‘तंबाखू खरंच कॅन्सरकडे नेतो हे निर्विवाद आहे. सिगारेटच्या पाकिटावर छापलेले विद्रुप चेहेरे पाहूनही लोक ती का पितात हे मलाही कळत नाही. पण केवळ तंबाखूवर दोषारोप होतोय हे बरोबर नाही. एकट्या धूम्रपानानेच सगळं होतंय हे पटत नाही. कॅन्सर होण्यामागे इतरही काही कारणं असली पाहिजेत.’ स्वाती स्वतःशीच पुटपुटल्यासारखं बोलली. स्वातीच्या चेहेर्यावरचे भाव ओळखून दुर्गा म्हणाली, वजन वाढलं की अनेक प्रकारचे कॅन्सर उद्भवू शकतात.
– – –
दुर्गाच्या मनातला प्रश्न ओळखून मी बोलू लागलो, ‘खरंच असं काही करता येईल का? कॅन्सर होऊ नये यासाठी काही करणं शक्य आहे का? असे प्रश्न कोणालाही पडतील. वैद्यकशास्त्र देखील या प्रश्नांचा गेली कित्येक वर्षं मागोवा घेतंय. पण या प्रश्नांची नीट उत्तरं या घडीला तरी छातीठोकपणे देणं शक्य नाही. कॅन्सर हा जीन्समध्ये झालेल्या बदलांचा आजार आहे. जीन्सच्या आजारांचं एक वैशिष्ट्य असतं. व्यक्तीव्यक्तीगणिक त्याच्या स्वरूपामध्ये चिक्कार तफावत असते. म्हणून जीन्सच्या आजारांविषयी नेमकं भाकीत करणं शक्य नसतं. या घडीला तरी इतकंच सांगता येतं की ज्या गोष्टींचा कॅन्सर होण्याशी संबंध आहे त्या दूर ठेवल्या तर कॅन्सर होण्याची शक्यता कमी करता येते.
‘दुसरी तितकीच महत्वाची बाब म्हणजे सजग राहणं. कॅन्सर एका पेशीपासून सुरू होतो आणि मग त्या एका पेशीमध्ये सतत विभाजन होत राहून पुढे त्या पेशींची संख्या प्रचंड वाढते. साहजिकच पेशीसंख्या कमी असेल तर त्यावर विजय मिळवणं आणि त्या पेशी मुळापासून उपटून काढणं शक्य असतं. त्यामुळं निदान ‘लवकर’ होण्याला खूप महत्व असतं. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर रोजच्या आयुष्यात केलेल्या काही महत्वाच्या बदलांनी कॅन्सर व्हायची भीती कमी करता येते आणि लवकर निदान झालं तर कॅन्सरवर मात करता येते.’
इतका वेळ सगळं ऐकत असलेली दुर्गा स्वातीला समजावयाला लागली, ‘स्वाती, यात दोन गोष्टी आहेत. जेव्हा आपण आजार होऊ नये म्हणून पावलं उचलतो, तेव्हा त्याला ‘प्रायमरी प्रिव्हेंशन’ म्हणतो. जसं पोलियो होऊ नये म्हणून आपण लस घेतो किंवा वजन वाढू नये म्हणून खाण्यात सांभाळतो व व्यायाम करतो तसं.
कॅन्सरच्या बाबतीत ‘प्रायमरी प्रिव्हेंशन’ला मर्यादा आहेत असं याला सांगायचं आहे. आपण या बाबतीत कितीही काळजी घेतली तरी कॅन्सर होणारच नाही अशी खात्री देता येत नाही, परंतु प्रमाण मात्र नक्कीच कमी करता येतं ही आजची परिस्थिती आहे. ‘याउप्पर असतं ते ‘सेकंडरी प्रिव्हेन्शन’ किंवा दुय्यम प्रतिबंध. आजार झाल्यानंतर त्याचा कमीतकमी त्रास व्हावा या दृष्टीनं उचललेली पावलं. कॅन्सरच्या बाबतीत प्राथमिक प्रतिबंध तितकासा प्रभावी झाल्याचं दिसत नसल्यानं हा पर्याय महत्वाचा ठरतोय.’
