मराठी रंगभूमीवर महिलांचे प्रश्न मांडणारी अनेक नाटके आजवर आलीत. बदलत्या काळानुसार त्यात नवनवीन प्रश्नही डोकावू लागलेत. आणि ते स्वाभाविकच आहेत. जयवंत दळवी यांचे ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘पर्याय’, ‘स्पर्श’, ‘दुर्गा’, ‘संध्याछाया’, ‘कालचक्र’, ‘किनारा’ अशी अनेक नाटके गाजली. सर्वाधिक महिलांचे विषय हे दळवी यांच्या नाटकातून ठळकपणे मांडले गेले. ज्योत्स्ना देवधर यांची ‘कल्याणी’, रत्नाकर मतकरी यांचे ‘अग्निदिव्य’, अनिल बर्वे यांचे ‘पुत्रकामेष्टी’, सई परांजपे यांचे ‘माझा खेळ मांडू दे’, विजय तेंडुलकरांचे ‘मित्राची गोष्ट’, ‘कमला’, सुरेश खरे यांचे ‘मंतरलेली चैत्रवेल’, ज्योती म्हापसेकरांची ‘मुलगी झाली हो’, महेश एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’, प्रशांत दळवी यांचे ‘चारचौघी’ अशा अनेक नाटकांनी स्त्रीविषयक समस्यांकडे गंभीरपणे बघण्यास प्रवृत्त केलं. स्त्रीजीवनाचा शोध-वेध घेण्याचाही प्रयत्न त्यामागे होता. आपल्या एकेकाळच्या पुरुषप्रधान संस्कृतीत काळाच्या ओघात काही बदल हे निश्चितच झाले असले तरीही आजची स्त्री समर्थपणे शारीरिक-मानसिकदृष्ट्या ठामपणे उभी आहे, असे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल. कारण एकाप्रकारे चाकोरीबद्ध जगण्याचे तिला सतत बिंबविले जाते. परंपरेचा पगडा तिच्या मनावर असतो. त्यातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असली तरी ते यशस्वी होतील याची खात्री देता येत नाही. याच पार्श्वभूमीवर नाटककार-दिग्दर्शिका रमा नाडगौडा यांनी ‘आवर्त’ या नाटकाचा डाव मांडलाय. जो लेखनापासून ते सादरीकरणापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याने लक्षवेधी ठरलाय. जातकुळी जरी प्रायोगिक रंगभूमीशी जुळणारी असली तरी व्यावसायिक रंगभूमीवर रसिकांपुढे ‘आवर्त’ पोहचले आहे.
‘आवर्त’ हे नाटकाचे शीर्षक. ‘आवर्त’ म्हणजे भोवरा! चक्राकार फिरणारा, वळणावर घुमणारा, फेरा मारणारा! शीर्षक अर्थपूर्णच! त्याचप्रकारे एका महिलेचं उभं जीवन हे एका भोवर्यात अडकलय. अथांग समाजातल्या नातेसंबंधात हे ‘आवर्त’ एकाकीपणे फिरतय. त्यात तिची जी शारीरिक-मानसिक घुसमट होतेय. त्याचे नाट्यपूर्ण सादरीकरण यात आहे.
हे नाट्य एकपात्री शैलीतलं. तसेच दीर्घांक कालावधीत सादर होणारं. दीडएक तास त्यातील संवाद, प्रसंग हे अक्षरशः खिळवून ठेवण्याची ताकद संहिता आणि दिग्दर्शनात दिसतेय. तसा हा प्रकार पेश करणे आव्हानात्मक, पण तो यशस्वीपणे पेलला आहे. आणखी एक वेगळेपण म्हणजे हे नाट्य काही सत्यघटनांवर आधारित असल्याचे निवेदन हे खुद्द लेखिका रमा नाडगौडा यांचे आहे. बदलत्या काळातले संदर्भ हे त्यातून नजरेत भरतात. सतत डोकावतात.
कंटाळवाणं रुटीन आयुष्य, विकृत चित्रांचं पुस्तक, गर्भाची अपूर्ण वाढ, व्यसनी नवरा, डॉक्टर आणि मनोविकार तज्ज्ञ, व्रतवैकल्य-देवधर्म, जगापुढे खोटं नाटक, रक्ताळलेले कपडे, वांझपणा हे सारं काही या कथानकातील दुवे हे खूप काही जवळपासचं सांगतात. थेट भिडतात. बोल्ड विषयाच्या संयमाने हाताळणीमुळे दर्जा राखला जातो.
