• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

यांचे विसर्जन जनताच करणार…

(संपादकीय १० सप्टेंबर २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 8, 2022
in संपादकीय
0

मंडपातील गर्दी ओसरली, कार्यकर्ते थकून झोपी गेले, तेव्हा हळू आवाजात मूषकाने विचारलं, बाप्पा, जागे आहात ना? बाप्पा म्हणाले, अरे बाबा, इथे दहा दिवस जागंच राहावं लागणार, याची कल्पना असते मला. म्हणून निघण्याच्या आधी काही दिवस मी मनसोक्त झोप काढून घेतो.
मूषक थोडा चिडून म्हणाला, यांना डीजे लावून एकमेकांचे कान फोडण्याची फार हौस. तुमचे कान मोठे आहेत. आवाज रिबाऊंड होत असेल. शिवाय तुम्ही साक्षात देव. आम्ही छोट्या कानांच्या माणसांनी काय करायचं?
बाप्पा समजावणीच्या सुरात म्हणाले, अरे, आता लोकांनाही कळतं. नियम पाळतात सगळे. काही असतात अतिउत्साही. या वर्षी तर मी ठरवलंय की थोडी जास्त सहनशक्ती ठेवायची. गेली दोन वर्षं भक्तांना मनासारखा उत्सव साजरा करता आला नाही माझा. यावर्षी थोडी वाफ निघणार, ती निघू द्यायची. त्यांना आनंद वाटावा, असं त्यांच्या आसपास काही घडत नाहीये. निदान या उत्सवात तरी त्यांना थोडा आनंद मिळू दे, रोजच्या यातनांचा विसर पडू दे.
मूषक म्हणाला, तेही खरंच म्हणा! मीही पाहिलं, आपण आलो तेव्हा डोळ्यांत पाणी होतं हो कित्येकांच्या.
अरे बाबा, त्यांच्यातल्या अनेकांना तर आपण हा उत्सव साजरा करायला आणि पाहायला जिवंत आहोत, यानेही हेलावून जायला झालं असेल, बाप्पा हळव्या सुरात बोलू लागले, काय काय भोगलं रे यांनी त्या कोरोनाच्या काळात. जवळची माणसं गेली. तीही दृष्टिआड. ना त्यांचं शेवटचं दर्शन झालं, ना त्यांना धड निरोप देता आला. अनेकांना कोरोना झाला, ऑक्सिजनअभावी श्वास अडायला लागला, व्हायरसने फुप्फुस भरून टाकलं, व्हेंटिलेटरवर,
ऑक्सिजनवर अनेक दिवस आयसीयूमध्ये काढून लोक बाहेर आले, आज व्यवस्थित आहेत, हा चमत्कारच आहे. जो वर हात लावून आलेला आहे, त्याच्यासाठी या उत्सवाचं मोल फार मोठं आहे… किती नवस फेडले जातायत या वर्षी ते बघतोयस ना!
बाप्पा, इतकी वर्षं मी तुमच्यासोबत येतो दरवर्षी. नेहमीच मला प्रश्न पडतो. हे सगळे नवस बोलणारे लोक ठरावीक ठिकाणी जाऊन तो का बोलतात? तुम्ही तर घराघरात आहात, प्रत्येक गल्लीत आहात. चराचरात आहात. एखाद्याने घरच्या गणपतीला नवस केला किंवा मनातल्या मनात तुमच्याकडे काही मागितलं, तर तुम्ही काय त्याला पावत नाही का? मोठमोठ्या रांगा लावून, चेंगरून घेऊन, काही ठिकाणी उर्मट कार्यकर्त्यांबरोबर वादविवाद करून त्या ठरावीक मूर्तीचंच दर्शन घेतल्याने काय फायदा होतो? मूषकाने तावातावाने विचारलं…
…बाप्पा हसले, म्हणाले, अरे असते स्थानावर श्रद्धा एकेकाची. मी काय मूर्तीत बंदिस्त आहे काय कुठल्या? प्रत्येकाच्या देव्हार्‍यात मी असतोच की. तरी लोक घरी मूर्ती आणतात. गल्लीत मांडव घालतात, तिथेही मूर्ती आणतात… उत्सवांचं वेड आहे आपल्या लोकांना.
बाप्पा, यावर्षी कितीतरी घरांमध्ये, नामांकित मंडळांमध्ये एक दाढीवाले गृहस्थ सतत दिसत होते… त्यांनी काय हजार मंडळांना भेटी देईन असा नवस बोलला आहे का? मूषकाने विचारलं.