दुर्गानं पाण्याचा घोट घेतला आणि पुढे सुरू ठेवलं, ‘मात्र कॅन्सर होऊ नये या दृष्टीनं काही महत्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत यावर अनेक तज्ज्ञांचं एकमत झालंय. यात कॅन्सरशी सगळ्यात नातं जोडलं गेलंय ते धूम्रपानाचं. एकंदरीतच तंबाखूचं सेवन कॅन्सरला आमंत्रण देतो हे निर्विवाद सिद्ध झालंय. फुफ्फुस, श्वसनसंस्थेशी निगडित घसा, तोंड असे इतर अवयव, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, मोठं आतडं, मूत्रपिंड, मूत्राशय अशा अनेक इंद्रियांच्या कॅन्सरमध्ये तंबाखूचा सहभाग असल्याचं आढळलं आहे. आपल्याकडे तंबाखू चघळणं तसंच तंबाखूची मशेरी वापरणं मोठ्या प्रमाणात दिसतं. तंबाखू घालून पानही लोक खातात, तपकीर ओढतात. गुटखा खातात. सगळ्याचा अर्थ एकच- तंबाखूचे सेवन, मग ते कुठल्याही मार्गानं असेना, धोकादायकच.
‘धूम्रपान केल्यानं कॅन्सरशिवाय फुफ्फुसांचे आणि हृदयाचे आजार होतात हे वेगळं. त्यामुळं तंबाखू आपल्या आयुष्यातून हद्दपार करणं कॅन्सरच काय इतर अनेक आजार न होण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे.’ मी मध्येच तोंड घातलं.
‘तंबाखू खरंच कॅन्सरकडे नेतो हे निर्विवाद आहे. सिगारेटच्या पाकिटावर छापलेले विद्रूप चेहेरे पाहूनही लोक ती का पितात हे मलाही कळत नाही. पण केवळ तंबाखूवर दोषारोप होतोय हे बरोबर नाही. एकट्या धूम्रपानानेच सगळं होतंय हे पटत नाही. कॅन्सर होण्यामागे इतरही काही कारणं असली पाहिजेत,’ स्वाती स्वतःशीच पुटपुटल्यासारखं बोलली. स्वातीच्या चेहेर्यावरचे भाव ओळखून दुर्गानं पुढच्या संभाषणाला सुरुवात केली.
‘होय. इतर काही कारणं आहेत की. वजन वाढलं की अनेक प्रकारचे कॅन्सर उद्भवू शकतात. शेवटी लठ्ठपणा म्हणजे काय? वाढणंच ना? हे वाढणं आपोआप होत नाही. शरीरातल्या काही हॉर्मोन्सचा काही रसायनांचा हात त्यामागे असतो. ही रसायनं वाढीला उत्तेजन देतात. त्यांच्यामुळे स्थूल पातळीवर वजन वाढतं, तर सूक्ष्म पातळीवर कॅन्सरसदृश परिस्थिती बनत असावी असा कयास आहे. लठ्ठपणा आणि गर्भाशय, पित्ताशय, गर्भाशयाचं तोंड (सर्विक्स), मूत्रपिंड, थायरॉईड, रक्ताचा कॅन्सर यांचं नातं असल्याचं स्पष्टपणे कळलं आहे. स्थूलपणा जितका अधिक तितके या इंद्रियांचे कॅन्सर उद्भवण्याचं प्रमाण अधिक. वजन वाढल्याबरोबर मोठं आतडं, लिव्हर, स्तनाचे कॅन्सर होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणून वजन काबूत राखणं यालाही कॅन्सरपासून दूर राहण्याच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे. फक्त एकाच बाबतीत लठ्ठपणाचा फायदा दिसतो. तो म्हणजे प्रोस्टेटचा कॅन्सर.
