आफ्रिकन खंडातील वंबास्टू नावाच्या खूपच लहान देशातील सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या नेत्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे सर्व सदस्यांनी बाक वाजवून अभिनंदन केले. बाकांचा आवाज थांबला तो राष्ट्राध्यक्ष महोदय अभिनंदनास उत्तर देण्यासाठी उठले तेव्हाच!
ते उठले आणि त्यांनी उजवा हात वर करून तर्जनी नि मधले बोट एकत्र उंचावत ‘व्ही’ आकाराचे चिन्ह करताच त्यांचा जयजयकार झाला. मग ते सांगू लागले आपण कसे निवडून आलो आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काय काय केले? त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच भाषणाला सुरूवात केली. याचं प्रक्षेपण न्यूज चॅनल्सवर लाईव्ह सुरू झाले..
मान्यवर राष्ट्राध्यक्ष सांगत होते, ‘मी निवडून येण्यासाठी किती कष्ट पडले काय सांगू? दीडशे मतकेंद्रांवर धाक दाखवत मी बोगस मतदान करून घेतलं, तिथून मला खूप लीड भेटली. जवळपास दोनतीनशे मतदान मृत व्यक्तीच्या नावांवर कार्यकर्त्याकडून करून घेतले. अनेक ठिकाणी पैसे वाटले, दमदाटी करून विरोधकांना मारहाण केली. बाकी शासकीय अधिकार्यांचा वापर कसा करून घेतला हे माझे मलाच माहीत..’
न्यूज चॅनल्सवर यावेळी चाललेल्या चर्चेत…
न्युज एँकर – नवनिर्वाचित नेते नेमके काय काय करून निवडले गेले आहेत हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. धाक दाखवून स्वत:स मतदान करून घेणे, पैसे वाटणे, दम देणे या बाबी म्हणजे त्यांच्या सर्वव्यापी प्रभावाचंच प्रतीक आहे! यावर इथं उपस्थित विचारवंतांना काय वाटतं ते ही आपण पाहू या. नमस्कार सर , काय वाटतं याबाबत?
विचारवंत क्र. १ – खरं सांगू मलाही खूप भारी वाटले हे! हे सर्व करण्यास एक धाडस लागतं आणि तिथल्या लोकांना एक धाडसी नेतृत्व मिळालं आहे, याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
न्यूज एँकर – अगदी बरोबर, ( दुसर्या विचारवंताकडे पाहत) तुम्हाला काय सर?
विचारवंत क्र. २ – अतिशय प्रेरणादायी असा हा विजय आहे. यात सर्वात आवडलं काय तर, दोनतीनशे मृत व्यक्तींच्या नावांवर त्यांनी स्वत:साठी करून घेतलेले मतदान! हे पाहा जीवन हे अपघात नि मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. मृत व्यक्ती जिवंत असतांना मतदान झाले असते तर त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला असताच, पण मृत व्यक्तींच्या नावांवर मतदान करून घेऊन, त्यांना मरणोपरांत मतदानाचा हक्क आपल्या कार्यकर्त्यामार्फत घडवून आणण्याची कल्पकता काही वेगळीच आहे! एक मानवतावादी दृष्टिकोन यात आहे, ज्या कृतज्ञतेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. खरं तर असा मानवतावादी माणूस आज राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त होतोय याचा देशाला अभिमान वाटला पाहिजे.
न्यूज एँकर – वाह, काय वर्णन केलंय तुम्ही. लोकशाहीत केवळ जिवंत व्यक्तींचे नव्हे, तर मृत व्यक्तीचेंही महत्व जाणणारे आणि त्या मृत व्यक्तींना मतदानाचा अधिकार तोही स्वत:च्या कार्यकर्त्यांकडून देणारे हे जगातील पहीलेच राष्ट्राध्यक्ष म्हणून देशासाठी एक भूषण आहेत. पण बराच वेळ झालं मी अजून विचारवंत क्र.३ यांच्याकडे गेलोच नाही, आपण जाणून घेऊया, त्यांचे काय मत आहे मा. राष्ट्राध्यक्षाबद्दल!
विचारवंत क्र. ३ – धन्यवाद, मी तसा तटस्थ आहे, मी राष्ट्राध्यक्षांचा टीकाकार आहे, परंतु त्यांनी मत मिळविण्यासाठी पैसे वाटले ही बाब मला खूप महत्वाची वाटते. आपल्याकडील पैसा मतदारांना वाटावा ही कल्पनाच त्यांच्या निरीच्छपणाचे प्रतीक आहे! आजकाल सर्व लोक पैशाचे लोभी झाले असताना, एक नेता आपल्यजवळची संपत्ती मतदारांना वाटतो, ही बाब कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर एक बाब आवर्जून नमूद करायला हवी ती अशी की, स्वत:ला मतदान मिळावे म्हणून मा. राष्ट्राध्यक्षांनी शासकीय अधिकार्यांचा वापर केला. म्हणजे हे यश प्रशासकीय प्रक्रियेत सहभाग नोंदवत त्यांनी मिळवले आहे, ही बाब जनतेचा शासकीय व्यवस्थांवरील विश्वास वृद्धिंगत करणारी आहे. बाकी धाक दाखवून मतदान करून घेणे हे मला काही पटलेले नाही, याबद्दल मी माझे तटस्थ मत इथे आवर्जून नोंदवतो. अन्यथा उगाच विरोधी पक्षातील लोक माझ्यावर टीका करतील की नि:पक्षपाती नाही म्हणून!
न्यूज एँकर – सर तुम्ही निष्पक्ष आहात हे सर्वांना माहीत आहे, तुमच्यावर कोण कशाला आरोप करतील? मला माहीत आहे, परवा तुमच्या कॉलनीशेजारील वस्तीत आग लागल्यावर तुम्ही पाठवलेल्या पाण्याच्या टँकरमधील मधील पाणी प्रत्येक पेटलेल्या घरावर समान प्रमाणात ओतावे, असे म्हणाला होता!
विचारवंत क्र. ४ – हो , मी रक्तदान करतानाही गरजूंना मी केलेले रक्त समप्रमाणात दिले जावे असा आग्रह धरतो.
न्युज एँकर – आपला निरपेक्षपणा हा कौतुकास्पद आहे. पण आपण इथे सर्वजण आलात आणि मान्यवर राष्ट्राध्यक्षांच्या कौशल्याचे, नेतृत्वाचे कौतुक केले त्याबद्दल आभार मानतो आणि पाहात राहा, आपल्या सर्वाचे लाडके चॅनल…