अगदी अलीकडे काही वर्षापूर्वीपर्यंत आपल्या मराठी मुलुखात लग्न-समारंभाव्यतिरिक्त, फारतर नवरात्रोत्सवात घराच्या चार भिंतीबाहेर सामूहिकरित्या नृत्य करायचा रिवाज होता. पण हल्ली ज्या सण-उत्सवात नाचकाम होत नाही असा सण शोधून सापडणार नाही.
सगळ्याच सणावारांना लोक बेभान होऊन नाचू लागले आहेत. नुकताच साजरा झालेल्या गणेशोत्सवात नाचणार्या गर्दीला काबूत ठेवायला गेलेले पोलिस स्वतःच नाचू लागल्याचं आपण पाहिलं. ‘आम्ही आमचा ताण घालवण्यासाठी डान्स केला,’ असं या नाचणार्या पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा! तुम्ही-आम्ही श्रद्धा आणि उपासनेचं घरातील स्वातंत्र्य रस्त्यावर नेऊन उपभोगू लागल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला हे मान्य करावंच लागेल.
लग्नात वरातीसमोर केला जाणारा अचकट-विचकट नाच मला आवडत नाही आणि भरत नाट्यम, कुचिपुडी, कथक, मोहिनीअट्टम, ओडिसी, मणिपुरी, कुडियाट्टम, कॅबरे, साल्सा, गिद्दा, घूमर, गरबा, भांगडा, हिपहॉप, इतकंच काय, अगदी बाल्या डान्स देखील मला येत नाही. त्यामुळे कॉलेज जीवनात जेव्हा बाकीचे मित्र क्लब किंवा डिस्कोथेकला जायचे, तेव्हा ते मला तिथे नेणे टाळायचे. ते म्हणायचे क्लब आणि डिस्कोच्या बाबतीत तू मोनोरेलपेक्षाही कुचकामी मनुष्य आहेस. माझी अशी अवहेलना बर्याच ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला सांगतो, नाचता न येणार्या किंवा पार्टीला जाऊन दारू न पिता केवळ चकना खाल्ल्यामुळे अवहेलना वाट्याला येणार्या लोकांच्या वतीने एक निवेदन घेऊन लवकरच आपल्या मुख्यमंत्रांना भेटण्याचा माझा इरादा आहे.
खरंतर मनातल्या मनात मी खूप उत्तम नाचतो. पण शरीर माझ्या मनाला अजिबात साथ देत नसल्याने लोकांना माझा डान्स दिसत नाही. निदान लग्नाच्या वरातीत तरी नाचता यावे म्हणून मी टीव्हीवर मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, प्रभुदेवापासून मायकल जॅक्सनपर्यंत कित्येकांच्या डान्स व्हिडिओची पारायणे केली. मित्रांकडून सोप्या डान्सच्या टिप्स घेतल्या, बॉलिवुड डान्सचा क्लासही लावला, पण माझे पाय कधी तालावर पडलेच नाहीत. पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आमच्या डान्स टीचरने माझी संपूर्ण फी परत करून माझी घरी रवानगी करत म्हटले की, अरे डान्स हा ठरवून करता येत नाही. तो आतून आला पाहिजे. तुझ्या आतून मला फक्त गॅस आणि ढेकरच येताना दिसतो.
डान्स या प्रकाराशी माझा उभा दावा असला तरी कोपर्यात एका बाजूला उभे राहून, लग्नाच्या मंडपात किंवा वरातीसमोर किंवा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचणारे लोक बघणे हा माझा छंद आहे. मी पाहिलंय की, तोंडाने वाजवायचे वाद्य असो की तालवाद्य असो, ते वाजविणारे कलाकार कुठलाच तोरा न मिरवता अगदी तल्लीन होऊन आपापलं वाद्य वाजवीत असतात. पण हल्ली, केवळ एका वेळी दोन-तीन सिड्या लावून मिक्सिंगचे कसब साधलेली ही जी डीजे नामक जमात बोकाळली आहे, ती मात्र आपण खूप मोठ्ठा कलाकार असल्याचा तोरा मिरवीत असते. त्या सीडीमध्ये गाणारा कितीही मोठा आणि नावाजलेला गायक/गायिका असली तरी कुठल्याही क्षणी त्यांचा गळा आपण आवळू शकतो याचा माज या डीजे लोकांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत असतो.
मी नाचणार्यांकडे टक लावून बघत असतो, तेव्हा माझ्या लक्षात येते की एखादा माणूस सातत्याने फक्त एकच स्टेप करीत असतो. डीजेवर बिडी जलयले म्हणत बिपाशा पेटलेली असो, भीगे होठ तेरे म्हणत इम्रान हाशमी विव्हळत असो की राष्ट्रगीत वाजवले जात असो- सर्व गाण्यांसाठी ह्याच्याकडे दोन्ही हात वर करून तर्जनी उंचावून नाचण्याची एकच स्टेप असते. एखाद्या डान्सरला डान्स करताना प्रॉपर्टी लागते. कधी तो हातात रुमाल घेऊन फडकावतो, कधी डोक्यावर टोपी घालतो, अंगात चित्रविचित्र जॅकेट घालतो. या लोकांची एक हातखंडा प्रॉपर्टी म्हणजे हातात बियरची बाटली घेणे, डोक्यावर बीयरने भरलेला ग्लास ठेवणे अन् नाचणे. एखादा माणूस पाय एकाच जागी खिळल्यासारखे स्थिर ठेवून, हाताची नाममात्र हालचाल करीत, कारच्या डॅशबोर्डवरील कुत्र्यासारखी फक्त मान मागेपुढे करून नाचण्याचा आभास निर्माण करीत असतो. एखादा मात्र खूप उत्साही असतो. तो सिनेमातल्या त्या विशिष्ट गाण्यात हिरो-हिरोईनने केलेल्या स्टेप्स तशाच्या तशा करण्याचा प्रयत्न करीत असतो. बर्याचदा ते खूप विचित्र दिसतं, पण त्याला त्याची फिकीर नसते. सिनेमात एखादं गाणं स्टेजवर असेल तर तो मंडपातल्या बाकड्यावर चढून नाचतो. सिनेमात एखाद्या गाण्यात हिरो-हिरोईन स्वित्झर्लंडच्या डोंगरावरील हिरवळीवर लोळत असतील, तर तो मंडपातल्या धुळीत लोळतो. कुणी जोडीजोडीने नाचत असतात. कुणी केवळ मोठमोठ्या उड्या मारीत असतो. कुणी पतंग उडविण्याची अॅक्शन करीत असतो. तर एखादा खरोखरीचं चांगलं नाचणारा गर्दीपासून थोडं दूर नाचत आपल्या नाचाला दाद देणारी कुणी सुबक ठेंगणी दर्दी मिळेलच या आशेवर एक डोळा मंडपाशेजारच्या गर्दीवर ठेऊन नाचत असतो. असं म्हणतात की, डान्स हा आपल्या आडव्या अपेक्षांचा उभा अविष्कार असतो. पण मी ते फारसं मनावर घेत नाही कारण त्या दृष्टीने पाहिलं तर मग सगळ्याच प्रकारचा डान्स आपल्याला हिडीस वाटू लागतो.
नवरात्र आणि गरबा हा तर नाचायचाच सण. मागील काही वर्षे नित्यनेमाने मी माझ्या गुजराती मित्रांच्या सोबतीने फाल्गुनी पाठकच्या गरबाला जातो. गरब्याच्या या क्षेत्रात प्रफुल दवे, गार्गी व्होरा, ऐश्वर्या मजुमदार, प्रीती पिंकी, नरेश कनोडिया अशा बर्याच लोकांचं नाव फेमस असलं तरी माझ्या गुजराती मित्रांच्या म्हणण्यानुसार फाल्गुनी इजे मॅडोना ऑफ इंडिया! कुणी कुणाला कशाची उपमा द्यावी यावर आपला काही कंट्रोल नाही. आपण ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणणारे अंधभक्तही पाहिलेत आणि ‘नरेंद्र हा देवाचा अवतार आहे’ असं म्हणणारे ही पाहिलेत. असो. तर सांगायचा मुद्दा असा की मला तिथला तो दांडिया गरब्याचा माहोल आवडतो म्हणून मी स्वखुशीने तिथे जातो. गुजराती लोक गरब्यात त्यांच्या तालावर आम्हाला नाचवयाचे, तोवर माझी काहीच तक्रार नव्हती; हल्ली त्यांची हिंमत खूपच वाढलीय आणि ते आख्या देशाला त्यांच्या तालावर नाचवू लागलेत, ते जरा मला खटकते इतकंच!
फाल्गुनीबद्दल गुजराती लोक इतक्या प्रेमाने बोलत असतात, पण माझं असं निरीक्षण आहे की ते तिचं म्हणणं फारसं मनावर घेत नाहीत. गरबा सुरु असताना अधूनमधून ती ‘हालो, हालो’ असं म्हणते, पण कुणीच आपल्या जागचं हालत नाही.
आमचा आठ-दहा मित्रांचा ग्रुप गरब्याच्या मंडपात शिरताच माझ्या मित्रांच्या अंगात जाणता राजा, अमित्शा किंवा वड्रा संचारतो आणि ज्या ठिकाणाहून, टिपर्या खेळता खेळता, जास्तीत जास्त सौंदर्यस्थळे टिपता येतील अशा एखाद्या जागेकडे बोट करून ते त्या जागेवर कब्जा करतात. सौंदर्यस्थळांवरून आठवलं, मागील वर्षी मी, माझा दांडिया खेळतानाचा फोटो ‘प्लेइंग दांडिया’ अशा कॅप्शनसह व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता. तो फोटो पाहून आमच्या ऑफिसच्या एका अमेरिकेच्या क्लायंट बाईने विचारले की, दांडिया म्हणजे काय असते? मी तिला म्हटलं, ‘दांडिया म्हणजे एक प्रकारचं टिंडर असून त्यात ऑटो स्क्रोल फीचर असते.’
स्टेजवर वाद्ये वाजू लागली की मैदानातील तमाम पोरी आणि आंटींच्या अंगात दया भाभी आणि मोंजोलिका एकत्रच संचारतात. सुरुवातीचा तासभर फाल्गुनीची टीम केवळ धिंग-टी-टिटी, टिटीरी-टिटी, धिंग-टी-टिटी, टिटीरी-टिटी, धिंग-टी-टिटी, टिटीरी-टिटी या तालावर आपल्याला नाचायला लावते. बर्याचदा हा धिंग-टी-टिटी, टिटीरी-टिटीचा ताल थांबून केवळ जनरेटरचा आवाज येत असतो, पण त्यामुळे मैदानातील कुणालाच काहीही फरक पडत नाही. नाच सुरूच असतो.
शप्पत सांगतो, आपण सगळ्यांपेक्षा हटके स्टेप्स करून सगळ्याचे लक्ष वेधून घेऊ या अट्टाहासापायी मला अजून साध्या साध्या स्टेप्स देखील येत नाहीत. इतकी वर्षे गरबा खेळायला जाऊन माझ्या डान्समधे विशेष सुधारणा झालेली नसली तरी एका बाबतीत निश्चितच खूप प्रगती झाली आहे. पूर्वी मला माझ्या डान्सिंग स्किलची लाज वाटायची, आता मी बीचवर नग्न धावणार्या मिलिंद सोमणइतका निर्लज्ज झालो आहे. सगळे मित्र ठरवून एखादी कॉमन स्टेप करत असतात आणि मी गोव्याच्या बीचवर चहा पीत असल्यासारखा वेगळीच स्टेप्स करत असतो. धिंग-टी-टिटी, टिटीरी-टिटीचं तासभर आवर्तन होतं. आपण दमलो भागलो असतो. आपल्या अंगातला कुर्ता आणि बनियन अंगाला घट्ट चिकटलेलं असतं. अंगावरील घामाचे ओघळ नको तिथे पोहोचून हुळहुळायला लागलेलं असतं. तेव्हा कुठे फाल्गुनी स्टेजवर येऊन गायला लागते.