‘काही रोगजंतूच्या प्रादुर्भावाचा (इन्फेक्शन्सचा) कॅन्सरशी संबंध जोडला गेला आहे. हिपॅटायटिस-बी हा विषाणू लिव्हरमध्ये इन्फेक्शन करतो. या विषाणूंनी शरीरात प्रवेश केला की लिव्हरचा कॅन्सर व्हायची भीती वाढते. लैंगिक संबंधातून शरीरात प्रवेश करणारा पॅपिलोमा व्हायरस गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतो. सुदैवानं या दोन्ही आजारांसाठी लस उपलब्ध आहे. लस घेऊन या आजारांपासून आणि पर्यायाने त्यांच्यापासून होणार्या कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करता येईल.’
मध्येच मला एक मुद्दा सुचला. त्याचं विस्मरण होऊ नये म्हणून हातानेच दुर्गाला थांबण्याचा इशारा करून मी बोलायला सुरुवात केली, ‘एक गोष्ट आणखी करता येईल. त्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. ती म्हणजे स्वतःची आरोग्याविषयीची ‘फॅमिली ट्री’ बनवून घेणं. तुमचे फॅमिली डॉक्टर ती तुम्हाला बनवून देतील. यात तुमच्या पूर्वजांच्या आजारांची कुंडली मांडलेली असते. त्यांचा मृत्यू कोणत्या कारणाने कोणत्या वयात झाला, ते नमूद केलेलं असतं. फायदा असा की अनेक अनुवांशिक आजारांचा छडा लागण्याच्या दृष्टीनं हा प्रकार उपयोगी पडतो. त्यात कॅन्सर देखील आला. एखाद्या कुटुंबामध्ये, एखादं जीन कॅन्सर होण्याला अनुकूल असेल तर त्याचा सहज छडा लागतो. कारण त्या कुटुंबात एकापेक्षा अधिक व्यक्ती त्या कॅन्सरला बळी पडलेल्या असतात. सरासरीच्या मानाने कमी वयात त्यांना तो विशिष्ट कॅन्सर झालेला असतो. मग कुटुंबाच्या इतर सभासदांच्या जीन्सची तपासणी करून निदान करता येतं, कुटुंबातल्या इतरांवर बारीक लक्ष ठेवता येतं. आणि कर्मधर्मसंयोगानं कॅन्सर झालाच तर तो लवकर कळल्यामुळं उपचार सोपे होतात. म्हणून आरोग्याची ‘फॅमिली ट्री’ असणं गरजेचं आहे. त्यात कॅन्सरव्यतिरिक्त कमी वयात हृदयरोग होण्याची शक्यता, काही आनुवंशिक आजार देखील समजतात.’
आता स्वातीचा चेहेरा जरासा बदलला. काहीतरी नवी टीप मिळाल्यानं ती खुलली, ‘पण अनेकदा आपण या गोष्टीमुळं कॅन्सर होतो, त्या गोष्टींमुळं होतो असं ऐकतो त्याचं काय?’
‘बरोबर आहे तुझं. अनेक रसायनांमुळं कॅन्सर होतो असं दिसतं खरं. यातली काही रसायनं निर्विवाद कॅन्सरशी जोडली गेली आहेत तर काहींवर मजबूत संशय आहे. त्यामुळं अधूनमधून पेपरचे रकाने अशा बातम्यांनी भरलेले दिसतात. अर्थात ही रसायनं किती प्रमाणात शरीरात गेली की प्रश्न निर्माण होतो याचे आडाखे आहेत.’
‘हो मी जपानला गेले होते तेव्हा हिरोशिमाला जाऊन आले. तिथं दुसर्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकला गेला होता. त्यातून निघालेल्या अणु उत्सर्जनानं अनेकांना कॅन्सर झाल्याचं वाचलंय मी,’ स्वातीच्या बोलण्यात नवीन उत्साह संचारल्यासारखं दिसत होतं.
