शिवसेना स्थापन होऊन जेमतेम एक वर्ष झाले होते. शिवसेनेच्या स्थापनेमुळे मराठी समाजात जागृती झाल्याचे चित्र मुंबईत दिसत होते. ‘मार्मिक’मधून ही जागृती होत होती. प्रबोधनकारांबरोबरच थोर विचारवंत धोंडो विठ्ठल देशपांडे हेही मार्मिकमध्ये लिखाण करीत. ‘मार्मिक’ मधून प्रबोधनकारांनी ‘घाव घाली निशाणी’ यासारखे लेख लिहून शिवसेनेचा प्रचार केला. त्याकाळी प्रा. स. अ. रानडे, अॅड. बळवंत मंत्री यांच्यासारखे सहकारी बाळासाहेबांबरोबर असत. या सर्वांबरोबर बाळासाहेब चर्चा करायचे. मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, सुधीर जोशी अशा नेत्यांची फौज उभी राहत होती. प्रबोधनकारांच्या लिखाणाने मराठी माणूस चेतावला गेला. प्रबोधनकारांचा ‘ठाकरे शैली’तील समाचार लोकांना आवडू लागला. त्याचवेळी आचार्य अत्रे यांनी शिवसेनेला बदनाम करण्यासाठी ‘मराठा’ या वृत्तपत्राद्वारे खोट्या बातम्या पसरवल्या. तेव्हा ‘मराठा’वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. अत्रे आणि ठाकरे यांची ‘मराठा’ विरूद्ध ‘मार्मिक’ अशी लढाई सुरू झाली. बाळासाहेब हे अत्रे यांचे ‘वरळीचे डुक्कर’ म्हणून व्यंगचित्र काढीत. आचार्य अत्रे यांनी मराठातून शिवसेनेला ‘काँगे्रसचे भाडोत्री गुंड’ आणि ‘शिवसेना नव्हे तर गुंडसेना’ म्हणून हिणवले. कै. श्रीपाद अमृत डांगे यांनी ‘शिवसेनेचे विषारी रोपटे मुळातूनच उपटून टाका’ असे आवाहन केले. तर बाळासाहेब देसाई म्हणाले की, ‘शिवसेना ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक लावित आहे.’ विरोधक अशाप्रकारे शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत होते. पण दुसरीकडे मराठी तरुणांची एकजूट शिवसेनेच्या झेंड्याखाली होत होती. त्यामुळे विरोधकांत असूया निर्माण झाली. ती एकजूट टिकू नये म्हणून सर्व विरोधक प्रयत्न करीत असताना शिवसेनेची नेते मंडळी मराठी तरुणांची लढवय्यी फौज उभारण्यासाठी कार्यरत होती.
या काळात मुंबईत अस्वस्थ आणि असंतुष्ट तरुणांचे जथ्थे जागोजागी उत्स्फूर्तपणे उभे राहिले होते. ही सर्व बेरोजगार मंडळी होती. परप्रांतीयांच्या वर्चस्वामुळे रोजगारापासून वंचित होती. त्यांच्या समित्या, सांस्कृतिक व क्रीडा मंडळे आणि व्यायमशाळा यातून एक शक्ती उभी राहिलेली सेनेने बघितली होती. त्याचा उपयोग शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेत्यांनी नव महाराष्ट्र उभारण्यासाठी करण्याचे ठरवले. त्यांचे प्रश्न निवेदनाद्वारे शासन दरबारी मांडण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुखांनी घेतला आणि त्यासाठी मोर्चाची तयारी सुरू झाली.
आणि मग शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी पहिला प्रचंड मोर्चा २१ जुलै १९६७ रोजी महाराष्ट्र विधानसभेवर काढला. या विराट मोर्चाचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यांच्या समवेत पत्रकार चं. वि. बावडेकर (आलमगीर) व सर्वश्री मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी हे होते. एकूण २५ मागण्या असलेले निवेदन शिवसेनाप्रमुखांनी सरकारला सादर केले. पश्चिम रेल्वेच्या मराठीत नसलेल्या पाट्यांना १५ ऑगस्ट १९६७ रोजी डांबर फासण्याचा कार्यक्रम मी स्वतः हातात घेणार आहे व त्याचवेळी इतर कार्यक्रम पार पाडले जातील असे बाळासाहेबांनी मोर्चापुढे भाषण करताना सांगितले. बरोबर ३.२० वाजता आझाद मैदानावर नारळ फोडून मोर्चास सुरूवात करण्यात आली. एक तासाने मोर्चा काळा घोड्याजवळ पोहोचला व त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. मोर्चाचे एक टोक काळ्या घोड्याजवळ तर दुसरे बोरीबंदरला होते. ‘न भूतो न भविष्यति’ असा मोर्चा मुंबईकरांनी पाहिला.
या मोर्च्यात सरकारकडे सादर केलेल्या केलेल्या २५ मागण्यांपैकी काही मुख्य मागण्या अशा होत्या…
– राज्यातल्या सर्व एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये इच्छुकांची नोंदणी कार्डे असतात. त्यावर प्रत्येक जण महाराष्ट्रात किती वर्षे स्थायिक आहे, त्याचे शिक्षण (प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत) कोठे झाले, त्याच्या आईवडिलांचे कायमचे निवासस्थान कोणते, त्याची मातृभाषा कोणती, मराठी भाषा त्याला बोलता, लिहिता, वाचता येते की नाही या गोष्टींची स्पष्ट नोंद व्हावी. तेथील अधिकारी वर्ग मराठीच असला पाहिजे.
– कोकण आणि उत्तर महाराष्ट्र यांच्याकरता स्वतंत्र विद्यापीठे त्वरेने निर्माण करण्यात यावीत.
