तुम्ही उकडीचे मोदकवादी आहात की तळलेले मोदकवादी?
– स्मिता मांढरे, पनवेल
मी कोकणातला असल्याने उकडीचे मोदक, तळलेले मोदक असं काही नसतं.
गणपतीच्या सणाची अनेक गाणी आहेत. तुमचं आवडतं गाणं कोणतं?
– आराध्या चिंचणकर, अलिबाग
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…
गणपती आले की कोकणातला माणूस गावी पळतो. अशी काय मजा असते हो कोकणातल्या गावच्या गणपतींमध्ये?
– संजय शिरसाट, डोंबिवली
तिथे जन्मल्याशिवाय नाही कळणार.
श्री गणरायाकडे दर वर्षी इतके लोक सद्बुद्धी मागतात… मग तेवढेच लोक पुढच्या वर्षी पुन्हा मागतात… आदल्या वर्षीची कुठे जाते? शिवाय इतकी सद्बुद्धी असलेले आपण सगळे सतत याचा-त्याचा द्वेष का करत असतो?
– रत्नाकर आंबिले, लोहगड
बाप रे, एवढे प्रश्न एकदम विचारलेत.. गोंधळ झाला माझा.. आपल्याला फक्त मागायचं एवढंच शिकवलंय. काही चांगलं कार्य करायचं असतं.. द्यायचंही असतं हे नाही शिकवलंय.
प्राणीसंग्रहालयात माणसांना दाखवायला प्राणी ठेवलेले असतात की प्राण्यांना दाखवण्यासाठी माणसं तिथे नेली जातात?
– आरती जाधव, परळ
सगळे पिंजर्यातच आहेत… आपण ते कसं घेतोय यावर स्वातंत्र्य अवलंबून आहे.
कलावंताने जरा कोणाच्या सांस्कृतिक, सामाजिक कल्पनांना धक्का देणारे काही केले, बोलले की त्याच्या कलाकृतींवर बहिष्कार घालत सुटणारे लोक त्यांना असलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य कलावंतांना का देत नाहीत?
– चिन्मय केळकर, मुलुंड
लोकशाही ही झुंडशाहीला जन्म देते… आणि ती गुरांसारखी हुशार लोकांना वळता येते.
जुन्या काळापासून कलावंतांनी प्रेक्षक-श्रोत्यांना ‘मायबाप’ म्हणून डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे आता ते सिनेमा-नाटकाच्या तिकीटाचे पैसेही खर्च न करता कलावंतांना कला, संस्कृती, अक्कल शिकवू लागले आहेत, असे वाटत नाही का?
– सिंधु जोशी, सदाशिव पेठ, पुणे
याचे उत्तर आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात आहे.
आपले वडील जगातले सगळ्यात भारी वडील आहेत, अशी घरातल्या मुलांची खात्री असते… आपल्या नवर्याबद्दल बायकांना अशी खात्री का नसते?
– रॉबर्ट सिक्वेरा, कल्याण
कारण त्या मोठ्या होऊन लग्न करतात… पूर्वी बालविवाह याचसाठी करायचे.
महाराष्ट्रात हल्ली लोक ५०-१०० खोक्यांना विकले जातात म्हणे; तुम्ही किती खोक्यांमध्ये पटाल?
– गजानन परब, ठाणे
काय विकायचं यावर खोक्यांची संख्या अवलंबून आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ही भाबड्यांची समजूत काढण्याची योजना आहे, असं वाटतं कधीकधी… तुमचा आहे या कर्मसिद्धांतावर विश्वास?
– अवधूत बापट, श्रीवर्धन
हल्ली हे राजकारणी पाहिले, श्रीमंत अजून श्रीमंत होताना पाहिले आणि गरीब अजून गरीब होताना पाहिले की कशालाच काही अर्थ नाही असं वाटतं.
गणेशोत्सवातल्या नाटकांत तुम्ही कधी काम केलं आहे का? कसा अनुभव होता तो?
– अभय शेंडे, सोलापूर
हो, खूप भन्नाट अनुभव असतो.. कलाकार इथेच घडतात.
श्रावणात घन निळा बरसला या गाण्यापासून ते सावन के झूले पडे हे मधुर गाणं आणि अब के सावनसारखं जोरदार गाणं अशी असंख्य श्रावणगीतं आहेत, त्यांच्यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं?
– सावनी कुलकर्णी, औरंगाबाद
श्रावणात घन निळा आणि अब के सावन.
अनुराग कश्यप म्हणतो की केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे लोकांच्या हातात मौजमजेवर, मनोरंजनावर खर्च करायला पैसेच राहिलेले नाहीत, म्हणून सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटतायत. तुमचं मत काय?
– विनय गाडगीळ, राजापूर
अर्धसत्य आहे हे. पैसे आहेत पण भिकार मनोरंजनासाठी नाहीत.