‘तू कधी एक्स रे काढणार्या टेक्निशियनना पाहिलं आहेस?’
स्वातीनं होकारार्थी मान डोलावली.
‘त्यांच्या कोटावर एक लहानसं यंत्र लावलेलं असतं. हे यंत्र त्या टेक्निशियनच्या शरीरात किती क्ष किरण गेले आहेत ते मोजतं. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त किरण शरीरात गेले तर कॅन्सरचा धोका वाढतो म्हणून इतकी काळजी घेतली जाते. क्ष किरणांचा शोध लावणार्या मॅडम क्युरींचा मृत्यूदेखील क्ष किरणांच्या अतिरेकानं झाला होता हे तुला सांगितलंच आहे.’
‘आणखी काय? इतरही काही गोष्टी कॅन्सरला निमंत्रण देतात का?’ आता स्वाती उतावीळ झाली होती.
‘सूर्यकिरणात असलेल्या अतिनील किरणांमुळे मेलॅनोमा नावाचा त्वचेचा कॅन्सर होतो असं आढळून आलं आहे. गोरी त्वचा असलेल्या लोकांमध्ये तो अधिक प्रमाणात दिसत असल्यानं आपल्या दृष्टीनं हा प्रश्न तितकासा गंभीर नाही. कारण मुळात आपण युरोपियन लोकांइतके गोरे नाही. आपल्याला उन्हाचा तितकासा त्रास होत नाही. अर्थात, आपल्याला मेलॅनोमा होतच नाही या भ्रमात राहण्यात अर्थ नाही. सुदैवाची गोष्ट इतकीच की त्वचा आपण सहज पाहू शकतो. त्यामुळं किमान या बाबतीत लवकर निदान होणं शक्य आहे. बर्याच लोकांच्या त्वचेवर काळा तीळ असतो. तिळावर लक्ष ठेवता येईल. त्याच्या रंगरूपात झालेला लहानसा फरक सहज समजू शकेल. तिळाचा आकार बदलला, अचानक मोठा झाला, एकाचवेळी अनेक रंगांच्या छटा त्यात दिसायला लागल्या की सावध व्हायला हवं. डॉक्टरांना दाखवायला हवं.’
‘मला तुम्हाला एक शंका विचारायची आहे. कुठल्यातरी जीन्सचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून हॉलिवुडच्या एका तारकेने आपले दोन्ही स्तन काढून टाकले. याचा खरंच फायदा होतो का?’ स्वाती उत्तर ऐकायला आतुर दिसली. चित्रपट तारे-तारका म्हटल्या की कोणाचीही उत्सुकता वाढतेच.
‘बरोबर ऐकलं आहेस तू. बीआरसीए-१, बीआरसीए-२ या जीन्समध्ये बदल झालेले दिसले की स्तन किंवा अंडाशय काढून टाकण्याचा प्रघात हल्ली पडतो आहे. पण याने फायदा होतो की नाही याबद्दल अजून संभ्रम आहे. असं केल्यानं कॅन्सरची भीती ५० टक्के कमी होते असं काही अभ्यास सांगतात. पण जीन्समध्ये अशा प्रकारचे बदल झालेल्या प्रत्येक स्त्रीला स्तन काढून टाकण्याची भलामण करायची वा कसं हे ठामपणं सांगता यावं अशी परिस्थिती या घडीला नाही.’
दुर्गालाही काहीतरी आठवलं असावं. तिनं बोलायला सुरुवात केली, ‘एकेकाळी कॅन्सरचं लवकर निदान व्हावं, प्राथमिक अवस्थेतच तो पकडला जावा, यासाठी खूप काही करण्याचा प्रघात होता. स्तनाच्या कॅन्स्ारसाठी स्वतःची स्वतःच केलेली नियमित स्तन तपासणी आणि मॅमोग्रॅम सांगितला जायचा. चाळीस वर्षांवरच्या सर्वच स्त्रियांनी वर्ष दोन वर्षातून एकदा मॅमोग्रॅम करावा असं सांगितलं जात असे. आता यात बदल करण्यात आला आहे. थोडं अधिक खोलात जाऊन पुरावे तपासले गेले आहेत. आपल्याकडेही टाटा कॅन्सर सेंटरशी निगडित संस्थांमध्ये प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजीचा विभाग असतो. यात कुठल्या तपासण्या केल्यानं कॅन्सर लवकर पकडला जाईल याचं मार्गदर्शन केलं जातं..’
