□ हिंदुत्वासाठी एकत्र आलाय मग मंत्रीपदासाठी का भांडताय – एकनाथ खडसे.
■ बोके बोलत काहीही असले तरी खरोखर कशासाठी भांडतात खडसे साहेब?
□ महागाईत जीएसटीची भर. वेष्टनांकित अन्नपदार्थांवर ५ टक्के कर, रुग्णालयातील उपचारही महाग.
■ जगणेही अवघड आणि मरणेही… वाह मोदीजी वाह!
□ स्वातंत्र्यवीर सावरकरांची महात्मा गांधी यांच्याशी तुलना. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा जीएसडीएसचा नवा अंक स्वातंत्र्यवीरांना समर्पित.
■ कशाला त्या महापुरुषांमध्ये लावालाव्या करता!
□ चीनमधील ‘इस्लाम’ हा चिनी संस्कृतीचाच असेल, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मुस्लिमांना ठणकावले.
■ संस्कृती अशी बळजबरीने कोणावरही फार काळ लादता येत नाही, हे त्यांना आता देशभर सुरू असलेल्या अस्वस्थ खदखदीतून कळालं असेल.
□ पृथ्वीवरून चंद्र, मंगळावर जाण्यासाठी रेल्वे! अंतराळातून कॅप्सूल मार्ग बनवणार; जपानमधील ‘क्योटो’, ‘काजिमा’चा प्रकल्प.
■ नितीन गडकरी साहेब जपानमध्येही मंत्री झाले की काय! त्यांचं काही सांगता येत नाही.
□ अमेरिकेच्या मसुरी राज्यात दारू पिऊन विमानोड्डाण केलेल्या पायलटने दारूच्या नशेत विमान चक्क महामार्गावरच उतरवले…
■ त्याचे विमान उतरले की हवेतच आहे अजून.
□ दलित आणि उपेक्षित समाजात स्वार्थी लोकांची कमतरता नाही : मायावतींचे ट्वीट.
■ ते तुमच्याकडे पाहूनच कळतं मायावतीजी.
□ मला सिंगापूरला जाऊ न देणे अत्यंत चुकीचे : अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना पत्र.
■ कोत्या वृत्तीचे नेते सर्वोच्च पदावर बसले की असला हिणकसपणा होतो.
□ मुख्यमंत्री व्हायचे होते, दिल्लीश्वरांनी सरप्राइझ गिफ्ट दिले- फडणवीसांची खदखद व्यक्त.
■ तुमच्या पक्षात कोणी काय करायचं याचे निर्णय काँग्रेसी पद्धतीचे हायकमांड घेत असते, तुम्ही कुठून ठरवायला लागलात?
□ मी एक फाटका माणूस आहे, असे म्हणता, मग आमदारांसाठी चार्टर्ड प्लेन, पंचतारांकित हॉटेल हे सर्व फुकट आलं का? प्रा. हरी नरके यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल.
■ महाशक्तीचा चमत्कार आहे तो.
□ एकरी २० क्विंटल कापूस झालाच पाहिजे. हे करणार असाल तर तुमचा उपयोग आहे. लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर मुलं कशी होणार? – शेतकर्यांसमोर नितीन गडकरी यांचे कृषी विद्यापीठावर ताशेरे.
■ गडकरी साहेब, अनेक निरुपयोगी योजना आणि निर्णय दिल्लीत घेतले गेले, त्याची फळं देश भोगतोय. तिकडेही सांगा हे विवाहाचं तत्त्वज्ञान.
□ ग्रंथप्रसारामुळे वाचनसंस्कृती वाढेल- दाजीशास्त्री पणशीकर.
■ हल्ली व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरच वाचन संस्कृती वाढत असते शास्त्रीजी!
□ शिक्षण घेऊन कुठे अभिनय करता येतो का?- अशोक सराफ.
■ शिक्षणाने उपजत अभिनयकलेला पैलू पडतातच की पण मामा.
□ शिवसेनेत शिवसैनिक हे सर्वात महत्त्वाचे पद – खाडे.
■ ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
□ आता सुट्या वस्तूंवरही जीएसटी लागू. खिशाला आणखी कात्री.
■ हवेवर जीएसटी लागेल लवकरच… तयार राहा.
□ केरळमध्ये रविवारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) देणार्या विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे उतरविण्याची सक्ती करण्यात आल्याच्या घटनेचा राज्यभरात निषेध.
■ ‘नीट’ पिऊन आले होते का हे लोक!
□ पालकांचा कल इंग्रजी शाळांकडेच, मिशन
अॅडमिशनअंतर्गत आतापर्यंत ३२ हजार मुलांचा इंग्रजी शाळेत प्रवेश.
■ आयुष्यात पुढे जायला जी भाषा उपयोगी पडणार, तिच्यातच लोक शिकणार.
□ सिंगापूरमध्ये स्त्रिया नोकरी करतात, पुरुष घर सांभाळतात. कोरोना महामारीमुळे लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली.
■ महायुद्धांप्रमाणेच महामारीही जगाला वळण देत असते.
□ नव्या सरकारला आत्महत्यांची धास्ती. मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी.
■ आत्महत्या करा, फक्त आमच्यासमोर नको.
□ सैनिकांसाठी राष्ट्रहित हे स्वहितापेक्षा मोठे! लेफ्टनंट कर्नलची मागणी हायकोर्टाने फेटाळली.
■ हेच राजकीय नेते, उद्योगपती, सर्वसामान्य माणसं यांनाही सांगायला हवं… सैनिकांचाच अपवाद कशाला?