देशात विरोधी पक्षांची लचके तोडणारी अघोषित हुकूमशाही असताना त्या लचके तोडणार्या लांडग्याला न घाबरता त्याचा सामना करण्यासाठी राहुल गांधींना निर्भिडपणे उभे असताना पाहिल्यावर संघ आणि भाजपाला ह्या घराण्याची आजवर इतकी जबरदस्त भीती का बसली आहे हे उमगते. पक्षातून गेलेल्यांची पर्वा न करता जे आहेत त्यांना सोबत घेऊन फक्त संघ आणि भाजपाविरोधातच नव्हे तर सरकारी दमनयंत्रणा, विकला गेलेला गोदी मीडिया, शिवराळ आणि गलिच्छ ट्रोलिंग करणारा आयटी सेल, ह्या सर्वांशी ताठ मानेने आज ते सामना करताना दिसताहेत.
– – –
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आणि ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सप्रमाण दाखवून दिले. राहुल गांधी ह्यांनी श्रीपेरुंबुदूर येथील आपल्या वडिलांच्या म्हणजेच दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या समाधीस्थळला वंदन करून त्यानंतर कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकापासून भारत जोडो यात्रेची सुरवात केली. आपण फक्त आणि फक्त प्रेमाची, बंधुत्वाची आणि भारतीयांना एकत्र जोडण्याचीच भाषा करणार असल्याचे राहुल ह्यांनी सांगितले.
राहुल आजवर फक्त सकारात्मक भाषेचाच वापर करत आले आहेत आणि देशभक्तीने भारलेल्या गांधी घराण्याच्या नावलौकिकाला शोभणारे असेच आजवर त्यांचे वागणे आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा ३५०० किमी इतक्या मोठ्या अंतराचा पल्ला गाठणारी आणि तब्बल १५० दिवस चालणारी भारत जोडो यात्रा ही ह्या देशातील राजकीय आणि सामाजिक पटलावरील नजीकच्या काळातील सर्वात मोठी घटना असणार आहे. देश आज फार कठीण परिस्थितीतून जात असून देखील देशात सर्व काही आलबेल आहे असे दाखवण्याचा मोदी सरकारचा जो केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, त्या सरकारला आरसा दाखवण्याचे काम देखील ही यात्रा करणार आहे.
बेरोजगारी आणि महागाई ह्यासारख्या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरल्याने केंद्र सरकारच्या एकूण कार्यक्षमतेवरच आज प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण आजघडीला अगदी दबक्या आवाजात देखील कोणी सरकारला एक देखील प्रश्न विचारायच्या भानगडीत पडत नाही. कारण सरकारला प्रश्न विचारणे, हाच जणू एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे, असेच आजचे कलुषित वातावरण आहे. स्वच्छ प्रतिमेचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, निर्भीड पत्रकार, सरकारी अधिकारी स्वतः निर्दोष असल्याची संपूर्ण खात्री असून देखील आज ईडी, सीबीआय, पोलीस ह्यासारख्या दमनयंत्रणांची भीती बाळगून आहेत, कारण ते निर्दोष तोपर्यंतच आहेत, जोपर्यंत सरकारला प्रश्न विचारणार नाहीत. प्रश्न विचारले तर मग त्यांना कोणत्यातरी प्रकरणात निष्कारण अडकवले जाते. मग स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करायला कायद्याच्या किचकट प्रक्रियेतून त्याना जावे लागते आणि ह्या किचकट प्रक्रियेचा जाच आज शिक्षेपेक्षा कैकपट जास्त आहे. केंद्र सरकारी यंत्रणांच्या प्रोसेस इज पनिशमेंट या खाक्यामुळे नको ती नसती ब्याद असेच कोणालाही वाटणे अगदी साहजिक आहे. जिथे प्रामाणिक माणसाचीच हिंमत होत नाही, तिथे इतरांचे काय? जे भ्रष्ट आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे त्याना पक्षांतर करून सहज वेळ निभावून नेता येत असल्याने ते स्वतःची सुरक्षित ठिकाणी सोय लावून घेत आहेत. भाजपाने अभयदान दिलेल्यांची आज प्रामाणिकपणे चौकशी करून सक्तवसुली करण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले तर सरकारची आर्थिक हालत बरी होईल. चोर सोडून संन्याशाला फाशी असे धोरण असलेले केंद्र सरकार आज इतक्या टोकाच्या हुकूमशाही वृत्तीने वागण्याचे धारिष्ट्य दाखवते. याला खरे जबाबदार कोण आहेत, असा प्रश्न जनतेने स्वतःलाच विचारला, तर दोष फक्त सत्ताधारी पक्षाकडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडेच जात नाही, तर तो बेगडी हिंदुत्वाच्या नावावर हनुमान चालिसा म्हणून दाखवला की सत्तापक्षाला अंधपणे मतदान करणार्या जनतेवरही जातो. फक्त भावना भडकावून मते मिळणार असतील तर कोण, कशाकरता जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालणार? २०२४ला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर त्या मंदिराच्या नावावर भाजपाने मते मागायची आणि जनतेने बेरोजगारी, महागाई वगैरे प्रश्न बाजूला ठेवून भाबडेपणाने देवाच्या नावाने मते द्यायची असेच होणार असेल तर विकासाचे राजकारण करून करायचे तरी काय?