‘आवर्त’ ही ‘सरी’ या विवाहित तरुणीची कहाणी. तिचा नवरा संदीप. तो इंजिनियर. एका बड्या कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीवर. आठएक तासाच्या नोकरीनंतर मित्रांसोबत दारू-मटण याची पार्टी ही ठरलेलीच. गोव्यासह अनेक पिकनिक स्पॉट हे संदीपच्या अंगवळणी पडलेलं. बायको मात्र लग्नानंतर पंचवीस वर्षे झाली तरी तशी तन-मनाने एकाकी. लग्नानंतर तिला दिवस गेले पण मिसकॅरेज झालेलं. पुढे मूलबाळ होण्याची शक्यता नसल्याने बायको म्हणून दुर्लक्षित ठरविण्यात आलेली. ‘जगातल्या सर्वच माद्यांना पोरंबाळ सहजच होतात पण तेसुद्धा तुला नीट जमत नाही!’ अशा शेलक्या शब्दात अपमान हा वारंवार सुरूच. मुलासाठी डॉक्टरांचे प्रयत्नही तसे संपलेले. आता यात दोष कुणाचा. रोज दारू ढोसून झिंगत घरी पडलेल्या नवर्याचा की शारीरिक हतबलतेमुळे निराश झालेल्या सरीचा? हा प्रश्न आणि त्यातून उभे ठाकलेले अनेक नवरा-बायको यातले संघर्षमय प्रसंग! यातून सुटका कशी काय करायची हा प्रश्न सरीपुढे उभा आहे. माहेरचे सारे बंध तुटलेले. त्यात वडिलांचे निधन. एक तिथे हक्काचं घर जरी असलं तरी तिथे जाणं तिला पटणारं, कसं काय ठरणार? ‘सरी ग सरी, माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून’ अशा विचित्र अवस्थेत अडकलेली नायिका. तिचं दीर्घ स्वगतातून अलगदपणे उलगडत जाणारे भावविश्व. ‘जगावं की मरावं?’ हा प्रश्न हॅम्लेटला पडला होता. तसाच प्रश्न यातल्या ‘सरी’ला आहे. आजच्या वेगवान नवरा-बायकोच्या नातेसंबंधात वांझ म्हणून जगायचं का? कसं! कुणासाठी? हा प्रश्न ठळकपणे नजरेत भरतो आणि एका निर्णयापर्यंत सरी पोहचते. त्यामागे एक चिरंतन शोध आहे. निर्णय आहे. आजचे वाढते घटस्फोट. तसेच ‘लिव्ह इन’ या युगात यातील विषय हा विचार करायला भाग पाडतो आणि सुन्नही करून टाकतो.
या नाटकाची संहिता आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदार्या एकाच हाती असल्याने एकूणच सादरीकरणात त्याचा सकारात्मक परिणाम होतोय. स्वतः लेखिका रमा नाडगौडा या अभिनेत्री असल्याने संहितेतले काही प्रसंगांची हळुवारता जपली गेलीय. तसेच ‘भडक’ असणारे विचारही बिनधास्तपणे मांडले आहेत. जे तसे अभावाने दिसतात. शरीरसंबंधांवरले स्वगत व देहबोली विलक्षणच. संवादात वेग आहे जो सादराrकरणातही कायम ठेवण्यात आलाय. नाडगौडा यांचा हा नाट्यलेखनातला पहिलाच प्रयत्न जरी असला तरी त्यातला सफाईदारपणा नजरेत भरतो. नवखेपणा जराही दिसत नाही.
एका घरातलं टिपिकल नेपथ्य वास्तववादी उभ केलंय. खुर्ची, टेबल, बेड, दोर्यांवरले वाळवत ठेवलेले कपडे- हे सारं काही थेट घरात घेऊन जाते. त्यात कुठेही कृत्रिमता वाटत नाही. साधेपणातलं सौंदर्य व अस्सलता प्रभावी ठरते. दोनदा वेशभूषा बदलामुळे कुठेही नाट्य थांबत नाही. हे विशेष. रंगसंगतीही उत्तम.
