विजय राजवाडे हे मराठी उद्योजक साईन बोर्ड या व्यवसायात चांगले नाव कमावून आहेत हे कळलं. त्यांना भेटायला त्यांच्या डोंबिवली ऑफिसला भेट दिली. दुकानांच्या पाट्या बनवण्याचं त्यांचं काम, त्या कामातील त्यांचं वेगळेपण पाहिल्यावर त्यांना विचारलं, ‘हे सगळं तुम्हाला सुचतं कसं?‘ यावर राजवाडे म्हणाले, ‘कलात्मकता हा माझ्या व्यवसायाचा यूएसपी आहे. पण ही कलाकारी कोर्स करून आलेली नाही, तर अनेक वर्षं कलाक्षेत्रात मुशाफिरी केल्यावर आलेली आहे. लहानपणापासून केलेलं निरीक्षण, उमेदीच्या काळात केलेले कष्ट यांचा फायदा मला आज हा व्यवसाय करताना होतो.
– – –
हल्ली वेळ कुणाकडेच नसतो, ग्राहकांकडे तर अजिबात नसतो; त्यामुळे विक्रेत्यांच्या दृष्टीने सर्वात कठीण गोष्ट कोणती- ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे. पूर्वी खरेदीसाठी दुकानांवर अवलंबून असलेल्या ग्राहकाला आज, भव्य मॉल्स, ऑनलाईन साईट्सचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन विक्री करणार्यांच्या ‘सबसे सस्ता’च्या लाटेत अवघी दुकानदारी वाहून जाते की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला, तेव्हा दुकानदारांनी कात टाकायला सुरुवात केली. काहींनी दुकानाला नवीन रंग काढला, आकर्षक सजावट केली, तर काहींनी दुकानाची संपूर्ण रचनाच बदलली. प्रत्येक दुकानदार ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी त्याला जमेल, खिशाला परवडेल तशी वेगवेगळी कामं करत करत गेला; पण या सर्वांनी एक गोष्ट ‘कॉमन‘ केली, ती म्हणजे दुकानाच्या ‘पाट्या‘ ग्राहकांचं लक्ष वेधून घेतील अशा नवीन ढंगाच्या बनवून घेतल्या. कारण हा ब्रॅण्डिंगचा जमाना आहे, बाजारात प्रत्येकाला आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे, त्याची सुरुवात नावापासून होते. मग नावाचं सुलेखन, ते कोणत्या रंगात हवं, त्याचा लोगो, त्याची रचना या सर्व गोष्टी यात येतात म्हणूनच दुकानाच्या ‘नावात काय आहे‘ हे सांगायला दुकानाची पाटी (साईन बोर्ड) खूप महत्त्वाची आहे. पूर्वी लाकडी फ्रेममधील या पाट्या ऑईल पेंटने रंगवून देणारे पेंटर असायचे. पण गेल्या काही वर्षांत फायबर, वुडन, अॅक्रॅलिक, एलईडी लाइट वापरून टिकाऊ आणि आकर्षक बोर्ड तयार केले जातात. रस्त्यावरून चालताना नजरेस पडणार्या दुकानात काय मिळेल, कसं मिळेल याचा नेमक्या शब्दात ‘ट्रेलर’ दाखवणारा साईन बोर्ड पाहून दुकान हिट आहे की फ्लॉप याचा ग्राहक अंदाज बांधतो आणि दुकानात शिरायचं की नाही हे ठरवतो; म्हणूनच दुकानाचा बोर्ड धंद्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. साइनेज बोर्ड उद्योगाची भारतात जोरदार वाढ होत आहे. देशाच्या सतत वाढणार्या किरकोळ बाजारात आज साईनेजची इंडस्ट्री दहा हजार कोटी रुपयांची आहे.
