पत्नीने मला हा प्रोजेक्ट तुम्ही करू नका, असा सल्ला दिला होता. पण तंत्रज्ञान नवीन आहे, त्यामुळे ते नक्की चालेल यावर विश्वास ठेवून तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून हा प्रोजेक्ट पुढे नेला होता. पुस्तके विकली जात नव्हती, त्यामुळे पैशाची ओढाताण होत होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा प्रोजेक्ट करण्यासाठी सगळी रक्कम कर्ज घेऊनच उभी केली होती. पैसे मागणीसाठी येणारा कोणताही फोन मी टाळल्याचे मला आठवत नाही.
– – –
नोकरीत असताना आपले सगळे उत्तम सुरु असते. पण कधी कधी आपण देखील एखादा व्यवसाय करून पाहावा, अशी कल्पना डोक्यात येते. त्यानंतर आपली पावले त्या दिशेने वळतात. आपल्याला व्यवसाय यशस्वी करायचा आहे, ही महत्वाकांक्षा जागी होते. त्यासाठी आवश्यक असणारे सगळे गुण आपण अवगत करतो. त्यात जिद्द, चिकाटी इथपासून ते मार्केटिंग आणि पडेल ते काम करण्याची आपण तयारी करतो.
सुरुवातीच्या काळात मी देखील एका नावाजलेल्या आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होतो. २०१२ मध्ये ऑगमेंटेड रियालिटीचे क्षेत्र तेजीमध्ये होते. मी त्या तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडलो. आपण या क्षेत्रात काम करणारी कंपनी उभी करण्याची तयारी केली. आभासी जगाच्या दुनियेत एक वेगळी ओळख निर्माण करू म्हणून एक पाऊल पुढे टाकले. सुरुवातीला दागिन्यांच्या क्षेत्रात काम करायचे ठरवले, पण अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे काही दिवसांत ट्रॅक बदलला आणि लहान मुलांसाठी आभासी जगाचा वापर करून ए टू झेडपर्यंतच्या अक्षरांची ओळख करून देणारे एक पुस्तक तयार करण्याचे ठरवले. स्टर्लिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या कंपनीच्या माध्यमातून सुमारे ४७ लाख रुपये खर्च करून हे पुस्तक तयार केले. हे पैसे मित्र मंडळी, बँक या माध्यमातून कर्जाच्या स्वरूपात जमा केले होते. त्यासाठी १३ जणांची टीम तयार केली. पुस्तक तयार झाले, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यामुळे डोक्यावरचे टेन्शन वाढत चालले होते. ही पुस्तके विकली जात नव्हती. पुन्हा नोकरीत जावे असा विचार सारखा मनात येत होता. पण एक दिवस नशिबाची साथ मिळाली आणि सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातही कामे सुरु झाली. त्यामुळे चांगला आर्थिक आधार मिळाला. देणेकरी मंडळींची कर्जे फेडण्याची व्यवस्था झाली आणि माझा जीव भांड्यात पडला…
एका क्षणाला वाटले होते आपण नोकरी सोडून जोखीम घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. पण या अनुभवामुळे तो व्यवसाय बंद करण्याचा विचार आला होता. पण मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिच्या मालकांनीच मला, तू व्यवसाय सुरु केला आहेस, त्यामधून पळ काढता कामा नये, हे सांगितले होते… त्यांचे ते वाक्य आणि व्यवसाय सूर ठेवण्याचे माझे ध्येय यामुळेच हा व्यवसाय आज यशस्वीपणे सुरु आहे…
ग्रामीण भागात शिकलो
माझे गाव बारामतीच्या जवळचे मळद… घरची थोडीफार शेती. वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात मैलमजूर म्हणून काम करत असत. त्यामुळे घर चालवण्यासाठी सगळेच जण कष्ट करत असत. त्यात मी देखील हातभार लावायचो. शाळा संपली की शेताची काही कामे, जनावरांसाठी चारा आणणे अशी कामे करायचो. बारामतीमधल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शालेय शिक्षण सुरु होते. अभ्यासाची गोडी मला पहिल्यापासूनच होती. आपण चांंगले शिक्षण घेतले तर स्वतःत चांगले बदल करू शकता, स्वत:ला चांगले घडवू शकतो या विचारांनी माझ्या मनात तेव्हपासूनच घर केले होते. शालेय शिक्षण सुरु असताना आपल्यात काय कमी आहे, त्याची उणीव भरून काढण्याचा कायम प्रयत्न असायच. त्यामुळेच की काय, माझी शिक्षणाची गोडी दिवसेंदिवस दृढ होत चालली होती. आपण जिथे कमी आहोत, तिथे अधिकचे कष्ट घेऊन सगळ्या उणिवा भरून काढायचे. आज त्याचे चीज झाल्याचे वाटते…
