शरीरसंपदेचे जतन आणि पॉवरलिफ्टिंगसारख्या उपेक्षित खेळला महाराष्ट्रात आणि देशात यशोशिखरावर नेणारे द्रोणाचार्य म्हणून क्रीडाजगतात ओळखले जाणारे, तन, मन आणि धनाने पूर्ण ६० वर्षे पॉवरलिफ्टिंग आणि व्यायामक्षेत्राची अविरत सेवा करणारे पॉवरलिफ्टिंग महर्षी मधुकर दरेकर यांनी नुकताच या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८३व्या वर्षातही या ‘आयर्नमॅन’ची शरीरसंपदा विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी होती. पण अखेर या खेळातील गलिच्छ राजकारणाचा धसका दरेकर सरांनी घेतला आणि त्याच धक्क्याने त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे जाणे क्रीडाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे. शरीरसौष्ठव आणि पॉवरलिफ्टिंग या खेळासाठी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत झटणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपल्याने अवघ्या पॉवरलिफ्टिंग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग खेळात हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार करणार्या मधुकर दरेकर सरांचे अकस्मात जाणे त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका देणारेच ठरले. कारण त्यांना आपल्या या महागुरूंचे अंतिम दर्शनही मिळाले नाही. या वेदनेने दरेकर सरांचे अनेक शिष्य आजही त्यांची आठवण काढून ढसढसा रडत आहेत. आपल्याला घडवणारा हा महात्मा हे जग सोडून गेलाय यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये.
खेळाच्या जिल्हा, राज्य, देश आणि विदेशातील प्रसार आणि प्रचार यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. गोरगरीब विद्यार्थ्यांनाही या खेळाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनेकांना मोफत प्रशिक्षण तर दिलेच, वर स्वतःच्या खिशाला चाट देत आर्थिक मदतही दिली. सुरुवातीला खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, प्रशासक आणि महासंघाचे पदाधिकारी अशा भूमिका दरेकर यांनी ६० वर्षे यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांच्यामागे त्यांचा पॉवरलिफ्टिंग आणि व्यायाम प्रशिक्षणाचा वारसा पुढे न्यायला त्यांच्या मानसकन्या आणि आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर कल्पना सावंत स्वतःची पोलीस दलातील नोकरी सोडून तयार झाल्या आहेत. दरेकर सरांचे व्रतस्थ जीवन पाहता त्यांना त्याच्या महान कार्याच्या बदल्यात सरकारदरबारी योग्य मानमरातब मिळाला नाही. पण खेळाचा विकास हा एकच ध्यास डोळ्यापुढे ठेवून दरेकर सर ६० वर्षे कार्य करीत राहिले आणि अखेर पॉवरलिफ्टिंग संघटनांतील उभी फूट पाहून व्यथित झालेल्या सरांनी या फुटीचा धसका घेऊन गोरेगाव येथील निवासस्थानी आपला देह ठेवला. त्यांच्या या दुःखद अंतानंतर तरी पॉवरलिफ्टिंग प्रशासकांनी आपले सर्व मतभेद आणि मतभेद विसरून एकजूट करावी हीच या म्हण क्रीडासेवकाला आणि महर्षीला आता खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
शरीरसौष्ठव आणि व्यायाम क्षेत्रात एक आदरणीय आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून दरेकर सरांना ओळखले जात होते. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी शिष्यांना शरीर सुदृढ राखण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन केले होते. वयाच्या ८०व्या वर्षानंतरही पिळदार शरीरयष्टीने ते सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे. शरीरसंपदा कमावण्यासाठी उत्तेजक अथवा स्टेरॉईड्सचा वापर करू नका असे ते शिष्यांना आग्रहाने सांगायचे. मुंबईतील ग्लॅक्सो लॅबोरेटरीजमध्ये ३४ वर्षे सेवा केल्यावर दरेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत अवघे आयुष्य व्यायाम, पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव क्षेत्राच्या विकासासाठी वाहिले होते. सुमारे ६० वर्षे त्यांनी या क्षेत्रात राज्य आणि देशाला अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पदके मिळवून देणारे हजारो खेळाडू घडवले.
महिलांना पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षण देण्याचा उपक्रम १९८३मध्ये त्यांनी प्रथमच सुरु केला होता. त्याचेच फलित म्हणून आज महाराष्ट्राच्या अनेक महिला पॉवरलिफ्टर्स जगभरात देशाचे नाव उज्वल करीत आहेत. जिगरबाज खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि प्रशासक असा त्यांचा प्रवास युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाराच आहे. महानगरपालिका शाळांतून मोफत प्रशिक्षण देण्याच्या दरेकर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले होते.
खेळाडू म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंगमध्ये अभिमानास्पद यश मिळून देणार्या मधुकर दरेकर सरांनी आपल्या आयुष्यातील तासनतास या खेळाला अर्पण केला. खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्राला दिलेले बहुमूल्य योगदान न विसरता येणारे आहे. त्यामुळेच पॉवरलिफ्टिंग आणि मधुकर दरेकर असे समीकरणच बनले. या खेळातील त्यांची कामगिरी नव्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारीच आहे.
