आज राज्यात गणेशोत्सवाचा माहौल आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच हा उत्सव विनानिर्बंध साजरा होत असल्याने विशेष उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, गोविंदांचा सण असो की गणपतीचा, या सणात आजवर कधी पाहायला मिळाली नाही अशी राजकीय चढाओढीची विचित्र, दुर्दैवी किनार जाणवते आहे. महाराष्ट्राशी फंंदफितुरी करून दिल्लीश्वरांच्या चरणी लोटांगण घेतलेल्या गद्दार खोकेबहाद्दरांची खोकी उघडली आहेत आणि सणांच्या आडून राजकीय प्रचार, भाषणबाजी सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या घृणास्पद गद्दारीची गाथा ‘५० थरांची हंडी फोडली’ अशी गाऊन दाखवत असतील, तर त्यांच्या खोकेबाज झिलकर्यांचे स्वर वेगळे कसे असतील.
यांना खोकेबाज म्हटले तर फार राग येतो. आपण विधिमंडळात आहोत, त्या सदनाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचं त्यांचं भानच विसरतं आणि रस्त्यावरच्या गुंडांप्रमाणे ते मारामारी, धक्काबुक्कीवर येतात. शिवसेनेने अनेकांना रस्त्यावरून उचलून मोठे केले, प्रसंगी अत्याचार्याशी दोन हात करण्याची हिंमतही त्यांना दिली. पण, विधिमंडळात दमबाजी, दादागिरी, बघून घेण्याची भाषा हे ना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे संस्कार आहेत ना जिगरबाज धर्मवीरांचे. त्यांनी कधी टाडाची फिकीर केली नव्हती, यांना ईडीची इतकी धास्ती की स्वत:च ईडी सरकार स्थापन करून मोकळे झाले. आता सुटका झाली, असे त्यांना वाटले असेल; पण, कोणत्या भयंकर पिंजर्यात आपण अडकलो आहोत, ते त्यांना हळुहळू कळत जाणार आहेच.
शिवाय विधिमंडळात एकमेकांमध्ये कराल हो धक्काबुक्की. लोकांनी शेतात बैल सोडले आहेत आणि त्यांच्या अंगावर लिहिलंय पन्नास खोके, एकदम ओक्के… त्यांचं काय कराल? हे तुमच्याविषयी तुमच्याच मतदारसंघांमधल्या जनतेचं मत आहे. तिथे बैलांशी कुस्ती करायला गेलात तर तो मातीत उताणे करील आणि आधीच माती खाल्ली आहेत तिथे ढेकळं खाण्याची वेळ आणेल. यांच्या घरी सकाळी ‘गद्दार साहेब, उठा आता, सूर्य डोक्यावर आला’ अशी हाक देऊन त्यांना जागे केले जात असेल. ‘नाश्ता तयार आहे खोकेवीर, या गिळायला,’ अशा शब्दांत त्यांना खानपानाला बोलावलं जात असेल. आता आयुष्यभर या शब्दांची सवय केली पाहिजे. हा डाग आता कायमचा चिकटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाशक्तीने तो पुसला जाणार नाही आणि जो ओक्के साबुन से नहाये, कमल सा खिल जाए असं गाणं गाऊन पण उपयोग नाही. काही डाग कितीही शक्तिमान वॉशिंग मशीनमधूनही धुवून निघत नाहीत. गणेशोत्सवात खोक्यांच्या बळावर मोठमोठ्या कमानी आणि गेट उभारून गद्दारीचा शिक्का पुसता येत नाही.
बरं या महाशक्तीच्या धास्तीला तरी विचारतो कोण? याच शिवसेनेचे नेते, सामनाचे संपादक संजय राऊत निर्भीडपणे बोलत आणि लिहीत होते. आपल्यावर नसत्या कारवायांचे बालंट आणले जाणार, आपल्याला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न होणार, हेही ते सांगत होते. संसद सदस्य असल्यामुळे त्यांना जे संरक्षण मिळायला हवे होते, तेही मिळणार नाही, याचीही त्यांना कल्पना होती. त्यांच्या स्वागतासाठी ईडीने काही सवाष्णी आणल्या नव्हत्या ओवाळायला… त्यांना घाबरवण्याचेच प्रयत्न झाले. पण ते डरून मागे हटले नाहीत, गद्दारांच्या गोटात गेले नाहीत. त्यापेक्षा त्यांनी तुरुंगवास पत्करला. ही हिंमत ज्यांच्या मनगटात नसेल, त्यांना मीच बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असे म्हणवून घेण्याची लाज कशी वाटत नाही?