आज विरोधी पक्ष असणे किंवा विरोधी पक्षाचे सदस्य असणे म्हणजे दमनयंत्रणेला आमंत्रण देणे ठरते. देशात विरोधी पक्षांची लचके तोडणारी अघोषित हुकूमशाही असताना त्या लांडग्याला न घाबरता त्याचा सामना करण्यासाठी राहुल गांधी निर्भीडपणे समोर उभे आहेत, हे पाहिल्यावर संघ आणि भाजपाला ह्या घराण्याची आजवर इतकी जबरदस्त भीती का बसली आहे, हे उमगते. पक्षातून गेलेल्यांची पर्वा न करता जे आहेत त्यांना सोबत घेऊन फक्त संघ आणि भाजपाविरोधातच नव्हे, तर सरकारी दमनयंत्रणा, विकला गेलेला गोदी मीडिया, शिवराळ आणि गलिच्छ ट्रोलिंग करणारा आयटी सेल, कुचेष्टा करणारे भाजपाई ह्या सर्वांशी ताठ मानेने आज राहुल सामना करताना दिसताहेत. ज्या जोमाने ते लढत आहेत ते पहाता आपण ह्या तरूण नेत्याला समजून घेण्यात चूकलो अशीच भावना आज देशवासीयांमध्ये झालेली आहे.
राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असल्याने त्यांची भाजपासोबतची लढाई त्यांच्या वैयक्तिक राजकीय अस्तित्वाची आहे असा गैरसमज सुरुवातीला बरेचजणांचा झाला. आज मात्र राहुल ह्यांची लढाई देशाच्या अस्तित्वाची, संविधानाच्या अस्तित्वाची, समतेसाठी, दीनदुबळ्यांच्या हक्कासाठीची सुद्धा आहे, हे आता लोक मान्य करून लागले आहेत. राहुल हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रकारण करत आहेत आणि नेमका तोच हेतू घेऊन ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली आहे याची खात्री पटल्याने अनेक काँग्रेसेतर पण समविचारी पक्ष, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आज या यात्रेत मोठ्या प्रमाणावर त्यांना साथ देत आहेत.
भाजपाने वरवर राहुल यांना हसण्यावारी नेले असले तरी आतल्या गोटात खळबळ माजली आहेच. म्हणूनच आधी त्यांच्याकडून अनवधानाने झालेल्या एका किरकोळ चुकीचे ढोल आयटी सेल आणि मीडिया यांनी वाजवले. मात्र, ताबडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना अशाच गफलती करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी फजिती ओढवून घेतली, याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या आणि भाजपचा डाव उलटला. पाठोपाठ राहुल गांधी यांच्या टी शर्टच्या किंमतीवरून रान पेटवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा राहुल गर्भश्रीमंत आहेत, त्यांना महागडे टी शर्ट परवडू शकते; पंतप्रधानांचे त्याहून महागडे शौक कोण पूर्ण करते, अशा विचारणा केल्या गेल्या. काँग्रेसने तर नंतर राहुल यांच्या स्पोर्ट्स शूजचा फोटो टाकून आता या शूजची पण किंमत काढा, असं प्रतिआव्हान आयटी सेलला दिलं.
