वामन केंद्रेसारखा रंगकर्मी नाट्याविष्कार, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण या विविध भूमिकांमध्ये अगदी लीलया वावरत असतो. एका शेतकर्याच्या घरातून लोककलांच्या संस्कारातून एक सकस ‘बी’ रुजले आणि त्याने आपल्या सृजनशीलतेच्या कर्तृत्वावर अत्यंत वैभवपूर्ण असा वटवृक्ष भारतभर उभा केला. त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणार्या पुढच्या पिढीसाठी एक स्वच्छ, सुकर असा रस्ता आपल्या कर्तृत्वाने घडवला आहे आणि त्या पिढीला तो स्वत:च्या हाताने त्या रस्त्यावरून पुढे नेत आहे, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
– – –
‘हॅलो… वामन… मी पुरू बेर्डे बोलतोय. एका अतिशय महत्वाच्या प्रोजेक्टवर चर्चा करायची आहे आणि त्यात तुला सहभागीही करायचे आहे. आज संध्याकाळी इरॉस टॉकीजजवळ कॅफे इरॉसमध्ये भेटू या, त्यानंतर सांस्कृतिक सचिव गोविंद स्वरूप यांना भेटायचे आहे..’
वामन केंद्रेला बोलावून घेण्याचे कारणही तसेच होते.
१९९७चा एप्रिल वगैरे महिना सुरू असावा… शिवसेनेचे मनोहर जोशी सर तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सांस्कृतिक मंत्री होते प्रमोद नवलकर. सांस्कृतिक खात्याचे सचिव होते गोविंद स्वरूप. शिवसेना-भाजप युतीचे ‘शिवशाही’चे सरकार होते आणि त्याच दरम्यान ९ ऑगस्ट १९९७ रोजी महात्मा गांधीनी पुकारलेल्या ‘चले जाव’ चळवळीला ५५ वर्षे पूर्ण होणार होती. या चळवळीची घोषणा महात्मा गांधीनी १९४२ साली याच तारखेला मुंबईतल्या गोवालिया टँक मैदान येथे केली होती. आणि त्यानिमित्त भारत सरकारने महाराष्ट्र सरकारकडे ९ ऑगस्ट १९९७ रोजी गोवालिया टँक येथे स्मृतिदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र सरकारने तो दिवस साजरा करायचे ठरवले. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी तशी मंजुरी दिली आणि गोविंद स्वरूप यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली व त्यासंबंधी काय सादरीकरण करता येईल याचा विचार करायला सांगितले. कारण त्याआधी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी सादर होणार्या चित्रपट महोत्सवाच्या सादरीकरणाचे दृकश्राव्य आरेखन आणि दिग्दर्शन मी करीत असे. तसेच शासनातर्फे मंत्र्यांच्या मुलाखतींवर आधारित ‘शिवशाही आपल्या दारी’ ही मालिका दूरदर्शनवर सादर करण्याचे कामही मीच करीत होतो. आणि त्याचे यशस्वी असे ७२ एपिसोड मी सादर केले होते. त्यामुळे त्या अनुभवावर मला पुन्हा बोलावण्यात आले.