ईडी सीबीआय या केंद्र सरकारी पोपटांचे तर हल्ली शाळकरी मुलांनाही हसू यायला लागले आहे. ईडी आणि सीबीआय काय करतात, तर जे लोक भाजपमध्ये येत नाहीत, भाजपच्या विरोधात एकवटतात, त्यांच्यामागे नसत्या चौकशांचा फेरा लावतात आणि त्यांना छळतात, असे उत्तर एखादा विद्यार्थी परीक्षेत लिहून जाईल तेव्हा त्याला पैकीच्या पैकी मार्क देण्यावाचून परीक्षकांकडेही काही गत्यंतर राहणार नाही. याच यंत्रणांचा धाक दिल्लीत दाखवला गेला. पंजाब जिंकल्यानंतर आता आम आदमी पार्टी गुजरातमध्ये जोरदार कामगिरी करणार आणि भाजपची सत्ता उलथवणार, अशी चर्चा आहे. त्यामुळेच, त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चांगलं काम करणार्या एका मंत्र्याला अटक झाली, दुसर्यावर कारवाई केली गेली, तीही त्याचा अमेरिकेत गवगवा होत असताना. किती ही क्षुद्र वृत्ती! पण, या मंत्र्याने झुकायला नकार दिला. वीस खोके, एकदम ओक्के अशी ऑफर तिथेही दिली गेली. पण, दिल्लीच्या त्या बहाद्दरांनी ही ऑफर धुडकावून लावली. आपले ईमान विकले नाही, आईच्या दुधाचा सौदा केला नाही.
बिहारमध्येही असेच काहीतरी घडणार याची सगळ्यांना पूर्वकल्पना होती. तरी तिथल्या जनता दल युनायटेड किंवा राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी, आमदारांनी पार्श्वभागाला पाय लावून भाजपच्या गोटात पळ काढला नाही. दाती तृण घेऊन ते यांना शरण गेले नाहीत. झारखंडातही हाच खेळ सुरू आहे. तेलंगणमध्ये तर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ईडी सीबीआयपासून सावध राहा, असा सल्ला आपल्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिला आहे. कारण, आता त्यांचा नंबर लागतो की नाही ते पाहा, असे भाजपचे स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणातील नेते बोलू लागले आहेत. या यंत्रणा भाजपने छू केले की धावत सुटतात, याचा आणखी वेगळा काय पुरावा हवा? वर यांची भाषा काय, तर जे भ्रष्ट असतील, त्यांना शिक्षा झाली तर त्यात चूक काय? ईडी-सीबीआयची भीती फक्त भ्रष्टजनांनाच वाटते… सगळा देश हे देतील ती चोखणी चोखत पाळण्यात पहुडला आहे, अशी यांची समजूत आहे काय? यांचा कोणी सोम्यागोम्या ज्याच्यावर बेंबीच्या देठापासून कोकलत आरोप करत असतो, तो तथाकथित भ्रष्ट नेता घाबरून यांच्या वळचणीला आला की सोम्यागोम्याच्या तोंडालाही बूच लागते आणि ईडीची फाईलही बंद होते, ती का? भाजपने राफेलपासून व्यापमंपर्यंत असंख्य घोटाळे केले आहेत, ते या यंत्रणांच्या दिव्य दृष्टीला दिसत नाहीत का? ईडीच्या हातात दिल्या गेलेल्या अमर्याद अधिकारांना चाप लावण्याची पाळी सर्वोच्च न्यायालयावर का आली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईडी ज्या प्रमाणात चौकशा करते, त्या प्रमाणात दोषनिश्चिती होते का? खोकी वाटून आपल्या गटात मोजायला डोकी खरेदी करून हे प्रश्न टाळता येणार नाहीत… सगळे ओक्के करता येणार नाही.