मी धागा पकडला आणि पुढचं सांगायला सुरुवात केली, ‘काहीही कारण नसताना वजन कमी होणं, औषधं करूनही बरेच दिवस खोकला बरा न होणं, आताच सांगितल्याप्रमाणे त्वचेवर असलेल्या तिळाने अचानक रंग बदलणं अशा काही लक्षणांची त्वरित दखल घेणं खूपच आवश्यक असतं. तुटक्या दातावर त्वरित उपचार करून घ्यायला हवा. वरकरणी फारशा महत्वाच्या न वाटणार्या गोष्टींमुळं, तुटलेल्या आणि टोकदार दातामुळं कित्येकांना जिभेचा कॅन्सर झालेला आहे. म्हणूनच आरोग्य, विशेषतः दातांची निगा राखणं आवश्यक आहे.
‘थोडंसं विचित्र वाटेल पण शौचातून रक्त जाणं किंवा शौच काळ्या रंगाचं होणं यावर लक्ष ठेवता येईल. आतड्यातून अकारण रक्तस्त्राव होणं, अन्नसंस्थेत सगळं आलबेल नाही याचं लक्षण आहे. आतड्यांमध्ये कॅन्सरमुळं (किंवा अन्य काही कारणाने) जखम झाली की त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. हे रक्त शौचामध्ये मिसळून जातं. आतड्यांमधले वेगवेगळे स्त्राव रक्तावर रासायनिक प्रभाव टाकतात. त्यामुळं शौच काळ्या रंगाचं दिसतं. साधं शौचकूपात डोकावलं तरी शौचाचा रंग कळेल.
‘पाळीच्या बाबतीत देखील अशी सूचना देता येईल. स्त्रीची पाळी बंद होताना कधी कधी ती अनियमित होते. पण बंद होऊन वर्ष उलटून गेल्यावर पुन्हा रक्तस्त्राव होण्याचं काहीही कारण नसतं. त्यानंतर त्या जागेतून झालेला थोडाही रक्तस्त्राव संशयाला पात्र ठरतो. अगदी ‘स्पॉटिंग’कडेही दुर्लक्ष करणं योग्य नसतं. झालं तर डॉक्टरांना दाखवायला हवं. गर्भाशयाच्या कुठल्या भागातून रक्त आलंय याचा छडा लावायला हवा. पाळी बंद होऊन जितका अधिक काळ उलटून गेल्यावर रक्तस्त्राव तितकी संशयाला जागा अधिक असं म्हणायला वाव आहे.
‘आपण आत्ताच खोकल्याबद्दल बोललो. फुफ्फुसांच्या किंवा गळ्याच्या कुठल्याही समस्येनं येणारा खोकला दीर्घकाळ चालत नाही. पण दुर्दैवानं खोकला बराच काळ टिकून असला, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलं तर चिंता करायला हवी. विशेषतः धूम्रपान करणार्या व्यक्तींनी जागरूक राहायला हवं. अर्थात आपल्या देशात अजूनही क्षयरोग म्हणजे टी बी हे जास्त काळ चालणार्या खोकल्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे. त्यात रक्तदाबासाठी दिल्या जाणार्या ‘एस इन्हिबिटर’ औषधानं येणार्या खोकल्याची भर पडली आहे. प्रदूषण सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. परंतु जेव्हा ही कारणं नसतील तेव्हा डॉक्टरी सल्ला आवश्यक आहे इतकं नक्की.