ज्येष्ठ संगीतकार दादा परसनाईक यांनी नाटकाची रचना ओळखून संगीताचे तुकडे बसविले आहेत. त्यात कुठेही भडकपणा किंवा धक्कातंत्र दिसत नाही. जे विषयाच्या गांभीर्यात भर पाडते. सांकेतिक नाटकापेक्षा वेगळा धाटणीचे एकपात्री दीर्घांक असल्याने सार्या तांत्रिक अंगांची जुळवाजुळवी विचारपूर्वक केल्याचे जाणवते.
नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठातून पूर्ण केलेली अभिनेत्री शिवकांता सुतार हिच्या सरी या भूमिकेभोवती हे नाट्य पूर्णपणे गुंफले आहे. तिचं संवाद, स्वगत आणि देहबोली ही शोभून दिसते. तिच्याकडून भविष्यात अशा वाढल्या आहेत. एका अभ्यासू अभिनेत्रीचे दर्शन या भूमिकेतून होते. काही प्रसंग हेलावून सोडतात. सरीचा नवरा संदीपचा आवाज अनिल नगरकर यांनी दिला असून त्यामुळे व्यसनी, उर्मट नवरा ऐकू येतो. दोघांचे संवाद खटकेबाज झालेत. वेशभूषा-रंगभूषा ही वातावरणाला अनुकूल ठरते. त्यात कुठेही फाजील अतिरेकीपणा नाही.
जन्मापासून ते लग्नापर्यंत आणि नंतर वृद्धापकाळापासून ते शेवटपर्यंत स्त्रियांच्या प्रश्नांचे स्वरूप हे तसे बहुपदरी आहे. त्यामागलं नाट्य उलगडून मांडण्याचा प्रयत्न हा विविध शैलीत, पिढ्यान पिढ्यांनी केलाय. या निर्मितीमागे समाजाला जागं करण्याचा एक नाट्यपूर्ण प्रयोग दिसतोय. वैचारिक मंथन त्यामागे आहे. व्यावसायिक म्हणून नाट्य न मांडता ते प्रायोगिकतेकडे झुकलेले दिसते. अशी नाटके ‘धंदा’ नव्हे तर ‘धर्म’ म्हणून खूप काही सांगू इच्छितात. त्याच वळणावरले हे ‘आवर्त’ म्हणावे लागेल.
सतीश आळेकर यांच्या ‘शनिवार-रविवार’ या एका नाट्यसंहितेची आठवण ‘आवर्त’ नाटकामुळे येते. ‘देशात दर मिनिटाला पंधरा हजार मुलं जन्माला येतात पण आमच्याकडे बोंबच! जमीनच नापीक!’ असे सांगणारा नवरा. पुढे तो वांझपणा स्वतःकडे घेतो. तिला दत्तक मूल घेण्याचा पर्याय सुचवितो. पण ती पर्याय नाकारतेही. आपल्याला मूल नसणं हे वास्तव स्वीकारणं महत्त्वाचं ठरते. ‘आवर्त’मध्ये केवळ मूल नसणार्या बाईवर लक्ष केंद्रित न करता तिच्या भावविश्वाभोवतीची भटकंती आहे. जी हृदयस्पर्शी ठरते. फक्त चूल-मूल-संसार यापलीकडे जाऊन समर्थपणे उभं राहाणं काळाची गरज आहे, हेच यातून मांडायचे आहे.
पुरुषांच्या बंधनात अडकलेल्या महिला या दडपणाखाली जगतात त्यांचे मानसिक खच्चीकरण घरापासून ते समाजापर्यंत होतच राहाते. त्यातून त्यांच्या सन्मानाने उभं राहाण्याचा तसेच अस्तित्वाचा प्रश्न हा गंभीरपणे पुढे येतो. काहीदा मानसिक विकृतीलाही त्या बळी पडण्याची शक्यता असते. पण ‘आवर्त’ यातली ‘सरी’ नायिका जो निर्णय घेते तो वादळातून सुटका करणारा ठरतो. कारण तिच्या तन-मनाची होणारी एकाकी घुसमट ही त्यामुळेच संपते! विचार करायला लावणारे एक सशक्त आशयघन नाटक म्हणून ‘आवर्त’ची नोंद निश्चितच होईल!
आवर्त
लेखन : सुचरिता
दिग्दर्शन/नेपथ्य : रमा नाडगौडा
संगीत : दादा परसनाईक
निवेदन : भारत गणेशपुरे
सूत्रधार : गोट्या सावंत
निर्मिती : व्ही. आर. प्रॉडक्शन्स