या ५० मिनिटांच्या भव्यदिव्य कार्यक्रमात १८५७चा पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचा उठाव ते १९४२ची ‘चले जाव’ची घोषणा असे स्वातंत्र्यलढ्याचे नाट्य ५० मिनिटांत सादर करायचे होते. त्याची संहिता, मांडणी आणि दृकश्राव्य भाग व प्रत्यक्ष नाट्याचे सादरीकरण, त्यातील, नृत्य, गीत, संगीत हे सगळं सांभाळायचं होतं. मराठा फौज, ब्रिटिशांचे व्यापाराच्या निमित्ताने आगमन आणि हळूहळू आक्रमण, भारतीय समाजावर विळखा, त्यानंतर भारताच्या विविध भागातून स्वातंत्र्यासाठी उठाव, सत्याग्रह, हल्ले, सैन्याचा उठाव इत्यादी सर्व प्रत्यक्ष दाखवण्याचे नाट्य उभे करायचे होते. शिवाय गांधी-नेहरूंपासून या लढ्यातली सर्व पात्रे जिवंत करून साकारायची होती. या दृकश्राव्य नाट्याची संहिता तयार झाली आणि लक्षात आले की खूप मोठा कलावंतांचा ताफा लागणार. सगळे गायक, नर्तक, प्रमुख कलावंत, सहायक कलावंत, तंत्रज्ञ, घोडेस्वार, स्टंटमन वगैरे मिळून नाट्य आणि चित्रपट यांच्या चित्रिकरणाचा मोठा व्याप उभा करावा लागणार होता आणि त्यासाठी निर्मिती व्यवस्थापन आणि सहायक दिग्दर्शकांचीही फौज लागणार होती. सगळे मिळून चारशेच्या वर संख्या गेली. जसजसे काम सुरू होऊन पुढे जाणार होते, तसतशी कलावंतांची संख्या जास्त होण्याची शक्यता होती. लेखन, दिग्दर्शन आणि कार्यकारी निर्माता अशा जबाबदार्या एकट्याने घेणं शक्य नव्हतं. एवढ्या मोठ्या शोच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दोन दिग्दर्शकांवर सोपवावी आणि माझ्याबरोबर एक ऑन फील्ड दिग्दर्शक असावा अशी मागणी मी गोविंद स्वरूप यांच्याकडे केली. त्यांनी मला तुम्हाला कोण सहकारी हवा आहे विचारताच मी त्यांना वामन केंद्रेचं नाव सुचवलं.
त्यावेळी वामन केंद्रेची वर्कशॉप मुंबईत चालायची. वामन एनएसडीचा स्नातक. सुप्रसिद्ध कन्नड दिग्दर्शक डॉ. बी. व्ही. कारंथ हे संचालक असताना त्याचं तिथे शिक्षण पूर्ण झालं. कारंथ सरांचेही लोककला या विषयावरचे अत्यंत प्रगल्भ नाट्याविष्कार गाजलेले आहेत. लोककला, लोककाव्य अशा या मातीतल्या आविष्कारांना समृद्धी मानणार्यांपैकी मी एक रंगकर्मी. आणि वामनही महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या दरडवाडी या छोट्याशा खेड्यातला. सूर्यप्रकाशात दिवस आणि कंदिलांच्या प्रकाशात रात्र, अशा छायाप्रकाशात जन्माला आलेला अत्यंत हुशार आणि दांडग्या स्मरणशक्तीचा मुलगा. त्या दरडवाडीसारख्या छोट्याशा खेड्यात शाळा असणं म्हणजे मुंबईच्या चाळीतल्या दहा बाय दहाच्या खोलीत चोवीस तास पाण्याचा स्वतंत्र नळ असण्यासारखं होतं. कच्च्या मातीच्या भिंतीच्या, शेतकर्याच्या घरात जन्माला आलेला वामन एका बाबतीत प्रचंड श्रीमंत होता. ती श्रीमंती कौटुंबिक होती. वडील आणि काका यांच्याकडे लोकसाहित्याचा प्रचंड खजिना होता. गोंधळ, भारुड, कीर्तन ही त्यांची शेती आटोपल्यानंतर फावल्या वेळातली करमणूक होती. त्यामुळे या लोकसंगीतांची आणि लोककाव्याची संपत्ती आपोआपच वामनकडे परंपरेने आणि वडिलोपार्जित हक्काने आली.
