विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधारी पक्षाने बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष नेहमीच बहिष्कार घालतो. पेय बदलून बघितले तर?
– अशोक परब, ठाणे
दुसर्या दिवशी विधानसभेत हँग ओव्हर दिसेल
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला, असं म्हणतात… पण, कलिजा म्हणजे तर लिव्हर ना! तो कसा खलास झाला?
– राजेंद्र येरुणकर, विन्हेरे
शराबी डोळे कलीजा खलास करतात. नुसती शराब लिव्हर खलास करते.. तुमचं काय आहे ते तपासा.
मराठी सिनेमांकडे प्रेक्षक जाता जात नाहीत आणि रंगभूमीवर तुम्ही एकटेही तीन तीन नाटकं घेऊन धुमाकूळ घालत आहात. इतर अनेक नाटकं जोरात सुरू आहेत. ही तफावत कशामुळे?
– सावित्री पांचाळ, रत्नागिरी
मायबाप रसिकाला कधीही गृहीत धरलं नाही त्यामुळे.
मला कवितेच्या सुंदर मुखड्याची एक ओळ सुचली आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके.’ तुम्ही दुसरी ओळ द्याल का…
– लक्ष्मण रानडे, पोलादपूर
माया जमवती बनेल बोके
यमक जुळवती रिकामे डोके
तुम्ही इतकी नाटकं लिहिली आणि दिग्दर्शित केली आहेत. काहींमध्ये व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत… तुमचं स्वत:चं तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं नाटक कोणतं?
– जैतून शेख, सणसवाडी
बायकोला खरं वाटतं ते.
एकेकाळी तमाशात हजरजबाबी सोंगाड्या असायचा. दादा कोंडके यांनी तो नाटकात आणि नंतर सिनेमात गाजवला. तुम्ही आजच्या पिढीत ती परंपरा समर्थपणे चालवताना दिसता? तुमचा आवडता सोंगाड्या कोण?
– नरेश इंगवले, पुणे
मीच.. मीच तो.. मीच तो.. मीच तो.
तुम्ही नाटक गाजिवलंत, आता फुल फॉर्मात शिणुमात बी या की!
– साबीर खान, कोल्हापूर
हातचं सोडून पळत्याच्या माग लागणं बरं न्हाई
‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ हा गाजलेला सिनेमा आता रिमेक करायचा झाला तर टिकली-कुंकू वादाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीला थांबवणारं टायटल काय असेल?
– छाया कोटकर, जिंतूर
टिकली आणि टकळी.
तुम्ही विक्रमी यश कमावणारी नाटकं लिहिलीत. पण, असं एखादं इतर लेखकाने लिहिलेलं नाटक आहे का, जे आपण लिहायला हवं होतं, असं निर्मळ असूयेने वाटतं?
– सोनाली देशपांडे, कर्जत
मला ढीग वाटेल… मानधन तुम्ही देणार का?
आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही कराल का, असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता तुमच्या तोंडून उत्तर येईल, नाय नो नेव्हर.
– आशिष चांदगुडे, पवनानगर
पुन्हा लग्न कराल का? (हा प्रश्न स्वतःला विचारून पहा)
तुम्ही नाटकवाले इतर लेखक-दिग्दर्शक-कलावंतांची नाटकं पाहता का हो? तुमचं समकालीन दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेलं आवडतं नाटक कोणतं?
– रचना बालगुडे, भायखळा
दुसर्याचं नाटक आवडलं तर आम्ही नाटकवाले कसले.
बुकिंगचा बादशहा प्रशांत दामले यांचं तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं नाटक कोणतं?
– रोहिणी पाटील, बदलापूर
‘पडद्यासमोरचं’ प्रत्येक नाटक आवडतं.