• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चित्ते, कबुतर आणि मर्कट

(संपादकीय २४ सप्टेंबर २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 22, 2022
in संपादकीय
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर नामीबियातून आणलेले चित्ते सोडण्याचा इव्हेंट झाला, देशात बाकी काहीही घडतच नसल्यासारखा तो गोदी मीडियाने दिवसभर टीव्हीवर दाखवला आणि भक्तमंडळींची अवस्था आधीच मर्कट तशातही मद्य प्यायला, अशी होऊन गेली. अनेकांच्या मुलाबाळांचा, नातवंडांचा शाळेत निबंध लिहिण्यासाठीचा ‘आवडता प्राणी’ पक्का झाला… चित्ता! ज्याचा कालपरवापर्यंत कोणालाच नव्हता पत्ता!
त्यात मोदींनी नेहमीप्रमाणे वेळकाळ न पाहता पंडित जवाहरलाल नेहरूंवर घसरण्याची आपली परंपरा पाळली आणि आधीचे लोक कबुतरे सोडत होते, आम्ही चित्ते सोडले, अशी वल्गना केली. हा नेहरूफोबिया दिवसेंदिवस हास्यास्पद होत चालला आहे, याचा त्यांना ना खेद, ना खंत. कबूतर हे शांततेचे प्रतीक. कोणत्याही देशाचा खर्‍या अर्थाने विकास व्हायचा असेल, तो महासत्ता बनायचा असेल, तर त्या देशात शांतता असायला लागते, त्याचे इतरांबरोबर संबंध शांततेचे असावे लागतात. नको तिथे चित्ते सोडून उपयोग काय? चीनच्या सीमेवर जायचे होते सोडायला. भारताच्या भूमीत कोणीही आले नाही अशी थाप देशाच्या पंतप्रधानांनी मारली होती. मग आता चीन भारतभूमीमधून दाखवण्यापुरती माघार घेतो आहे, त्याबद्दल पाठ थोपटून घेताय ती कशी? जो आलाच नव्हता तो चालला कसा?
शिवाय मोदींनी चित्ते सोडले ते सुरक्षित अंतरावरून, कडेकोट बंदोबस्तात. वर पुन्हा जवळच्या अंतरावर टेलिफोटो लेन्स लावून त्यांनी नेमकी कसली फोटोग्राफी केली, हे तेच जाणोत. त्यांनी ज्यांना नावे ठेवली त्या नेहरू आणि इंदिरा गांधी या पूर्वसुरींचे थेट वाघांच्या बछड्यांबरोबर खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि जे ही हिंमत ठेवतात, तेच आकाशात शांततेची कबुतरेही उडवू शकतात, हे अधोरेखित झाले. लांबून चित्ते सोडायचे आणि शौर्याच्या वल्गना करायच्या याने फक्त हसेच होते.
दक्षिणेत यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोव्यात कमळीबाईंच्या ऑपरेशन चिखलमुळे हा पक्ष किती सत्तापिपासू होऊन बसला आहे, हे पाहून लोक अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात गद्दार टोळीला हाताशी धरून महाविकास आघाडी सरकार या पक्षाने पाडले तेच वेदांता फॉक्सकॉनची गुंतवणूक पळवण्यासाठी, असे मानायला जागा आहे. त्याने मराठी माणूस (भाजपच्या भजनी लागलेले मराठी भय्ये आणि भय्यिणी वगळून- त्यांना एक दिवस बुलेट ट्रेनने गुजरातलाच पाठवून द्यावे लागणार आहे) या पक्षावर कमालीचा संतापलेला आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने मोदींच्या गर्वाचे माहेर’घर’ खाली खेचण्याची तयारी केली आहे. अशा वेळी आपण काहीतरी ‘चित्ता’चक्षु चमत्कारिक करू आणि लोकांचे लक्ष विचलित करू, अशी मोदींची कल्पना झाली असावी. आतापर्यंतचा काळ त्यांनी याच प्रकारे काही ना काही इव्हेंटबाजी करून साजरा केलेला आहे. त्यात फॅन्सी ड्रेस स्पर्धेची अपुरी राहिलेली हौसही भागवून घेता येते हा आणखी मोठा फायदा. यातला राममंदिराच्या लोकार्पणाचा बहुधा, दोनचार महिने चालेल असा सर्वात मोठा इव्हेंट त्यांनी २०२४च्या निवडणुकीसाठी राखून ठेवला असावा.
मात्र दरवेळी असले चित्ताकर्षक उपक्रम कामी येत नाहीत, हे हळुहळू त्यांच्या प्रचारयंत्रणेच्या लक्षात यायला लागले आहे. एकतर मोदींना सवय अशी की प्रत्येक गोष्ट आपणच केली, असे दाखवायचे. चित्तेही आपणच आणले, जे ७० वर्षांत घडले नाही, ते आपण करून दाखवले, असे ढोल त्यांच्या प्रचारयंत्रणेने आताही वाजवलेच. पण, चित्ते आणण्याची कल्पनाच मुळी माजी वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची होती, हे उघड झाले. चित्ते आणण्याच्या तेव्हाच्या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने खीळ घातली होती. तो निर्णय फिरवला गेला २०१९ साली. पण तेव्हा मोदींचे सरकार पुन्हा सत्तेत आले होते, त्यांना तेव्हा कोणत्याही इव्हेंटची गरज नव्हती. त्यामुळे नामीबियातल्या चित्त्यांना तीन वर्षे वाट पाहावी लागली आणि अखेरी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे भाग्य फळफळले. हे सगळेच उघड झाल्यामुळे ‘७० वर्षांत प्रथमच’ हा मोदीभक्तांचा दावा साफ उताणा पडला.
पण, हे चित्ते भाग्यवान खरेच. ज्या सरकारला अमानुषपणे लॉकडाऊन लावल्यानंतर पायी चालत निघालेल्या मजुरांसाठी बसगाड्या सोडता आल्या नाहीत, त्या सरकारने या चित्त्यांसाठी खास विमान पाठवले. लोकसंख्येत आघाडीवर असलेला आपला देश सर्वाधिक सुशिक्षितांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत कुठेही नाही, ही बातमी टाळून माध्यमांनी त्यांचे असे स्वागत केले की चित्त्यांनाही प्रश्न पडला, आपण भारतात आलो आहोत की भारतीय जनता पक्षात. मोदींनी जणू परदेशांत दडवलेले काळे धनच परत आणले आहे आणि आता आपल्या खात्यांमध्ये १५ लाख रुपयांची भरच पडणार आहे, अशा थाटात मोदींच्या भक्तजनांनी आनंदकल्लोळ केला.
आता इव्हेंट संपला. टाळ्याथाळ्या बासनात गेल्या. भक्तजनांना नव्या नशेत तर्रर्र होण्यासाठी मोदी नवा अंमली पदार्थ पुरवतील तेव्हा खरे. दरम्यान त्या चित्त्यांवरही लक्ष ठेवले पाहिजे. आता इव्हेंट संपला, आता त्यांचे काय काम, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले तर शेतकर्‍यांप्रमाणे बिचारे टाचा घासत मरतील… किंवा गुजरातमध्ये नवी नजरबंदी करण्यासाठी कधी गुजरातला नेले जातील, तेही सांगता येत नाही. मर्कट त्यावरही टाळ्या वाजवतीलच म्हणा!

Previous Post

नया है वह…

Next Post

राजर्षींचा आशीर्वाद

Next Post

राजर्षींचा आशीर्वाद

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.