खरंतर मूल चालतं बोलतं झालं की सरळ शेतात राबायचं, ही तिथली आणखी एक परंपरा; पण वामनचा एक काका- जो त्याच्यापेक्षा काही वर्षांनी मोठा होता- तो शाळेत त्याच्या चार वर्षं पुढे होता, म्हणून शाळेत जाण्याची वामनची आकांक्षाही पूर्ण झाली. खांद्यावर जुजबी दप्तरांची पिशवी घेऊन घरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या शाळेत चालत जाणे हा शिरस्ता होता. दोन तास कच्च्या रस्त्यावरून पायपीट केल्यावर शाळा यायची. पावसाळ्यात तर गुडघाभर चिखलातून रुतलेला एक पाय बाहेर काढून दुसरा चिखलात टाकून, चार चार तास चालून, वामन शाळेत पोहोचत असे. शाळेची वेळ होईपर्यंत त्या वाड्यात गुरे बांधलेली असत. मुलं समोर येऊन उभी राहिली की गुरे चरायला सोडत, मग वाडा स्वच्छ केला जाई, त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या मुलांना मास्तर शाळेत बोलावून पहिली ते चौथीच्या शाळेचे वर्ग भरवत. त्या वर्षी दुसरीनंतर त्या शाळेत तिसरीत एकच विद्यार्थी होता, तोही शाळा सोडून गेला; त्यामुळे एकट्या वामनसाठी तिसरीचा वर्ग न भरवता, वामनची हुशारी बघून त्याला प्रमोशन देण्यात आले आणि एकदम चौथीत बसवले गेले. त्यावर्षी तिसरीचा वर्गच भरला नाही. त्या खेडेगावातल्या गोठावजा शाळेतून चौथी पास झालेल्या छोट्या वामनला त्यानंतर उच्चशिक्षणासाठी कुटुंबातर्फे तिथून १५ किलोमीटरवर असलेल्या नेकनूर या जरा मोठ्या आणि आठवड्याचा बाजार भरणार्या गावात पाठवण्यात आले. १५ किलोमीटर हे अंतर आज काहीच वाटत नसलं तरी त्या काळात ते जवळ जवळ दरडवाडीतल्या लोकांसाठी मुंबई-दिल्लीइतकंच लांब होतं. कारण त्या गावात पोहोचायलासुद्धा वाहनसुविधा दुर्मिळच होती. बैलगाडी, नाहीतर चालत जाणे किंवा मध्येच असली तर एखादी एसटी; ती पण आली तर आली, नाहीतर चला चालत. तिकडे वामनचं पाचवी ते सातवी शिक्षण झालं. त्या गावात एक खोली भाड्याने घेऊन त्यात वामनचा काका आणि इतर चार विद्यार्थी राहात होते. त्यांच्यात सिनीयर असा वामनचा काका जो सातवीत होता, त्याच्यावर अर्थातच सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी होती. त्या खोलीत कोपर्यात एक चूल होती, त्या चुलीवर सर्वांचे जेवण व्हायचे; त्यासाठी सुक्या लाकडाच्या मोळ्या आणून ठेवल्या जायच्या.
त्याच भागात जवळच श्री बंकटस्वामींचा मठ होता. त्या मठातील स्वामींनी वामनच्या एका दुसर्या मोठ्या चुलत्याला लहानपणीच दत्तक घेतले होते. त्या मठात अनेक भाविक दर्शनाला येत तसेच तिथे अहोरात्र भजन कीर्तन, भारुडे, गोंधळ चालत, प्रवचने होत; या सर्वांचे खूप मोठे आणि फुकट कानावर पडणारे संस्कार त्या वयात वामनवर झाले. या फुकट मिळणार्या संस्कारातून त्या सर्वांचा त्रास होण्यापेक्षा वामनला शिक्षणाबरोबर मिळणारी लोककलांची समृद्धी आणखीनच वाढली. शिवाय नेकनूर हे बाजारचं गाव असल्यामुळे तिथे दर रविवारी मोठा बाजार भरत असे आणि त्यानिमित्ताने दर रविवारी तिथे कुणा नामचंद सोंगाड्यासह तमाशाचा खेळ हा ठरलेला असे. वामन आणि त्याच्या शाळकरी मित्रांना या तमाशाचे खेळ बघण्याचा चसकाच लागला. काळू-बाळू, दत्तोबा तांबे यांच्यासारख्यांचे सुप्रसिद्ध तमाशाचे फड वारंवार लागायचे आणि तुफान गर्दीत ते रात्रभर चालायचे. ते सतत बघण्याइतके पैसे नसल्याने, मग वामन आणि त्याचे मित्र काही ना काही युक्ती करून आत प्रवेश घ्यायचे आणि तमाशा बघायचे. त्या काळी त्या गावात तमाशाच्या खेळाला तिकीट हा प्रकार नव्हता. पैसे घ्यायचे आणि आत सोडायचे, मग बाहेर येताना हातावर ओल्या शाईचा रबर स्टँप मारायचे. त्यांच्या ग्रुपमधला आधी एक मुलगा पैसे देऊन आत जायचा आणि बाहेर येताना हाताला थुंकी लावून ओला करायचा आणि हातावर स्टँप मारून घ्यायचा, मग तो मुलगा धावत जाऊन तोच रबर स्टँप दुसर्याच्या हातावर उमटवायचा, मग तिसर्याच्या हातावर उमटवायचा; अशा प्रकारे एका वेळेस दहा बारा मुलं तमाशाला जायची. पाचवी ते सातवी अशा शाळेच्या तीन वर्षांत वामनने जवळ जवळ दोनशे कनातीतले तमाशे परत परत बघितले.
