मातोश्रीवर दीड दिवस वरचा बाप्पा खाली आणून ठेवला जातो. पूजाअर्चा होते आणि विधीपूर्वक पुन्हा वर नेऊन ठेवला जातो. असे विसर्जन मी पहिल्यांदाच पाहिले. पण यामुळे माझी घोर निराशा झाली. मिरवणुकीचे फोटो घेण्यासाठी कॅमेरा घेऊन मी जय्यत तयारीत आलो होतो. पण एकही फोटो न काढता हात हलवत परतावे लागले. बाप्पांचा असाही प्रसाद!
– – –
गणेशोत्सवात घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. ‘बाप्पाचे दर्शन घ्यायला घरी अवश्य या’, असे अनेक संदेश मोबाईलवर येत राहतात. दिवस रात्र जागून केलेली सजावट ही लोकांनी पाहावी असे त्यांना वाटत असते. ‘नक्की येतो’ म्हणता कुणाकडे जावे असा प्रश्न पडतो. मलाही वृत्तपत्रासाठी बाप्पाचा विशेष फोटो हवा असतो. त्या निमित्ताने देवदर्शन, गप्पाटप्पा आणि त्यातून मिळालेली बातमी महत्त्वाची असते.
घरगुती उत्सवात फळाफुलांचे, थर्माकोलचे डेकोरेशन साधारण सारखेच दिसते. सार्वजनिक मंडळात बाप्पाची विविध रूपे घेतलेली भली मोठी मूर्ती आणि बाजूला वर्तमान परिस्थितीवर आधारित चलचित्रांचा देखावा असतो. यातून वाचकांना आवडेल अशा बाप्पाचा फोटो टिपायचा असतो. तो कोणाच्या घरचा किंवा मंडळाचा आहे यावरही त्याची लोकप्रियता अवलंबून असते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी म्हणजे सच्च्या शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर गणपती असतो. हे फारच थोड्या जवळच्या लोकांना माहितेय. त्याच्या दर्शनासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले केले तर सिद्धिविनायकासारख्या लांबच लांब रांगा लागतील आणि त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची दुसरी रांग लावावी लागेल, म्हणजे कलानगरचे जनसागरात रूपांतर होईल. ज्या साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्रीकडे धाव घ्यायचे, त्या साहेबांच्या गणपतीसाठी ते किती गर्दी करतील याचा विचार करा.
मी कॉलेजमध्ये असताना मातोश्रीवर बाप्पा पाहण्याचा योग आला. उद्धवजींनी घरच्या गणपतीचे आमंत्रण दिले. घरी दीड दिवसाचा गणपती बसला असून आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे असे म्हणाला. नंतर त्याचे विसर्जन होईल आणि मला दर्शन घेता येणार नाही म्हणून मी घाईघाईनेच कॅमेरा घेऊन ८७ नंबरच्या बसने कलानगरला पोहोचलो. तोपर्यंत सात वाजून गेले होते. साहेबांचा बाप्पा म्हटला म्हणजे किती राजेशाही मिरवणूक असेल. वाजत गाजत गुलाल उधळत ती दादर चौपाटीवर येईल. तेव्हा तुडुंब गर्दी असलेली असेल. स्वतः साहेब आणि त्यांचा बाप्पा एकाचवेळी दोन देवांचे दर्शन घेण्याचा दुग्धशर्करा योग. योगायोगाने मीही ठाकरे कुटुंबीयांसोबत असणार या कल्पनेने मी भारावून गेलो होतो. पण प्रत्यक्षात कलानगरात शुकशुकाट. कुणीही दिसेना. बहुधा विसर्जनाची मिरवणूक निघून गेली असावी, असे वाटले. मी धावत पळत मातोश्रीच्या दारात पोचलो. तेव्हा साध्या कपड्यातला पोलीस होता. तो नेहमी तेथे असायचा, त्याकाळी आतासारखा पोलीस फौजफाटा नसायचा, अनेक चौकशा आणि सामानाची तपासणी नसायची. मातोश्रीची दारे सर्वांसाठी मुक्त खुली असायची. फक्त एक डॉबरमॅन जातीचा चपळ कुत्रा होता. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे न भुंकता स्वागत करायचा. त्याला ट्रेनिंग दिल्यामुळे कोणावर कधी भुंकायचे हे त्याला ठाऊक होते. बंगल्याच्या हॉलमध्येही कुणी नव्हते, पण आरतीचा आवाज येत होता. आतल्या खोलीत गेलो तेव्हा पाहिले, साहेबांच्या हातात आरतीचे ताट होते आणि सर्व कुटुंबीय आरती म्हणत होते. साहेबांचा सेवक थापा आणि पी.ए. राजेसुद्धा होते.