– इतर राज्यांप्रमाणे या राज्यातही सर्व ठिकाणी ८० टक्के नोकर्या मराठी माणसांसाठी राखून ठेवल्या पाहिजेत, असे धोरण जाहीर करून त्याच्या अमंलबजावणीकडे सतत कटाक्षाने लक्ष द्यावे.
– मराठी माणसाच्या सहकारी हाऊसिंग सोसायट्यांसाठी कर्जे आणि जागा देण्यात सरकारने उदार धोरण ठेवावे. टाऊन प्लॅनिंग स्कीम अमलात आणताना बेघर होणार्या मराठी कुटुंबांच्या पर्यायी वस्तीची सोय लागल्याशिवाय त्यांना बेघर करू नये.
– केरळ, मद्रास, म्हैसूर, बंगाल, आंध्र इत्यादी राज्यांनी स्थानकांच्या नावाच्या पाट्या, बस स्टॉपवरील पाट्या, कचेर्या, सिनेमागृहे, फार काय पण त्यांच्या हद्दीतील मैलांचे दगडही आपापल्या भाषेत रंगवले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही सर्व ठिकाणच्या पाट्या मराठी भाषेत रंगविण्याची संबंधितांना ताकीद द्यावी.
– मराठी चित्रपटासाठी चित्रपटगृहे तात्काळ उपलब्ध करावीत आणि मराठी चित्रनिर्मितीसाठी स्टुडिओ योजना ताबडतोब हाती घ्यावी.
– मराठी भाषा उत्तम लिहिता बोलता येत असणार्यांनाच सरकारी-निमसरकारी कचेर्यांत आणि इतरत्र नोकरीस ठेवावे. हा नियम विशेषतः इस्पितळातले डॉक्टर्स, नर्सेस यांना लागू करावा.
– प्रत्येक सरकारी, बिनसरकारी अथवा शिक्षण संस्थेच्या समारंभाचा आरंभ ‘महाराष्ट्र गीताने’ व्हावा.
– जिल्हा परिषदा, महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस कार्यालय, महाराष्ट्र वीज मंडळ, गृहनिर्माण मंडळ, शेतकी व शेती संबंधित खाती इत्यादी क्षेत्रांत सर्व ठिकाणच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांना मराठी बोलता, लिहिता आणि वाचता आलेच पाहिजे असा कटाक्ष त्यांच्या नेमणुका करतेवेळी ठेवावा.
– महाराष्ट्र राज्यात जनतेचा नेहमी संबंध येणारा जो जो कारभार भारत सरकारच्या कचेर्यांकडून होत असेल, त्या सर्व कारभारात मराठीचा वापर झालाच पाहिजे असा आग्रह केंद्र सरकारकडे धरावा. उदा. रेल्वे, पोस्ट, तार, टेलिफोन, विमा
कॉर्पोरेशन, केंद्रीय प्रकल्प इत्यादी.
– मराठवाड्यासाठी एक, उत्तर महाराष्ट्रासाठी एक व दक्षिण महाराष्ट्रासाठी एक अशी आकाशवाणीची तीन नवीन केंद्रे प्रस्थापित करण्याविषयी केंद्र सरकारकडे तातडीची मागणी करावी व तिचा सतत पाठपुरावा करीत राहावे. तसेच पुणे, नागपूर आणि गोवा येथील आकाशवाणी केंद्रांची प्रक्षेपणशक्ती वाढविण्याचा आग्रह धरावा.
– कोकण विभागाच्या भरभराटीकरिता एक कांडलासारखे मोठे बंदर आणि महत्वाच्या शहरांना जोडणारे रेल्वेमार्ग यांची तरतूद पुढील पंचवार्षिक योजनेत त्वरित करून द्यावी.
शिवसेनेच्या या पहिल्या विराट मोर्चाचे पडसाद विधानसभेत उमटले. चर्चा झाली. शेकापचे आमदार केशवराव धोंडगे यांनी मोर्चा आणि मोर्चातील निवेदनाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा शिवसेनेने दिलेल्या काही निवेदनांचा विचार शासन करणार आहे असे शासनाने उत्तर दिले. शिवसेनेच्या पहिल्या मोर्च्याची दखल शासनाला घ्यावी लागली.
शिवसेनेच्या स्थापनेपासून इंग्रजी वृत्तपत्रे सातत्याने शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकत होती. शिवसेनेच्या जातीय भूमिकेमुळे देशाच्या एकात्मतेला तडा जात आहे, तेव्हा शिवसेनेवर कारवाई व्हावी असा सल्ला देण्यात डाव्या विचारसरणीचे ‘ब्लिट्झ’ आणि भांडवलदारांचे वर्चस्व असलेले ‘इंडियन एक्स्प्रेस’ आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली लगेच मोर्चा काढून ‘ब्लिट्झ व इंडियन एक्स्प्रेस’च्या अंकांची होळी करण्यात आली. त्यानंतर मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने अनेक मोर्चे काढले.
शिवसेनेच्या पहिल्या विराट ऐतिहासिक मोर्चाने शिवसेनेला लढण्याचे बळ मिळाले तर मराठी तरुणांना आणि शिवसैनिकांना लढण्यासाठी उभारी दिली. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मराठी तरुणांची एकीची वज्रमूठ दिसली. मराठी तरुणांना शिवसेनाच आपली तारणहार आहे अशी खात्री पटली. शिवसेनेच्या या विराट मोर्चाची धास्ती फोर्ट, हुतात्मा चौकमधील फेरीवाले, दुकानदार यांनी घेतली. या यशस्वी ऐतिहासिक विराट मोर्चामुळे मुंबईत शिवसेनेचा दरारा आणि वचक निर्माण झाला तो कायमचा!