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण शास्त्र शाखेतून पूर्ण केले. तेव्हा आपण मिलिटरी इंजीनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून सैन्यात जावे असा विचार मनात आला. बारावीला असताना परीक्षेचा सराव करण्यासाठी सलग १८ तास बसून पेपर सोडवले होते. परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले. बारावीत असताना केमिस्ट्री विषयात चांगली गोडी निर्माण झाली होती. त्यामुळे पेट्रोकेमिकल इंजिनीरिंगसाठी प्रवेश मिळवण्याचे माझे प्रयत्न सुरु होते. पण त्याची फी खूप होती, त्यामुळे ते शक्य होणार नव्हते. तर दुसरीकडे मिलिटरी इंजिनीयरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरु केली होती. दरम्यान, माझे एक नातेवाईक तेव्हा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी करत होते. तेव्हा कॉम्प्युटर सायन्स जोरात होते. माझे गणित चांगले होते, त्यामुळे आपण देखील तिथे शिक्षण घ्यावे, असे ठरवले. पण काही कारणामुळे मला सीएमईची परीक्षा देता आली नाही. दरम्यान, माझे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरु झाले. घरची परिस्थिती बेताची होती, त्यामुळे मामाने फी भरली. ते शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केले. आपल्याला याच क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर एमएससी, ते देखील पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमधून करायला हवे. हा विचार करत असताना मनावर एक दडपण आले होते. तेव्हा या प्रवेशासाठी एंट्रन्स घेतली जायची. मी त्या परीक्षेत पाचवा आलो, त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझा प्रवेश निश्चित झाला. पण पुण्यात राहायचे कुठे हा प्रश्न माझ्यासमोर होता. माझा मित्र अतुल सांगळे दत्तवाडीत राहायचा, त्याच्या रूमवर राहण्याची सोय झालीr. दोन महिन्यांनी मला हॉस्टेल मिळाले.
तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्णय
आपण कॉम्प्युटरचे शिक्षण घेत आहोत त्यामुळे आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायला हवे, या विचाराने उचल खाल्ली. सेकण्ड सेमिस्टरला विजय गोखले सरांकडे डिझायनिंंग ऑपरेटिंगचा क्लास लावला. त्यामधून भरपूर शिकायला मिळाले. या क्षेत्रात प्रगती करण्याचा मार्ग मला तिथेच सापडला. कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामुळे बदलून गेला. एमएससीला असताना मला पर्सिस्टन्ट कंपनीत नोकरीची संधी चालून आली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे, मला सैन्यासाठी काम करण्याची इच्छा होती, ही कंपनी जॉईन केल्यावर मला तिथे त्याच विषयावर काम करण्याची संधी मिळाली.
शिकवण्याच्या ओढीने झपाटले
नोकरी सुरु होती, तेव्हा मला खासकरून ग्रामीण भागातल्या मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण देण्याच्या ओढीने झपाटले होते. त्यामुळे बारामतीत भाड्याने जागा घेऊन स्टर्लिंग स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स सुरु केले. मुलांना शिकवण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी माझ्याकडे एमआयडीसीमधून प्रोजेक्ट यायचे. हे काम नोकरी सांभाळून अर्धवेळ पद्धतीने सुरु होते. २०११मध्ये हे काम पूर्ण वेळ करूयात, म्हणून मी लाँग लीव्हवर जाण्याचे ठरवले. मला नव्या मुलांना घडवायचे होते, म्हणून हा सगळा खटाटोप सुरु होता. यासाठी मी दोन लाख रुपयांचे भागभांडवल देखील गुंतवले.
९ नोव्हेंबर २०११ मध्ये मी कंपनीचे उद्घाटन केले. हळूहळू कामे मिळायला सुरुवात होऊ लागली. त्यामुळे नोकरीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला. कामे सुरु होती. पण या कामात फार पैसे मिळत नाहीत, अशी एक भावना मनात आली. तेव्हा ऑगमेंटेड रियल्टी (आभासी जगाचे) क्षेत्र तेजीत होते. तिथे काहीतरी करावे म्हणून सुरुवातीला दागिन्यांच्या क्षेत्रात काय करता येते का याची चाचपणी केली, पण त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. २६ इंग्रजी अक्षरांचे अॅनिमेशन करणे, डिझाइन करणे, त्याची गोष्ट तयार करणे असे करत एकूण ४७ लाख रुपये खर्च करून इंग्लिशची ओळख करून देणारे अनोखे पुस्तक तयार केले… एकदम नवीन कल्पना असल्यामुळे ते हातोहात खपेल असा अंदाज होता. क्रांतिकारक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये दणक्यात झाला होता. सहा हजार पुस्तके ठेवली होती. प्रकाशनाच्या दिवशी फक्त २६ पुस्तकांची विक्री झाली. एका पुस्तकाची किंमत होती ५०० रुपये… बरेच दिवस ही पुस्तके विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही यश मिळाले नाही. अखेरीस एके दिवशी ही सगळी पुस्तके गाडीत टाकून बारामतीला आणली.