भारत जोडो यात्रेची खरोखर गरज काय आहे, भारत तर जोडलेलाच आहे, असा एक सूर गोदी मीडिया आळवत असतो. भारतीय जनता पक्षाच्या विखारी राजवटीमध्ये धर्मांधता वाढीला लागली आहे, देशाच्या विविधतेला नख लावण्याचे उद्योग सुरू आहेत, त्यातून आधीच जातीपातींनी, भाषांनी, धर्मांनी चिरफाळलेला देश आणखी चिरफाळत चालला आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना आजच जागवली पाहिजे, ती भाजपच्या बेगडी हिंदुत्वातून जागवली जाणे शक्यच नाही. भारत जोडो ह्याचा अर्थच भारतीय जोडो असा होतो. भारत हा निव्वळ भौगोलिकदृष्ट्या एकत्र असलेला एक भूभाग आहे, असे मानणारे इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल भारताला एक देश म्हणायलाच तयार नसत. सिंगापूरचे संस्थापक अध्यक्ष ली कूआन यू ह्यांनीदेखील भारत एक अखंड देश नसून ब्रिटिशांनी विणलेल्या रेल्वेच्या जाळ्याने जोडलेला बत्तीस वेगवेगळ्या देशांचा समूह आहे, अशा आशयाची टिप्पणी केलीच होती. भारत म्हणजे काय? सोळा प्रमुख भाषा, सोळाशे इतर भाषा व बोलीभाषा, जगातील सर्व धर्म, शेकडो जाती, शेकडो पंथ अशी सामाजिक स्थिती. बर्फाच्छादित शिखरे, रखरखीत वाळवंट, समुद्रकिनारा, पठार अशी अत्यंत विषम भौगोलिक स्थिती, एका भागात अगदी चिनी अथवा जपानी वाटतील अशी दिसणारी माणसे तर काही भागात आप्रिâकन वंशाशी साधर्म्य दाखवणारी माणसे, आहार म्हणा, कपडे म्हणा कशातच समानता नाही. थोडक्यात एकत्र येण्यासाठी अगदी कमीतकमी देखील जी समानता असावी लागते, ते देखील नसताना, आलेल्या शेकडो अडचणींवर मोठी मात करत पंचाहत्तर वर्षांपूर्वी भारत नावाचे एक प्रजासत्ताक गणराज्य अस्तित्त्वात येते, ते टिकते, प्रगतीपथावर जाते, हे निव्वळ भाषेवर, अथवा धर्माच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या इतर देशांच्याच नव्हे, तर सबंध जगाच्या दृष्टीने एक मोठे आश्चर्य ठरले आहे. भारत देश आपापसात यादवी होऊन नाश पावणार, ह्या देशाचे तुकडे होतील अशी भाकिते पंचाहत्तर वर्ष आधी केली जात होती, आज देखील केली जातात. पण त्यांना खोटे ठरवत आपण एक बलशाली राष्ट्र म्हणून पाऊणशे वर्षांपासून एकत्र आहोत. हा काळ मानवी इतिहासात नगण्यच आहे, पण लोकशाही देशांच्या इतिहासात हा चमत्कारच आहे. ह्या देशातील पराकोटीची विविधता ही खरेतर एकत्र टिकण्यासाठीचा कायम एक मोठा अडथळा ठरू शकते. भारत देशासमोर तुटण्याचे संकट अनेकवेळा येऊन गेले आहे. पण तरी देखील हा देश आजवर तुटला नाही कारण ‘तोडो’ म्हणणारे कितीही आवेशात आले तरी कालांतराने ते नेस्तनाबूत झाले आणि ‘जोडो’ म्हणणारे अंतिमतः विजयी झाले. ह्या देशात ‘तोडो’ म्हणणारे गाडलेच पाहिजेत आणि भारतात जितक्या म्हणून विविध भाषा आहेत, त्या सर्व भाषांतून समस्त भारतीयांनी देश व देशबांधव म्हणून एकत्र टिकण्यासाठी ‘भारत जोडो’ ही एकच भाषा बोलली पाहिजे. तीच आजची गरज आहे.