नुकत्याच झालेल्या देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांची ‘माझा आवडता मंत्री’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरूनच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पेपर्स स्वत: मोदी व अमित शहा तपासणार होते. पेपर्सचा गठ्ठा मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठेवण्यात आला होता. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने गुपचूप जाऊन त्या गठ्ठ्यातील दाढीवाल्यांचा निबंधाचा पेपर बाहेर काढला आणि मोबाईलवर त्या पानांचे फोटो घेतले. पुन्हा ते कागद गठ्ठ्यात ठेवून तो निसटला. नंतर तो निबंध स्वत: वाचून त्याने मला सेंड केला. तर दाढीवाल्यांचा हा निबंध. जसाच्या तसा…
माझा आवडता मंत्री कोण म्हणाल तर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. ते माझ्या हाताखाली काम करीत असल्याचे दाखवत असले, तरी मीच त्यांच्या हाताखाली काम करत आहे की काय असे मला सतत का वाटते हेच समजत नाही. पण त्याचे मला वाईट वाटत नाही. त्यांना पूर्वीचा मुख्यमंत्रीपदाचा दांडगा अनुभव असल्यामुळे आणि मला तो नसल्यामुळे माझी बहुतेक कशाला, जवळजवळ सर्वच कामे तेच मार्गी लावतात. शिवाय गृहमंत्र्यांसकट बहुतेक महत्त्वाची खाती त्यांच्याच हातात असल्यामुळे राज्यच त्यांच्या हाती आहे म्हणा ना. तरीही मला ते आवडतात. कारण आज माझ्या सहाय्याला ते नसते, तर माझी काय हालत झाली असती ते कोणालाच कळणार नाही. म्हणूनच माननीय मोदीजींनी गोड मोदकासारखा माणूस माझ्या हाताखाली दिला. कधी कुरकूर करत नाही की धुसफूस करत नाही. नेहमी हसतमुख चेहर्याने वावरतो. मला एवढा रिस्पेक्ट दिल्याचे दाखवतो… म्हणजे खरोखरच देतो. माझ्यापेक्षा ते जास्त शिकलेले आहेत. त्यांच्यापाठी भरपूर आमदार आहेत, तरीही आपल्या मित्रासाठी म्हणजे माझ्यासाठी त्यांनी इतका मोठा त्याग केला आहे. त्यांना माझे गॉडफादर म्हणावे की देवमाणूस म्हणावे असा प्रश्न मला पडला आहे.
माणूस खरोखरच सज्जन आहे. ते मला आतल्या गोटातल्या खबरी सांगतात आणि मी त्यांना माझ्या मनातली खदखद सांगतो. त्यांचे कान फार तीक्ष्ण आहेत. त्यांना भिंतीपलीकडचेही ऐकू येते. कानात अतिंद्रिय पॉवर असल्याशिवाय हे शक्यच नाही. अडीच वर्षांपूर्वी ‘मातोश्री’च्या एका दालनात रात्री सन्माननीय अमितजी शहा आणि आदित्यच्या वडिलांची जी गोपनीय बैठक झाली, त्यावेळी फडणवीसजी भिंतीला बाहेरून कान लावून होते. त्या दोघांच्या बोलण्यातील शब्द न् शब्द त्यांच्या श्रवणेंद्रियांनी ग्रहण केला आणि गेल्या आठवड्यात त्यांनी तो जणू टेप केल्यासारखा मला ऐकवला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या बोलण्यात अडीचकीचा म्हणजे अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाचा विषय कुठेच आला नव्हता. फक्त त्या दोघांच्या हवापाण्याच्या गप्पा चालल्या होत्या. आता फडणवीस साहेब म्हणतात ते खोटे कसे म्हणता येईल? तेव्हा मी त्यांना म्हटले की हे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले पाहिजे. नाहीतर मी सांगतो. ते म्हणाले, तुमच्या जबाबदारीवर तुम्ही सांगा किंवा सांगू नका. पण मित्रासाठी एवढे केले नाही तर मी मित्र कसला?
तेव्हा मी जाहीरपणे पत्रकारांना सांगितले की, आदित्यच्या बाबांची आणि सन्माननीय अमितजी शहाजी यांची अडीचकीची बोलणीच झाली नव्हती. मी गेल्या आठवड्यात दिल्लीला आदरणीय अमितजींना भेटलो, तेव्हा त्यांनीही मला तेच सांगितले की भाजपा आणि सेनेत अडीच अडीच वर्षांची सीएमपदाची बोली असे मी कधीच बोललो नव्हतो. आता शहा बोलतात ते मी खोटे कसे म्हणू? शहा म्हणजे सत्यवचनी, पददलितांचे वैâवारी, धनदांडगे. ते खोटे कशाला बोलतील? त्यामुळेच त्यांचे बोलणे ऐकून आणि फडणवीसांची अतिंद्रिय कान पॉवरची किमया ऐकूनच मी माझे स्वत:चे मत बनवले. त्याची खातरजमा करून घेतली आणि नंतरच पत्रकारांपुढे माझा भोंगा वाजवला. हा आत्मविश्वास मला फडणवीसजी यांनी दिला. अडीच वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर एका टपरीवर रात्रीच्या वेळी चहा पिताना त्यांनी मला शब्द दिला होता. कधी ना कधी तुला या सीएम पदाच्या खुर्चीत काही दिवस तरी बसवेन. त्यातून तुझी सेना घेऊन भाजपमध्ये येत असशील तर तुला नारायणजी राणेजी यांच्यासारखे केंद्रातही मोठ्ठाले पद देऊ. फक्त तुम्ही हो म्हणा. पण माझी डेअरिंग झाली नाही. मला पिक्चर काढायची कल्पनाही त्यांनीच सुचवली. पिक्चर काढला की आपली इमेज खूप मोठी होते, हे त्यांनी माझ्या मनावर बिंबवले, त्यांच्यामुळेच मोक्यावर पिक्चर काढून मी काय करू शकतो हे दाखवून दिले. ही प्रेरणा फडणवीसजी यांचीच होती.
आता मी कोणावरही पिक्चर काढू शकतो. फडणवीसजी म्हणाले की किरीटजी सोमय्याजी यांच्यावर विनोदी पिक्चर काढ, तर तोही काढीन. कारण आता मोदी, शहा, फडणवीस ही त्रिमूर्ती माझी परमदैवते आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं ही काही खायची गोष्ट नाही. मला फडणवीसांशी मैत्री करून हे पद मिळालं. म्हणूनच मला ते उपमुख्यमंत्री म्हणून मनापासून आवडतात. सेनावाले आपली किंमत करत नसले तरी भाजपवाले एवढा भाव देतात की मी अभिमानाने दाढी कुरवाळतो. आणि देवाकडे एकच मागणे मागतो की देवा, त्यांचा पक्ष मोठा होईल असे कार्य माझ्या हातून घडू दे!