आशिया खंड, त्यातील देश आणि तिथले जेवण यांच्यात नेहमीच काही ना काही समानता आढळून येईल. उदाहरण घ्यायचे तर थायलंड या देशात वापरले जाणारे बहुतेक मसाले, घटक पदार्थ, इतर सामग्री ही आपल्या भारतीय जेवण खाण्यासारखी आहे. नारळ, हळद, आले, मिरच्या, नारळाचं दूध, तांदूळ, मसाले. भले पद्धत, चव वेगळी असेल पण अनेक पदार्थ समान. त्यामुळे थाई जेवण भारतात लोकप्रिय झाले. चायनीज पदार्थ भारतीय पद्धतीपेक्षा वेगळे असतात, पण थाई जेवण आपल्या खाण्यासारखे दिसेल. दुसरे म्हणजे थाई पदार्थ सौम्य चवीचे असतात. जहाल तिखट अभावाने. त्यामुळेच चायनीजपाठोपाठ थाय फूड आपल्याकडे खूप लोकप्रिय झाले आहे.
आता ऑथेंटिक थाई पदार्थ करायचे म्हटले की त्याचे विशिष्ट साहित्य लागतेच… आणि ते बर्यापैकी सर्व ठिकाणी मिळते. उदाहरणार्थ बर्ड आय चिली, आपल्याकडे कशी गुंटूर किंवा संकेश्वरी तिखट मिरची असते, तशीच ही मिरची. बर्ड आय चिली, लेमनग्रास म्हणजे चहाची पात, गलांगल म्हणजे थाई आले, काफिर लाइम म्हणजे थाई कढीलिंब हे थाई अन्नपदार्थांचे चार मुख्य घटक. थाई पदार्थ बनवताना चायनीजसारखे भरपूर सॉस वापरले जात नाहीत. नारळ दूध घातल्याने छान सौम्य चव येते. थाई जेवणाची लोकप्रियता ओळखून हल्ली बर्याच कंपन्या विशिष्ट पदार्थ करायला आवश्यक असे साहित्य एकत्र देतात. ग्राहकाने त्यात आवडीनुसार चिकन, मासे घालून शिजवायचे… साहित्य शोधायची कटकट नको. त्याचबरोबर येलो, ग्रीन आणि रेड थाई करी पेस्ट पण मिळते. चायनीज नुडल्सपेक्षा थाई नूडल्स वेगळ्या असतात. चपट्या किंवा अतिशय पातळ अश्या तांदळाच्या नूडल्स थाई जेवणात वापरल्या जातात. पूर्ण दक्षिण पूर्व आशियाई देशांतील जेवणात भरपूर भाज्या आणि मांस एकत्र शिजवून पदार्थ होतात. भाज्या कच्चट असतात. तेल अगदी नावाला. त्यामुळे पचायला हलके.
तर आज बघुया थाई सूप, थाई राइस आणि थाई रेड करी यांची कृती..
थाई पदार्थ करताना त्यात थाई करी पेस्ट महत्वाची असते. बाजारात त्या उपलब्ध आहेत आणि त्याच वापराव्यात. कारण घरी करायला गेले तर खूप साहित्य आणि खटाटोप असतो. म्हणून वर्क स्मार्ट. आवडणारी पेस्ट घ्यावी.
थाई पदार्थात फिश सॉस अत्यावशक आहे, तुम्हाला शाकाहारी हवेय तर डार्क सोय सॉस घेऊ शकता.
थाई कोकोनट सूप
साहित्य : थाई करी पेस्ट, आवडीने हिरवी, लाल, पिवळी घ्यावी.
दीड वाटी चिकन बोनलेस/ कोळंबी/ मश्रुम/ ब्रोकोली/ टोफू यापैकी काहीही जे आवडेल ते.
घट्ट नारळ दूध १ वाटी
पातळ नारळ दूध १ वाटी
थाई गलांगल अथवा आपले आले थोडे लांबट चिरून
चहा पात बारीक चिरून, विशेष करून देठ घ्यावेत. त्यात अधिक चव असते. जून असेल तर चक्क वाटून घ्यावे.
फिश सॉस/ डार्क सोय सॉस : एक चमचा
चिकन अथवा भाजी यांचा ब्रॉथ : ३ वाट्या
साखर, लिंबू रस/ काफिर लाईम पाने चुरडून, मीठ
तिखट हवे तर बर्ड आय चिली अथवा आपली लवंगी मिरची
तीळ तेल.
कृती : भाज्या/चिकन धुवून हवे तसे चिरून घ्यावे, वाटल्यास चिकन उकडून घ्यावे, म्हणजे ते पाणी ब्रॉथ म्हणून वापरता येते.
तेल गरम करून त्यात चिरलेले आले परतून घ्यावे, मग चहा पात, लिंबू पाने आणि करी पेस्ट घालून परतून घ्यावे.
आता चिकन/ भाजी/ टोफू घालून परतून फिश/सोय सॉस घालावा आणि ब्रॉथ घालून किंचित शिजवून घ्यावे.
आता पातळ नारळ दूध, मीठ घालून एक उकळी.
आता घट्ट नारळ दूध आणि चिरलेल्या मिरच्या घालून थोडे उकळावे. पार्सले अथवा आपली कोथिंबीर वरून.