‘एरवी डोकेदुखी सहसा गंभीर नसते. पण तेच डोकं चोवीस तास दुखायला लागलं किंवा दिवसागणिक वेदना वाढत असली की त्याकडे दुर्लक्ष करून फायदा नाही. मेंदूत वाढणारी गाठ हे त्याचं कारण असू शकतं. मुळात ही डोकेदुखी अचानक उद्भवत नाही. हळूहळू वाढत जाते. सुदैवानं इतर अनेक तितक्याशा गंभीर नसलेल्या आजारांमुळे डोकं दुखत असतं. पण चोवीस तास चालणारी डोकेदुखी गंभीर असायची शक्यता लक्षात ठेवायला हवी.
आता दुर्गाला राहवेना. तिनं घोडं पुढं दामटलं, ‘तिसरी पातळी असते कॅन्सर कळल्यावर ताबडतोब उपचारांकडे वळण्याची. इथेही काहीजण उगीचच वेळ काढत बसतात. ज्या उपचारांबद्दल सुतराम शास्त्रीय पुरावा नाही त्या उपचारांची कास धरत बसतात. अशाने आजार गंभीर होऊन बसतो. वेळेवर केलेले काही इलाज खूपच उपयुक्त ठरतात असं दिसून आलं आहे. उदाहरणार्थ गर्भाशयाच्या मुखाच्या भागात कॅन्सर दिसला किंवा तिथल्या पेशींमध्ये कॅन्सरसदृश बदल झालेले दिसले की पुढचे प्रश्न टाळण्यासाठी विद्युतप्रवाहाचा वापर करून ऑपरेशन करता येतं. तो भाग ‘कॉटरी’ वापरून, एका विजेरी उपकरणाचा वापर करून, काढून टाकता येतो.
‘अॅस्पिरिन घेतल्यावर मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरला अटकाव होतो असं काही अभ्यास सांगतात. पण सरसकट अॅस्पिरिन घेण्याची भलामण करणं योग्य नाही. कारण त्यामुळं शरीरात अनेक ठिकाणी, खास करून आतड्यांमध्ये, रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. म्हणून त्यातून मध्यममार्ग काढला जातो. ज्यांना हृदयरोग व्हायची भीती आहे अशा ५० ते ६० वयोगटातल्या मंडळींना अॅस्पिरिन घेण्याचा सल्ला दिला जातो. (वाढत्या वयात रक्तस्रावाची भीती जास्त असते) अॅस्पिरिन हृदयासाठी देखील फायद्याचं असल्यानं त्यांना दुहेरी लाभ होतो.
‘कॅन्सरपासून वाचण्याची चौथी पातळी म्हणजे एकदा कॅन्सर उपचारानंतर बरा झाला की पुन्हा तो होऊ नये याची काळजी घेणं. यात अनेक गोष्टी करता येतात. त्या त्या प्रकारच्या कॅन्सरचा विचार करताना आपण याची अधिक माहिती घेऊच. पण उदाहरण म्हणून एक दाखला देता येईल. स्तनाच्या काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये टॅमोक्सिफेन नावाचं एक औषध बराच काळ दिलं जातं. स्त्री हॉर्मोन्समुळं उद्भवणार्या कॅन्सरना ते उत्तम प्रकारे काबूत ठेवतं.
‘एकंदरीत काय? सजगपणे पाठपुरावा केला गेला तर अनेक पातळींवर कॅन्सरला आडकाठी करता येणं शक्य असतं. फक्त छे, मला काय होणार हा विचार बाजूला ठेवला पाहिजे. कॅन्सरमध्ये दुखत खुपत नसल्यामुळं लहान सहान लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं ते होता कामा नये.’