साईन बोर्ड व्यवसायाची अंतर्भूत माहिती जाणून घेण्यासाठी मी, आकर्षक दिसणार्या पाट्यांचा सर्व्हे केला. त्यातून मिळालेल्या माहितीत, विजय राजवाडे हे मराठी उद्योजक साईन बोर्ड या व्यवसायात चांगले नाव कमावून आहेत हे कळलं. त्यांना भेटायला त्यांच्या डोंबिवली ऑफिसला भेट दिली. दुकानांच्या पाट्या बनवण्याचं त्यांचं काम, त्या कामातील त्यांचं वेगळेपण पाहिल्यावर त्यांना विचारलं, ‘हे सगळं तुम्हाला सुचतं कसं?‘ यावर राजवाडे म्हणाले, ‘कलात्मकता हा माझ्या व्यवसायाचा यूएसपी आहे. पण ही कलाकारी कोर्स करून आलेली नाही, तर अनेक वर्षं कलाक्षेत्रात मुशाफिरी केल्यावर आलेली आहे. लहानपणापासून केलेलं निरीक्षण, उमेदीच्या काळात केलेले कष्ट यांचा फायदा मला आज हा व्यवसाय करताना होतो. माझ्या जन्म कोल्हापूरचा. शिवाजी पेठ गल्लीत आमचं घर. चार भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. वडील एका भांड्यांच्या दुकानात कामाला होते. मी घरातील शेंडेफळ. त्यामुळे बालपण धमाल मस्ती करण्यात गेलं. माझ्या लहानपणीच कोल्हापूर म्हणजे ‘रंकाळा पन्हाळा अन् गोष्टीवेल्हाळा‘. तेव्हा तिथे होणार्या मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे वेगवेगळ्या थाटाची माणसं, गाड्या अशा गमतीगमतीच्या गोष्टी ऐकायला-बघायला मिळत, ते प्रसंग घरी अथवा मित्रांना सांगताना, मी चित्र काढून सांगायचो; बहुधा यातूनच चित्रकलेची आवड निर्माण झाली असावी. चित्रातलं फार कळत नव्हतं पणचौथ्या इयत्तेपासून माणसांची स्केच बनवायचा छंद जडला. वयाच्या नवव्या वर्षी मी आई-वडिलांसोबत बेळगावला कलावती देवींच्या आश्रमात गेलो. जाताना कलावती आईंचं स्केच बनवून घेऊन गेलो, ते स्केच त्यांना खूप आवडलं. त्या म्हणाल्या, ‘या मुलाच्या अंगात कला आहे, याला याच विषयाचं शिक्षण द्या.‘ नवव्या वर्षी त्या वाक्याचा अर्थ काही मला कळला नव्हता किंवा आपल्यात काही वेगळं आहे याची जाणीवही नव्हती; पण ती रंगीत चित्र काढताना मी ‘रंगून’ जायचो हे मात्र आठवतं…
…मोठा होत गेलो तशी चित्रकलेची आवड वाढत गेली. ८० साली दहावी झाल्यावर मला चित्रकला क्षेत्रात काम करायचं आहे हे सांगितलं. घरी या निर्णयाला फार विरोध झाला, ‘चित्र काढणं हे काय काम असतं का? हे करून तुला नोकरी कोण देणार,‘ असा त्यांचा सवाल होता. पण मोठ्या वहिनीने पुढाकार घेऊन कोल्हापूर कलानिकेतनला कमर्शियल आर्ट्स डिप्लोमासाठी प्रवेश घेऊन दिला. माझे वडील बंधू अरविंद व शेंडेफळ मी, आमच्यात जवळ जवळ ३५ वर्षांचं अंतर त्यामुळे मनीषा वहिनी आणि अरविंद भाऊ हे आईवडिलांसारखेच होते. त्यांनी पाठिंबा दिल्यावर सगळ्यांचाच विरोध मावळला आणि माझा या क्षेत्रातला प्रवेश सुकर झाला. कमर्शियल आर्ट्सला असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कोल्हापूरमध्ये रंकाळा, पन्हाळा किंवा वेगवेगळ्या बाजारपेठेत जाऊन पोर्ट्रेट, लाइव्ह स्केचेस, लँडस्केप काढायचं, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, तोच रस्ता तेच झाड वेगळं भासायचं…
चार वर्षं कोल्हापूरला शिक्षण घेतल्यावर, विजयच्या कलागुणांना मुंबईत जास्त वाव मिळेल असं घरच्यांना सांगून मोठा भाऊ आणि वहिनी मला मुंबईला घेऊन आले. १९८६ साली मी रहेजा कला महाविद्यालयात कमर्शियल आर्ट्स डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश घेतला. कोल्हापूरहून मुंबईत आल्यावर सुरुवातीला थोडा बावचळलो.
कॉलेजमध्ये भाषेच्या लहेजावरून टिंगल झाली. गावाच्या आणि शहराच्या शिक्षणपद्धतीत फरक जाणवला. पण अभ्यास आवडीचा असल्याने काहीच दिवसात मी रुळलो. रहेजाला कमर्शियल आर्ट्स शिकताना, एखाद्या वस्तूची जाहिरात बनवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, त्याची मांडणी कशी करावी, स्लोगन, कॉपी रायटिंग, टाईपोग्राफी या सर्व गोष्टी शिकलो. म्हणजे असं बघा, कोल्हापूरला असताना मी या क्षेत्रात निरीक्षण कसं करायचं ते शिकलो आणि मुंबईत आल्यावर त्या निरीक्षणाचं सादरीकरण कसं करायचं हे शिकलो. कॉलेजला असताना अनेक जाहिरात प्रोजेक्ट बनवले. त्यात मी बनवलेल्या महिंद्रा जीपच्या जाहिरातीला पारितोषिक मिळालं, खूप कौतुकही झालं. माझा स्वभाव बोलका, अघळपघळ त्यामुळे मुंबईत भरपूर मित्र जमले. आम्ही खूप भटकायचो, खासकरून दिवसभर धावून दमलेली, उसंत घ्यायला थांबलेली, रात्रीची मुंबई मला आवडायची. माणसांची ये जा नसताना, त्या हेरिटेज बिल्डिंग्जचे चित्र रेखाटताना तंद्री लागायची.
शिक्षण पूर्ण करून ८७ साली ‘मॅप‘ जाहिरात एजन्सीत कामाला लागलो. त्यांच्याकडे ‘ग्वालियर’ कंपनीचं काम होतं. बाजारात नवीन येणार्या शूटिंग शर्टिंगचं, फोटो डिझाईन आणि आऊटलेट बनवायचं काम मी करायचो. आमचा स्केच आर्टिस्ट एकदा रजेवर होता, नेमकं त्याच दिवशी कंपनीला एका मॉडेलचं स्केच अर्जंट हवं होतं. स्केचेस हे तर माझं हुकुमाच पान. आमच्या क्लायंटला मी काढलेलं स्केच फारच आवडलं. आणि क्लायंट खुश तर कंपनी खुश; ताबडतोब कंपनीने पगारवाढ केली आणि इलेस्ट्रेशनचं (चित्रांकन) काम नंतर मलाच मिळत गेलं. लहानपणी केलेला चित्रांचा सराव वाया गेला नाही, याचं तेव्हा फार समाधान वाटलं.
दिवस मजेत जात होते. एक दिवस दादरला छबिलदास गल्लीत फेमस श्रीकृष्ण वडा खायला गेलो असताना समोर ‘विलास जोशी यांचे नाट्य प्रशिक्षण शिबिर’ असा बोर्ड दिसला. अभिनयाची आवड होतीच, लगेच नावनोंदणी केली. आज नाट्य व्यवसायात यशस्वी असलेले चंदू लोकरे, अजित सरंबळकर, नंदू आचरेकर असे अनेक मित्र मला तिथेच भेटले. छबिलदासमध्ये जात असताना आविष्कार या संस्थेची ओळख झाली. आम्हा सगळ्यांचाच तो उमेदीचा काळ होता, समोर येईल ते काम करण्याचा हुरूप होता. आविष्कारसोबत मी आधी बॅकस्टेज केलं, नंतर ‘झुलवा’ नाटकात यल्लमाचा रोल करायची संधी मिळाली. सयाजी शिंदे ‘झुलवा’मध्ये प्रमुख भूमिकेत होता. नंतर ‘दुर्गा झाली गौरी’ आणि काही नाटकांत कामं केली. आपल्याला अभिनयापेक्षा नेपथ्याची समज अधिक आहे हे इथेच कळलं. तिथल्याच एका मित्राच्या ओळखीने कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे काम मागायला गेलो. त्यांना मी काढलेली काही स्केचेस, पोर्ट्रेट्स दाखवली, ती पाहून ते म्हणाले, ‘तुझं कामातंल डिटेलिंग खूप चागलं आहे, तू उद्यापासून जॉइन कर.’ दुसर्या दिवशी मेहबूब स्टुडिओत सेटवर गेलो. ‘जंगल बुक’ या हॉलिवुडपटाचा सेट लागला होता. पहिलीच संधी एकदम हॉलिवुडच्या चित्रपटाची, स्वप्नवत वाटतं होतं. जंगल बुकचं काम करताना मला हॉलिवुडच्या टीमची कामातली शिस्त, वेळापत्रकाचं काटेकोर पालन, कामातली सफाई हे सर्व जवळून पाहता आलं, त्यात सहभागी होता आलं. चित्रपट असो नाटक किंवा सिरीयल- नेपथ्य हा सगळ्याचाच अविभाज्य घटक असतो, उत्तम नेपथ्यासोबत कथा खुलून येते आणि म्हणूनच कला दिग्दर्शकाला रंगकाम, मॉडेल मेकिंग, सुतारकाम, डिझायनिंग अशा अनेक गोष्टींचं अंग असावं लागतं. जंगल बुकच्या सेटवर मी मॉडेल मेकर म्हणून काम करत होतो. कोणताही भव्य सेट बनवण्याआधी, कलाकुसर केल्यावर तो कसा दिसेल याचं मिनिएचर (छोटी प्रतिकृती) बनवावं लागतं. मला एका गणपती मंदिराची प्रतिकृती बनवायला सांगितली गेली. पुरातन काळातील मंदिर कसं असेल आणि आज हजारो वर्ष लोटल्यावर त्याची अवस्था काय असेल, आपण आज तयार केलेलं ‘नवं कोरं’ मंदिर कॅमेर्यासमोर ‘जुनं’ दिसण्यासाठी काय करावं याचा विचार करून मी त्याची प्रतिकृती बनवली. नितीनजींनी काही गोष्टी त्यात समाविष्ट करायला सांगितल्या. आम्ही बनवलेली प्रतिकृती दिग्दर्शक स्टिफनला पसंत पडल्यावर मग आम्ही त्या भव्य सेटचं काम हाती घेतलं. दोन वर्षाच्या कालावधीत नितीनजी माझ्या कामावर खुश होते. ते अनेकदा म्हणायचे की, ‘तुझ्याकडे जे कलागुण आहेत त्यामुळे तू मोठा कलादिग्दर्शक होऊ शकतोस.’
सगळं छान चाललं होतं, पण प्रत्येक क्षेत्रात झारीतल्या शुक्राचार्यांसारखी काही असुरक्षित माणसं असतात, ज्यांना गुणवत्ता असलेली तरूण मुलं धोकादायक वाटतात. माझ्या कामाची वाहवा होत असलेली पाहून काही लोकांनी गैरसमज निर्माण केले आणि मी नितीन देसाईंच्या कंपनीतून बाहेर पडलो. नंतर अजित पटनाईक यांच्यासोबत शेखर सुमन अभिनित ‘रिपोर्टर’ ही सिरीयल केली. पैसे चांगले मिळत होते, पण एकदा मोठी फिल्म केल्यानंतर सिरीयलमध्ये काम करणं मनाला कठीण जात होतं. मी गंमतीने म्हणायचो देखील की सिरीयलमध्ये असिस्टंट आर्ट डिरेक्शनचं काम काय तर सामान हलवून एका खोलीचं रूपांतर कमीत कमी वेळात, हॉल, बेडरूम, पोलीस स्टेशन, शाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये करून देणं. सिरीयलचं काम करताना आपण काही नवीन शिकतोय असं वाटलंच नाही म्हणून ते काम सोडलं आणि कलादिग्दर्शक सुधीर तारकर यांना जॉईन केलं. तेव्हा ते अजय देवगण, करिष्मा कपूर यांचा ‘जिगर’ आणि अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर यांचा ‘जानवर’ सिनेमा करत होते. सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर कलाकारांना पाहताना मला त्यांच आकर्षण वाटायचं, पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांना जवळून बघता आलं, आऊट डोअर शूटिंगला त्यांच्याशी संवाद साधायला मिळाला, तेव्हा उमगलं, अरे ही तर आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसं आहेत. ‘लार्जर दॅन लाईफ’ ही संकल्पना फक्त पडद्यावरच असते. या दोन सिनेमांचं काम संपल्यावर अनेक दिवस पैसे मिळण्याची वाट पाहिली, पण शेवटपर्यंत पैसे मिळाले नाहीत. या अनुभवानंतर नवीन काम घेण्याची इच्छा झाली नाही. शेवटी कंटाळून कलादिग्दर्शनाच्या प्रोफेशनलाच रामराम करून तिथून निघालो.
आज मागे वळून पाहताना काही वेळेला वाटतं की त्या काळात जर मी पैसे बुडतायेत म्हणून हे क्षेत्र सोडलं नसतं, तर कदाचित हळूहळू अनुभवाने तिथे स्वतःची ओळख निर्माण झाली असती. पण माझी तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून, मोठ्या भावाचं घर सोडून मी पेईंग गेस्ट म्हणून राहायला सुरुवात केली होती. जगायला पैसे लागतात, माझं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगून, काही कुणी वाणसामान देत नाही. त्यामुळे अर्थार्जनासाठी वेगळा व्यवसाय निवडणं त्यावेळी आवश्यक झालं होतं.
कला दिग्दर्शन सोडून पुढे काय करावं हा विचार सुरू असताना नरेंद्र कौशल हा मित्र भेटला. नरेंद्रचा दादरला रानडे रोडवर प्रिंटिंगचा व्यवसाय होता. त्याच्याकडे ‘अमेरिकन रेमेडीज’ या औषध कंपनीचे काम होते. त्यांना डिझाईन आर्टिस्ट हवा होता आणि मला काम. आमची अगदी घट्ट युती जमली. मी केलेलं लिफलेट डिझाईन पहिल्याच मीटिंगमध्ये पास व्हायचं. कंपनीचे नवीन येणारे औषधांचे सर्व प्रोजेक्ट्स आम्ही करत होतो. याच दरम्यान मी ‘शादी डॉट कॉम’ या साईटवर लग्नासाठी नावनोंदणी केली. तृप्ती शहा नावाची मुलगी आवडली. तिला इंटरेस्ट रिक्वेस्ट पाठवली, तिच्याकडूनही रिप्लाय आला. थोड्याच दिवसात आमच्या गाठीभेटी वाढल्या. लग्न ठरवायला तिच्या घरी गेलो. पण मी सेटल्ड नाही, स्वतःचं घर नाही म्हणून तिच्या घरून फार विरोध झाला. दुसर्या कुणासोबत लग्न लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही दोघांनी दादरला शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात लग्न केलं. एका आठवड्यानंतर मात्र आमचं लग्न घरच्यांनीच लावून दिले. बायको सोबत असताना पेईंग गेस्ट म्हणून राहणं शक्य नव्हतं, मग दादरहून बाडबिस्तरा उचलून डोंबिवली वेस्टमधे भाड्याने घर घेऊन संसार थाटला. दादरला प्रिंटिंग प्रेसमधे अमेरिकन रेमेडीजचे काम कमी झालं होतं. नवीन काम शोधताना, तृप्तीचे एक नातेवाईक प्लास्टिक कॅरीबॅग डिझाईन करून देणार्याच्या शोधात आहेत असं कळलं. डिझायनिंग हे आपलं आवडीच काम. विक्रोळीला कॅरीबॅग फॅक्टरी होती. त्यांना जॉइन केलं. त्यांच्याकडे वेगवेगळी दुकाने किंवा कंपन्यांच्या कॅरीबॅग्ज प्रिंटिंगसाठी यायच्या. रिलायन्ससारख्या कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते फुटवेअर, मेन्स वेअर, अशा दुकानांच्या शेकडो कॅरीबॅग डिझाईन्स मी २००५ ते २००८पर्यंत केल्या. या कंपनीत काम घेऊन येणारे सेल्समन मला म्हणायचे, ‘दादा, तुम्ही स्वतःचं ऑफिस का सुरू करत नाही? तुमच्या हातातील कला तुम्हाला नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळवून देईल.’ कुटुंब वाढत होतं, त्यामुळे नोकरीच्या पगारात घर चालवणं जिकिरीचं होतं. तृप्ती शैक्षणिक क्लासेस घेऊन घराला हातभार लावत होती. तिच्याच खंबीर पाठिंब्यामुळे मी नोकरी सोडून डोंबिवलीला ऑफिस भाड्याने घेतलं आणि २००९ साली स्वतःचं ऑफिस सुरू केलं. सुरुवातीला सेल्समन काम घेऊन यायचे, पण हळुहळू माझ्या कामाच्या क्वालिटीने, अनेक कॅरीबॅग निर्मिती कंपन्या स्वतःहून माझ्याकडे ऑर्डर्स घेऊन येऊ लागल्या. यात कल्याणच्या विपुलभाईंनी मला भरपूर काम दिलं. छान काम सुरू असतानाच एक दिवस महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा कायदा पास झाला आणि सर्व कॅरीबॅग कंपन्या गुजरातला शिफ्ट झाल्या.
काम कमी झाल्यामुळे पैशाची चणचण भासत होती. एके दिवशी एका जुन्या गिर्हाईकाने ‘दुकानाच्या साईन बोर्डचे डिझाईन करून द्याल का,’ असं विचारलं. त्याची मागणी समजून घेत मी डिझाईन बनवून दिलं. साधारण १५ दिवसांनी मला हा बोर्ड माझ्याच ओळखीच्या एका दुकानावर दिसला. त्या बोर्डमुळे, दुकानाच्या एकंदर लुकमध्ये बदल झाला होता, पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती. दुकानात गेल्यावर नवा बोर्ड पंधरा हजार खर्च करून बनवला आहे, हे स्वतः दुकानदाराने मोठ्या कौतुकाने सांगितलं. माझ्या डिझायनिंगचे हजार रुपये आणि बोर्ड बनवायला लागणारे सामान व मजुरीचा खर्च साधारण नऊ हजार असावा. मी विचार केला, या कामात सर्वात जास्त महत्त्वाची आहे ती क्रियेटिव्हिटी- हजार रुपये घेऊन डिझाईन करून देण्यापेक्षा संपूर्ण बोर्ड मीच बनवला तर मी अजून उत्तम काम करू शकेन आणि पैसे देखील चांगले मिळतील. या विचाराने मी या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. आता रस्त्याने जाता येता मी दुकानातल्या वस्तूंकडे न बघता दुकानांच्या पाट्यांकडे पहायला लागलो. सेल्स डिस्काउंटच्या स्टिकरपेक्षा साईन बोर्डवरील रंगसंगती, फाँट, लोगो मला खिळवून ठेवू लागले. हेच डिझाईन का बरं केलं असेल, हे मटेरियल का वापरलं असेल, मला हे काम मिळालं असतं तर मी कसं केलं असतं, हे विचार सतत माझ्या मनात घोळू लागले. मार्केटमध्ये जाऊन साईन बोर्डचे विविध प्रकार धुंडाळायला लागलो.
दादरला राहत असतानाचे कॉन्टॅक्ट्स अजूनही होतेच. रानडे रोडला मित्राच्या दुकानात गेलो असताना तेथील ‘श्रीजी कृपा’ या दुकानाचे मालक भेटले. त्यांनी नुकतंच दुकानाचं नूतनीकरण केलं होतं आणि आता साईन बोर्ड बनवणार्याच्या शोधात होते. माझ्या कॅरी बॅग डिझाईनिंगचं काम त्यांना माहित होतं. साईन बोर्डचं नवीन काम सुरू करतोय म्हटल्यावर त्यांनी विश्वासाने मला त्यांच्या दुकानाचं काम सोपवलं. साईन बोर्डचं मला मिळालेलं ते पहिलं काम, ते चांगल्या पद्धतीने झालं. कला दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे साईन बोर्डच काम फारसं अवघड गेलं नाही. इथून मला एक वेगळी लाईन मिळाली. मी बाईकवरून कल्याण-डोंबिवली पालथी घालायचो, नवीन काम किंवा दुकानांच रिनोव्हेशन चालू असेल तर त्यांना मी तयार केलेले डिझाईन्स, बोर्डस् यांचे फोटो दाखवायचो आणि सांगायचो की जर काही नवीन काम असेल तर मला द्या. अशी खूप कामं मिळत गेली. डिझाईनिंगसाठी मी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत गेलो. आजही एखाद्या दुकानदारानं मला त्याचा व्यवसाय आणि दुकानाचं नाव सांगितलं, बोर्डची साईज घेतली की माझा विचार सुरू होतो. बोर्ड साईज, दुकानाचं नाव आणि व्यवसाय या सगळ्याला साजेशा अशा साधारण चार वेगवेगळ्या डिझाइन्स त्यांना बनवून दाखवतो. त्यांच्या अजून