दीड फुटाची काळ्या रंगाची दगडाची रेखीव गणेशमूर्ती चौरंगावरती ठेवली होती. पंधरा-वीस मिनिटे धीर गंभीर वातावरणात चाललेली आरती संपली. गणपती बाप्पा मोरया असे म्हणून साहेबांनी त्यांच्या पद्धतीने वाकून नमस्कार केला. सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर मीही पाया पडलो. गार्हाणे घातले मनातल्या मनात… `बाप्पा… साहेबांना माझ्यावर लक्ष ठेवायला सांग रे बाबा… महाराजा!
सर्वांना प्रसाद वाटल्यानंतर ‘मोरया! पुढल्या वर्षी लवकर या!’ असे म्हणून ती बाप्पाची मूर्ती उचलून वरच्या मजल्यावर नेऊन देवघरात ठेवण्यात आली. मला वाटले वरच्या मजल्यावरून बाहेर जाण्याचा मार्ग असेल, म्हणून मीही गेलो मागोमाग. गणपती ठेवून पुन्हा खाली आलो आणि उद्धवकडे विसर्जनाची चौकशी केली. तो म्हणाला आम्ही विसर्जन करत नाही. दीड दिवस वरचा बाप्पा खाली आणून ठेवतो. पूजाअर्चा करतो आणि विधीपूर्वक वर नेऊन ठेवतो.
असे विसर्जन मी पहिल्यांदाच पाहिले. माझी घोर निराशा झाली. मिरवणुकीचे फोटो घेण्यासाठी कॅमेरा घेऊन मी जय्यत तयारीत आलो होतो. पण एकही फोटो न काढता हात हलवत परतावे लागले.
माझा मूड गेला. फोटो मिळाला नाही. हा भाग सोडा, पण ही पद्धत किती चांगली आहे. पाहा, अशा हजारो लहान मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित करायच्या म्हणजे किती प्रचंड प्रदूषण होते, याचा आम्ही कधी विचारच केला नाही. प्रत्येक घराघरात अशी प्रथा आली तर आपण सर्वजण प्रदूषण थांबवू शकतो.
माझ्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. गिरगाव चौपाटीवर आम्ही त्याचे विसर्जन करतो. त्या रात्री मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या भल्या मोठ्या उंच गणेशमूर्ती विसर्जनाला येतात. कार्यकर्ते त्यांना खोल समुद्रात घेऊन जातात. कितीही जिवाचा आटापिटा केला तरी त्या बुडता बुडत नाहीत. तासन् तास समुद्रात जैसे थे उभ्या असतात. त्या कशा बुडणार अशा विवंचनेत मी दुसर्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा चौपाटीवर जाऊन पाहतो, तर समुद्राच्या ओहोटीमुळे त्या मूर्ती पुन्हा किनार्यावर येऊन पडलेल्या दिसतात. काही कामगार मंडळी त्या मूर्तीच्या उरावर बसून हात पाय तोडतात. पायाखालचा लाकडी पाट काढून घेतात. पोटातील लोखंडी सांगाडा वेगळा करून बाहेर उभा असलेल्या ट्रकमधून घेऊन जातात. लाकडी पाट आणि आतील स्टील हजारो रुपये किमतीचे असते. ते पुढल्या वर्षी पुन्हा वापरता येते. म्हणून ते मूर्तिकार अक्षरश: तुटून पडतात. गिधाडासारखे. काही कार्यकर्त्यांकडे मी विचारपूस केली तर म्हणाले, मोठ्या गणपतीला आम्ही महत्त्व देत नाही. त्याच्यापुढे तो लहान गणपती आम्ही ठेवतो, तो पूजेचा महत्त्वाचा असतो. त्याची यथासांग पूजाअर्चा करून विधीपूर्वक विसर्जन करण्यात येते.
मी हे सर्व ऐकून घेतले आणि बाहेर रस्त्यावर येऊन सार्वजनिक दूरध्वनी केंद्रावरुन `लोकसत्ता’ दैनिकाचे त्यावेळचे म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे वृत्तसंपादक तुकाराम कोकजे यांना सर्व माहिती दिली. ते म्हणाले, कमाल झाली या बेशरम लोकांची. तू ताबडतोब फोटो घेऊन ‘लोकसत्ता’मध्ये ये. त्यावेळी कोकजे दुपारनंतर ऑफिसमध्ये येत असत. त्यांनी तो फोटो पाहिला आणि सर्व बातमी माझ्या भाषेत माझ्याकडून लिहून घेतली. दुसर्या दिवशी ‘लोकसत्ता’मध्ये माझ्या नावानिशी तो फोटो पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला. आणि खळबळ उडाली. मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ताकीद देऊन विसर्जन व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आयुक्तांनी एक पत्रक काढून विसर्जनानंतरचे फोटो काढण्यास मनाई केली.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबले असे नाही. खरी गंमत पुढे आहे मी जो फोटो कोकजे साहेबांकडे दिला त्याखाली असे लिहून दिले की समुद्रातील ओहोटीमुळे किनार्यावर वाहून आलेल्या गणेशमूर्तीचे चारही हात आणि दोन्ही पाय काही कामगार तोडत आहेत. हा फोटो पहिला पानावर घेण्यासाठी कोकजे यांनी एका पिळदार मिशीवाल्या कोल्हापुरी पत्रकाराकडे दिला. त्याने त्यात चुकून गणपतीचे दोनही पाय लिहिण्याऐवजी चारही पाय आणि दोन हात असे लिहिले आणि ते जसेच्या तसे ‘लोकसत्ता’मध्ये छापून आले. ‘लोकसत्ता’चे वाचकवर्ग प्रचंड असल्यामुळे अनेकांचे फोन लोकसत्तामध्ये गेले आणि लोकांनी चार पायाची चूक निदर्शनास आणून दिली. त्यावर कोकजे साहेब प्रचंड संतापले त्यांनी माझ्या बातमीची शहानिशा केली. त्यात त्या पत्रकाराची चूक आढळून आली. त्याने पाय दाखवून अवलक्षण केल्याबद्दल त्याला खरमरीत मेमो देण्यात आला.