—-
धूम्रपान सोडताना…
धूम्रपान वाईट हे अनेकांना पक्कं माहीत असतं. तरीही त्यांना ते सोडणं कठीण जातं. समाजातला धूम्रपानाचा सोस कमी व्हावा यासाठी देश आणि जग पातळीवर जोमानं प्रयत्न केले जातात. तंबाखूच्या उत्पादनावर भरपूर कर लावणं, त्याच्या वापरामध्ये असलेल्या धोक्याची कल्पना सामान्य नागरिकांना सतत देत राहणं अशा गोष्टी सुरूच असतात.
मागच्या शतकात हाती घेतलेल्या अशा कार्यक्रमांमुळं धूम्रपान करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे हे निश्चित. परंतु काही वेगळ्या प्रवृत्ती मूळ धरायला लागल्यात. पूर्वी आपल्याकडे धूम्रपान बहुतकरून पुरुष करायचे. तपकीर ओढणार्या, तंबाखूचं पान खाणार्या आणि तंबाखूची मशेरी लावणार्या स्त्रिया अगदीच नगण्य नव्हत्या. परंतु धूम्रपान करणार्या स्त्रियांकडे तेव्हा वेगळ्या नजरेनं पाहिलं जायचं. म्हणून त्या वाटेला जाणार्या स्त्रियांची संख्या कमी होती. आताशा सुशिक्षित तरुणीदेखील इकडे वळू लागल्या आहेत ही चिंताजनक बाब आहे. शिवाय गुटखा खाण्याचं प्रमाण खूप वाढलंय. समाजातल्या जवळपास सर्वच थरातली, वयातली मंडळी यात अग्रेसर आहेत. वाईट म्हणजे इथं लिंगभेद देखील राहिलेला नाही. स्त्रियादेखील मोठ्या प्रमाणात तंबाखूची पुडी ‘मावा’ म्हणून तोंडात रिकामी करायला लागल्या आहेत. आपल्याकडे तंबाखूची देवाण घेवाण हे प्रतिष्ठेचं समजलं जातं. मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याशिवाय यावर नियंत्रण मिळवणं शक्य नाही.
मुळात कुठल्याही प्रकारे तंबाखूचा वापर शरीराला वाईटच. तंबाखू हा सगळ्यात उपद्रवी पदार्थ आहे. धूम्रपान करणार्या तीनातल्या एका व्यक्तीला कुठला ना कुठला आजार होऊ शकतो. त्यात हृदयरोग सर्वात पुढे आहे, पण कॅन्सर देखील फार मागे नाही. विशेष म्हणजे हा कॅन्सर केवळ फुफ्फुसं किंवा श्वसनमार्गापुरता मर्यादित नाही. अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, मोठं आतडं, मूत्राशय अशा अनेक इंद्रियांचा कॅन्सर धूम्रपानामुळं होऊ शकतो. इथं हेही लक्षात घेतलं पाहिजे की कॅन्सर व्हायला धूम्रपान स्वतःच केलं पाहिजे असं नाही. धूम्रपान करणारी व्यक्ती आसपास असली तरी त्यांनी बाहेर टाकलेल्या धुरानेही तो होऊ शकतो.
तंबाखूचा वापर थांबवण्यासाठी केवळ उपदेश करून भागणार नाही, काही ठोस पावलं उचलावी लागतील. पहिलं म्हणजे सिगारेटकडे माणसं साधारण कोणत्या वयात वळतात हे लक्षात घेतलं पाहिजे. ही सुरुवात बहुदा अल्प वयात होते. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या काळात लागलेली सवय मग सुटता सुटत नाही. म्हणूनच या मुलांवर लक्ष केंद्रित करणं आलं. समुपदेशन करून, सवयी बदलण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करून, धूम्रपानाला पर्याय सुचवून वा प्रसंगी औषधं देऊन धूम्रपान बंद करता येतं हे समजून वेळीच डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा.
