रकल्प तिथेच आले पाहिजेत, किमान तसा देखावा तरी उभा राहिला पाहिजे, यासाठी त्यांचे हृदय तळमळत असते. यावेळी त्यांचे प्रखर राष्ट्रीयत्व गुजराती बाण्यापुढे का शरणागती पत्करते कोण जाणे! कदाचित गुजरातचा इव्हेंटबाजीचे स्टिरॉइड देऊन फुगवलेला पोपट मेला, तर पुढचा सगळा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, अशी भीतीही त्यांना वाटत असेल.
त्याबरोबरच मोदीजी भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ प्रमुख प्रचारकही आहेत. एखादा हिरा जसा कोंदणात शोभून दिसतो, तसे मोदी प्रचारात शोभून दिसतात. ते तसेही अहोरात्र प्रचारमग्नच असतात. जेव्हा पक्षाचा प्रचार नसतो, तेव्हा स्वत:चा प्रचार सुरू असतो. आपण, पक्ष आणि देश हे सगळे एकच करून टाकले आहे त्यांनी. हिटलर आणि गोबेल्स आजच्या युगात जन्माला आले असते, तर गुरू म्हणून दोघांनी दोन बाजूला बसून मोदींचे पाय चेपले असते आणि प्रचाराचे तंत्र शिकून घेतले असते. जिथल्या लस प्रमाणपत्रावर ज्याने लस घेतली त्याचा फोटोच नाही, त्याजागी पंतप्रधानांचा फोटो आहे, असा भारत हा जगातला एकमेव देश आहे. महामार्गावरील बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर निर्मनुष्य रस्त्याला हात दाखवून अभिवादन करणारेही मोदीजी हे एकमेव पंतप्रधान असतील जगातले. त्यांच्या गाडीचे हेडलाईट एकवेळ चालू नसतील, पण गाडीतला त्यांच्यावरचा दिवा मात्र सतत चालू असतो.
त्यांना प्रचाराच्या नाना युक्त्या सतत सुचत असतात. ते पंतप्रधानांच्या निवासस्थानात पुस्तकवाचनाचे फोटोसेशन करताना पुस्तक बिनधास्तपणे पालथे ठेवू शकतात हिरवळीवर. मोरांना दाणे भरवताना वेगळा वेश, नंतर डेस्कपाशी काही काम करताना वेगळा वेश, मग बाहेर पडल्यावर वेगळा वेश असा सतत फिरता रंगमंच ते असा काही गरागरा फिरवत ठेवतात की जनतेला भोवंडायला होते. गेल्या काही महिन्यांत आठवड्यात हिमाचल आणि गुजरातच्या जनतेने हा भोवंडून जाण्याचा अनुभव घेतला. भाजपचे झाडून सगळे वरिष्ठ नेते इथे प्रचारात लोटले होते. मोदीजींनी झंझावाती रोड शो पण केले. पण, तरीही मोदीजींना प्रचारात काही कमतरता जाणवत होती. आपण विकासपुरुष, लोहपुरुष, विश्वगुरू, जगातले सर्वश्रेष्ठ नेते आहोत, यावर आपल्याप्रमाणेच आपल्या भक्तगणांचाही प्रगाढ विश्वास बसलेला आहेच; पण, याने व्यक्तिमत्त्वाला पूर्णता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आले असावे. नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाला माणुसकीचीही झालर असायला हवी, असे त्यांच्या मनाने घेतले असावे. अर्थव्यवस्थेचे वाटोळे करणारी नोटबंदी लागू केल्यानंतर सर्वसामान्य जनता कशी त्रासली आहे, लोकांचे लग्नसमारंभ कसे अडकलेले आहेत, यावर अनिवासी भारतीयांसमोर आपण क्रूर विनोद केले, शेतकरी आंदोलनात आपण शेतकर्यांना देशाचे शत्रू असल्यासारखे वागवले, त्यांना भेटून त्यांचे अश्रू पुसले नाहीत, तेव्हाही माणुसकीच्या प्रदर्शनाची संधी गेली. आता ती साधायला हवी, असे त्यांच्या मनात आले की काय न कळे!
कारण या वेळच्या प्रचारात मोदीजींनी एक नवा स्टार प्रचारक उतरवला, अॅम्ब्युलन्स!
पंतप्रधानांचा ताफा आणि एसपीजीची सुरक्षा किती कडेकोट असते, याची कल्पना असलेल्या कोणालाही हे माहिती असेल की या ताफ्यात कोणतेही बाहेरचे वाहन शिरकाव करू शकत नाही. मोदींच्या कार्यकाळात तर ही भयाकुलता इतकी अधिक आहे की गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांनाही न घेता मोदींचा ताफा पुढे निघून गेल्याचे केविलवाणे दृश्य लोकांना पाहायला मिळाले. पंजाबमध्ये एका पुलाच्या टोकाला शेतकर्यांनी अहिंसक आंदोलन करून मोदींचा ताफा रोखला तेव्हा २० मिनिटे ते गाडीत बसले होते आणि ‘नशिबाने जीव वाचला’ अशी टिप्पणी त्यांनी दिल्लीला पोहोचल्यावर केली होती. असे असताना गुजरातमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यात चक्क एक अॅम्ब्युलन्स शिरली आणि मोदींनी चक्क त्या अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली, असे हृदयंगम दृश्य देशाने पाहिले आणि पंतप्रधानांची माणुसकी पाहून देश सद्गतित झाला. भक्तगणांचे डोळे बाष्पगदगदित झाले. पण काही दिवसांनी पुन्हा पुढे हिमाचलमध्येही तोच प्रकार. पुन्हा पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये त्याच प्रकारे अॅम्ब्युलन्स आली, पुन्हा तिला तशीच वाट करून दिली गेली. पुन्हा त्याचा गाजावाजा झाला. ही अॅम्ब्युलन्स या ताफ्यात घुसण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी चार मिनिटे थांबलेली होती, नंतर ती नियोजनपूर्वक आत आणली गेली, हे सगळे नाटक होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यात तथ्य असो वा नसो पंतप्रधानांच्या ताफ्यात लागोपाठ दोन वेळा अॅम्ब्युलन्स शिरणे हा सुरक्षेचा भंग आहे आणि तो त्यातून दहशतवादी हल्लाही होऊ शकतो. मग दाेन वेळा अॅम्ब्युलन्स आली कशी? मोदींनी तिला वाट दिली कशी?
मोदींनी सिनेमांच्या पटकथा लेखनात हात घातला नाही, हे सलीम जावेद, कादर खान प्रभृतींचे सुदैव! इतक्या प्रभावी फिल्मी कल्पना त्यांना सिनेमात हयात घालवूनही सुचल्या नसत्या.