बाप्पा क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले, अच्छा, ते खोकेवाले होय… अरे ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे. ते मुख्यमंत्री आहेत?… पण, मुख्यमंत्र्यांना तर राज्य चालवायचं असतं ना! त्यांना हे सगळं करायला वेळ कसा मिळतो. आपण निघण्याआधी भगवान श्रीकृष्ण भेटले होते, ते सांगत होते की हे सगळ्या दहीहंड्यांना पण होते…
असं आहे मूषका. ते मुख्यमंत्री आहेत, पण चावीचे. राज्य चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही. ती सांभाळायला त्यांचे दिपोटी आहेत की. यांची नेमणूक उत्सवमंत्री म्हणूनच झालेली आहे… कारण ते नुसते उत्सवमूर्तीच आहेत… पूजेचा मान त्यांचा नाही. घरचे देव सोडून बाहेरचे देव पुजले की माणसावर ही वेळ येते.
अरे देवा, म्हणजे हे रिकामटेकडेच फिरतायत होय! तरी यांचे काही समर्थक म्हणतायत की हे मुख्यमंत्री बघा कसे सगळीकडे फिरतात, आधीचे घरात बसून होते, कुठे जात नव्हते, काही काम करत नव्हते.
मूषका, मूषका, मूढांचं कशाला मनावर घेतोस? हे मेंदूगहाण भक्तगण आहेत. त्यांच्याकडे गहाण टाकायला तरी मेंदू आहे का, अशी साक्षात बुद्धिदेवता असून मलाही शंका येते. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काही काम केलं नसतं, तर आज हे जे वकील तरफदार्‍या करत फिरतायत, ते जिवंत राहिले असते का? यांच्या गुजरात मॉडेलचे ढोल हॉस्पिटलबाहेर गोळा झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या आणि ढणाढणा पेटलेल्या चितांच्या दृश्यांनी फोडून टाकले. यांच्या डबल बुलडोझर सरकारच्या राजवटीत गंगेमध्ये प्रेतं वाहवण्याची वेळ आली. ही यांची कार्यक्षमतेची व्याख्या. कोरोनाकाळात सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आधीचे मुख्यमंत्री होते, कारण त्यांना या काळातली जबाबदारी माहिती होती. लोकांना मास्क घालण्याचं, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व सांगायचं आणि आपण सभा घ्यायच्या, सार्वजनिक ठिकाणी, जागतिक मंचांवर विनामास्क वावरून गावठीपणा करून दाखवायचा, देशाला कमीपणा आणायचा, हा उद्योग त्यांनी कधी केला नाही. त्यांच्या सरकारने उत्तम कामगिरी केली, म्हणून महाराष्ट्र बचावला, याचीच ही पोटदुखी.
यांनी हिंदू सणांवरचं विघ्न घालवलं, असं सांगतायत ते सगळीकडे.
अरे, मी साक्षात विघ्नहर्ता असताना हिंदू सण आणि हिंदू जन असुरक्षित कसे होतील?… महाराष्ट्रात ते कधी खतरे में आले, तर शिवसेना भक्कम आहे… या उपटसुंभांची गरज आहे का?
बरं बाप्पा, मला एक सांगा… हे इतक्या ठिकाणी तुमच्या दर्शनाला येतायत, म्हणजे तुमच्याकडे काही मागत तर असतीलच ना? काय मागणं तरी काय आहे यांचं?
अरे, काय मागतील? जिथे जातील तिथे लोक गद्दार, खोके, ओक्के म्हणतायत या सगळ्यांनाच. पार लाज निघते आहे. गाजराची पुंगी कधी मोडेल ते सांगता येत नाही… बाप्पा, आमचं विसर्जन होऊ देऊ नका, म्हणून गयावया करत असतात जिथे तिथे येऊन!
मग, तुमचा निर्णय काय?
तो मी नाही, मराठी जनतेने घ्यायचा… त्यांनी घेतलाच आहे. संधी मिळताच तीच करून टाकणार यांचं कायमचं विसर्जन!

Previous Post

नया है वह…

Next Post

छत्रपती शाहूंच्या शिकवणुकीचं सार

Next Post

छत्रपती शाहूंच्या शिकवणुकीचं सार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.