□ शिवसेनेची संभाजी ब्रिगेडबरोबर युती, सर्व निवडणुका एकत्र लढणार.
■ अरे वा, शिवरायांची आणि शंभूराजांची ताकद एकत्र येणार… मग महाराष्ट्राचं भाग्य पालटायला काय उशीर?
□ साईबाबांच्या दरबारात राडा, फुलं, हार, नारळ बंदीच्या विरोधात विक्रेत्यांचा उद्रेक.
■ कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतरही इथे त्यांचा बाऊ करून नक्की कोण कसली पोळी भाजतंय?
□ ‘तारीख पे तारीख’कडे लक्ष देऊ शकलो नाही, सॉरी- मावळते सरन्यायाधीश रमण्णा यांची दिलगिरी.
■ शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असं म्हणतात, ही परिस्थिती बदलण्याची धमक ज्यांच्यात आहे, अशा मोजक्या माणसांपैकी तुम्ही होतात. पण, तुम्हीही ‘जस्टिस डिलेड’चीच परंपरा पाळलीत?
□ ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना टाडा लागला, तरी ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत. गद्दारांना क्षमा नाही, या विधानावरून माघार घेतली नाही. – खा. राजन विचारे यांचा टोला.
■ नेता फक्त सिनेमा काढण्यापुरता, पोस्टरवरची जागा भरण्यापुरता. त्यांचे विचार आणि तेज आत्मसात झाले असते, तर गुवाहाटी व्हाया सुरत असे पलायन केले असते का नेभळटांनी?
□ गणेशभक्तांनो, रत्नागिरीत १३ किलोमीटर गचके खात कोकणात जा. त्या विभागातील १५ टक्के रस्ता खड्डेमय.
■ बाकीचा प्रवास तरी सुखाचा आहे की काय! गचके बसता बसता आचके देण्याची वेळ नाही आली म्हणजे मिळवली.
□ फेसबुक फ्रेंडशिप क्लबमध्ये समाविष्ट होऊन उच्चभ्रू महिलांबरोबर संबंध ठेवण्याच्या आमिषाने फसवणूक, तरुणीच्या नावाने काढलेल्या अकाऊंटच्या माध्यमातून फसवाफसवी.
■ असल्या अकाऊंटवर ज्यांचे फोटो असतात, त्या रंगरूपाच्या बायका आपल्यावर भाळतील असा कॉन्फिडन्स येतो कुठून या म्हादूंच्या अंगात?
□ देशात २१ विद्यापीठे बोगस, सर्वाधिक बनावट विद्यापीठे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात.
■ सगळ्या बनावट पदव्याही इथूनच निघतात की!
□ ५० हजार टिश्यू पेपर आणि ९० किलो तुरटीपासून साकारला बाप्पा, साकीनाक्याच्या मंडळाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव.
■ हळुहळू हा उत्सव लोकजागृतीकडे वळू लागला आहे पुन्हा, म्हणजे बाप्पांनी सद्बुद्धीच दिली म्हणायची.
□ तुमच्या चिठ्ठ्याचपाट्या आमच्याकडे आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दमबाजी.
■ नाक्यावरची भाषा विधिमंडळात, तीही मुख्यमंत्र्याच्या तोंडून… शिवाय ज्यांच्या स्वत:च्या चिठ्ठ्याचपाट्या इतरांच्या हाती आहेत, ते हा दम देतायत, हा केवढा मोठा विनोद!
□ १०० मजली बेकायदा इमारतही तुम्ही अधिकृत करणार का? राणेंच्या याचिकेवर हायकोर्टाचा मुंबई महानगरपालिकेला सवाल.
■ त्यांनी आता चंद्राला टेकणारा बंगला बांधला तरी तो ओक्केच असणार न्यायमूर्ती महोदय… जो ओक्के साबुन से नहाये, कमल सा खिल जाए…
□ मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती असलेल्या जीएसबी मंडळाने ३१६ कोटींचा विमा उतरवला… मंडप, भाविक, कार्यकर्ते आणि कर्मचारी कामगारांना संरक्षण.
■ दाखवेगिरीचे ढोल आणि डीजे कमी करून बाकीच्या मंडळांनीही याचं अनुकरण करायला हवं…
□ मुंडे महाजनांचा भाजप आता बांडगुळांचा पक्ष झालाय- माळीण दुर्घटनेतील आदिवासींच्या पुनर्वसनाचे लाखो रुपये लाटले गेल्याने भाजपच्याच माजी आमदाराचा संताप.
■ मुंडे महाजन कसले घेऊन बसला आहात, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंघटनेचा तरी पक्ष राहिला आहे का?
□ बोके आणि खोके याबद्दलच्या घोषणा झोंबल्याने शिंदे गटाकडून विरोधकांना शिवीगाळ, तुफानी धुमश्चक्री, धक्काबुक्की, हाणामारी.
■ वर्मावरच बोट ठेवल्यानंतर दुसरं काय होणार? पण उद्या मतं मागायला जनतेत जाल तेव्हा तीही तेच विचारणार आहे. तेव्हा कुणाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की कराल?
□ सिंधुदुर्गाचे उदय लळीत देशाचे ४९वे सरन्यायाधीश, महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी.
■ अभिनंदन! आता त्यांच्या नेतृत्त्वाखालील घटनापीठ महाराष्ट्राला आनंदाची बातमी कधी देते, ते पाहायचे…
□ शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या अर्जाला पाच दिवसांनंतरही परवानगी नाही, शिंदे गट मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत.
■ आणखी किती हसे करून घ्याल, झाली इतकी बेइज्जती पुरे नाही का झाली?
□ बिहारमध्ये सीबीआयचे तर झारखंडमध्ये ईडीचे छापे.
■ कमळाच्या पाकळ्या फडफडायला लागल्या वाटतं…