‘आयुष्यावर बोलू काही..’ या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमात संदीप खरे सादर करीत असलेली एक कविता मला अतिशय आवडायची. ‘मी मोर्चा नेला नाही.. संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही..’ अशी त्या कवितेची सुरुवात आहे. आपल्या अवतीभवती काहीही घडो, त्याकडे दुर्लक्ष करून ‘आपल्याला काय त्याचे’ अशा स्थितप्रज्ञतेने जगणार्यांवर त्या कवितेतून अगदी समर्पक भाष्य केलेले आहे. खरं तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणार्या अडचणी, समस्या, अन्याय याविरोधात लोकशाही पद्धतीने आवाज उठवणे, निषेध नोंदवणे हे आपल्यातील जिवंतपणाचे लक्षण आहे. पण एकूणच मागील काही वर्षांमध्ये आंदोलनं, चळवळी आदी बाबींविषयी अनेक नागरिकांमध्ये निरुत्साह निर्माण झाल्याचे दिसून येतो. राजकीय कार्यकर्ते आपापल्या पक्षीय अजेंड्यानुसार आंदोलने करत असतात, पण त्यात सर्वसामान्य जनतेचा अभाव असतो. पंधरावीस कार्यकर्त्यांनी एखाद्या चौकात जमायचं, टीव्हीवाल्यांसमोर दहापंधरा मिनिटे घोषणाबाजी करायची, व्हिडीओ-फोटोसेशन झालं की संपलं आंदोलन! महागाई, भ्रष्टाचार आदी बाबींविरोधातील आंदोलनांमध्ये पूर्वी जो एक रसरशीतपणा, जिवंतपणा, उत्स्फूर्तता होती ते सगळं आता पूर्ण हरपलंय.
अर्थात मागील काही वर्षांमध्ये रोजच्या जगण्यात येत राहिलेल्या विविध समस्यांनी, संकटांनी सर्वसामान्य लोक इतके गांजलेत आणि बहुसंख्य राजकारण्यांच्या बेमुर्वतपणाचाही इतका तिरस्कार किंवा नाराजी त्यांच्या मनात निर्माण झालीय की त्याचाही परिणाम आंदोलनांच्या उत्स्फूर्ततेवर झालाय. याशिवाय देशहित, समाजहित आदी बाबींपेक्षा पक्षहित, राजकीय स्वार्थ आदी बाबींसाठी केल्या जाणार्या राजकीय आंदोलनांमुळेही सर्वसामान्य माणसांच्या मनातील आंदोलनांविषयीची उदासीनता वाढलीय.
अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील प्रथम आंदोलनात देशभरातील बहुसंख्य जनता उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. अण्णा कुणाला आपला वापर करून देत आहेत किंवा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकीय स्वार्थ साधण्याचा खेळ करतंय या सगळ्या बाबींशी सर्वसामान्य जनतेला काहीही घेणंदेणं नव्हतं. या देशातील भ्रष्टाचार आणि तो करणारे भ्रष्ट राजकारणी यांच्या विरोधात जनतेच्या मनात धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा तो उद्रेक होता. देशभरातील गावागावांतून अण्णांच्या समर्थनार्थ मिरवणुका काढल्या जात होत्या. ‘मैं भी अण्णा’ असं लिहिलेल्या गांधीटोप्या परिधान करून या मिरवणुकांमध्ये सहभागी होताना आपण काहीतरी पवित्र राष्ट्रकार्य करतोय अशी तेव्हा बहुसंख्य समाजाची प्रामाणिक भावना होती. मात्र पुढच्या एकदोन वर्षातच अण्णांच्या त्या आंदोलनामागचे खरे कर्तेधर्ते आणि त्यांचा राजकीय कावा देशासमोर आला आणि आपण हे काय करून बसलो, अशा पश्चात्तापाच्या भावनेने असंख्य लोकांना ग्रासलं. अण्णांच्या आंदोलनाने जनतेचा भ्रमनिरास झाला तर निराशाग्रस्त जनता यापुढे कोणत्याही आंदोलनात सहभागी होणं टाळेल आणि त्याचा फटका देशाला व लोकांनाही बसेल असं मत काही विचारवंतांनी, अभ्यासकांनी, पत्रकारांनी तेव्हा व्यक्त केलं होतं. अखेर तेच खरं ठरलं. राजकीय पक्ष आणि नेत्यांसोबतच सामाजिक कार्यकर्ते, नेत्यांवरील जनतेचा विश्वास डळमळीत व्हायला अण्णा आंदोलनं कारणीभूत ठरलं.
मागील आठ वर्षात गॅस, इंधनाचे दर प्रचंड वाढले, जागतिक बाजारात कच्च्या तेलाने दरांचा तळ गाठलेला होता, तेव्हाही केंद्र सरकारने त्याचा लाभ भारतीयांना मिळू दिला नाही. महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारीने कहर केलाय, निसर्गाचे रौद्र रूप आणि सरकारी यंत्रणांची अनास्था यामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्यात. राजकारणाचे प्रचंड अधःपतन झालंय, पूर्णपणे असंवैधानिक मार्गाने सत्तेवर आलेलं सरकार सध्या महाराष्ट्रात आहे आणि न्यायालयात याबाबतीत केवळ तारीख पे तारीख सुरु आहे. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी, राष्ट्रपित्याचा अवमान करणारी वक्तव्य खुलेआम सुरु आहेत, उठाव व्हावा अशा अनेक बाबी आहेत. पण जनता उदासीन आहे. कोणीतरी त्राता येईल आणि या सगळ्याचा नायनाट करून आपल्याला बरे दिवस आणेल अशी बहुदा सर्वसामान्य जनतेची भावना झालीये की काय ते कळायला काही मार्ग नाही.
नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणार्या संभाजी भिडे यांनी गेल्या सप्ताहात एका पत्रकार भगिनीला तिने कुंकू लावलेलं नव्हतं म्हणून अश्लाघ्य भाषा वापरली. सुजाण लोकांनी तातडीने भिडेंच्या त्या वक्तव्याचा निषेध केला. परंतु त्याचवेळी अनेक लोक सोशल मीडियावर भिडेंची बाजू घेताना, त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करताना पाहून वेदना झाल्या. तर अनेक लोक कशाला या विषयात लक्ष घालताय, असं भिडेंविरोधात व्यक्त होणार्या सजग लोकांना सुचवत राहिले. या देशाच्या संविधानात्मक चौकटीचं उल्लंघन जो जो कोणी करू पाहील, माणसांच्या खाण्यापिण्यावर, कपडेलत्त्यांवर, अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणू पाहील किंवा त्यांच्यावर आपले बुरसटलेले मनुवादी विचार लादू पाहील त्यांना वेळीच रोखणं, त्यांचा प्रतिकार करणं हे खरं तर प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्यच आहे. परंतु आपली ही जबाबदारी विसरून गेलेल्या नागरिकांची संख्या मागील काही काळात वाढलेली दिसत आहे.
एकीकडे असं काहीसं निराशावादी चित्र असतानाच दुसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सर्वसामान्य जनतेचा, विचारवंतांचा,विविध विचारधारेतील सामाजिक कार्यकर्त्यांचा जो काही उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळतोय ते चित्र आशादायी आणि अजून सगळंच काही संपलेलं नाही हे दर्शवणारं आहे. या यात्रेने देशभरात पुन्हा एक नवी उमेद असंख्य लोकांच्या मनात निर्माण केलीय. या देशाचे संविधान, स्वायत्त संस्थांची स्वायत्तता मोडीत काढणारी, येनकेन मार्गाने विरोधकांना संपवण्यासाठी आटापिटा करणारी आणि आपली विशिष्ट विचारधारा या देशावर लादण्यासाठी आतुर झालेली कितीही मोठी महाशक्ती समोर उभी ठाकलेली असो; आपण हतबल न होता तिच्याविरोधात लढायला हवं ही जिद्द या यात्रेने लोकांच्या मनात निर्माण केलीय. ही यात्रा आता महाराष्ट्रातून मार्गक्रमण करतेय आणि प्रचंड असा प्रतिसाद तिला मिळताना दिसतोय, हे चित्र सुखावणारं आहे. भाजप आणि गुवाहाटी सेनेव्यतिरिक्त अन्य सारे राजकीय पक्ष, त्यांचे नेते या यात्रेत सहभागी झाले, हे चित्र तर अतिशय सुंदर आणि आश्वासक आहे. लोकांच्या मनातील उदासीनता दूर करून पुन्हा त्यात चैतन्य निर्माण करण्याचं काम ही यात्रा करतेय. काँग्रेसला, राहुल गांधींना त्यातून किती राजकीय लाभ मिळेल ते येणारा काळ सांगेल, पण बर्याच काळाने या देशातील सर्वसामान्य जनतेला उत्स्फूर्तपणे एखाद्या बाबीत सहभागी व्हावंसं वाटलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. भूमिका घेणं महत्वाचं आहे अन्यथा स्वतःला जबाबदार नागरिक म्हणवून घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
संदीप खरेंना आपल्या कवितेतून तेच तर सांगायचं होतं.. त्यांच्या कवितेचे ते सदाबहार शब्द पुढीलप्रमाणे…
मी मोर्चा नेला नाही,
मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा,
कधी नोंदवलेला नाही
भवताली संगर चाले,
तो विस्फारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना,
कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो,
रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल,
मज कुणी उचलले नाही
नेमस्त झाड मी आहे,
मूळ फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो,
थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही,
खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही,
कधी गरूड बैसला नाही
धुतलेला सातिव सदरा,
तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते,
अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो,
मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या,
कधी दंगा केला नाही
मज जन्म फळाचा मिळता,
मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी,
तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी,
रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही,
आंबाही झालो नाही
मी मोर्चा नेला नाही,
मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा,
कधी नोंदवलेला नाही