फोटो घेण्यासाठी आम्ही घराबाहेर पडतो, तेव्हा अनेक ठिकाणी आमचे उत्स्फूर्त स्वागत होते. चहापान, आदरातिथ्य आणि बरेच काही भरभरून मिळते. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे लोक बोलून दाखवतात. मग आमचाही इगो सुखावून जातो. परंतु अशा लोकांचा काही भरोसा नसतो. ते कधी सूड घेतील त्याचा नेम नसतो. समुदायाची मानसिकता तर कधीच लक्षात येत नाही. तरीही फोटो घेतेवेळी कुठे धोका असू शकतो त्याचे ठोकठाळे मी आधीच बांधीत असतो. त्याप्रमाणे कुठे कसे वागणं बदलायला हवे त्याची तयारी आधीच केलेली असते. अनेक वर्षाच्या अनुभवानंतरही अंदाज चुकतात आणि ज्यांना आपले म्हणावे त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करावे तीच माणसे अचानक आक्रमक होतात आणि अंगावर धावून येतात.
गिरगावातील के. ना. चाळ म्हणजे केशव नाईकांची चाळ. येथील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी १९०१ साली लोकमान्य टिळक आले होते. २००१ साली या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल के. ना. चाळीतील लोकांनी शंभर वर्षांपूर्वीचा प्रसंग पुन्हा नाट्यमय रीतीने उभा करायचा ठरवले. पुण्यातील अभिनेते विनायक कुलकर्णी खास लोकमान्य टिळकांचा पोशाख घालून बग्गीत बसून आले होते. त्यांच्या संरक्षणासाठी घार्या डोळ्याच्या कोकणस्थ चित्तपावन तरुणांनी इंग्रजी पोलिसांचा गणवेश घालून घोडेस्वारी केली. सोबत संघाचे कार्यकर्ते तसेच अ. भा. विद्यार्थी परिषदेचे तरणेबांड तरुण होते. घोड्याच्या बग्गीत बसलेल्या टिळकांची छान पोझ मिळावी म्हणून अनेक फोटोग्राफर त्यांना हाका मारू लागले. `मिस्टर टिळक’ प्लीज इथे पहा. अहो टिळक एक सेकंद कॅमेरा पहा, पण टिळकांची व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार कुणालाही दाद देत नव्हते. आजूबाजूच्या इतर कार्यकर्त्यांनी आम्हाला पूर्वसूचना दिली होती की कोणत्याही परिस्थितीत टिळकांना त्रास देऊ नका किंवा फोटोसाठी बग्गीवर चढू नका. म्हणून टिळक जसे बसले तसे फोटो मी लांबूनच घेत होतो. `लोकसत्ता’चा एक ज्येष्ठ पत्रकार टिळकांचा चांगला फोटो मिळावा म्हणून बग्गीवर चढला, पण इतरांना ते आवडले नाही. त्यांनी पाठीमागून त्याचा शर्ट खेचून खाली उतरण्यास विनंती केली. तो काही केल्या खाली उतरेना. लोक चिडले आणि त्यांनी फोटोग्राफरला मारहाण करायला सुरुवात केली. तोही धट्टाकट्टा असल्याने दोन ठेवून दिल्या. मग टिळकांच्या समोर दे दणादण सुरुवात झाली. मी त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलो, तर मलाही मुका मार खावा लागला. त्याचे घड्याळ तुटून फुटून खाली रस्त्यावर पडले. ते गोळा करुन त्याला दिले. हे टिळक उघड्या डोळ्याने सर्व पाहत होते. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही की मध्यस्थाची भूमिका केली नाही. फोटोग्राफरही टिळकप्रेमी असल्यामुळे त्याने अशाही अवस्थेत टिळकांचा चांगला फोटो ऑफिसमध्ये जाऊन दिला. पण झाल्या प्रकाराबद्दल एक निषेधाचा शब्दही लोकसत्तेत छापला नाही. फोटो काढणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि तो त्याने मिळवलाही.