आवडतं असल्यास यात राइस नूडल्स घालू शकता.
थाई करी
साहित्य : करी पेस्ट १ मोठी वाटी, कोणतीही
चिकन बोनलेस/ टोफू/ पनीर/ मश्रुम/ कोळंबी, धुवून साफ करून,
थाई आले थोडे चिरून
काफिर लाइम अथवा लिंबू रस
चहा पात देठासकट बारीक चिरून
छोटे कांदे २ बारीक चिरून
बर्ड आय चिली अथवा आपली मिरची आवडीनुसार
नारळ दूध २ वाट्या
जिरे, धने कुटून अर्धा चमचा
ब्राऊन अथवा साधी साखर,
मीठ,
अख्खी मिरी, दालचिनी अर्धा चमचा,
फिश/ सोय सॉस एक चमचा,
कोथिंबीर बारीक चिरून.
कृती : तेल गरम करून अख्खे मसाले, कांदा, आले, चहा पात घालून परतावे.
आता भाज्या/ कोळंबी/ चिकन/ टोफू यातील जे हवे ते घालून फिश/ सोय सॉस घालावा.
आता करी पेस्ट, व्यवस्थित ढवळून ब्रॉथ घालून मंद आगीवर बोटचेपे शिजवून घ्यावे.
आता मिरच्या, कुटलेले धनेजिरे घालून एक उकळी आणावी.
आता नारळ दूध, साखर, लिंबू रस घालून ढवळून छोटी उकळी.
शेवटी कोथिंबीर.
करी पेस्ट घरी करायला हरकत नाही. आपल्या भारतीय जिभेला रेड थाई करी आवडेल अशी आहे, त्यामुळे त्याची कृती देते.
रेड थाई करी पेस्ट
साहित्य : सांबार कांदे ४/५ सोलून तुकडे
चहा पात बारीक तुकडे पाव वाटी छोटी
थाई लाल मिरच्या/ आपल्या लाल मिरच्या (रेशीमपट्टी मिळाल्या तर उत्तम. आवडीने जसे तिखट हवे तसे चिरून. सुक्या असल्यास काश्मिरी घ्याव्यात. रंग सुरेख येतो. फक्त थोड्या भिजवाव्यात. अथवा चक्क लाल शिमला मिरच्या.)
लसूण ४/५ कळ्या
थाई/ नेहमीचे आले थोडे चिरून
फिश/ सोय सॉस १ मोठा चमचा
लालबुंद टोमॅटो २ चिरून अथवा बाजारातील टोमॅटो प्युरी
नारळ दूध १ वाटी घट्ट असावे
धने, जिरे, मिरी, अर्धे बोट दालचिनी कुटून १ चमचा
मीठ
साखर.
कृती : नारळ दूध वगळता सर्व साहित्य प्रोसेसर/ मिक्सरमध्ये थोडे भरड करून घ्यावे.
पाणी बिलकुल नको.
शेवटी नारळ दूध घालून दोन फेरे घ्यावेत.
अशी लाल थाई करी पेस्ट फ्रिझरमध्ये उत्तम टिकते.
झिपलॉक पिशवीत ठेवावी.
हवी तेव्हा थाई करी तैय्यार.
किंवा सरळ बाजारातील पेस्ट आणावी. त्यात गैर काहीही नाही.
थाई फ्राईड राइस
चायनीज फ्राईड राइसपेक्षा हा राइस थोडा वेगळा पण चवदार असतो.
थाई राइस बनवताना चक्क आपला इंद्रायणी अथवा आंबेमोहोर तांदूळ घ्यावा. अस्सल चिनी/ जपानी/ थाई राइस अश्याच बुटक्या चिकट तांदळाचे असतात. आपणच उगा बासमती वापरतो.
साहित्य : तांदूळ १ वाटी कच्चट शिजवून.
हव्या त्या भाज्या/ चिकन आवडीने हव्या त्या प्रमाणात पातळ लांबट चिरून. मश्रुम आणि मूग मोड असल्यास उत्तम.
छोटे कांदे २ बारीक चिरून, थाई/ साधे आले अर्धा बोट चिरून, थाई/ साध्या मिरच्या चिरून, लसूण ५/६ पाकळ्या चिरून, रेड चिली सॉस. नसल्यास चक्क टोमॅटो केचप १ चमचा, चहा पात १ चमचा चिरून, लिंबू रस १ चमचा
काफिर लाईम पाने २ चुरडून, मीठ, साखर, तीळ तेल. नसल्यास चुकूनही ऑलिव्ह तेल घेवू नये. साधे शेंगदाणा तेल वापरावे.
भरपूर कोथिंबीर चिरून.
मिळत असल्यास थाई बसील (चव सुंदर येते, नसल्यास साधी बसिल घ्यावी).
कृती : तेल गरम करून, त्यात कांदे, लसूण, मिरच्या, चहा पात, सर्व सॉस परतून भाज्या/ चिकन/ पनीर/ टोफू, काजू घालावे.
फार शिजवू नये.
आता भात घालून लिंबू रस, मीठ, कोथिंबीर घालून मोठ्या आगीवर परतून शेवटी कोथिंबीर/ बसिल, थाई काफिर लाईम पाने घालावीत.
मग फार शिजवू नये.