पत्नीच्या सल्ल्याकडे केले दुर्लक्ष
तेव्हा माझ्या पत्नीने मला हा प्रोजेक्ट तुम्ही करू नका, असा सल्ला दिला होता. पण तंत्रज्ञान नवीन आहे, त्यामुळे ते नक्की चालेल यावर विश्वास ठेवून तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून हा प्रोजेक्ट पुढे नेला होता. पुस्तके विकली जात नव्हती, त्यामुळे पैशाची ओढाताण होत होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा प्रोजेक्ट करण्यासाठी सगळी रक्कम कर्ज घेऊनच उभी केली होती. त्यामुळे काही काळानंतर देणेकरी मंडळी फोन करू लागली होती. पैसे कधी देणार आहात, आम्हाला पैसे हवे आहेत. असे फोन करून बोलत होती. आपल्याला या मंडळींनी पैसे दिलेले आहेत, ते परत द्यायला हवेत हे कायम माझ्या मनात असायचे. पैसे मागणीसाठी येणारा कोणताही फोन टाळल्याचे मला आठवत नाही. एकदा रामाच्या मंदिरात दर्शन घेत असताना मला पैसे कधी देणार असा फोन आला होता. तेव्हा, मी आता रामाच्या मंदिरात आहे, पैशाची सोय झाली की देतो, असे त्या व्यक्तीला सांगितल्याचे आजही आठवते.
पुन्हा नोकरीचा विचार आला…
पुन्हा कुठेतरी नोकरी सुरु करावी आणि देणेकर्यांचे पैसे देऊन टाकावेत आणि व्यवसाय बंद करून टाकावा, असा विचार डोक्यात घोळत होता. एप्रिल २०१३ मध्ये मी पर्सिस्टन्टचे प्रमुख डॉ. आनंद देशपांडे यांना भेटलो आणि त्यांना सगळी कैफियत सांगितली. मी त्यांना म्हटलो, सर, मी व्यवसाय बंद करतो आणि पुन्हा नोकरी सुरु करतो. तेव्हा ते म्हणाले, व्यवसायातून पळ काढू नकोस, व्यवसाय सुरु ठेव. नक्की तुला मार्ग सापडेल. त्याच्या त्या बोलण्यामुळे मला धीर मिळाला. दरम्यान, पुस्तके विकण्यासाठीचे माझे प्रयत्न सुरु होते. अशामध्येच २०१४मध्ये माझ्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कामे येण्यास सुरुवात झाली. काही काळातच हा ओघ इतका वाढत गेला की त्यामुळे माझी बंद पडलेली गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली होती. त्यामधून चांगले अर्थार्जन होऊ लागले होते. सगळ्यात आधी मी देणेकर्यांचे पैसे देण्यास सुरवात केली. थोड्या काळातच मी त्या कर्जाच्या ओझ्यातून अगदी सहीसलामत बाहेर पडलो होतो.
बाजार समितीसाठी सॉफ्टवेअर
२०१४मध्ये कोणताही कमीपणा न बाळगता मी बारामती बाजार समितीला सॉफ्टवेअर बसवण्यासाठीचे एक कोटेशन दिले होते. २०१५ मध्ये पुणे बाजार समितीला त्याच प्रकारचे कोटेशन दिले. त्यात बाजार समितीमध्ये येणार्या मालाच्या आवक जावक नोंदीपासून सगळ्या बाबींचा समावेश आहे. ते सॉफ्टवेअर त्यांना आवडले, त्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, इथल्या बाजार समितीसाठी असाच प्रकारच्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. सध्या इंडस्ट्री ४.० या सॉफ्टवेअरवर काम सुरु आहे. शेतकर्यांसाठी देखील एक वेगळे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. भविष्यात खूप वेगळे अभिनव प्रयोग करण्याची योजना आहे. आयुष्यात कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी मागे न हटता तिच्याशी सामना करण्यासाठी आपल्याकडे तगडा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. हे मला या अनुभवातून शिकायला मिळाले आहे.