धूम्रपान हे व्यसन आहे हे मान्य करणं ही महत्वाची पायरी झाली. आपलं काहीतरी चुकतंय आणि त्यावर मात करायलाच हवी असा ठाम निश्चय केल्यावर तो सोडणं थोडं सोपं जातं. मग प्रत्यक्ष ‘सोडणं’ आलं. काही लोक थोड्या काळासाठी सोडतात, कालांतरानं पुन्हा सुरू करतात. म्हणजे सोडल्यानंतर ‘त्याकडे पुन्हा न वळणं’ हे तिसरं पाऊल देखील महत्वाचं झालं. धूम्रपान कमी करण्यावर सगळ्यांनीच ठाम असलं पाहिजे. कारण ही एक गोष्ट करून आपण कॅन्सरपासून वाचू शकतो हे अनेकवार सिद्ध झालं आहे. धूम्रपान सोडण्यात साधारण कोण यशस्वी होतं याचा धांडोळा घेतला की चांगले अंदाज बांधता येतात. जे दिवसाला भरपूर सिगारेट ओढतात त्यांना ती सोडणं कठीण जातं. हळूहळू कमी करणं ही कल्पना चुकीची असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं एका क्षणात ती सोडायला हवी. पुढचे काही दिवस मनावर नियंत्रण ठेवलं की जमून जाईल. कारण धूम्रपान न करता जितके दिवस अधिक काढता येतील तितका ती सोडण्याचा संकल्प टिकतो. हा संकल्प दुसर्याच्या सांगण्यावरून करण्यापेक्षा स्वतःहून ठरवला तर यशाची शक्यता जास्त. काही धार्मिक बाबतीत, जसे रमजानचे उपास करताना, माणसे दिवसभरात जराही धूम्रपान करत नाहीत. याचा उपयोग करून त्यांनी ते कायमचं सोडावं असा आग्रह धरता येईल. प्रसंगी डॉक्टरांची मदत घ्यायलाही लाजू नये. अनेक जण हार्ट अटॅक आला किंवा कॅन्सर झाल्यावर तंबाखू सोडतात. ही नंतरची उपरती कामाची नाही.
कमी धूर निघणारी ‘लो टार’ सिगारेट धोकादायक नाही हा भ्रम काढून टाकायला हवा. धूम्रपान किती धोकादायक हे धूर किती खोलवर फुफ्फुसात शिरतो यावर अवलंबून असतं. लो टार सिगारेटमध्ये तलफ भागवायला श्वास फार खोलवर खेचला जातो. म्हणजे एकंदर परिणाम वाईटच. इलेक्ट्रॉनिक सिगारेट एकप्रकारे धूम्रपानाचं उदात्तीकरण करते. इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या सवयीकडून प्रत्यक्ष धूम्रपानाकडे वळणार्यांचं प्रमाण विलक्षण आहे हेसुद्धा लक्षात घेऊन तेही टाळायला हवं.
आपल्याकडे सिगारेटइतकंच इतर मार्गानं तंबाखूचं सेवन होतं. गुटका, मशेरी, तपकीर, नुसता तंबाखू चघळणं, पानात घालून केलेला तंबाखूचा वापर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तंबाखू वापरला जातो. हे थांबवायला हवं. तंबाखूतली रसायनं कॅन्सरला निमंत्रण देतात हे तरुण वयातच मनावर खोलवर बिंबवायला हवं. तंबाखू खाण्याने आणखी एक धोका असतो. तोंड खूप अस्वच्छ राहतं. दात खराब होतात. खराब, तुटक्या दातांमुळं जिभेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. पान किंवा तंबाखूची चिमूट तोंडात धरून ठेवणं हे देखील तोंडाच्या कॅन्सरला दिलेलं निमंत्रण ठरतं. म्हणून एकंदरीतच तंबाखूचा वापर टाळायला हवा.
गुटका खाणार्यांच्या तोंडाच्या आतल्या त्वचेत फायब्रोसिस व्हायला लागतं. तिथल्या त्वचेचा लवचिकपणा कमी व्हायला लागतो. तोंड पूर्णपणे उघडणं कठीण होऊन बसतं. असलं काही दिसायला लागलं म्हणजे समजावं आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे.