• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विपर्यास कसला, माफी मागा!

(संपादकीय ६ ऑगस्ट २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 4, 2022
in संपादकीय
0

महाराष्ट्राचे राज्यपाल बी. एस. कोश्यारी (त्यांचे भगतसिंग असे नाव आईवडिलांनी ठेवले आहे; शहीद भगतसिंगांच्या मूळ विचारधारेचा तीव्र द्वेष करणार्‍या आणि तरीही भगतसिंगांच्या चरित्राची, विचारांची विकृत मोडतोड करून त्यांना आपल्या कंपूत ओढू पाहणार्‍या विचारधारेचे हे चिरंजीव पुढे पाईक होणार आहेत, याची त्यांना कल्पना नसावी) हे महाराष्ट्राचे आजवरचे सर्वात सुमार राज्यपाल असतील. आपल्या बेताल जिभेने त्यांनी हा बहुमान पटकावला आहे. आधी हे गृहस्थ सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात स्त्रीशिक्षणाची ज्योत लावणार्‍या दाम्पत्याच्या बालवयातील दाम्पत्यजीवनावर घसरले होते. महाराष्ट्र हा बहुतांशी सभ्य, सुसंस्कृत नेत्यांचा, माणसांचा देश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मानबिंदूंवर अशी तंगडी वर केल्यानंतरही कोश्यारी महोदयांचे धोतर कंबरेवर शाबूत राहिले होते. ते ज्या संवैधानिक पदावर (येनकेनप्रकारेण, लाजलज्जा गुंडाळून भारतीय जनता पक्षाचे हित सांभाळण्याची आणि विरोधी पक्षांच्या कारभारात काड्या घालण्यासाठीच) नेमले गेले आहेत, त्याचा मान महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी राखला होता. त्यांचे सौजन्य आणि मराठी जनतेची सहनशीलता म्हणजे महाराष्ट्राचा बुळेपणा अशी गैरसमजूत या गृहस्थांनी करून घेतली असावी. राजस्थानी आणि गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात या महोदयांनी एक फार मोठा शोध लावला. हे म्हणतात की महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी माणसांना बाहेर काढले तर इथे पैसा कुठून राहील, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी कुठून म्हणवली जाईल! ज्याची सुपारी घ्यायची त्या यजमानाचे गुणगान करायचे, असे ‘संस्कार’ कोश्यारी महोदयांवर त्यांच्या परिवारात झाले असतील कदाचित; पण, फुटकळ कार्यक्रमात यजमानांची कौतुकं गाता गाता आपण ज्या राज्याचे मीठ ओरपतो आहोत, त्या राज्याशी नमकहरामी करत आहोत, हे या भाज्यपालांच्या लक्षात आलेच नसेल?
या प्रकरणात विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या गृहस्थांना कोल्हापूरचा जोडा दाखवला पाहिजे, अशी उत्तरपूजा बांधली आणि भाजपच्या एरवी तोंडात मिठाची गुळणी धरून बसणार्‍या मुखंडांनाही ‘राज्यपालांचा तसं बोलण्याचा हेतू नसावा, अनवधानाने ते बोलले असावे, त्यांनी इतरप्रांतीयांचे कौतुक केले आहे, मराठीजनांचा अपमान केला नाही,’ अशा गुळमुळीत शब्दांत का होईना, यांच्याशी असहमत असल्याचे सांगावे लागले. पण या मुजोर राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितलेली नाही. उलट, हे गृहस्थ राजकीय पक्षांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये, असे दीडशहाणे डोस पाजत आहेत. अहो, कोणतेही अन्यप्रांतीय या भूमीतून निघून गेले तर महाराष्ट्रातला पैसा संपुष्टात येईल, हे अडाणी विधान स्वयंस्पष्ट आहे; त्याचा विपर्यास करण्याची गरज काय? मराठी माणसाचं मुंबईच्या, महाराष्ट्राच्या विकासात काहीच योगदान नाही काय?
मूळ आगरी कोळ्यांची वस्ती असलेल्या मुंबईचा ब्रिटिश काळात विकास करण्यात अन्यप्रांतीयांमध्ये सर्वात मोठे योगदान पारशी समुदायाचे होते, त्या समुदायाने कधी आपण मुंबईचे भाग्यविधाते असल्याच्या गमजा मारलेल्या नाहीत, हे त्यांच्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. या मुंबापुरीत ब्रिटिश सरकारला कर्ज देण्याची ऐपत असलेला धनवंत माणूस म्हणजे जगन्नाथ अर्थात नाना शंकरशेट हा हिमालयाएवढ्या कर्तृत्वाचा मराठी व्यावसायिक होता, हे सकाळ संध्याकाळ राजभवनावर समुद्राचा वारा खायला जाणार्‍या मराठी भाजप नेत्यांनी कोश्यारींच्या कानात सांगितले नाही की काय?
गुजराती आणि राजस्थानी हे दोन्ही समुदाय भारतभरातच नव्हेत तर जगभरात विखुरलेले आहेत. त्यांच्यामध्ये व्यापारासाठी आवश्यक तीक्ष्ण बुद्धी आणि व्यवसायात संपूर्णपणे झोकून देण्याची जैविक वृत्ती आहे. चंद्रावर पहिला माणूस गेला तेव्हा त्याला तिथे मारवाड्याचे किराणा मालाचे दुकान दिसले, असा एक विनोद प्रचलित आहे, तो या समुदायाच्या व्यापारकौशल्याचा गौरव करणारा आहे. पण, नरेंद्र मोदी सरकारने मुंबईचे खच्चीकरण आणि गुजरातचे सबलीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही गुजरात आणि राजस्थान हे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पासंगालाही पुरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
गुजराती आणि राजस्थानीच नव्हेत तर देशातल्या सगळ्या भागातल्या उद्यमशील, नवविचारी, धाडसी मंडळींना महाराष्ट्रात यावेसे वाटले, इथे त्यांच्या कर्तबगारीला पंख फुटले; त्यांना त्यांच्या मूळ राज्यात ही कर्तबगारी गाजवून त्या राज्यांना महाराष्ट्राच्या बरोबरीला आणणे साधलेले नाही, यात महाराष्ट्राचा काहीच वाटा नाही का? महाराष्ट्राने, मुंबईने इथे उत्तम नागरी सुविधा, सुरक्षित वातावरण, व्यापारउदीमाला संरक्षण देऊन या अन्यप्रांतीयांना ‘हिंदुस्तानी’ म्हणून उदार मनाने स्वीकारले नसते, तर हे सगळे घडू शकले असते का?
हा देश स्वतंत्र झाला तेव्हा घटनाकारांच्या आणि या देशाच्या भाग्यविधात्यांच्या मनात जी ‘आयडिया ऑफ इंडिया’ होती, ती मराठीजनांच्या प्रगतिशील उदारतेमुळे मुंबईत मूर्तिमंत साकारली आणि शिवसेनेसारख्या जहाल प्रादेशिकतावादी पक्षानेही वेळोवेळी मराठी माणसांवरील अन्यायाविरोधात लढे उभारल्यानंतरही कधी त्या मूळ कल्पनेला नख लावले नाही, या महानगराच्या कॉस्मोपोलिटन स्वरूपात प्रमाणाबाहेर हस्तक्षेप केला नाही, जातीधर्मांच्या आणि भाषांच्या आधारावर भेदाभेद केला नाही, म्हणून अन्यप्रांतीय इथे भरभराट करू शकले आहेत, हे मराठी माणसाचे मोठेपण आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना हे माहिती आहे, ते अंतर्बाह्य मराठीच आहेत. कोश्यारींच्या अर्धवट वक्तव्यांनी महाराष्ट्रातल्या मराठीजनांपेक्षाही अधिक या अन्यप्रांतीय महाराष्ट्रीयांचा अपमान झाला आहे. त्याबद्दल या महोदयांनी महाराष्ट्राची आणि सर्वप्रांतीय महाराष्ट्रीयांची बिनशर्त माफीच मागितली पाहिजे.

Previous Post

नया है वह…

Next Post

भिक्षुकशाही पिळवणुकीचा साक्षात्कार

Next Post

भिक्षुकशाही पिळवणुकीचा साक्षात्कार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.