माझ्याच्याने आता गरबा खेळण्यासाठी एक पाऊलही उचलवत नाही. बहुतेक सगळ्या बाप्ये मंडळींची थोड्याफार फरकाने हीच अवस्था असते. आम्ही इतस्ततः विखुरलेल्या आमच्या चपला शोधून पायात चढवून निघू लागतो. जाता जाता मागे वळून पाहतो. तर गुजराती पोरी अजूनही त्याच उत्साहाने, ऊर्जेने नाचत असतात. (घरी) मांसाहार न करणार्या, केवळ ढोकळा-फाफडा खाणार्या नाजूक नाजूक गुजराती पोरीइतका वेळ नाचण्यासाठी ऊर्जा कुठून आणतात हा मना सज्जनाला पडलेला प्रश्न तसाच घेऊन आम्ही मंडपाबाहेर पडतो.
या सणासुदीच्या निमित्ताने वाजविले जाणारे ढोल-ताशे-डीजे, रस्त्यावर होणारा धिंगाणा यामुळे समाजातील एका वर्गाची या सगळ्या प्रकारावर बंदी घालावी अशी मागणी आहे. पण मला वाटते, समाजात सण असायलाच हवेत. उत्सव साजरेही करायला हवेत. सण-उत्सव-लग्नसमारंभ साजरे करण्याच्या तुमच्या व्याख्येत वाद्ये वाजवून नाचणे येत असेल तर नाचायलाही हरकत नाही. एकत्र नाचून-गाऊन, सण-उत्सव-लग्नसमारंभ साजरे केल्याने समाज बांधला राहतो. इतकेच नव्हे तर आनंदाच्या अशा प्रकटीकरणाने ऊर्जेचं योग्य रित्या विरेचन होतं. एकप्रकारे उत्सव हे तरुणाईच्या कोंडलेल्या ऊर्जेचे सेफ्टी व्हॉल्व म्हणून काम करतात आणि परिणामी समाज सुरक्षित राहतो.
पण आजकाल, ‘आमच्याच सणाला का बोल लावता, त्यांच्या का नाही?’ अशी व्हॉटअबाऊटरी प्रवृत्ती फोफावू लागली आहे. मुलंबाळं, परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, आजारी आणि वयस्कर लोक यांची पर्वा न करता डीजेच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. या भिंतीच्या अलीकडे ‘आमचा धर्म, आमचा उत्सव आणि आमचा १२० डेसिबलचा गोंगाट’ असा बेमुर्वतखोरपणा दाखविणार्या झुंडी आहेत आणि पलीकडे स्वतः पब-क्लबमध्ये नाचणारा पण सण-समारंभावेळी रस्त्यावरील नाचगाण्यांवर सरसकट बंदी घालायची मागणी करणारा उत्सवद्वेषी किंवा शांतीप्रिय समुदाय आहे. या दोन समुदायांमध्ये एक भलीमोठी भिंत उभी आहे. ही भिंत केवळ डीजेची नसून ती आर्थिक, सामाजिक विषमतेची देखील आहे. आपल्याला संवाद, सहकार्य आणि समजुतीच्या मार्गाने या डीजेच्या आणि विषमतेच्या दोन्ही भिंती पाडायच्या आहेत. त्या भिंती जेव्हाकेव्हा जमीनदोस्त होतील तेव्हा, आपण पूर्व-पश्चिम जर्मनीतील भिंत पडल्यावर झाला होता त्याहून मोठ्ठा, जल्लोष करू. त्या जल्लोषाच्या वेळी (मी धरमपाजी इतकाच नृत्यनिपुण असलो तरी) बेधुंद होऊन नाचायला मला आवडेल!