पॉवरलिफ्टिंग खेळ त्यांच्या रक्तातच जणू भिनला होता. प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत सरांनी महाराष्ट्राला एकाहून एक सरस खेळाडू दिले. या खेळाडूंची गणतीही करता येणार नाही. त्यातील अनेक खेळाडूंना श्री शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात नागेश पुजारी, संदीप सावंत, अनंत चाळके, उद्देश शिंदे, संतोष बुटे, मनोज मोरे, तुषार दरेकर, राजेश कामठे या पुरुष खेळाडूंचा तर अलका कुलकर्णी, रक्षा महाराव, विजया नर, कल्पना सावंत, निशा साटम, स्नेहांकिता वरूटे, सोनाली गिते या महिला खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या या शिष्यांनी राष्ट्रीयच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत आपल्या खेळाची चमक दाखवली आहे.
पॉवरलिफ्टिंगसारख्या उपेक्षित खेळाला दरेकर सरांचा परिसस्पर्श झाला आणि हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात प्रकाशझोतात आला. त्यानंतर या खेळाने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत अन्य राज्यांतही पाय रोवले. पाहता पाहता विदेशांतही हा खेळ पोहोचला. एखाद्या व्रतस्थ ऋषींप्रमाणे दरेकर सरांनी या खेळाची खूप मोठी सेवा केली. रत्नागिरीतील कशेडीसारख्या छोट्या गावातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या सरांनी जिद्द, मेहनत, चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर उत्तुंग गरुडझेप घेतली. या खेळात त्यांनी घेतलेली मोठी भरारी खरोखरच कौतुकास्पद आणि नव्या पिढीतील खेळाडू व प्रशिक्षकांना प्रेरणा देणारीच आहे.
वयाच्या १२व्या वर्षी शिक्षणासाठी दरेकर मुंबईत आले. मोठ्या बहिणीच्या घरी राहून त्यांनी शिक्षण आणि व्यायाम दोन्ही क्षेत्रांत मेहनतीने यश मिळवले. सर राहात असलेल्या परळ भागात त्या काळात देशी खेळांचा प्रभाव मोठा होता. त्यामुळेच ते व्यायामक्षेत्राकडे वळले. सातवीपर्यंत शिक्षण महापालिका शाळेत घेतल्यावर ते आर. एम. भट शाळेत दाखल झाले. तिथेच परळच्या प्रसिद्ध सोशल सर्विस लीगशी त्यांचे ऋणानुबंध जुळले, ते आयुष्यभर टिकले. शरीरसंपदा कमावल्यावर त्यांनी १८ ऑगस्ट १९६४ रोजी राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर त्यांनी वेटलिफ्टिंगमध्ये आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके पटकावली. त्यांची ही क्रीडासाधना वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत अखंडितपणे सुरु राहिली. १९६८मध्ये दरेकर सरांनी दिवंगत टी. व्ही. हरिहर आणि दिवंगत ए. के. बॅनर्जी यांच्या सहकार्याने पॉवरलिफ्टिंग खेळाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात स्ट्रेंथ लिफ्ट या नावाने स्कॉटिंग, बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट या नावाने वजन उचलायच्या वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या. हे तिन्ही क्रीडाप्रकार एकत्र करून सरांनी पॉवरलिफ्टिंग हा नवं खेळ सुरु केला. त्यानंतर ‘वन गेम, वन फेडरेशन, ही संकल्पना उदयास आली. १९७७ साली हिंदुस्थानी पॉवरलिफ्टिंग महासंघाची स्थापना झाली. त्यात सिंहाचा वाटा दरेकर सरांचा होता.
दरेकर सरांनी अनेक खेळाडूंना मोफत प्रशिक्षण आणि संकटकाळी आर्थिक मदत करीत उच्चपदावर नोकरी मिळवण्यास मदत केली आहे. त्यातील एक इंडिगो एअरलाइन्सचे वैमानिक कवलदीप सिंग सरांच्या निधनाचे वृत्त कळतच लहान मुलांसारखे ढसढसा रडले. आपल्याला शून्यातून यशोशिखरावर नेणारा गुरु आज या जगात नाहीय ही भावनांचा त्यांना सहन झाली नाही. सर माझ्यासाठी आई, वडील, गुरु आणि परमेश्वरच होते असे त्यांनी त्यांनी सांगितले. हेच कंवलदीप इंडिगोचे फ्लाईट मुंबईत लॅन्ड झाले की रिक्षा करून सरांच्या भेटीसाठी थेट गोरेगाव येथील त्यांच्या जिममध्ये यायचे. सरांना पाहिले की ईश्वराचंच दर्शन झाले असे त्यांना वाटायचे.सरांच्या प्रत्येक वाढदिवसाला कंवलदीप त्यांना लहान मुलासारखे खांद्यावर बसवून पूर्ण जिममध्ये अथवा सरांच्या निवासस्थानभर फिरवायचे. हा आपल्यासाठी स्वर्गीय आनंदाचा क्षण असल्याचे त्यांना वाटायचे.
पॉवरलिफ्टिंग हा दरेकर सरांचा श्वासच बनला होता. त्यामुळे आयुष्यातील अन्य सर्व गोष्टींना त्यांनी दुय्यम स्थान दिले. सरांचे या क्षेत्रातील हे प्रचंड कार्य पाहता ‘झाले बहू, होतील बहू, परी या सम हाच’ ही उक्ती त्यांना तंतोतंत लागू पडते. पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसंवर्धन या खेळांतील सरांच्या कार्याची नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंद करावी लागेल. त्यांच्या या अजोड आणि बहुमूल्य कामगिरीची आठवण महाराष्ट्र कदापि विसरू शकणार नाही.