दिल्लीत सत्ता कोणाचीही असो- महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल या तीन राज्यांना दिल्लीश्वर नेहमी वचकून असतात. या तीन राज्यांमध्ये आपले होयबा सत्तेत असावे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. ही तीन राज्ये भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी होती. या तीन राज्यांमध्ये देशाला दिशा देण्याची ताकद आहे. त्यात महाराष्ट्राने साक्षात जननायक पंडित नेहरू यांच्याशी लढा देऊन मुंबई खेचून आणली. शिवसेनेने तिच्यावरची मराठी पकड कायम ठेवली. महाराष्ट्र हे सामाजिक, आर्थिक, वैचारिक पातळीवर देशातील सगळ्यात प्रगत राज्य राहिले आहे बराच काळ. अटकेपार भगवा झेंडा नेणार्या मरगठ्ठ्यांनी दिल्लीचे तख्तही फोडले होते. तोच प्रकार पुन्हा करण्याची हिंमत महाराष्ट्र राखून आहे. म्हणूनच इथे लाचार, मिंधे सत्ताधीश नेमायचे आणि महाराष्ट्राचा वरचष्मा राहणार नाही, यासाठी काड्या करत राहायचे, हा दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा आवडता उद्योग राहिला आहे. १९७८ साली स्व. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना या दिल्लीच्या उंदरांनी महाराष्ट्रातला एक प्रकल्प कसा कुरतडून नेला होता, ते बाळासाहेबांच्या कुंचल्याने ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठावर जळजळीतपणे उमटवले होते. अलीकडे तर उंदीरही बाहेरून आणावे लागतात, घराचे वासे कुरतडणारे उंदीर काही खोक्यांच्या बदल्यात पाळता येतात. मग ते महाराष्ट्र कुरतडून त्यांच्या मालकांना प्रिय गुजरातची भर करतात.