पुढे काका एसएससीसाठी बीडला गेला आणि त्याच्याबरोबर वामनही आठवीनंतरच्या शिक्षणासाठी बीडला गेला. बीडच्या भगवान विद्यालयातून वामन एसएससी झाला. तिथे जनार्दन मुंडे हे त्याचे शिक्षक आणि इतरही बरेच शिक्षक डाव्या विचारसरणीचे होते, त्या सर्वांचा प्रभाव वामनवर पडला. जनार्दन मोरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा सुरू होता. वामनच्या चटपटीत स्वभावामुळे त्याला या चळवळीत भाषणे वगैरे देण्याच्या जबाबदार्या देण्यात आल्या. मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार होण्याच्या चळवळीत भाषणे आणि मोर्चे या रूपात वामनचा खारीचा वाटा आहे. भाषण म्हणजे नुसती बडबड नव्हे, तर विचारांचा स्रोत, जो कधी ओघवता, तर कधी आक्रमक असतो, हे त्या काळात मिळलेल्या संस्कारात वामनला सापडलं. त्यामुळे वैचारिक सुस्पष्टता आणि उच्चारांचं आणि आवाजातल्या चढउतारांचं महत्व बीडमधल्या शाळा-कॉलेजातूनच वामनला कळले. वक्तृत्वस्पर्धेत बक्षीसं मिळवण्यात वामन इतका माहीर होता की त्या काळात बक्षीसांवर त्याचा चरितार्थ चालायचा.
याच संस्कारांनी पुढे वामनमधल्या जातिवंत शिक्षकाला आणि सर्जनशील दिग्दर्शकाच्या विचारसरणीला खतपाणी घातलं आणि समाजाचं हे देणं हे आपल्यावरचं ऋण आहे या भावनेतून नाटक या आविष्कारकलेकडे तो जाणीवपूर्वक ओढला गेला आणि त्यातून पुढे वामन केंद्रे हा अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक मराठी रंगभूमीला सापडला.
बीडच्याच राजुरीमधल्या नवगण कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर औरंगाबाद विद्यापीठातून नाट्यशास्त्राचा एक वर्षांचा अभ्यासक्रम वामनने केला. तिथे प्रा. कमलाकर सोनटक्के सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथेच एनएसडीसारखं काहीतरी नाट्यशिक्षण देणारं केंद्र दिल्लीत आहे हे कळलं. आपणही तिकडे जावं असं वामनला प्रकर्षाने वाटू लागलं.
मराठवाड्यातल्या खेड्यातून गेलेला हा तरूण दिल्लीच्या एनएसडीच्या हाय फाय वातावरणात थोडा बावचळला, पण नेटाने पुढे गेला. सिलेक्शनच्या मुलाखतीत आजूबाजूच्या शहरी मुलामुलींमध्ये आपली डाळ शिजणार नाही या भावनेनेच तो तिथे बसला होता.
डॉ. कारंथ मुलाखत घेत होते. अनेक विद्यार्थ्यांनी हिन्दी सिनेमातल्या गाण्यांपासून ते अगदी नाटकातल्या स्वगतांपर्यंत अनेक आविष्कार सादर केले. वामनचा तो साधासुधा अवतार इतर विद्यार्थ्यांचं मनोरंजन करीत होता. काय सादर करावं असा प्रश्न पडलेला असताना वामनने अखेर खड्या आवाजात एक भारूड सादर केले आणि डॉ. कारंथ यांनी या मुलाचं पाणी ओळखलं. आणखी काय काय येतं, या प्रश्नावर चारशेच्यावर भारुडं आणि लोकगीतं येतात या त्याच्या उत्तरावर डॉ. कारंथ प्रचंड खूश झाले आणि म्हणाले, या एकाच गोष्टीमुळे तू या सर्वांपेक्षा वेगळा आहेस. हे तुझं वैगुण्य नव्हे, तर ही तुझी ताकद समज, असं म्हणून त्यांनी त्याला एनएसडीमध्ये प्रवेश दिला. या एकाच ताकदीवर विद्यार्थी म्हणून दाखल झालेला वामन पुढे जिद्दीच्या आणि नाट्यविषयक तळमळीच्या जोरावर पुढे काही वर्षांनी त्याच एनएसडीचा संचालक म्हणून नियुक्त झाला, त्यात त्याच्या अंगी असलेल्या प्रशिक्षणगुणांचाही सिंहाचा वाटा आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मेडिकलच्या एन्ट्रन्स परीक्षेत ७५ टक्के मार्क मिळण्याची शक्यता असताना- पास झालो तर डॉक्टर होईन आणि त्यानंतर फार फार तर काय तर प्रॅक्टिस आणि त्यातून हॉस्पिटल्स आणि आणखी हॉस्पिटल्स यापलीकडे काय होणार- म्हणून वामनने परीक्षा दिली नाही. चळवळी आणि भाषणांचा, सामाजिक अन्यायाविरुद्धच्या विचारांचा उद्रेक त्याच्या मनात भडकला आणि आपल्यातल्या अस्वस्थतेच्या आविष्कारचे माध्यम नाटक हेच आहे, तेच काहीतरी स्फोट घडवून आणेल या भावनेने तो नाटकांकडे वळला.
पहिला ब्रेक..
एनएसडीनंतर मुंबईत येऊन बॅकस्टेज तंत्रज्ञ बनून वामनने हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये चंचुप्रवेश केला आणि तो हळू हळू हातपाय पसरू लागला. त्याला केवळ मनोरंजनात्मक नाटके करून त्याकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहायचे नव्हते, तर आपल्या आत चाललेल्या विद्रोही विचारांना वाट देणार्या अविष्काराला सामोरे जायचे होते. अशा परिस्थितीत प्रचंड वाचन असलेल्या वामनच्या हातात ‘झुलवा’ ही उत्तम बंडू तुपे यांची कादंबरी पडली. चेतन दातारने नाट्यरूपांतर केल्यानंतर वामनने दिग्दर्शक म्हणून हेच आपले पहिले नाटक बसवायला घेतले. त्याचे सादरीकरण त्याच्या संस्कारांतून आणि आजवरच्या जडणघडणीतून उभे राहिले. आपले प्रशिक्षण, संगीतविषयक आणि नृत्यविषयक लोककलांचे ज्ञान यांच्या माध्यमातून वामनने मनातला विद्रोह नाटकाच्या आविष्कारात ओतला आणि त्यातून ‘झुलवा’सारख्या जातिव्यवस्थेवर आणि परंपरा व रूढींमध्ये जखडलेल्या समाजाच्या कोंडीवर भाष्य करणारे एक ज्वलंत नाटक उभं राहिलं आणि अजरामर झालं.
‘झुलवा’सारखं नाटक आणि पुढे एनसीपीएमध्ये रिसर्च करण्यासाठी प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे, अशोकजी रानडे यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली वामन कार्यरत होता. ती नोकरी नव्हती, एक प्रकारे उच्चशिक्षणच होतं. ‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक सोडलं, तर वामनने सामाजिक आशय आणि खूप काही सांगून जाणारी नाटकंच केली. त्यात दुसरा सामना (लेखक सतीश आळेकर), नातीगोती (जयवंत दळवी), महाभोजन तेराव्याचे, माध्यम व्यायोम, तीन पैशांचा तमाशा यांच्यासारखी नाटकं प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर केली. एनसीपीएमध्ये पुलंच्या सान्निध्यात आल्यावर ‘झुलवा’ नाटकाच्या दिग्दर्शनावर प्रचंड खूश झालेल्या पुलंकडे वामनने ‘द लास्ट अपॉइंटमेंट’ या मूळ रशियन नाटकावर आधारलेलं ‘एक झुंज वार्याशी’ हे नाटक लिहून देण्याचा आग्रह धरला. पुलंनी त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं. इतक्या गंभीर विषयावरचं नाटक माझ्यासारख्या विनोदी लेखकाने लिहिणे रसिक स्वीकारतील का, असा प्रश्न पुलंना पडला. पण वामनने आत्मविश्वासाने त्यांना लिहायला भाग पाडलं आणि दिलीप प्रभावळकर आणि वसंत सोमण या ताकदीच्या कलावंतांना घेऊन या गंभीर नाटकाचा तितकाच विद्रोही प्रयोग एनसीपीएतर्फे बसवला आणि त्याचे अनेक प्रयोग झाले.
हे सर्व सांभाळून वामन सातत्याने त्याच्या स्वत:च्या ‘रंगपीठ’ या संस्थेतर्फे नियमित नाट्यशिबिरे घेत होता. त्याआधी सत्यदेव दुबे, रमेश चौधरी, जयदेव हट्टंगडी यांच्यासारखे मातब्बर दिग्दर्शक नाट्यप्रशिक्षणाचं कार्य करीत होते. वामनचं ते आवडीचे कार्य आणि त्याला प्रतिसादही खूप मिळत असे…
…तर सांस्कृतिक सचिव गोविंद स्वरूप यांनी मला १९९७ साली ‘संकल्प’ या मेगा प्रॉडक्शनसाठी तुम्हाला दुसरा दिग्दर्शक कोण हवा आहे, हे विचारलं, तेव्हा वामन केंद्रेचं नाव मला चटकन सुचलं. कारण दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष नाट्य, चित्रफिती, दृकश्राव्य, संगीत दिग्दर्शन, नेपथ्यनिर्माण, साहसदृष्ये, स्टंट्स, लढाया, या सर्वांची निर्मिती करायची होती. त्यासाठी संपूर्ण गोवालिया टँक मैदान वापरायचं होतं. शिवाय १२० फूट बाय ४० फुटांचा रंगमंच वापरायचा होता. झाशीची राणी, शहीद भगत सिंग, चापेकर बंधू, रँडचा खून, महात्मा गांधींचे आफ्रिकेत निर्गमन आणि पुन्हा भारतात आगमन, मिठाचा सत्याग्रह ते ‘चलेजाव’ चळवळ यातलं नाट्य सर्व माध्यमांतून उभं करायचं होतं. त्यासाठी मी संहिता, एकूण दृकश्राव्य चित्रिकरण आणि दिग्दर्शन व कार्यकारी निर्माता म्हणून काम करीत होतो. नाट्य दिग्दर्शनासाठी वामन केंद्रेला बोलावलं. नेपथ्य सुबोध गुरुजी करीत होते, तर प्रकाश योजनेसाठी मी कुमार सोहोनीला बोलावलं. संगीत अनिल मोहिले आणि नृत्यदिग्दर्शनासाठी अर्चना जोगळेकर आणि देवेंद्र शेलार यांना बोलावलं. विशाल भारद्वाज यांनी गुलजारजींच्या एका गाण्याचं संगीत केलं. त्यातले स्टंट्स आणि युद्धदृश्यं सादर करण्यासाठी हिन्दी चित्रपटसृष्टीतले फाईट मास्टर बोलावले. या ५० मिनिटांच्या भव्य नाट्याच्या पूर्वतायरीला मी आणि वामनने दोन महिने आधी तयारी केली आणि प्रत्यक्ष रिहर्सल वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन, शेवटचे २५ दिवस सेट लावून गोवालिया टँक मैदानातच तालमी केल्या. या महानाट्याच्या ९ ऑगस्ट १९९७च्या प्रयोगाला, पंतप्रधान इंद्रकुमार गुजारल, राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर तसेच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. या ऐतिहासिक प्रयोगाचं दूरदर्शनवरुन ५७ देशांमध्ये एकाच वेळी लाइव्ह प्रसारण झालं.
या दोन महिन्यांच्या काळात वामनबरोबर खूप छान ट्यूनिंग होत गेलं. या तालमींना लेखक शफाअत खान येऊन बसत असे. आजूबाजूला मेकअपमध्ये बसलेले गांधी, नेहरू, सरोजिनी नायडू वगैरेंना बघून अनेक जण फसत होते. या रिहर्सलच्या विरंगुळ्याच्या क्षणी सिगरेट ओढणारे नेहरू, पेप्सी पिणारे गांधी, तंबाखू खाणारे टिळक आणि पानाचा तोबरा भरलेले वल्लभभाई पटेल साकार करणारी पात्रे बघून शफाअत खानला नाटक सुचलं… ‘शोभायात्रा’. या भव्य दिव्य अनुभवातून पुढे वामन केंद्रेने विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’वर आधारित ‘रणांगण’ हे नाटक केलं आणि यातल्या दृकश्राव्य करामती, आणि गिमिक्स करता करता मला ‘जाऊबाई जोरात’ या नाटकाचा फॉर्म सुचला. ‘संकल्प’च्या अनुभवातून ‘शोभायात्रा’, ‘रणांगण’ आणि ‘जाऊबाई जोरात’ ही तीन नाटके जन्माला आली शिवाय अनेक नवोदित नटांना पुढील कारकीर्दीचा मार्ग खुला झाला.
दुसरा ब्रेक…
वामन केंद्रेमधला दिग्दर्शक विविध प्रयोग तर करतच होता, पण त्याच्यातला प्रशिक्षक गप्प नव्हता बसला. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नाट्य विभाग सुरू व्हावा यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले आणि ‘अकॅडेमी ऑफ थिएटर आर्ट्स’ हा नाट्यविभाग सुरू झाला. त्या विभागाचा पहिला संचालक होण्याचा मान वामनला मिळाला. केवळ हा मान मिळवून वामन गप्प नाही बसला, तर निवडलेल्या विद्यार्थ्यांना बीएनंतर एमएच्या दोन वर्षांमध्ये उत्तम प्रशिक्षण मिळण्यासाठी चांगले प्रशिक्षक कसे येतील आणि सर्व सुविधा विद्यार्थ्यांना कशा मिळतील, याकडेही लक्ष दिलं. या सर्वांवर कळस म्हणजे वामनला ज्या एनएसडीने उच्चप्रशिक्षित केलं त्या दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या संचालक पदासाठी निमंत्रित करण्यात आलं. पाच वर्षांच्या काळात दिल्लीतही अनेक नव्या योजना वामनने त्या काळात राबवल्या. आणि सगळ्यात भरीव कामगिरी म्हणजे, ‘भारतरंग’ हा सकलकला महोत्सव आणि ‘थिएटर ऑलिंपिक’ हा जागतिक दर्जाचा जगभर केलेला नाट्यमहोत्सव.
ब्रेक के बाद…
महाराष्ट्रातल्या अगदी छोट्याशा खेड्यातून एका ध्येयाचा माग काढत स्वत:ची कारकीर्द स्वत:च्या हुषारीवर प्लॅन करून वाटेत आलेला चिखल तुडवत, प्रसंगी खडतर रस्त्यांवरील खडकाळ प्रवास सहन करत मुंबईत पोहोचलेला वामन दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत पोहोचला. अत्यंत शांत आणि मोजक्या शब्दांमध्ये आपले विचार ठामपणे मांडणारा, कोणत्याही संकटांत विचलित न होणारा आणि आनंदाच्या क्षणी भारावून न जाणारा एक परिपक्व विचारवंत म्हणून तो या क्षेत्रात शोधक वृत्तीने वावरत असतो. अभिनेत्री असलेली आणि त्याच्याइतकीच स्वत:ला प्रशिक्षणामध्ये वाहून घेतलेली त्याची पत्नी गौरी केंद्रे ‘रंगपीठ’ या त्यांच्या संस्थेतून बालकलाकार घडवण्याचं मोठं कार्य करत आहे. या दोघांना साथ देत मराठी चित्रपटात नायकाच्या भूमिकेत पदार्पण करणारा त्यांचा सुपुत्र ऋत्विकही या रंगपीठाचा एक महत्वाचा भाग आहे.
महाराष्ट्र सरकारच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत एकाच वेळी आपले दिग्दर्शन असलेली तीनही नाटके प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर नामांकित होऊन पुरस्कारप्राप्त ठरण्याचा विक्रम वामनने केला आहे. शिवाय अनेक मोठमोठे पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. यावर कळस म्हणजे भारत सरकारने पद्मश्री देऊन वामनचा यथोचित बहुमान केला आहे.
वामन केंद्रेसारखा रंगकर्मी नाट्याविष्कार, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण या विविध भूमिकांमध्ये अगदी लीलया वावरत असतो. एका शेतकर्याच्या घरातून लोककलांच्या संस्कारातून एक सकस ‘बी’ रुजले आणि त्याने आपल्या सृजनशीलतेच्या कर्तृत्वावर अत्यंत वैभवपूर्ण असा वटवृक्ष भारतभर उभा केला.
एकेकाळी छोटा वामन शाळेत जाताना चिखलात रोवलेला एक पाय बाहेर काढून, मग दुसरा पुढे ठेवून पुढे जात होता. त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणार्या पुढच्या पिढीसाठी एक स्वच्छ, सुकर असा रस्ता आपल्या कर्तृत्वाने घडवला आहे आणि त्या पिढीला तो स्वत:च्या हाताने त्या रस्त्यावरून पुढे नेत आहे, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.