काही सूचना असतील तर त्याप्रमाणे बदल करून डिझाईन फायनल करतो आणि मग बोर्ड बनवायच्या कामाला लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर असं बघा, मंगल कार्यालयाच नाव लिहिताना त्या नावात गणपती असावा, अशी श्रद्धा असते; पण म्हणून तो कुठल्याही आकाराचा किंवा कुठल्याही शब्दात ‘घुसवून’ चालणार नाही- बोर्ड कसा सुटसुटीत, ठसठशीत आणि अगदी मोजक्या आकारातून सुस्पष्ट व्यक्त होणारा हवा. हैद्राबादी बिर्यानी ही खासियत असणार्या एका हॉटेलचा बोर्ड मला बनवायचा होता, तिथे मिळणार्या बिर्यानीच्या चवीची ऑथेंटिसिटी, हॉटेलचा दर्जा हे सगळं एका लुकमध्ये लक्षात यावं म्हणून गडद हिरव्या बॅकग्राऊंडवर उर्दूशी साधर्म्य साधणार्या रोमन लिपीत अक्षर चितारली. प्रत्येक बोर्ड वेगळी कहाणी सांगत असतो, फुरसतीत ऐकणारा ग्राहक मात्र हवा.
खरं म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी करता येत असतात. पण वयाच्या एका टप्प्यावर, आपली इच्छा असो की नसो, एक स्पेशालिटी पकडावी लागते. कारण एका वेळी चार उद्योग करण्याची फुरसत आयुष्य प्रत्येकाला देईलच असं होत नाही. अशावेळी आपण काय निवडतो हे महत्वाचं ठरतं. माझ्या बाबतीत म्हणाल तर दुकानांचे बोर्ड बनवणे या कामात माझी स्पेशालिटी आहे असं माझे ग्राहक म्हणतात. हीच दुकानदार मंडळी मी केलेलं काम पाहून माझ्याकडे नवीन ग्राहकांना पाठवतात. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे नवीन दुकानं शोधायला मला बाहेर जावं लागत नाही. पण म्हणून या क्षेत्रात माझी मक्तेदारी आहे असं होत नाही. कॉपी पेस्टच्या या जमान्यात मी आज बनवलेल्या डिझाईनचं अवघ्या काही दिवसांत अनुकरण होतं. आपल्या कामाचं अनुकरण होताना बघून आपण उत्तम काम करत असल्याची खात्री पटते, पण त्याचबरोबर दरवेळी काहीतरी युनिक, वेगळं देण्याची जबाबदारी वाढते. अगदी घरगुती उद्योग ते मोठे ब्रँड्स, घराच्या नेम प्लेट्स ते प्रेक्षणीय स्थळांचे सेल्फी पॉइंट्स असं चिक्कार काम या क्षेत्रात आहे आणि पुढेही येत राहील. आज कॉम्प्युटरवर भरोसा ठेवून या क्षेत्रात येऊ इच्छिणार्या तरुणांना सांगावंसं वाटतं की कॉम्प्युटर एका क्लिकवर तुम्हाला शेकडो पर्याय देईल, भले त्यामुळे काही काळ यशस्वी व्हाल, पण ते पर्याय तुमच्याइतकेच इतरांसाठीही खुले आहेत; त्यामुळे टिकून राहायचं असेल तर ओरिजनॅलिटीला पर्याय नाही.
कोल्हापूरला लागलेली निरीक्षणाची सवय, मुंबईत कमावलेली मांडणीची हातोटी, कला दिग्दर्शन, अॅडव्हर्टायझिंग, डिझायनिंग अशा विविध कामातून मिळवलेला अनुभव या सार्याचा सुरेख मेळ विजय यांच्या प्रत्येक साईन बोर्डमध्ये दिसतो. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेगळेपण जपावं लागतं, ते साधलं तर यशाच्या शिखरावर तुमच्या नावाचा बोर्ड झळकलाच म्हणून समजा, हे त्यांच्याकडे पाहून कळतं.